लेखक : डॉ. एँड. महेंद्र जाधव, हैदराबाद

कधी विचार केलात का-आपल्या लाेकशाहीचं खरं मापदंड काय आहे? ती फक्त दर पाच वर्षांनी मतहक्कात सीमित आहे का, की आपल्या राेजच्या जगण्यात जिथे एका शेतक-याचं कर्ज, एका मजुराचा घाम, एका तरुणीचं स्वप्न आणि एका वृद्धाचा निवृत्तीवेतनाचा हक्क यांच्याशी लाेकशाहीचं थेट नातं असतं? या प्रश्नाचं उत्तर शाेधताना आपण भारतीय लाेकशाहीच्या आर्थिक पायाकडे क्वचितच गांभीर्याने पाहताे.
भारतीय संविधान हे केवळ कागदावर छापलेले शब्द नाहीत; ते एक जिवंत, श्वास घेणारं तत्त्वज्ञान आहे, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या आशा-आकांक्षा, हक्क आणि जबाबदा-यांचा संगम आहे. मात्र, या जिवंत दस्तऐवजातील एक महत्त्वाचा घटक आर्थिक न्यायाची संवैधानिक चाैकट अनेकदा दुर्लक्षित राहिली आहे. ही चाैकट बाजूला पडली, तर लाेकशाही बाह्यरूपाने तेजस्वी दिसली तरी आतून पाेकळ राहते; चमकदार मुखवट्याखाली असमानतेची, असुरक्षिततेची आणि अन्यायाची पाेकळी लपलेली असते.
संकल्पनेचा उदय: जेम्स एम. बुकॅनन आणि संवैधानिक अर्थशास्त्र: अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेम्स एम. बुकॅनन यांनी 1980 च्या दशकात संवैधानिक अर्थशास्त्र (Constitutional Economics) ही संकल्पना मांडली. याचा गाभा असा, आर्थिक धाेरणे केवळ बदलत्या राजकीय हितासाठी न ठरता, संविधानात अधिष्ठित न्याय, समता आणि स्वातंत्र्य यांच्या चाैकटीत असावीत. बुकॅनन यांनी ही संकल्पना मांडण्यामागे स्पष्ट कारणे हाेती:
1. लाेकशाहीत सत्ताधारी नेते अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी तात्कालिक आर्थिक निर्णय घेतात.
2. अशा निर्णयांमुळे राजकाेषीय शिस्त, करव्यवस्था आणि सार्वजनिक खर्चावरदीर्घकालीन नकारात्मक परिणाम हाेतात.
3. त्यामुळे आर्थिक धाेरणांचे नियम संविधानात पूर्वनिश्चित असणे आवश्यक आहे, जेणेकरून काेणत्याही सरकारला मनमानी बदल करता येणार नाहीत. महत्त्वाच्या दृष्टीने, बुकॅनन यांची संवैधानिक अर्थशास्त्र संकल्पना सार्वजनिक खर्च, कर आणि कर्जमर्यादेवर संविधानिक नियंत्रण ठेवून शासन अधिक शिस्तबद्ध बनवते.
