Menu

वाचकांचे मनोगत

डॉ. सतीश देशपांडे यांचा ‘अखेर शुद्ध आली’ हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक आहे.

लेखकाने जातीगणनेचा इतिहास, सामाजिक व राजकीय संदर्भ, आणि आजच्या परिस्थितीत त्याचे महत्त्व फार स्पष्टपणे समजावले आहे. एका शिस्तबद्ध आणि प्रगल्भ विचारसरणीतून हे विश्लेषण पुढे येते. ‘जातीनिहाय जनगणना म्हणजे केवळ मागासवर्गीयांसाठी नव्हे, तर उच्च जातींच्या विशेषाधिकारांचंही दर्शन’ हा मुद्दा वाचकाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणतो. नेहरू काळ, मंडल आयोग, गांधी व आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ युक्तिपूर्णपणे वापरला आहे. त्यामुळे लेख अधिक सुसंगत आणि ऐतिहासिकदृष्ट्या बांधलेला वाटतो. लेखात ‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या संदर्भाने दिलेले निरीक्षण काही वाचकांना त्रासदायक वाटू शकतात. विशेषतः ज्या वाचकांचं राजकीय झुकाव त्या दिशेने आहे, त्यांना लेख ‘पूर्वग्रहदूषित’ वाटू शकतो, जरी तो तसा नसला तरी. ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भांचा अचूक वापर करण्यात आला. सामाजिक न्यायाविषयी लेखाची भूमिका अत्यंत चांगली आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त.

Shahim Jambhulkar, Customer Service Manager Brisbane, Australia

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत आपली सामाजिक संकल्पना अशी की, पाच वर्षांत एकदा हिरिरीने (अगदी रांगा वगैरे लावून ) मत द्यावे व उरलेली पाच वर्षे हाताची घडी तोंडावर बोट वगैरे घेऊन जे होईल ते पाहावे, जे मत व्यक्त करायचे धाडस दाखवतील त्यांनाच त्यांच्या कथित चोंबडेपणा, अगोचरपणाबाबत दूषणे देत राहावीत. कुंभकर्णाला युद्धासाठी सहा महिन्यांनी उठवत म्हणतात पण आपल्याकडे एकदा मत देऊन झाले की साम दाम दंड भेद वापरून समाजाला पाच वर्षांसाठी गुंगीचे औषध देऊन झोपविले जाते.

मत देण्यासाठी अत्याग्रह पण ते एकदा देऊन झाले की नंतर पाच वर्षे बिलकुल मत व्यक्त करायचे नाही हा दुराग्रह, ही सामाजिक व राजकीय दांभिकता चांगलीच बोकाळली आहे. पराकोटीची दांभिकता हे आपल्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते ते उगीच नाही. राजासमोर सगळे फक्त त्याचा उदोउदोच करायला शिकले की कुणी परका हुशार व्यापारी येऊन नुसतेच गोडगोड बोलून नसलेलेच वस्त्र अतिशय महागात विकून जातो आणि राजा उघड्याने फिरतोय हे सत्य सांगायची हिंमत न दाखवता प्रजा त्याचा फक्त उदोउदोच करत राहाते अशा आशयाची एक लोककथा आहे तशी आपल्या लोकशाहीची अवस्था झाली नाही म्हणजे मिळवली.

प्रवीण देरुरकर, माहीम, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *