शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे तत्वज्ञान
–डाॅ. संजय शेंडे,
ओबीसी चळवळीचे अभ्यासक नागपूर
पुराेगामी महाराष्ट्रा शिक्षणाची व्याख्या करणारे कर्ते, सुधारक म्हणून महात्मा ज्याेतिराव फुले, राजश्री शाहू महाराज,
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय आपण सर्वांना आहे. त्याचबराेबर सत्यशाेधक समाजाची धुरा सांभाळणारे महात्मा फुलेंचा वारसा ख-या अर्थाने विदर्भात पुढे नेणारे नेतृत्व म्हणजे डाॅ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हाेय.

विदर्भातील शेतकरी, कष्टकरी, समाज शिक्षणा अभावी प्रचंड नागावला जाताे आहे. याची तीव्रता डाॅ. भाऊसाहेबांना अस्वस्थ करीत असे, त्यातूनच डाॅ. भाऊसाहेबांनी तळागाळातील शेवटच्या माणसाला सक्तीचे शिक्षण द्यावे असा आग्रह धरला. जिल्हा काैन्सिलच्या माध्यमातून सक्तीच्या शिक्षणाची 100 केंद्रे त्यांनी उघडली. त्यांच्या कक्षेतील 11 वर्षाखालील मुला-मुलींना शिक्षण अनिवार्य केले, न शिकवणा-या पालकास त्यांनी दंड केला. त्याचबराेबर खेडयांमध्ये नव्या शाळा उघडल्या. शिक्षण सार्वत्रिक स्वस्थ व सुलभ करण्याचे कार्य डाॅ. भाऊसाहेबांनी केले. 1957 साली डाॅ. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षण संस्थांची सुरुवात झाली. नागपूरला श्रद्धानंद बालमंदिर सुरू झाले, पुढे वरुड, अमरावती, नागपूर, अकाेला, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 1946 ला शिवाजी शिक्षण संस्थेची निर्मिती करून शिक्षणाची ज्ञानगंगा भाऊसाहेबांनी सुरू केली. हे व्रत त्यांनी बहुजनांच्या शरीरावर बहुजनांचाच मेंदू असावा यासाठी स्विकारली. ऐतखाऊ लाेकांनी देवदैववादाच्या नावाखाली ओबीसींची फसवणूक करू नये यासाठी शिक्षणाची व्याख्या करताना स्पष्ट केले की, ख-या खाेटयाची चिकित्सा करणे म्हणजेच खरे शिक्षण हाेय. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासाेबत त्यांची विशेष मैत्री हाेती. त्यामुळे संविधान सभेत सदस्य म्हणून बाेलताना डाॅ. भाऊसाहेब देशमुख यांनी ओबीसींना आरक्षण द्यावे यासाठी सतत आग्रह धरला. 27/8/1947 राेजी त्यानंतर जेव्हा जेव्हा चर्चा झाली त्या त्या प्रत्येक वेळी डाॅ. भाऊसाहेब देशमुख यांनी प्रचंड उद्वेगाने आपलं मत संविधान सभेत मांडलं आहे. भाऊसाहेब म्हणाले, मागासवर्गीयांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रमाणे इतर मागासवर्गाचा सुद्धा समावेश हाेताे. या ओबीसींमध्ये शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला फार माेठा घटक आहे. सामाजिकदृष्टया या घटकांवर अनेक वर्षापासून ताे निर्मितीशील उत्पादक असून सुद्धा प्रचंड अन्याय झालेला आहे. परंतु हा वर्ग संघटित नाही, हा वर्ग चळवळ करण्याच्या स्थितीत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यावर अन्याय करित आहात. पण मी डाॅ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आज या घटना परिषदेला सांगताे की, या फार माेठया घटकांवर अन्याय करून तुम्ही ‘भारत’ नावाच्या देशाच्या आत्म्यावर अन्याय करीत आहात. म्हणून मी आपल्याला सांगताे की, या देशाचं आणि तुमचं कधीही भलं हाेणार नाही. जाेपर्यंत या घटकाला न्याय मिळणार नाही, ताेपर्यंत भारत कधीही सुपर पाॅवर हाेऊ शकणार नाही. डाॅ. भाऊसाहेब देशमुखांची ही तळमळ आजही ओबीसी बांधवांना समजले नाही. डाॅ. आंबेडकरांनी त्यांना समजून घेतले. मुळातच करुणाशील असलेल्या डाॅ. बाबासाहेबांनी राज्यसभेत 340 कलम ओबीसी करीता राखीव ठेवून ओबीसी समाजाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले. एवढयावरच ते थांबले नाही तर दिनांक 27 सप्टेंबर 1951 राेजी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा याच कारणासाठी राजीनामा दिला. आज दलित, आदिवासी, ओबीसी ऐक्याची प्रक्रिया गतिमान करणारे आरक्षण धाेरण संकटात आले आहे. खाजगीकरणामुळे संकट ’आ’वासून उभे ठाकले आहे. डाॅ. भाऊसाहेबांनी ख-या खाेटयाची चिकित्सा करण्याचा मंत्र दिला, तथापि ओबीसी बहुजन घटक कर्मकांडाच्या चाैकाेनात अखंड बुडालेला आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ वैज्ञानिक दृष्टिकाेन लहानपणापासूनच मिळण्याचा आग्रह डाॅ. भाऊसाहेबांनी सक्तीच्या शिक्षणाद्वारे केला. पण हे शिक्षण आज नवीन शैक्षणिक धाेरणामुळे धाेक्यात आले आहेत. लहानपणापासून अगदी शिशु मंदिरपासून या महामानवांचा आदर्श समाेर ठेवून घटनेच्या 51 क कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकाेन, विवेकवाद, बुद्धीप्रमाण्यवाद, शाेधकवृत्ती चिकित्सा, मानवतावादी दृष्टिकाेन, शिक्षण द्यावयाची असेल तर कृती करण्याची आज वेळ आली आहे. प्रबाेधनाबराेबर रचनात्मक आणि नवनिर्माणाचे काम ओबीसी बहुजनांना प्रयत्नपूर्वक करावे लागेल. सीबीएससी शाळा उघडणे, त्या शाळेत लहान मुला-मुलींवर घटनात्मक शिक्षण देणे, मानवी मूल्य जसे स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय यांची शिकवण देणे अत्यावश्यक आहे. आज जर आम्ही पेरणी, वखरणी, नांगरणी करू शकलाे नाही तर आम्हाला आगामी काही वर्षात फळ मिळणार नाही. नाहीतर येणारा काळ अत्यंत कठीण आहे, प्रतिक्रांतीचा आघात झाला आहे. या अस्वस्थ काळात प्रेम, मैत्री, करुणा, बंधुभाव ही महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. भाऊसाहेब देशमुख यांनी रुजवलेली मूल्ये काेमेजण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा ‘जागे व्हा ! काेळसा उगाळण्यापेक्षा चंदन उगाळूया’ ज्येष्ठ कवी साहित्यिक डाॅ. यशवंत मनाेहर यांचा माेलाचा सल्ला स्वीकारूया आणि पुढे जाऊया, हीच भाऊसाहेबांना ख-या अर्थाने आदरांजली ठरेल.
–डाॅ. संजय शेंडे,
ओबीसी चळवळीचे अभ्यासक नागपूर