१. मुबलक खनिज संपत्ती असलेला विदर्भावरील नशिबातील मागासलेपणाचा शाप दूर होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, असे या नव्या अहवालावरून म्हणता येईल. राज्याच्या सकल उत्पन्नात ५४ टक्के वाटा असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये केवळ नागपूरचा समावेश आहे, तर २६ टक्के जीडीपी असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये वर्धा आणि चंद्रपूरचा समावेश आहे. याचा अर्थ ८० टक्के जीडीपीच्या अठरा जिल्ह्यांमध्ये विदर्भातील अकरापैकी केवळ तीन जिल्हे आहेत.
२. दुसरीकडे मागास अठरा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आठ जिल्हे विदर्भाचे आहेत. विभागीय मुख्यालय असलेला अमरावती, महानगरपालिका असलेला अकोला तसेच कॉटनबेल्टमधील यवतमाळ व बुलडाणा हे मोठे जिल्हे अतिमागास आहेत, कापसासोबत या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. नागपूरची संत्रानगरी ओळख असली तरी अमरावतीच्या मोर्शी, वरूड भागात संत्रा मोठ्या प्रमाणात पिकतो. कृषी उत्पादनांचा जीडीपीमधील वाटा अल्प आहे.
३. अमरावतीमधील मेळघाट ३ आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात वनाच्छादन असून, हा भाग वनीपजांनी संपन्न आहे. अलीकडे स्टील हब म्हणून विकसित होत असलेला गडचिरोली जिल्हा लोह खनिजाने संपन्न असूनही सध्या तरी जीडीपीत अतिमागास श्रेणीत आहे. चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाचे उत्पादन होते. तसेच इथे निर्माण होणारी वीज राज्याच्या ऊर्जेची गरज भागविते.