सौंदाळा गावाचे सरपंच श्री. शरद अरगडे यांची मुलाखत
मुलाखतकार– किशोर खांडेकर

संविधानाच्या 73 व्या घटनादुरुस्तीने ग्राम विकासाशी संबंधित एकूण 27 विषय पंचायतराजकडे वर्ग करण्यात आले. ग्रामपंचायत हा पंचायतराज मधील सर्वात तळाचा परंतु महत्त्वाचा भाग आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, सांडपाणी, निचरा, वीजबत्ती इत्यादी महत्त्वाचे विषयांचे नियोजन व अंमलबजावणी ग्रामपंचायतकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 27 हजार 951 ग्रामपंचायत आहे. त्यांचे वार्षिक बजेट दहा लाख ते दीड करोड रुपयाच्या आसपास असते. त्यातील 80 ते 85 टक्के केंद्र, वीस ते पंधरा टक्के राज्य व एक ते दोन टक्के ग्रामपंचायत स्थानिक कर गोळा करते. या महसुलाचा भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विनियोग करणाऱ्या ग्रामपंचायती बोटावर मोजता येतील. तर उर्वरित मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ग्रामपंचायत जातीयवाद, भाई-भतीजाबाद व भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहात असून पंचायतराजच्या मूल्यांना हरताळ फासतात. म्हणूनच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पंचायतराजची अवस्था अत्यंत वाईट दिसते. या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर गाव खेड्यांबद्दल काय म्हणाले होते, याबाबत त्यांचे मत विचारात घेणे भाग ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘खेड्यातील संकुचित मानसिकतेमुळे देशात राष्ट्रवादी भावना रुजण्यास अडथळा निर्माण होतो. उच्च जातीच्या वर्चस्वामुळे. सत्तेचे विकेंद्रीकरण न होता शोषित वर्गावरील अन्याय वाढतो. त्यामुळे खरी लोकशाही तिथे नांदू शकणार नाही.’ गाव खेड्याकडे डोळसपणे पाहिले असता, स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटल्यानंतरही परिस्थिती फारसा बदल घडलेला दिसत नाही. गेल्या काही वर्षात तर जातीय विषमता व जातीय द्वेष वाढलेला दिसतो आहे.
जात आणि अस्पृश्यतामुक्त गाव करण्याचा निर्णय घेणारे सोंदाळा गाव
अशा या निराशाजनक वातावरणात अहिल्यानगर मध्ये नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीचा जात पंथ, धर्म, वंश याच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही हा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करून राज्यात क्रांतीदर्शक पाऊल उचलले आहे. राज्यानेच नव्हे तर संपूर्ण देशाने हा क्रांतिकारक ठराव सर्व ग्रामपंचायतींना अनिवार्य करावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सरपंच श्री. शरद अरगडे यांच्या दूरदर्शी व कुशल नेतृत्वाखाली खालील ठराव या गावाने एकमताने मंजूर करून घेतलेला आहे?
सौंदाळा ग्रामसभेत मंजूर झालेले ठरावाचे मुद्दे
• मौजे सोंडाळा गावामध्ये जात, पंथ, धर्म, वंश यांच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
• गावातील सर्व नागरिक समान असून ‘माझी जात–मानव’ ही भावना अंगीकारण्यात येईल.
• सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सव आदींमध्ये जातीय भेद पूर्णपणे बंद राहील.
• गावात कोणतीही जातिनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता किंवा सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा व ग्रामपंचायत तात्काळ कारवाई करेल. सोंडाळा गाव जातमुक्त गाव म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात येत आहे.
• हा ठराव शासनाकडे आणि संबंधित विभागांकडे नोंदवहीसाठी पाठविण्यात येईल.
• गावामध्ये जातीय सलोखा, समता व बंधुता याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील. सर्व सार्वजनिक ठिकाणे – पाणीपुरवठा केंद्र, मंदिर, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्वांसाठी समान हक्काने खुले राहतील.
• सोशल मीडियावर जातीय द्वेष व भेदभाव करणारे संदेश टाकले जाणार नाहीत व तसे होऊ दिले जाणार नाहीत. शासनाच्या समता आणि सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.
वर्तमानपत्रात सदर बातमी वाचल्यानंतर मुक्ती विमर्शच्या संपादक मंडळाने असे ठरवले की, सरपंच श्री. शरद अरगडे यांची मुलाखत घेण्यात यावी व त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. अरगडे साहेबांची मोबाईलवरूनच बातचीत झाली त्याची संक्षिप्त टिपणी अशी आहे.
प्रश्न- शरद अरगडे: प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन माझ्या माहितीनुसार एकूण 27 हजार 951 ग्रामपंचायत पैकी केवळ आपल्या ग्रामपंचायतीने हा क्रांतीदर्शी ठराव एक मताने ग्रामसभेत मंजूर करून घेण्यात आला आहे. हा ठराव मांडण्यामागची पार्श्वभूमी काय होती? थोडे विस्तृतपणे विशद करा.
शरद अरगडे: होय निश्चितच: खरे तर गावातील बहुतांश तरुण मंडळी पुरोगामी विचाराची आहे. विधायक विषयांवर गावात नेहमी चर्चा होत राहते. करमाळा गावचे श्री. प्रमोद दादा झिंजाळे ही सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. राष्ट्र प्रथम हा विचार ग्रामसभेतील सर्व नागरिकांना मान्य होताच व आहे. यापूर्वी पण ग्रामसभेने अनेक विधायक पुरोगामी ठराव घेतलेले आहेत. केवळ ठराव घेऊन आम्ही थांबलेलो नाही तर त्याची कठोरपणे अंमलबजावणीही केली जाते. जशी आपण सारे भारत मातेचे सुपुत्र आहोत ही भावना दृढ करण्यासाठी रोज सकाळी दहा वाजता भोंग्यावर राष्ट्रगीत लावण्यात येते. त्यावेळी सगळेजण आपापली कामे सोडून स्तब्ध उभे राहतात व राष्ट्रगीताचा सन्मान करतात.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले तेव्हा शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गावातील प्रत्येक मुलीचे पालकत्व ग्रामपंचायतने स्विकारले त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत करीत आहे. गावात हुंडा घेणाऱ्या विरुद्ध कठोर भूमिका घेऊन हुंडा घेणाऱ्या बद्दल माहिती दिली तर रुपये पाच हजार बक्षीस म्हणून ग्रामपंचायत देते. आमचे गाव बालकामगार मुक्त करण्यात आलेले आहे. गावात कुणी शिवीगाळ केल्यास त्याला पाचशे रुपयांचा दंड सक्तीने केला जातो. खरे तर आईच्या गर्भातून आपण सर्वच जन्माला आलेलो असतो तरीसुद्धा जेव्हा भांडण होतात तेव्हा आई व बहिणींचाच उद्धार केला जातो. हे अत्यंत क्लेशदायक आहे. वचक राहावा म्हणून गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. एकूण 11 जणांना आजपर्यंत दंड झालेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून नवीन प्रकरण आढळली नाही. गावातील विधवा भगिनींना सन्मानपूर्वक वागविण्यात येते. त्यांना गावातल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला आवर्जून बोलवण्यात येते. त्यांनी चांगली वस्त्र व अलंकार घालावे अशी आग्रहाची विनंती पण करण्यात येते. माझ्या वाढदिवसाला मी त्यांच्या कडून औक्षण करून घेतो. रक्षाबंधनाला ग्रामपंचायततर्फे त्यांना हजार रुपयाची ओवाळणी देण्यात येते. विधवांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी ग्रामपंचायत कार्यरत आहे. गतवर्षी एक विवाह झालेला आहे.
प्रश्न: खरं तर एकापेक्षा एक धाडसी निर्णय जे आपण संविधानिक मूल्यांची सुसंगत आहे ते घेतलेले आहेत. आणि ते सुद्धा या धार्मिक उन्माद वाढलेल्या वातावरणात आपण खरेच अभिनंदनास पात्र आहात.
अरगडे साहेब- धन्यवाद : आज मोबाईल ही जागतिक समस्या झाली आहे. मुलांच्या शरीरावर व मनावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे संध्याकाळी सहा ते आठ पर्यंत मुलांकडून मोबाईल काढून घेण्यात येतो व त्यांना अभ्यासाला बसवण्यात येते. मुले खरोखरच अभ्यास करतात की नाही हे पाहण्यासाठी मी स्वतः किंवा उपसरपंच शहानिशा करण्यासाठी घरोघरी भेट देतात. मुली अभ्यास करताना आढळले की त्यांना बक्षीस देण्यात येते. गावात जिल्हा परिषदची चौथीपर्यंतची शाळा आहे. एकूण 195 विद्यार्थी आहेत त्यातील 95 विद्यार्थी सभोवताली गावातून येतात. प्रत्येक विद्यार्थ्याला डेस्क टॉप आहे. शाळेत वायफायची सोय आहे. डिजिटल बोर्डवर शिकवण्यात येते. शिकवण्यासाठी युट्यूब चा समर्पक वापर करण्यात येतो. केंद्रीय नवोदय विद्यालयात आमच्या शाळेतून सगळ्यात जास्त मुले जातात. गावातल्या मुलींसाठी सुकन्या योजना राबवण्यात येते. गेल्या काही वर्षात जातीवाद अंधश्रद्धा वाढीस लागलेल्या दिसतात. जातीवाल्याच्या दुकानातून सामान घेणे, जातीच्याच डॉक्टर वकिलाकडे जाणे इत्यादी प्रकार वाढताना दिसतात. किमान गावात तरी हे प्रकार वाढू नये म्हणून राष्ट्र प्रथम हा विचार प्रत्येकात रुजवण्यासाठी समता, न्याय व बंधुता या तत्वांना दृढ करण्यासाठी गावात विविध कार्यक्रम घेण्यात येतात. जातीय द्वेष वाढला तर राष्ट्राची एकात्मता निश्चित धोक्यात येईल. हे होऊ नये म्हणून आमची जबाबदारी म्हणून आम्ही ग्रामसभेत जात, पंथ, धर्म, वंश याच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही हा ठराव एकमताने घेतला. खरतर साहेब संविधानात अंतर्भूत विधायक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आम्हाला हा ठराव घ्यावा लागतो ही शोकांतिका आहे.
आपल्या पाक्षिकाद्वारे एक विनंती मला करावीशी वाटते. खाजगी कंपनीचा सीएसआर जो इतरत्र जातो तो, ग्रामीण विकासाकडे वळता करावा, आमच्यासारख्या ग्रामपंचायतींना हे पाठबळ मिळाल्यास अजून चांगले राष्ट्रीय कार्य आमच्याकडून घडेल हे निश्चित.
अरगडे साहेबांना धन्यवाद देत मुलाखत आटोपती घेतली. असे राष्ट्रभिमानी दूरदर्शी प्रामाणिक नेतृत्व त्या प्रत्येक ग्रामपंचायतला लाभले तर ग्रामीण भारताचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.