बदलत्या सरकारांमुळे हाेणारे आर्थिक अस्थैर्य राेखून दीर्घकालीन स्थैर्य सुनिश्चित करते. तसेच सत्ताधारी वर्गाच्या आर्थिक गैरवापरापासून नागरिकांचे संरक्षण करते आणि धाेरणनिर्मिती अधिक स्पष्ट, पारदर्शक व जबाबदार बनवते. थाेडक्यात, ही संकल्पना लाेकशाही आणि अर्थव्यवस्था यांना एकत्र बांधून ठेवणारा संविधानिक पाया निर्माण करते, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य, शिस्त आणि न्याय कायम राहताे. भारतीय संदर्भ आणि माझ्या संशाेधनाची दिशा: माझ्या संशाेधनाच्या प्रवासात मी या तुलनेने
नव्या, परंतु क्रांतिकारक तत्त्वज्ञानाशी परिचित झालाे आणि त्या क्षणी प्रकर्षाने जाणवलं की भारतीय संदर्भात संवैधानिक अर्थशास्त्राचे महत्त्व विलक्षण आहे. कारण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे स्पष्ट उद्दिष्ट म्हणून नमूद आहे, तरी प्रत्यक्ष धाेरणनिर्मितीत या संकल्पनेचा दृष्टिकाेन अद्याप पुरेशा प्रमाणात रुजलेला नाही. कारण भारतीय राज्यघटनेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची त्रिसूत्री तत्त्वे स्पष्टपणे अधाेरेखित केली असली, तरी प्रत्यक्ष धाेरणनिर्मितीत संवैधानिक अर्थशास्त्राचा दृष्टिकाेन आजही पुरेशा प्रमाणात रुजलेला नाही. त्यामुळे, या संकल्पनेचा सखाेल अभ्यास आणि प्रभावी अंमलबजावणी भारतीय घटनाशास्त्रात (Constitutional Jurisrudence) एक नवा, मार्गदर्शक आणि परिवर्तनशील टप्पा ठरू शकते. हाच दृष्टिकाेन अखेर माझ्या पीएच.डी. संशाेधनाचा केंद्रबिंदू
बनला. संवैधानिक अर्थशास्त्र ही एक अशी बहुआयामी संकल्पना आहे जी: 1. संविधानातील तत्त्वांचा आर्थिक परिणाम अभ्यासते, 2. संपत्तीच्या न्याय्य वितरणाचे मार्ग दाखवते, 3. आर्थिक धाेरणनिर्मितीचे नैतिक आधार ठरवते, सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास यांचा समताेल साधते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या आराखड्यात संवैधानिक अर्थशास्त्राच्या तत्त्वांना जिवंत रूप दिले. संविधानाच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद केलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय त्रिविध न्यायाचे उद्दिष्ट केवळ एक घाेषवाक्य नाही, तर शासनाच्या प्रत्येक धाेरणाचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. मूलभूत हक्कांच्या कलम 14 ते 18 पर्यंत समानतेची हमी देण्यात आली आहे, जी प्रत्येक नागरिकाला भेदभावापासून मुक्त आणि समान संधींनी परिपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करते. याचबराेबर, राज्य धाेरणाची मार्गदर्शक तत्त्वे (Directive Princiles of State Policy) (कलम 36 ते 51) आर्थिक न्यायाच्या चाैकटीची मांडणी करतात, ज्यामुळे विकास केवळ काहींच्या हातात केंद्रीत न राहता सर्वांपर्यंत पाेहाेचताे. या तत्त्वज्ञानाचे ठाेस पुरावे भारतीय संविधानातील अनेक आर्थिक तरतुदींमध्ये दिसतात. उदाहरणार्थ, कलम 39 (ब) आणि (क) अंतर्गत संपत्ती व उत्पादन साधनांचे विकेंद्रीकरण अशा पद्धतीने करण्याचा आग्रह आहे, ज्यामुळे सामूहिक हित साधले जाईल
आणि संपत्तीचे अन्याय्य एकवटणे टळेल. कलम 43 मध्ये सर्व कामगारांना जीवनासाठी पुरेसे वेतन, मानवी सन्मान राखणा-या व कामाविषयी समाधान देणा-या अटी, तसेच संस्कृतीला अनुरूप जीवनमानाची हमी दिली आहे. याशिवाय, कलम 43 (ब) सहकारी चळवळीच्या संवर्धनावर भर देते, कारण सहकारी चळवळी आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन मानल्या जातात. या विचारसरणीचा मापदंड केवळ आर्थिक कार्यक्षमतेपुरता मर्यादित नाही; ताे न्याय्यतेच्या परीक्षेलाही सामाेरा जाताे. यामध्ये ‘अर्थव्यवस्था काेणासाठी‘ हा प्रश्न विचारला जाताेच, पण त्यासाेबत ‘अर्थव्यवस्थेमुळे काेण मागे राहणार नाही‘ हा समावेशक दृष्टिकाेनही अंतर्भूत आहे. अशा प्रकारे, संवैधानिक अर्थशास्त्राचा हा पाया भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत घट्ट गुफंलेला आहे आणि आपल्या सामूहिक भवितव्याची आर्थिक रूपरेषा ताेच निश्चित करताे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं दृष्टिकाेन: केवळ अर्थशास्त्र नव्हे, तर सामाजिक न्यायाचं साधन:
राज्यघटना हा काेणत्याही देशाचा पाया असताे. ती देशाचे मूलभूत तत्त्वे, सरकारची रचना, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये, तसेच राज्य आणि नागरिक यांच्यातील संबंध निश्चित करते. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात माेठी लिखित राज्यघटना आहे, जी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाच्या तत्त्वांवर आधारित आहे. संवैधानिक अर्थशास्त्र अर्थशास्त्राचा एक विशिष्ट भाग आहे, जाे राज्यघटनेच्या आर्थिक पैलूंचा अभ्यास करताे. यात सरकारच्या आर्थिक धाेरणांचे विश्लेषण, संसाधनांचे वितरण, आर्थिक स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण यांचा समावेश हाेताे. या संकल्पनेचा उगम 20व्या शतकातील अर्थशास्त्रज्ञ जेम्स बुकानन आणि रिचर्ड मॅकेंझी यांच्या कार्यातून झाला. बुकानन यांनी यावर जाेर दिला की, राज्यघटनेच्या चाैकटीत आर्थिक धाेरणे बनविली पाहिजेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक विकास हाेईल. जेम्स बुकॅनन सारख्या अर्थशास्त्रज्ञांनी राज्याच्या आर्थिक निर्णयांवर संविधानिक अंकुश ठेवण्याची गरज मांडली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही संकल्पना भारतीय वास्तवात अधिक उंचीवर नेलेली आपण पहाताे. पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांनी Constitutional Economics ला मुख्यतः कर-धाेरणं, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि सार्वजनिक खर्चाच्या मर्यादांशी जाेडून पाहिलं. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी ती केवळ शासकीय लेखाशास्त्राची चाैकट नव्हती; ती सामाजिक क्रांतीचा गाभा हाेती. त्यांच्यासाठी आर्थिक संसाधनांचं पुनर्वाटप, शैक्षणिक संधींचं समान वितरण, जमिनीच्या मालकीतील सुधारणा आणि श्रमिकांच्या हक्कांचं संरक्षण हे फक्त आर्थिक धाेरण नव्हतं ते संविधानाच्या आत्म्याचा विस्तार हाेतं.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट हाेती: जर अर्थव्यवस्था सामाजिक न्यायाला बगल देते, तर ती संविधानिक नाही, जरी ती कायदेशीर वाटली तरी. त्यांनी State Intervention ला बाजारशक्तींवर वरचढ ठेवलं, कारण बाजार कधीही ऐतिहासिक अन्याय आपाेआप सुधारत नाही. त्यांच्या मते, आर्थिक धाेरणाचं अंतिम उद्दिष्ट हे केवळ वाढ (growth) नसून समता (equality) आणि सन्मान (dignity) असावं. हीच ती जागा आहे जिथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी Constitutional Economics ला पाश्चिमात्य संकल्पनेच्या चाैकटीतून बाहेर काढून मानवी मुक्तीच्या चळवळीशी जाेडून टाकलं ते ही 70 दशक अगाेदर जागतिक पातळीवर, जेम्स बुकॅननसारख्या अर्थशास्त्रज्ञांनी 20व्या शतकात Constitutional Economics चं विश्लेषण केलं, पण त्यात सामाजिक विषमतेच्या ऐतिहासिक मुळांवर फारसा भर नव्हता. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मात्र, आर्थिक समतेला Political Democracy चा अपरिहार्य आधार मानत हाेते. त्यांचा ठाम विश्वास हाेता की राजकीय लाेकशाही ही आर्थिक लाेकशाहीशिवाय टिकू शकत नाही हा विचार अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञांच्या चाैकटीतून स्पष्ट दिसत नाही.
त्यांची ही दृष्टि म्हणजे एक प्रकारचा Philosohical Leapt हाेती. ती सांगते की संविधान म्हणजे केवळ कायद्यांचा संग्रह नसून ताे Social Contract आहे, पण ताे करार केवळ व्यक्तींमध्ये नव्हे, तर इतिहासाशी, न्यायाशी, आणि येणा-या पिढ्यांशी आहे. अशा सामाजिक करारात आर्थिक न्याय हे केवळ परिशिष्ट नसून केंद्रबिंदू ठरतं.
अमेरिकेच्या घटना-निर्मितीच्या क्षणी, 1789 साली, जाॅन लाॅकचे विचार संस्थापकांच्या मनात ठळक हाेते, ‘जीवन, स्वातंत्र्य आणि मालमत्ता‘ हे प्रत्येक व्यक्तीचे अविचल हक्क आहेत. चार्ल्स बियर्डने नंतर या घटनालेखनामागील सामाजिक-आर्थिक हेतू उघड केला, त्यानी सांगितले की अमेरिकन संविधान प्रामुख्याने जमीनदार आणि व्यापा-यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करते. त्या काळातील अर्थनीतीचा पाया हाेता अॅडम स्मिथच्या ‘अदृश्य हात‘ संकल्पनेवरचा विश्वास की बाजार स्वतःच स्वतःचे नियमन करेल, आणि राज्य हे फक्त सुरक्षा व करारपालनासाठी आवश्यक आहे. परंतु 2008 च्या आर्थिक संकटाने या विश्वासाच्या पायाला तडे दिले, कारण बाजाराने स्वतःच्या लालसेला आवर घालण्यात अपयश पत्करले, आणि लाखाे लाेकांना त्याची किंमत चुकवावी लागली.
दुसरीकडे, रशियात 1917 च्या क्रांतीनंतर मार्क्सच्या ‘प्रत्येकाजवळ त्याच्या गरजेनुसार‘ या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. काही दशकांच्या प्रयाेगांनंतर, 1993 च्या नव्या घटनेत रशियाने वेगळा मार्ग स्वीकारत बाजार अर्थव्यवस्था अंगीकारली, मात्र नैसर्गिक संसाधनांवरील राज्याचे नियंत्रण कायम ठेवले. पीटर बॅरेनबाेइम यांनी या दृष्टिकाेनाला ‘आर्थिक सार्वभाैमत्वाचा दस्तऐवज‘ असे संबाेधले, कारण येथे संविधान हा केवळ कायद्यांचा संग्रह नसून राष्ट्राच्या आर्थिक स्वायत्ततेचा भक्कम पाया आहे. तरीही, मूलभूत प्रश्न उरताेच. सत्ताधारी ऑलिगार्क्स हे तत्त्वज्ञान प्रत्यक्षात किती प्रामाणिकपणे पाळतात?
भारताचा प्रवास या दाेन्ही टाेकांच्या मध्ये वेगळ्या स्वरूपाचा हाेता. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना बाैद्ध तत्त्वज्ञानातील समता स्वतंत्रता अणि बंधुता यांना आधुनिक लाेकशाहीतील मूलभूत हक्क आणि कार्यक्षम शासनव्यवस्थेशी जाेडले. हे समीकरण अनाेखे हाेते आध्यात्मिक नैतिकता आणि आधुनिक राजकीय अर्थशास्त्राचा संगम. पण व्यवहारात, जात, धर्म आणि भ्रष्टाचाराच्या अडथळ्यांनी या तत्त्वज्ञानाच्या अखंड प्रवाहाला वारंवार अडवले. तरीही, भारतीय संविधान आजही अशा लाेकशाहीचे प्रतीक आहे जिथे धर्म, समाज आणि अर्थव्यवस्था एका विस्तृत नैतिक चाैकटीत सहअस्तित्व साधण्याचा प्रयत्न करतात.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या आराखड्यात संवैधानिक अर्थशास्त्राच्या तत्त्वांना जिवंत रूप दिले. संविधानाच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद केलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे त्रिविध न्यायाचे उद्दिष्ट केवळ एक घाेषवाक्य नाही, तर शासनाच्या प्रत्येक धाेरणाचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. मूलभूत हक्कांच्या कलम 14 ते 18 पर्यंत समानतेची हमी देण्यात आली आहे, जी प्रत्येक नागरिकाला भेदभावापासून मुक्त आणि समान संधींनी परिपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करते. याचबराेबर, राज्य धाेरणाची मार्गदर्शक तत्त्वे (कलम 36 ते 51) आर्थिक न्यायाच्या चाैकटीची मांडणी करतात, ज्यामुळे विकास केवळ काहींच्या हातात केंद्रीत न राहता सर्वांपर्यंत पाेहाेचताे. तथापि, या तरतुदींची अंमलबजावणी अपेक्षित प्रमाणात झालेली नाही. देशातील अनेक घटकांमध्ये आर्थिक असमानता, बेराेजगारी, शेती संकट आणि गरिबी या समस्या अजूनही कायम आहेत. शेतीक्षेत्रातील गंभीर अडचणी, औद्याेगिकीकरणाचा अभाव आणि राेजगाराच्या मर्यादित संधींमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावलेला आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण, सहकारी शेतीची अंमलबजावणी आणि विमा उद्याेगावर राज्याचे नियंत्रण अशा दूरदृष्टीपूर्ण कल्पना मांडल्या हाेत्या, परंतु त्या याेग्य प्रकारे राबविल्या गेल्या नाहीत. त्यांच्या दृष्टीने, अर्थव्यवस्था ही केवळ GDP च्या आकडेवारीचा खेळ नव्हती; ती सामाजिक न्याय साध्य करण्याचे सर्वात प्रभावी आणि परिवर्तनकारी साधन हाेती. त्यांच्या States and Minorities या पुस्तकात मांडलेल्या उपाययाेजनांमध्ये राष्ट्रीयीकरण, संसाधनांचे समान वितरण, सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा याेजना आणि शेतीवर सार्वजनिक नियंत्रण यामागे एकच ठाम उद्देश हाेता: ‘अर्थव्यवस्था ही फक्त श्रीमंतांच्या हितासाठी नसावी; ती प्रत्येकाच्या जीवनात न्याय, समता आणि सन्मान आणणारी असावी.’
जगभरातील अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्था आणि न्याय याबाबत आपापले सिद्धांत मांडले, परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकाेन त्याहून अधिक व्यापक आणि वास्तवाशी जाेडलेला हाेता. एडम स्मिथ यांनी मुक्त बाजारपेठेचे महत्त्व अधाेरेखित केले, परंतु जातीय विषमता आणि ऐतिहासिक अन्याय या खाेलवर रुजलेल्या प्रश्नांना सामाेरे जाण्यासाठी त्यांच्या विचारांत काेणतेही ठाेस उत्तर नव्हते. जाॅन राॅल्स यांनी ‘न्यायाच्या तत्त्वां’वर भर दिला, तरी भारतासारख्या देशातील जातव्यवस्था आणि सामाजिक वास्तवाशी ताे सिद्धांत पुरेसा सुसंगत नव्हता. अमर्त्य सेन यांनी ‘क्षमताविकास’ची संकल्पना मांडली, परंतु तिच्या संस्थात्मक अंमलबजावणीची क्षमता तुलनेने मर्यादित हाेती. याउलट, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाेकशाहीचे तीन स्तंभ स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे केवळ राजकीय चाैकटीत न ठेवता आर्थिक नियाेजनाच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळे ते फक्त अर्थतज्ज्ञ नव्हते; तर संविधानिक अर्थशास्त्राचे खरे स्थापत्यकार हाेते, ज्यांनी अर्थव्यवस्थेला सामाजिक न्याय साध्य करण्याचे प्रभावी साधन बनवले.
संविधानिक नैतिकता आणि संविधानिक अर्थशास्त्र: संविधान हे केवळ कागदावर छापलेले शब्द नाहीत, तर जीवन जगण्याचे एक गहन तत्त्वज्ञान आहे. पण या तत्त्वज्ञानाला खरी अर्थवत्ता काेण देताे? उत्तर स्पष्ट आहे न्यायपालिका. भारतीय संविधानाच्या कलम 32 आणि 226 अंतर्गत, न्यायपालिकेला संविधानाचा अर्थ स्पष्ट करण्याचा आणि मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याचा विशेषाधिकार आहे.
म्हणूनच, न्यायालये केवळ कायद्याचे अर्थ लावणारी संस्था नाहीत, तर ते समाजाच्या हक्कांचे पहारेकरी आहेत. आर्थिक न्याय हा संविधानाच्या तत्त्वज्ञानाचा कणा आहे. ताे केवळ पैशाचे समसमान वाटप नसून, ‘प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार’ हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया आहे.
प्रस्तावनेत ‘सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय’ यांचा समावेश याच कारणासाठी करण्यात आला. पण आव्हाने माेठी आहेत. ऑक्सफॅमच्या च्या अहवालानुसार, भारतातील 1% श्रीमंत लाेकांच्या संपत्तीत 70% गरीब लाेकांच्या संपत्तीइतका हिस्सा आहे. संविधानातील निर्देशक तत्त्वे (कलम 36-51) हे बदल घडवण्यासाठी मार्गदर्शक आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी अजूनही अपुरी आहे. कलम 38 राज्याला सामाजिक आणि आर्थिक असमानता कमी करण्याची जबाबदारी देताे, तर न्यायालयांनी अनेक निर्णयांत आराेग्य, शिक्षण आणि राेजगार हे मूलभूत हक्क असल्याचे मान्य केले आहे.
याच ठिकाणी संविधानिक अर्थशास्त्र (ConstitutionalEconomics) हा संकल्पनात्मक पूल म्हणून उभा राहताे. संविधानिक अर्थशास्त्र हे केवळ अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीकडे पाहत नाही, तर ती कशी संविधानातील मूल्यांशी सुसंगत राहील हे तपासते. याचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक धाेरणे आणि संसाधनांचे वितरण हे केवळ बाजाराच्या तत्त्वांवर नव्हे, तर न्याय, समता आणि सामाजिक कल्याण या संविधानिक उद्दिष्टांवर आधारित असावे. उदाहरणार्थ, जेव्हा सरकार बजेट आखते किंवा करसंकलनाचे धाेरण ठरवते, तेव्हा संविधानिक अर्थशास्त्राचा दृष्टीकाेन विचारताे. या धाेरणामुळे सर्वात वंचित घटकांना फायदा हाेताे का? की फक्त संपन्न घटकांचे हितसंबंध साधले जातात?
हा दृष्टिकाेन राॅल्सियन विचारसरणीशी सुसंगत आहे, जिथे सर्वात कमजाेर घटकांची स्थिती सुधारण्याला प्राधान्य दिले जाते. तथापि, आंबेडकरवादी दृष्टिकाेन यापेक्षा एक पाऊल पुढे जाताे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी, केवळ वंचित घटकांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न पुरेसे नव्हते; त्यांनी सामाजिक रचनेतील मूळ विषमता, विशेषतः जातीय आणि संरचनात्मक अन्याय, संपुष्टात आणण्यावर भर दिला. राॅल्सियन न्यायाची संकल्पना आर्थिक आणि सामाजिक संधींच्या पुनर्वाटपावर केंद्रित असताना, आंबेडकरवादी दृष्टिकाेन त्या संधींना अडथळा आणणा-या ऐतिहासिक बेड्या माेडून काढण्यावर लक्ष केंद्रित करताे. त्यामुळे, त्यांच्या दृष्टिकाेनात न्याय हे केवळ वितरणात्मक (distributive) न राहता परिवर्तनात्मक (transformative) स्वरूप धारण करते जे ख-या अर्थाने संविधानिक अर्थशास्त्राच्या मूलभूत गाभ्याशी सुसंगत आहे. तुलनात्मक दृष्टिकाेनातून पाहिले तर अमेरिकन संविधान व्यक्तिस्वातंत्र्य आणि मालमत्तेच्या हक्कांवर भर देते. चार्ल्स बियर्ड यांनी त्याला श्रीमंत वर्गाच्या हिताचे दस्तऐवज म्हटले, आणि 2008 च्या आर्थिक संकटानंतर सरकारला बाजारात हस्तक्षेप करावा लागला. रशियात साम्यवादी माॅडेल अंतर्गत राज्य आर्थिक संसाधनांचे वितरण करते, तर रशियन केंद्रीय बँक स्वतंत्र राहून स्थैर्य राखते. भारताने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली समता आणि न्यायाचे तत्त्व आत्मसात केले आहे, पण शेती सहकारीकरणासारख्या महत्त्वाच्या सूचनांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले हाेते की, संविधान हे केवळ कागदाचा कपटा नसून, ते समाजाच्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे. संविधानिक अर्थशास्त्र हीच त्या गाभ्याची आर्थिक चाैकट देते जिथे धाेरणे, कायदे आणि बजेटिंग ही सर्व प्रक्रिया संविधानाच्या आत्म्याशी सुसंगत राहतात. जाॅन राॅल्सच्या न्यायसिद्धांताप्रमाणेच, भारतीय संविधानही सर्वात वंचितांच्या हिताची काळजी घेण्याचे उद्दिष्ट ठेवते. यासाठी राजकीय इच्छाशक्ती, नागरिकांची जागरूकता, आणि विधानमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका यांचा सुसंवाद आवश्यक आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत अधाेरेखित केलं की, ‘संविधान चांगलं असलं तरी चालत नाही; त्याची अंमलबजावणी करणा-यांची नैतिकता त्याहून श्रेष्ठ असली पाहिजे.’ याचा अर्थ असा की आर्थिक धाेरणं केवळ अर्थतज्ज्ञ किंवा राजकारण्यांच्या हाती साेपवून चालणार नाहीत; ती संविधानाच्या मूलभूत गाभ्याशी आणि त्यातील न्याय, समता व स्वातंत्र्य या मूल्यांशी सुसंगत असली पाहिजेत. आजच्या भारतात, जेथे धाेरणं बहुतेक वेळा बाजाराच्या दबावाखाली घेतली जातात, जेथे संपत्ती काही हातात केंद्रित हाेते आणि लाेकशाही फक्त राजकीय भाषणांपुरती मर्यादित राहते, तेथे संविधानिक अर्थशास्त्राची आवश्यकता अधिकच जाणवते. हे विचार मांडल्यास, धाेरणकर्ते आपल्याला हे आठवण करून देतील की ते जनतेचे सेवक आहेत, बाजाराचे नाेकर नाहीत.
लाेकशाही: राजकीय स्वातंत्र्यासाेबत आर्थिक सक्षमता: प्राचीन काळापासून माणूस समाजरचनेचा शाेध घेत आहे. प्लेटाेचे ‘रिपब्लिक‘ हाेते किंवा काैटिल्याचे ‘अर्थशास्त्र‘. आजच्या युगात, राज्यघटना ही त्या शाश्वत प्रश्नांचे आधुनिक उत्तर आहे. संविधानिक अर्थशास्त्र ही एक महत्त्वाची संकल्पना आहे, जी देशाच्या आर्थिक धाेरणांचे मार्गदर्शन करू शकते. भारतीय राज्यघटनेत सामाजिक आणि आर्थिक न्यायाची तरतूद केली आहे, पण त्याची अंमलबजावणी याेग्य पद्धतीने व्हायला हवी. शासनाने नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर द्यावा, संसाधनांचे समान वितरण सुनिश्चित करावे आणि धाेरणनिर्मितीमध्ये पारदर्शकता आणण्यावर लक्ष केंद्रित करावे. फक्त तेव्हाच भारत एक समृद्ध आणि समतावादी समाजाचे स्वप्न साकारू शकेल.
लाेकशाही म्हणजे फक्त मतदानाचा हक्क नाही; ती म्हणजे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची हमी. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ‘संविधान कितीही चांगलं असलं, तरी त्याची अंमलबजावणी करणारे लाेक चांगले नसतील तर ते अपयशी ठरेल.‘ आज ही चेतावणी धगधगत्या वास्तवात उभी आहे. आपल्या लाेकशाहीचं भविष्य फक्त संसदेतल्या संख्याबळावर नाही, ते संविधानातील आर्थिक आणि सामाजिक तत्त्वांना जिवंत ठेवण्याच्या आपल्या सामूहिक निष्ठेवर आहे. आजच्या भारतात, जेव्हा धाेरणं जलदगतीने बाजाराभिमुख हाेत आहेत आणि असमानतेची दरी वाढते आहे, तेव्हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेली संवैधानिक अर्थशास्त्र (Constitutional Economics) ही केवळ अर्थशास्त्रीय चाैकट नाही, तर नैतिक मार्गदर्शन
आहे. ती सांगते की अर्थव्यवस्थेतील काेणताही बदल ताे कृषी सुधारणेचा असाे, उद्याेगधंद्याच्या स्वातंत्र्याचा असाे, किंवा सामाजिक सुरक्षा याेजनांचा त्याला संविधानातील न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची परिक्षा द्यावी लागेल.
शेवटी, संवैधानिक अर्थशास्त्र (ConstitutionalEconomics) ही संकल्पना आपल्याला आठवण करून देते की अर्थव्यवस्था ही माणसासाठी आहे, माणूस अर्थव्यवस्थेसाठी नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात ती केवळ आर्थिक धाेरणांची चाैकट न राहता, सामाजिक मुक्तीचा सखाेल नकाशा बनली. त्यांच्या विचारविश्वातून स्पष्ट हाेते की खरी आर्थिक समृद्धी तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ती प्रत्येकाच्या जीवनमानाला उंचावते, अन्यायाच्या मुळांचा पूर्णतः नाश करते आणि मानवी सन्मानाला सर्वाेच्च स्थान देते. हाच ताे तत्त्वज्ञानिक गाभा आहे, जाे भारतीय संविधानाला केवळ कायद्यांचा संग्रह न ठेवता, जगातील सर्वात जिवंत आणि नैतिकदृष्ट्या उंच लाेकशाहीचा केंद्रबिंदू बनवताे.
आजच्या भारतात, भारतीय संविधानातील या अस्पर्शित आर्थिक तत्त्वज्ञानाचा सखाेल अभ्यास ही केवळ शैक्षणिक गरज नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कारण आर्थिक धाेरणे, संसाधनांचे वितरण आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी ही फक्त अर्थतज्ज्ञांची किंवा सत्ताधा-यांची बाब नाही; ती थेट प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी प्रक्रिया आहे. संविधानातील आर्थिक दृष्टिकाेन समजून घेणे म्हणजे लाेकशाहीचा खरा अर्थ जाणणे आणि हाच अर्थ, बदलत्या जागतिक व राष्ट्रीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, आजच्या काळाची तातडीची गरज आहे.