-मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी, अमेरिका
‘मुक्ती विमर्श’ चा १५ ते ३० नोव्हेंबरचा अंक शब्द न शब्द वाचला. हा निवडणूक विशेषांक लोकशाही, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता मानणा-या जगातील मानवसमाजासाठी दिशादर्शक आहे. आम्हा मूळ व मन भारतातच असणा-या अमेरिकन जनतेसाठी सुद्धा भारतीय समाज कोणत्या दिशेने जातो, याची सतत चिंता असते. मागील दहा वर्षात भारताचे राज्यकर्ते, संविधानाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी व पंडीत जवाहरलाल नेहरूंनी दिलेल्या मार्गाद्वारे जाताना दिसत नाहीत, याचे वैषम्य वाटते. अशा वेळी मुक्ती विमर्श या अंकाने त्यांच्या डोळ्यात अंजन घातलेले पाहून, आम्हाला थोडे समाधान मिळत आहे.
यातील संपादकीय लेख; ‘घटना व ब्राह्मणवाद : परस्पर विरोधी विचारधारा’, ‘राज्यशासनाचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न’,
प्रा. श्रीनिवास खांदेवाल्यांचा ‘रोजगार विरहित आर्थिक विकासाची समस्या’, डॉ. खालीद खान यांचा ‘महाराष्ट्रतील शिक्षणामधील विषमतेचा प्रश्न’, प्रा. आर. ए. देशपांडे यांचा ‘दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी, हे सगळे भारतातील गंभीर प्रश्न या अंकात अधीकारवाणीने मांडलेले आहेत. तसेच ‘लोकभावने’ द्वारा विविध समाजचिंतक व कार्यकर्त्यांनी व्यक्त विविधांगी मते व प्रसंगानुरूप घटनांचे चीत्रण या सगळ्यांनी, हा अंक समृद्ध व परीपूर्ण झाला आहे.