Menu

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मनमाड सभेतील भाषण

Text Box:  आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत आणि जोपर्यंत माऱ्याच्या जागा आपण काबीज करीत नाही तोपर्यंत खरीखुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही. वास्तविक शिक्षणाची तरतूद प्रांतिक सरकारांनी केली पाहिजे पण तसे झालेले विशेष काही दिसत नाही. मी यापूर्वी सांगितलेच आहे पण आता क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतो की, मी मात्र हिंदुस्थान सरकार कडून अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी तीन लाख रुपयांची मंजूरी मिळविली आहे. त्यामुळे आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत आहेत, पण दुर्दैवाची गोष्ट ही की, आपलेच विद्यार्थी जास्त नापास होतात. याचे कारण मला तरी काही समजत नाही. मी विद्यार्थी असताना या लहानशा मंडपा एवढीच आमची खोली होती. त्यात आम्ही सर्व कुटुंब राहत होतो. त्यात बहिणीची दोन मुले, एक बकरी, जाते, पाटा वगैरे आणि मिणमिण जळणारा तेलाचा दिवा. इतकी हलाखीची परिस्थिती असताना मी अभ्यास केला. आमच्या विद्यार्थ्यांना बोर्डिंगांमधून आमच्यापेक्षा किती तरी पटीने चांगली सोय असताना त्यांनी रात्रंदिवस कां अभ्यास करू नये. तुम्हाला माहिती आहे की, जो कोणी पैसा देत असतो तो त्याचा जाब विचारीत असतो. तद्वतच हिंदुस्थान सरकार विचारील की, आम्ही अस्पृश्यांच्यासाठी जो इतका पैसा खर्च करतो त्याचे त्यांनी काय चीज केले ? म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास केला पाहिजे आणि पास झाले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
९ डिसेंबर १९४५, मनमाड ,
सभेतील भाषण