Menu

महात्मा ज्योतिबा फुले: विचार, सामाजिक चळवळ आणि त्याचे समकालीन महत्व

डॉ. सुखदेव थोरात

ज्योतिबा फुले हे महात्मा होते, एक महान पुरुष होते. आपण त्यांना ‘महात्मा’ हा मान  का दिला? याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यातील एका भाषणात महान व्यक्तीच्या तीन गुणांचा उल्लेख केला आहे, पहिला गुण म्हणजे वास्तव ओळखण्याची बुद्धी दुसरा गुण  स्वार्थाशिवाय सत्य सांगण्याचे धैर्य आणि तिसरा गुण म्हणजे  दुर्बलांच्या उन्नतीसाठी बुद्धी आणि प्रामाणिकपणाचा वापर इत्यादी  सर्व गुण महात्मा फुले यांच्यात अद्वितीयरीत्या दिसतात याबाबत दुमत नाही.  महात्मा फुले यांनी सर्वप्रथम  प्रस्थापित शोषणाची ऐतिहासिक मीमांसा करून स्त्री-शूद्रांच्या मानवी अधिकारांचा पुरस्कार केला. त्यांच्या गुलामगिरीची चिकित्सा केली. गुलामगिरीच्या  मुळाशी असलेल्या शोषण परंपरा तर्कशुद्ध पद्धतीने मांडल्या. महात्मा फुले यांनी शुद्र, दलित, स्त्रिया, शेतकरी आणि मजूर  यांच्या प्रश्नांना समजून घेतले. या प्रश्नांची  जातिव्यवस्थेमध्ये असलेली कारणे शोधली व त्यावर उपाय सुचविले व त्यांच्यामध्ये परिवर्तन आणण्याकरिता सामाजिक चळवळी उभ्या केल्या, त्याकरिता संस्था उभारल्या व आपल्या हयातीत बदल घडवून आणले. या पार्श्वभूमीवर फुल्यांच्या १३५ व्या स्मृती दिवसानिमित्य महत्वाचा संवाद करण्यासाठी प्रस्तुत लेख सादर आहे.

महात्मा फुले: शूद्रअतिशूद्रांच्या समस्यांचे मूळ विश्लेषण

   १८ व्या शतकातील पाश्चिमात्य उदारमतवादाचा महात्मा फुलेंवर प्रभाव झालेला दिसतो. त्यांच्या लिखानामधून अनेक उदारमतवादी व्यक्तींचा उल्लेख येतो ज्यामध्ये थाँमस पेन यांचे  मानवाचे नैसर्गिक हक्कासंबंधी विचार,जॉन स्टुअर्ट मिलचे स्त्री–पुरुष समान हक्क विचारांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय  भारतीय बौद्ध विचार परंपरेचासुद्धा त्यांचावर प्रभाव आहे. याच विचारप्रभावातून जन्मास आलेले महात्मा फुले स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र यांच्या समानतेचा पुरस्कार करणारे आधुनिक काळातील पहिले क्रांतिकारक होते. बहुजनांच्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेताना त्यांनी समाजव्यवस्थेची सखोल चिकित्सा केली. महात्मा फुले यांनी आपल्या संशोधनातून शुद्र, अतिशूद्र, दलित, स्त्रिया, शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांची उकल केली. ज्यात जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता हेच शूद्र–अतिशूद्रांच्या दासत्व व दारिद्र्याचे मूळ आहे हे महात्मा फुलेंनी ठणकावून सांगितले. शिक्षणाचा अधिकार नाकारणे, स्त्रियांचे अमानवीय दास्य, बालविवाह, विधवांचे दैन्य, ब्राह्मणवादी धर्मकर्मांतून होणारे शोषण, ब्राह्मण पुरोहितांकडून दक्षिणेच्या नावाखाली होणारी लूट, शेतकरी व मजुरांच्या हक्कांचे दमन, ब्राह्मणांकडून प्रशासनात केला जाणारा भेदभाव, ब्राह्मण मामलेदारांकडून कुणबी शेतकऱ्यांचे शोषण ह्या सर्व  पद्धती अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

    महात्मा फुले यांनी शोधून काढले की शूद्र आणि अतिशुद्रांच्या  शोषणाच्या मुळे हे जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यामध्ये रुजली आहेत. कारण शूद्र आणि अतिशुद्रांना सर्व आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले गेले होते. शुद्रातीशुद्रांना असमानता व सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले. या  सामाजिक परिस्थिती विरोधात महात्मा फुल्यांनी बंड पुकारले. प्रचार केला. त्यांनी समाजविरोधी वृत्ती, भेदभाव, अज्ञान, अविद्या आणि अमानुष प्रथा व परंपरेची  जाणीव  शूद्र, दलित व स्त्रियांमध्ये निर्माण केली.

महात्मा फुल्यांनी बहुजनाच्या जागृतीसाठी केलेले प्रयत्न

    महात्मा फुल्यांनी त्यांच्या हयातीत अनेक ग्रंथ साहित्याचे लेखन केले. ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘तृतीय रत्न’ नाटक यात भटब्राह्मणांकडे समाजाचे प्रभुत्व, कसे आहे हे त्यांनी स्पष्ट केले. ‘गुलामगिरी’ या ग्रंथातून वर्ण, वर्ग, जात, लिंग आणि धर्म यांच्या आधारे भारतातील गुलामगिरीची सखोल चिकित्सा केली. स्त्रीशुद्रातिशूद्रांना कसे मानसिक गुलाम केले जाते, याचा शोधही फुल्यांनी घेतला. बहुजनांच्या गुलामगिरीला सुरुंग लावण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्याद्वारे त्यांनी समानता, विज्ञानवाद आणि न्याय प्रस्थापित करण्याचे धोरण  राबवले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, जातिभेद आणि शोषणाचा अंत, समानता व मानवमर्यादेवर आधारित समाज, ब्राह्मणश्रेष्ठत्व, मूर्तीपूजा, पुरोहितशाही व अंधश्रद्धेला विरोध, एकेश्वरवाद व तर्कनिष्ठ आचार, शिक्षण आणि सबलीकरण, खालच्या जातीतल्या व्यक्ती आणि स्त्रियांसाठी शिक्षण, स्त्री–पुरुष समानता, विधवा पुनर्विवाह, शेतकरी आणि कामगारांच्या आर्थिक हक्कांसाठी लढा, राजकीय आणि नागरी हक्क, वंचित घटकांना सामाजिक राजकीय हक्क मिळवून देणे, ब्रिटिश सरकारशी संवाद साधून शिक्षण व संधी उपलब्ध करून घेणे इत्यादी महत्वाचे धोरण महात्मा फुले यांनी अंगीकारले. सत्यशोधक समाजाचा वैचारिक आधार म्हणून ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. तत्कालीन वैदिक धर्मव्यवस्था नाकारून विज्ञाननिष्ठ, भौतिकवादी सत्यधर्माचा आराखडा या ग्रंथात त्यांनी मांडला आहे. याशिवाय दीनबंधु सारख्या वृत्तपत्रांतून त्यांनी जागृती घडवून आणली.

व्यवस्थेतील सुधारणा आणि सकारात्मक उपाय

    महात्मा फुले यांनी निर्माण केलेल्या साहित्यातून केवळ जातिव्यवस्था–अस्पृश्यतेचे विश्लेषण केले नाही तर त्यांनी शूद्र, अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्या न्याय आणि उन्नतीसाठी प्रत्यक्ष कार्य केले. सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे ब्राह्मणी धार्मिक–सामाजिक प्रणालीतील असमानतेवर त्यांनी निर्णायक प्रहार केला. त्यांनी उचललेली सकारात्मक पावले खालील प्रमाणे आहेत-

  1. स्त्रिया आणि अस्पृश्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिले.
  2.  अस्पृश्यतेचे निर्मूलन आणि सार्वजनिक जीवनात प्रवेश
  3. बालविवाह रोखणे, विधवा पुनर्विवाह आयोजित करणे, विधवांच्या मुलांसाठी आश्रय दिला.
  4. ब्राह्मणिक विधी आणि प्रथांचा निषेध
  5.  अस्पृश्यांसाठी विहिरी खुल्या केल्या.
  6.  जमीन उत्पादन वाढीसाठी खत, सिंचन, करसवलती यांसाठी सरकारकडे मागणी केली.
  7. औद्योगिक कामगारांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले.

      महात्मा फुल्यांनी उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे लोकांच्या जीवनात फुलेंच्या हयातीमध्ये काही बदल सुद्धा घडून आले. जसे की, अस्पृश्य आणि मुलींच्या शिक्षणात वाढ झाली, बालविवाह कमी झाले; विधवा पुनर्विवाह वाढले, सार्वजनिक सुविधांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.

महात्मा फुले : वर्तमान संदर्भात महत्व

       फुले यांनी आपल्या लिखानामधून भारतात दोन तत्त्वज्ञानांच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. एक म्हणजे ब्राह्मणवादी परंपरा जी, असमानता, अज्ञान, भेदभाव, अवैज्ञानिकता आणि शोषण यांना प्रोत्साहन देणारी धार्मिक आणि सामाजिक तत्वज्ञान परंपरा आहेत. तर दुसरी म्हणजे  समता, स्वातंत्र्य–बंधुता व तार्किक विवेकावर आधारित परंपरा यामध्ये बुद्धांचा विचार, भक्ती चळवळ, कबीर, नामदेव, चोखामेळा, फुले, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख व शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा समावेश होतो. शुद्रांमध्ये इतकी मोठी परंपरा क्वचितच इतर राज्यांमध्ये पाहायला मिळते. या परंपरेला जसे नामदेव (१३ वे शतकात), तुकाराम यांची पार्श्वभूमी आहे, तशीच महात्मा फुलेंचीही पार्श्वभूमी आहे. महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीने पुढल्या काळात अनेक समाजसुधारक निर्माण केलेत.  सामाजिक व राजकीय चळवळीना प्रोत्साहन दिले. ही परंपरा शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली. याच तत्वज्ञानाचा संविधानामध्ये समावेश झाला आहे.

