Menu

धर्म,आमिष व गरज पडल्यास इवीएम सुद्धा

– प्रा. सुखदेव थोरात

२५ नोव्हेंबर १९४९ च्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतात लोकशाही यशस्वी होईल किंवा नाही ह्याविषयी दुःख व खंत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपले स्वातंत्र्य हे आपणच गमवीत आहोत. त्यांनी मातृ भूमीशी गद्दारी करणा-या ‘जयचंद‘ चे उदाहरण दिले. पुढे ते म्हणाले की लोकशाहीला व स्वातंत्र्याला अशाच छुप्या अंतर्गत ‘जयचंद‘ पासून धोका आहे. ह्या पासून आपण सावधराहावे. अन्यथा काही वर्गाला आपले स्वातंत्र्य गमवावे लागेल.

१९४६ ला (Communal Dead lock and Way to solve it) च्या आपल्या निवेदनामध्ये’ त्यांनी लोकशाही मध्ये काही राष्ट्रीय पक्ष जात व धर्माचा आधार घेऊ शकतात व राजकीय पक्षाच्या विचारसरणीला सांप्रदायिक आधार मिळू शकतो. त्यावर त्यांनी उपाय सुचविले. हे उपाय १९४७ मध्ये राज्य व अल्पसंख्यांक ह्या त्यांच्या घटने संदर्भातील निवेदनामध्ये सुद्धा मांडले. पुढे हि खंत व निराशा १९५२ ला बी.बी.सी. ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झालेली दिसून येते.

आज आपण बघतो की राष्ट्र व लोकशाही मध्ये जात व धर्माचा वापर उघडपणे केला जात आहे. २०२४ च्या महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये धर्माचा व जातीचा सर्रास उघडपणे उपयोग करण्यात आला. काहीही विधीनिषेध न बाळगता धर्माच्या आधारावर मते मागण्यात आली. अश्या प्रकारे डॉ. आंबेडकरांनी केलेले भाकीत मूर्त स्वरुपात दिसायला लागले. धर्माचा वापर विशेषतः २०१४ नंतर जोमाने व मुक्तपणे केल्याचे आढळतो. डॉ. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र, लोकशाही व काही वर्गाचे, विशेषतः अल्पसंख्याक व दलित ह्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येणार हे खरे ठरते.

धर्म व जातीचा वापर व शिवाय न भूतो न भविष्यती असे पैसे वाटून मतदारांना ‘आमिष दाखविण्यात आले. ऐन निवडणुकीचा तोंडावर महिलांकरिता महिन्याला १५०० रुपये देण्याची योजना जाहीर करून व उघडपणे त्यांचे मत मागावे ह्या पेक्षा दुसरा निर्लज्जपणा कोणता असू शकतो?  आणि निवडणुकीत यश मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिले हे स्पष्टपणे काही खंत व शरम न बाळगता मांडले जाते. ही लोकशाहीची घोर विटंबना आहे. याशिवाय (इवीएम) वापर गरज पडेल तिथे मोठ्या प्रमाणात केला गेला अशी जनमाणसात चर्चा आहे. हे समाज माध्यमात फिरणा-या असंख्य व्हिडीओ वरून लक्षात येते.

असे ‘त्रिसूत्र’ ह्या निवडणुकीमध्ये वापरल्याचे दिसते. ह्याचा अर्थ एवढ्या की पूर्वपरंपरेने चालत आलेली नीती म्हणजे, ‘साम, दाम, दंड, भेद‘ हि सूत्र वापरण्याची मानसिकता अजूनही कायम आहे.

डॉ. आंबेडकरांनी आपले आंतरिक वैचारिक शत्रूमुळे आपले स्वातंत्र्य गमावणार हि जी भीती व्यक्त केली ती आज आपल्या समोर स्पष्टपणे उभी आहे. डॉ. आंबेडकर हे प्रकांड द्रष्टा होते. १९५२ च्या बी.बी.सी. च्या मुलाखतीत जी खंत व विशेषतः ‘असाह्यता व्यक्त केली. ती आज आपण सर्व अनुभवत आहोत.. यासाठी सर्व शक्तीने विवेकवादी लोकांनी सामोरे जावे लागेल तरच राष्ट्र’ व लोकशाही जीवंत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *