Menu

डाॅ. बाबासाहेबांनी सुरु केलेल्या रविवार ता. 3 एप्रिल सन1927 ‘बहिष्कृत भारत‘ याचा पहिला अंक या अंकामध्ये बहिस्कृतांच्या प्रश्नांची चर्चा करून वर्तमान पत्राची आवश्यकता नमूद केली.

प्रस्तुतच्या लेखकानें तारीख 31।1।20 पासून ‘मूकनायक‘ या नांवाचे एक पाक्षिक वृत्तपत्त्र चालू केलें हाेतें. सदरील वृत्तपत्रासंबंधीं आपले मनाेगत व्यक्त करितानां, त्याने पहिल्या अंकांत असें म्हटलें हाेतें कीं, ‘आमच्या या बहिष्कृत लाेकांवर हाेत असलेल्या व पुढे हाेणा-या अन्यायावर उपाययाेजना सुचविण्यास तसेंच त्यांची भावी उन्नति व तिचे मार्ग याच्या ख-या स्वरुपाची चर्चा हाेण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच नाहीं. परंतु मुंबई इलाख्यांत निघेत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिलें असतां असे दिसून येईल की, त्यांतील बरीचशी पत्रे विशिष्ठ अशा जातीचे हितसंबंध पहाणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नसते. इतकेंच नव्हें तर केव्हां केव्हां त्यांना अहितकारक असेंहि त्यांतूनप्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा
एवढाच इषारा आहे की काेणतीहि एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतींचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहाणार नाहीं. समाज ही एक नाैकाच आहे. व ज्याप्रमाणें आगबाेटींत बसून प्रवास करणा-या उतारूनें जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावें म्हणून म्हणा किंवा त्यांची वेधा कशी उडते ही गम्मत पाहाण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खाेलीस छिद्र पाडलें तर सर्व बाेटीबराेबर त्यालाहि आधी किवा मागाहून जलसमाधि ही घ्यावीच लागणार आहे. त्याच प्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नुकसान करणा-या जातीचेही नुकसान हाेणार, यांत बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्त्रांनी इतरांचें नुकसान करून आपले हित करण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्ते निघाली आहेत हे सुदैवच म्हणावयाचे. दीनमित्र, जागरूक, डेक्कनरयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश व सुबाेधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार हाेते. परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली माेडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल हाेताे, त्यांत बहिष्कृतांच्या
प्रश्नांचा सांगाेपांग उहापाेह हाेण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही हेहि पण उघड आहे. अशा
या अति विकट स्थितिशी संलग्न असलेल्या प्रश्नांची उकल करण्यास एक स्वतंत्र्यच पत्र पाहिजे हे
काेणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे. खास अस्पृश्यांच्या
हिताहिताची चर्चा करण्यांसाठी ‘ साेमवंशीय मित्र‘, ‘हिंद नागरीक,‘ ‘विटाळ विध्वंसक‘, ही पत्तें
उपजली व लयही पावली. परंतु वर्गणीदारांकडून याेग्य प्राेत्साहन मिळत गेल्यास ‘मूकनायक‘
न डगमगता स्वजनाेद्धाराचें महत्कार्य करणारांस याेग्य पंथ दाखविल, असे आश्वासन देताना तें
अनुभवाअंति खाेटें ठरणार नाही अशी खात्री बाळगून हें स्वाशयनिवेदन आटाेपते घेताें.‘
प्रस्तुतच्या लेखकानें या उता-यांत जाहीर केलेला हा संकल्प ार दिवस टिकला नाहीं याबद्दल
त्यास खेद वाटताे. पण हा संकल्प सिद्धीस गेला नाहीं यांत त्याचा दाेष नाहीं, हें ज्यांस
खरी परिस्थिति ठाऊक आहे त्यांस अवगत आहेच. पत्राचा उपक्रम सुरूं केल्यानंतर प्रस्तुतच्या
लेखकास असें दिसून आलें कीं, अशा प्रकारचा लाेकसेवेचा मार्ग पत्करणे झालें तर त्याकरितां
काेणता तरी एखादा स्वतंत्र धंदा हस्तगत करणें अवश्य आहे. त्यास अनुसरून सुसाध्य असा
ब्यारिस्टरी सारखा स्वतंत्र धंदा करता यावा म्हणून आपला अवशेष राहिलेला अभ्यासक्रम पुरा
करण्यासाठी त्यास परत विलायतेस जाणें भाग पडलें. जातांना त्यानें वृत्तपत्त्राच्या कार्याचीं सूतें
कांहीं दिवस त्याच्या तालमीत राहिलेल्या एका तरुणाच्या हातीं दिली. प्रस्तुतच्या लेखकास आशा
हाेती की, अभ्यासक्रम संपवून परत आल्यावर सदरील वृत्तपत्त्र भरभराटीस आलेलें आपल्या दृष्टीस
पडेल. पण त्याच्या कमनशीबानें ती आशा व्यर्थ ठरली. कारण परत येण्यास निघण्यापूर्वीच पत्ताला
मूठमाती मिळाल्याची बातमी त्यास कळली. अंगीकृत कार्याचा अशा रीतीनें अल्प काळांतच नाश
झालेला पाहून ज्याचें त्यास वाईट वाटणे साहजिकच आहे. ह्या नाशांची कारणें जनतेपुढे मांडून
त्यांच्या खरेखाेटेपणाची छाननी करीत बसण्यांत प्रस्तुतच्या लेखकास कांहीं अर्थ दिसत नाहीं. परंतु
आज जवळ जवळ सहा वर्षाच्या कर्मलाेपानंतर जुन्या स्वाध्यायास नव्या नांवाखाली पुन्हा सुरवात
प्रस्तुतचा लेखक कां करीत आहे, यासंबंधी खुलासा केल्यास वावगे हाेणार नाहीं असें वाटतें.
सहा वर्षापूर्वी प्रस्तुतच्या लेखकानें ‘मूकनायक ‘ पत्रास सुरवात केली तेव्हां राजकीय सुधारणेचा
कायदा अमलांत यावयाचा हाेता. ’त्यास अनुसरून वृत्तपत्राची जरूरी काय आहे याचें दिग्दर्शन
करताना प्रस्तुतच्या लेखकानें असें म्हटलें हाेतें की ‘जर या हिंदुस्थान देशांतील सृष्ट पदार्थांच्या
व मानव जातींच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्यानें पाहिलें, तर हा देश म्हणजे केवळ विषमतेचें
माहेरघर आहे असे निःसंशय दिसेल.

‘हिंदु धर्मीयांत असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निदास्पदही आहे. कारणविषमतेनुरूप हाेणा-या परस्परांच्या व्यवहाराचें स्वरूप हिंदुधर्माच्या शीलाला शाेभण्यासारखें खास
नाहीं. हिंदुधर्मात समाविष्ट हाेणा-या जाती उच्चनीचभावनेनें प्रेरित झाल्या आहेत हें उघड आहे, हिंदू समाज हा एक मनाेरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच हाेय. पण लक्षांत ठेवण्यासारखी गाेष्ट ही आहे की या मना-यास शिडी नाहीं; आणि म्हणून एका मजल्यावरून
दुस-या मजल्यावर जाण्यास मार्ग नाहीं. ज्या मजल्यांत ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यांत त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला इसम मग ताे कितीही लायक असाे त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाहीं व वरच्या मजल्यातला माणूस मग ताे कितीहि नालायक असाे त्याला खालच्या मजल्यात
लाेटून देण्याची काेणाची प्राज्ञा नाहीं. उघड भाषेत बाेलावयाचें म्हणजे जाती जातींत असलेल्या
या उच्चनीच भावना गुणावगुणांच्या पायावर झाल्या आहेत असे नाही.

उच्च जातीत जन्मलेला मग ताे कितीहि अवगुणी असाे ताे उच्च म्हणावयाचा; तसेच नीच जातींत जन्मलेला मग ताे कितीहि गुणी
असाें, ताे नीचच रहावयाचा. दूसरे असें कीं, परस्परांत राेटी- बेटी व्यवहार हाेत नसल्यामुळे दर एक जात या जिव्हाळ्याच्या
संबंधांत स्वयंवह म्हणजे तुटक आहे. ही निकट संबंधाची गाेष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्यव्यवहार अनियंत्रित
असा नाहीं. कांहींचा व्यवहार दारापर्यंतच हाेताे व कांहीं जाती तर अस्पृश्य आहेत, म्हणजे त्या जातींतील माणसाचा स्पर्श झाला
असतां इतर जातींतील माणसास विटाळ हाेताे. विटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातीच्या लाेकांशी
क्वचितच व्यवहार हाेताे. राेटी-बेटी व्यवहाराच्या अभावीं कायम झालेल्या परकेपणांत स्पृश्यास्पृश्य
भावनेंनें इतकी भर टाकली आहे की, या जाती हिंदू समाजात असून समाजाबाहेरआहेत असेंच म्हटले
पाहिजे. या व्यवस्थेमुळे हिंदुधर्मीयांचे ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग हाेतात. तसेंच या विषमतेच्या
परिणामाकडे लक्ष दिलें तर असें दिसून येईल की, तिच्या पायीं विविध जातीवर विविध परिणाम झाले आहेत.
सर्वांत उच्च असलेल्या ब्राह्मण वर्गास आपण भूदेव आहाें असें वाटत आहे. सर्व मानवांचा जन्म आपल्या
सेवेसाठीं आहे असें मानणा-या भूदेवांनारूढ असलेली विषमता पाेषकच आहे, आणि म्हणूनच ते आपल्या
स्वनिर्मित हक्काने इतरांपासून आपली सेवा करून घेऊन आपण राजराेसपणे व बिनदिक्कत मेवा खात आहेत. त्यांनीं कांहीं
करणी केली आहे म्हणावें तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्रलेखन एवढेच काय ते! पण तें धर्मशास्त्र म्हणजे उदात्त विचार व नीच आचार यांतील प्रबल विराेधाचें काेडेंच म्हणावयाचें. सचेतन व तसेच अचेतन वस्तू हीं सारी ईश्वराची रूपे आहेत, असें उपदेशणा-या तत्ववादींयांच्या विचारांत व आचारांत विलक्षण विषमता दिसावी हें कांहीं शुद्धीवर असणारांचे लक्षण नव्हे. वेडेवाकडे कसेहि असाे पण या धर्मशास्त्राची छाप लाेकांवर कांहीं कमी नाहीं. आपण हाेऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूस भूदेव म्हणून भजत आहेत हे काेण नाकबूल करील ? विधातक धर्मभावनेच्या शृंखलेनें जखडून घेऊन शत्रूतूस मित्र समजून त्यांच्यापायी इतर जन लीन कां झाले याचा उलगडा करण्यास फार दूर जावयास नकाे. अज्ञानी लाेकांकडून कांहीहि करविता येईल आणि म्हणूनच ज्ञानसंचय प्रसार नव्हे ही ब्राह्मणांची मिरास हे एक धर्माचे माेठे तत्व बनवून ठेवण्यात आले आहे.

‘‘सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नति खुंटली, हे निविवाद आहे, परंतु त्यांच्या दुःखांत दारिर्द्याची तरी
भर पडली नाही. कारण शेती, व्यापार, उदीम अथवा नाेकरी करुन आपला चरितार्थ चालविणे त्यांना दुरापास्त नाही; पण
या सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अवि घाेर आहे. दाैर्बल्य, दारिर्द्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात
हा अफाट बहिष्कृत समाज वाहवत आहे हे खास. दीर्घकाल अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे खेचीत
आहे. आहे ती स्थिति याेग्य आहे यापेक्षा बरी स्थिति आपल्या नशिबी नाही अशा समजुतीचा विघातकपणा ह्या पतितांच्या
नजरेस आणण्यास ज्ञानासारखे अंजनच नाही. पण तें अंजनहि आजकाल मिरची मसाल्याप्रमाणें विकत घ्यावे लागत आहे;
आणि दारिद्रयामुळे ते दुर्मिळ झालें आहे. काेठे काेठे तर विकत घेऊं गेलाें असतां ते मिळतहि नाही, कारण ज्ञानमंदिरात सर्वच
ठिकाणी अस्पृश्यांचा प्रवेश हाेताे असे नाही. दारिद्रयाची बाेळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळविण्यास हवी तेवढी संधि किंवा माेकळीक नाही. नाेकरी, व्यापार, उदीम इत्यादि धंद्यात त्यांना क्वचितच रिघाव हाेताे;
नशीब काढण्यास काेठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागत आहे.‘‘
‘प्रचलित हिंदू धर्माच्या अति घाेर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचे महापातक विश्वजनक प्रभूला
न जुमानता करणारे काेट्यावधि अविवेकी व दुराग्रही जन जाेंपर्यंत या देशांत वावरत आहेत ताेपर्यंत आपला समाज निकृष्ट
स्थितीमध्येंच खितपत रहाणार आहे, याची जाणीव या बहिष्कृत समाजातील ब-याच लाेकांस झाली आहे, असे म्हणण्यास

प्रत्यवाय नाही. तसेंच परस्थ सरकारास आपल्या तंत्रानें वागावे लागत आहे याचा फायदा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या ख-या
स्थितिविषयी वरिष्ठ हिंदूकडून त्याचा कसा गैरसमज करुन देण्यांत येत आहे हें देखील त्यांना कळून चुकलें आहे. जातिभेद
व जातिमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या या देशांत खरें स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधीतर्फे
राजकीय सत्तेचा पुरेसा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विराेधाच्या खाेडसाळपणा बद्दल
बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे. एवंच राजकीय सत्ता मिळवून तिच्या जाेरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम
करू पाहाणारांचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे, ही त्यांच्यांत उपजलेल्या जागृतीची साक्ष हाेय.‘‘
सुधारणेचा कायदा अमलात येण्यापूर्वीचे हे उद्गार आहेत. आतां सुधारणेचा कायदा अमलांत आलेला
आहे. इंग्रजांच्या हातची सत्ता कांही प्रमाणांत वरिष्ठ हिंदी लाेकांच्या हातीं गेली आहे. बहिष्कृत
वर्गाची प्रतिनिधींच्या बाबतीत मुळी दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्ढय
धनी कसायाच्या स्वाधीन करताे त्याप्रमाणें बहिष्कृत वर्गाच्या लाेकांना त्यांच्या
माबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लाेकांच्या स्वाधीन केलें आहे. सहा वर्षापूर्वीची स्थिति व आजची स्थिति यांची तुलना जर केली तर अस्पृश्यांची स्थिति सहा वर्षापूर्वीपेक्षा आज जास्त शाेचनीय आहे यांत वानवा नाही. ही शाेचनीय स्थिति जगजाहीर
करुन हाेत असलेली हेळसांड टाळावयाची असेल व घडत असलेल्या अन्यायापासून व जुलमा पासून बचाव करावयाचा
असेल तर वृत्तपत्राची जरुरी सहा वर्षांपेक्षा आज अधीक तीव्र आहे हे बहिष्कृत वर्गातील सर्व जाणत्या माणसास
कबूल करावे लागेल. शिवाय 1930 साली हिंदुस्थानच्या कायद्याची दुरुस्ती हाेऊन 1930 साली इंग्रजांनी आपल्या हाती
राखून ठेवलेली सत्ता देखील हिंदी लाेकांच्या हाती देण्यांत येईल असा अंदाज आहे. तसें जर झालें व त्याबराेबर बहिष्कृत
वर्गाच्या लाेकांना जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाहींत तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असेच सम
जावे. कारण ब्रिटीश सरकारचें निःपक्षपाती धाेरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठेवले जाईल इतकी त्यांची मनाेभूमिका शुद्ध
व सात्विक बनलेली नाहीं. हा घाेर प्रसंग जर टाळावयाचा असेल ‘तर आतांपासूनच चळवळीस सुरवात केली पाहिजे असे
प्रस्तुतच्या लेखकाचे ठाम मत झाले आहे आणि ह्मणूनच त्याने आपल्या स्वाध्यायास पुन्हा प्रारंभ केला आहे. ईश्वर कराे आणि
या कार्यात यशप्राप्ती हाेवाे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *