विद्या चौरपगार

नुकताच पार पडलेला महिला क्रिकेट सामना दोन अर्थाने वैशिष्टपूर्ण व आगळावेगळा ठरला. पहिले म्हणजे या सामन्यातून स्त्रियांनी क्रिकेट जगताला नवीन ओळख दिली आणि दुसरे महत्वाचे वैशिष्ट असे की, या सामन्यातून धर्म, प्रांत,पंथ भाषा, जात हा भेद बाजूला सारत मानवी समूहजीवनातील एकत्वाची व आपलेपणाची भावना प्रकर्षाने जाणवली. मोगा, रोहतक, बोकाखात (आसाम), घुवारा (उत्तर प्रदेश), इरामल्ले (आंध्र प्रदेश), रोहरू (हिमाचल प्रदेश) आग्रा, सांगली, देहराडून अशा शहरांमधून महिला खेळाडू या संघात सामील होत्या. कोणालाही कोणाचा धर्माशी जाती पंथाशी काही संबंध नाही. त्या एकजुटीने खेळल्या केवळ राष्ट्रासाठी. सामना जिंकल्यावर भारतभर जल्लोष करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवरील भावनात्मक एकात्मता दर्शवणारे हे वास्तव होते.
अशीच भावनात्मक एकता ‘राष्ट’ या संकल्पनेत निहित असणे अपेक्षित आहे. याच प्रकारच्या भावनिक राष्ट्रीय एकतेची साद डॉ. आंबेडकरांनी भारतीय जनतेला दिली आहे. आंबेडकरांनी मानवतेच्या सीमेवर सर्वसमावेशक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आहे.
सामान्यतः अनेक देशांमधील विचारवंतांना धर्म, शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती व इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी “राष्ट्रवाद’ हे प्रभावी साधन वाटत आले आहे. त्यामुळे एकोणिसाव्या शतकापासून “राष्ट्रवाद’ या संकल्पनेचा प्रभाव जगभर जाणवू लागला. जगातील अनेक राष्ट्रे या काळात आधुनिक राष्ट्र निर्मितीच्या मार्गावर लागली होती. भारतातही राष्ट्र निर्माण प्रक्रियेने जोर धरला होता. एकीकडे धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेची सांगड घालणारा हिंदुत्ववादी राष्ट्रवाद हा पहिला प्रवाह. विविधतेतील एकतेला अधोरेखित करणारा, उदारमतवादी विचारसरणीचा गांधी–नेहरूंचा राष्ट्रवाद हा दुसरा प्रवाह. तर जोतिराव फुले, आगरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विवेकनिष्ठ दृष्टीकोनातून उभा राहिलेला, सामाजिक न्यायाला केंद्रस्थानी ठेवणारा राष्ट्रवाद हा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रवाह मानला जातो.
अशा काळात डॉ. आंबेडकरही आधुनिक राष्ट्र निर्मितीसाठी लढा देत होते. त्यांच्या राष्ट्र या संकल्पनेत सामाजिक व भावनिक एकरूपतेचा विचार अंतर्निहित होता. शेकडो, हजारो जातींनी विभागलेले लोक हे एक “राष्ट्र” कसे होऊ शकतील,? असा प्रश्न त्यांच्या राष्ट्र संकल्पनेत केंद्रस्थानी होता.त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना विवेकशील, मानवतावादी, धर्मविहीन, इहवादी स्वभावाची होती. आंबेडकरांच्या राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेत एक खोल भावनिक नातेसंबंध समाविष्ट होता—“इतर कोणत्याही गटाचा भाग होऊ नये अशी तीव्र इच्छा” (आंबेडकर 1946: 31). अशी भावना निर्माण होण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक असतात? समान वंश, संस्कृती आणि भाषा यांमुळे भारतीय संदर्भातील देशभक्तीची पायाभरणी होऊ शकते… परंतु राष्ट्रीयत्व अस्तित्वात येण्यासाठी केवळ समान वंश, भाषा किंवा संस्कृती पुरेशी नव्हती. त्यासाठी भावनिक नात्याचा बंध आवश्यक होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “राष्ट्र म्हणून जगण्याची इच्छा” (आंबेडकर 1946: 39) आवश्यक होती. देशभरातील विविध जात, धर्म, भाषा, श्रद्धा यांच्या विवेचनातून प्रकटलेली एकत्वाची भावना हे राष्ट्रवादाचे केंद्रक आहे असे ते म्हणत.
वास्तविकत: डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा केवळ वसाहतविरोधी राजवटीला प्रत्युत्तर नव्हे, तर प्रचलित व प्रस्थापित सामाजिक-आर्थिक संरचनेच्या पुनर्रचनेची गरज या विचारातून आला होता. डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीयत्व या संकल्पनेत “सामाजिक भावना” जी बांधिलकीची भावना निर्माण करण्याला महत्व दिले होते. डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा “विवेकनिष्ठ राष्ट्रवादासोबतच भावनिक राष्ट्रवादाची साद घालणारा आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते, “केवळ भौगोलिक आकार असलेला “देश” म्हणजे “राष्ट्र” नव्हे. समान भाषा, वंश, जात, श्रद्धा व अस्मिता म्हणजे “राष्ट्र” नव्हे. उलट “राष्ट्र” ही एक वस्तुनिष्ठ समूहभावना आहे… ती सद्सद्विवेकशक्तीची भावना आहे’ (लेखन आणि भाषणे, खंड 3, पृ. 308-9) वंश, भाषा, भूगोल व संस्कृती या गोष्टी निखळ राष्ट्रीयत्वाच्या प्राथमिक गरजा नव्हेतच, असे ते निक्षून सांगत असत.
डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रासाठी अध्यात्माऐवजी सामाजिक नीतीला, धर्मनिष्ठेपेक्षा विवेकनिष्ठेला, वंश, जन्म, भाषा, अस्मिता या खुज्या घटकांऐवजी उदात्त मानवतेला महत्त्व देत असत. वंशश्रेष्ठत्वाला, भाषिक अहंकारांना समूळ नकार देणारा व समाजातील सर्व जाती, वर्ग, धर्म समूहांचे हक्क व अधिकार सुरक्षित करणारा उदात्त राष्ट्रवादी विचार त्यांनी मांडला. मानवी समूहजीवनातील एकत्वाची व आपलेपणाची भावना हाच राष्ट्रवादाचा मूलाधार आहे असे ते मानत.