आजची स्थिती  नवीन आव्हाने

   महात्मा फुलेनी ज्या समस्या हाताळल्या, त्या आजही काही प्रमाणात कायम आहेत.या समस्या खालीलप्रमाणे आहे.

1.आर्थिक असमानता–  ओबीसी व एस.सी. चे प्रति व्यक्ति उत्पन्न उच्चवर्णांपेक्षा अजूनही कमी आहे. ओबीसी व एस.सी. मधील गरिबी ही उच्चवर्णांपेक्षा अजूनही जास्त आहे.

2. शैक्षणिक विषमता– महाराष्ट्रातील 2017-18 चा शिक्षण प्राप्तीचा दर राज्यत सरासरी 34% हा उच्च शिक्षणाचा दर ग्रामीण भागात २९.६ % तर शहरात ४० % आहे. म्हणजे ग्रामीण व शहरी भागांमध्ये असमानता आहे. तशीच असमानता जाती-जातींमध्ये आहे. अनुसूचित जातींचा  उच्च शिक्षणाचा दर  29%, आहे. ओबींसीचा  34%, आहे तर ओपन मध्ये (खुल्या जाती) शिक्षणाचे प्रमाण  40% आहे.

3. स्त्रियांचे शिक्षण – स्त्री शिक्षणाबाबतही अजूनही फारशी प्रगती दिसत नाही. उच्च शिक्षणातील स्त्रियांचा दर २७.५% व पुरुषांचा दर ३९.४ % आहे.

4. जातभेद अस्पृश्यता – अस्पृश्यता व दलितांवरील अन्याय व अत्याचार अजूनही कायम आहेत.  आकडेवारी लक्षात घेता, दलितांवरील गुन्ह्यांची संख्या चिंताजनक दिसते. १९९५-२०१५ दरम्यान, अनुसूचित जातीवर एकूण गुन्हे २२२५३ इतके नोंदवले गेले. एकूण  १०६० सरासरी वार्षिक गुन्ह्यांची नोंद आहे.

5. ब्राह्मणवादाचा पुनरुज्जीवन– वर्तमान स्थितीत धार्मिक अवडंबर, कर्मकांड, वेदवाद, मनुवादाचे उघड उघड समर्थन, होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. उदा. संविधान हे ब्राह्मणवादावर आधारित असले पाहिजे असे शंकराचार्य यांनी अलीकडेच व्यक्त केले आहे. धर्म आधारित राजकीय ध्रुवीकरण, संविधानातील धर्मनिरपेक्षतेला विरोध जोरकसपणे केला जात आहे याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे बिहारमध्ये सरकारने जाहीर केलेले पहिले धोरण म्हणजे सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी आयोजकाची नियुक्ती करणे, हे होय. या विशेष अधिकाऱ्याच्या मार्फत उत्सव आणि हिंदू विधी, सत्य नारायण कथा, भगवती पूजा  या उत्सवांचा प्रचार करणे आणि लोकांना धार्मिक शिक्षित करण्याची जबादारी सोपवण्यात आली आहे. या प्रकारे संनातन धर्म घरा  घरात पाळल्या  गेला पाहिजे असा कृती कार्यक्रम तयार केला आहे.  

    वास्तविक पाहता एका धर्माचा प्रचार करणे संविधानाच्या विसंगत  आहे असे असताना सुद्धा गीता, मनुस्मृती, वेद, पुराणे इत्यादी मूल्य प्रभावित शिक्षण प्रक्रिया व अभ्यासक्रमातून  ब्राह्मण धर्माच्या शिक्षणाचा प्रसार राजरोसपणे होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे  शूद्र–दलित अनवधानानेच याच ब्राह्मणी  विचारसरणीला पाठिंबा देतात ज्या विचाराने त्यांचे नुकसान केले आहे.

    आज महात्मा फुले यांच्या स्मृतीदिन  प्रसंगी  त्यांच्या  विचार व कार्यकृतीतून  धडे घेणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारातील समानता, स्वातंत्र्य, बंधुत्वत, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मुल्यांची रुजवणूक होणे निकडीचे आहे. संविधानिक मूल्ये मजबूत करणे,जात, पंथ, कर्मकांड यांच्या नावाने होणारे शोषण संपवणे, स्त्रिया, शूद्र, दलित, ओबीसी यांच्या सामाजिक-राजकीय हक्कांना बळकटी देणे वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक, तर्कशुद्ध विचार समाजात दृढ करण्याची नितांत गरज आहे. हीच  महात्मा फुले यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *