Menu

युगप्रवर्तक बंडखोर नायिका: सावित्रीबाईं फुले

डॉ. विद्या चौरपगार
  ( असिस्टंट प्रोफेसर, राज्यशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, नागपूर )


डॉ. विद्या चौरपगार

सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सर्वश्रुत आहेतच, याबद्दल दुमत नाही. परंतु एक निस्वार्थी समाज सुधारक, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या आणि फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणा-या महान नेत्या होत्या. जातीधर्मपितृसत्ताक व्यवस्थेच्या परंपरावादाला छेद देणा-या 19 व्या शतकातील बंडखोर नायिका म्हणूनही त्यांच्या कार्याची मीमांसा होणे आवश्यक व प्रासंगिकही आहे.

महात्मा फुल्यांनी स्त्रियांना सार्वजनिक जीवनात निर्भयपणे सहभागी होता येण्यासाठी तिला पुरुषांप्रमाणेच सहभागाच्या संधी व हक्क मिळाले पाहिजे यासाठी तत्कालीन काळात बंड केले. या बंडाला सावित्रीबाईने समर्थपणे साथ देऊन विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेला आव्हान देण्याचे महत्तम कार्य सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या धैर्याने केले. ज्योतीरावांच्या लोकविलक्षण ध्येयवादाला साथ देण्यात सावित्रीबाई उत्सुक झाल्या होत्या. सर्व मानवमात्रांबाबतचा जोतीरावांचा कळवळा, अन्याय व शोषणाविरुद्धची मनस्वी चीड, मानवी अधिकाराच्या प्राप्तीसाठी संघर्ष करण्याचा जाज्वल्य ध्यास आणि जातीविरोधी विवेकनिष्ठेतून निष्पन्न झालेली चिकित्सापद्धती सावित्रीबाईच्या व्यक्तिमत्वाच्या व जाणिवेचा भाग बनत होती यासाठी लागणारे ‘अतुलनीय साहस करणा-या सावित्रीबाईंच्या अलौकिक मानसिक धैर्याला भारताच्या इतिहासात तोड नाही.’ भारतातील बहुजन स्त्री सुद्धा युगप्रवर्तक कार्य करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले होय. स्त्रियांचे माणूसपण किंवा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मान्य करण्यास तत्कालीन समाजाचा विरोध होता. पण सावित्रीबाईने या विरोधाचा कडाडून प्रतिकार केला. ब्राह्मणशाही आणि पारंपारिक रूढीप्रियता या दोन्ही गोष्टींचा टोकाचा विरोध सहन करून सावित्रीबाईनी स्त्री आणि शुद्रांचे सामाजिक जीवन बदलण्यासाठी अपार कष्ट घेतले. विधवा ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन करू नये म्हणून महात्मा फुले यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यात सावित्रीबाईंनी बरोबरीची साथ दिली. अस्पृश्यांना घरची विहीर खुली करून देणे, दलित आणि स्त्रियांसाठी शाळा, बालप्रतिबंधक गृहाचे कार्य, व सत्यशोधक चळवळीच्या सर्व उपक्रमांमध्ये सावित्रीबाईची भूमिका महात्मा फुल्यांच्या बरोबरीने सिद्ध झाली आहे. स्त्रियांना होणारी मारहाण, विधवांवरील अत्याचार, लादलेले मातृत्व, पुरुषी वर्चस्वाचा प्रतिकार करण्यासाठी महात्मा फुल्यांच्या सोबतच सावित्रीबाईंनी विवाहसंस्था व कुटुंबसंस्थेच्या अंतर्गत होणा-या हिंसाचाराची व लैंगिक शोषणाची जाणीव दिली. म्हणूनच बालविवाह, विधवा विवाहबंदी, बहुपत्नीत्व, जरठ विवाह यासारख्या प्रथांवर महात्मा फुल्यांच्या सोबतच स्व-कार्यकृतीतून प्रहार केले आहेत. जाती व्यवस्थात्मक समाजव्यवस्थेच्या संदर्भात सावित्रीबाईची स्त्री प्रश्नांची जाण अधिक प्रगल्भ असल्यामुळे ब्राह्मण विधवांचे व शूद्रातील शूद्र स्त्रियांचे प्रश्न सारख्याच ताकदीने व सम्यकपणे समजून घेतले व याचा अहोरात्र प्रतिकार केला. ज्या काळात स्त्रियांचे घराबाहेर पडणे निषेधार्थ होते, त्या काळात सावित्रीबाईने धर्ममार्तंडांच्या विरोधाला न जुमानता स्त्री स्वातत्र्यांचा पुरस्कार केला. हिंदू धर्माने स्त्रीशुद्रांवर शिक्षणबंदी लादली होती. जातीय उतरंडीत स्त्रीशुद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारला गेल्याने गुलामाचे जीवन स्त्रियांच्या वाट्याला आले होते. अशा दडपल्या गेलेल्या स्त्रीयांचे आत्मभान व स्वाभिमान व त्यांची शोषणमुक्ती केवळ शिक्षण प्रसारातूनच होईल असा विश्वास महात्मा फुल्यांना होता. यामुळेच शिक्षण व्यवस्थेतील ब्राह्मणी वर्चस्वावर टीका करीत, त्यांनी पुरुषप्रधानता व धर्मजातीव्यवस्थेच्या शोषणात अडकलेल्या मुलींसाठी 1848 मध्ये शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. हिंदू समाज रुढीप्रिय असल्यामुळे सावित्रीबाईंचे घराबाहेर पडणे, शिक्षिका होणे धर्मबाह्य म्हणून निषेधार्थ वाटत होते. ‘मुलींना शिक्षण देणे म्हणजे त्यांना कुमार्गाला लावण्याचा उद्योग आहे’ अशी आवई त्यावेळी धर्ममार्तंडानी उठवली. परंतु ‘सावित्रीबाईने स्त्री सहभाग निर्बंधाचा उंबरठा ओलांडून बहिष्कृत जातीपर्यंत शिक्षण प्रवाहित करण्याचे धाडसी कार्य केले.’ ‘शिक्षणाने मनुष्यत्व प्राप्त होते व पशुत्व हटते’ या सावित्रीच्या काव्यशब्दात शिक्षणाचे मूळ रुजले आहे. सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन स्त्रीशिक्षणाला वाहिले होते. शिक्षणकार्य करताना त्यांनी कसल्याही प्रकारचा मोबदला न घेता निस्वार्थ भावनेतून हे कार्य केले, असा उल्लेख ‘बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या 1852-53 सालच्या रीपोर्टात आहे.’ यावरून सावित्रीबाईचा शिक्षण ध्यास व त्या अनुषंगाने स्त्रीसुधारणांचा प्रकल्प लक्षात घेता येईल. स्त्रियांना शिक्षण देताना भट ब्राह्मणांकडून सावित्रीबाईचा अत्यंत क्लेशदायक असा छळ केला गेला. त्यावेळी शेण, माती, गोळ्यांचे वार सावित्रीने अंगावर घेतले पण माघार घेतली नाही. यावरून हजारो वर्षाच्या शिक्षणबंदीला झुगारून स्त्रीच्या सार्वजनिक क्षेत्रातील सामाजिक सहभागाच्या वाटा मोकळ्या करणा-या सावित्रीबाई युग प्रवर्तक ठरतात. असे म्हणण्यास हरकत नसावी.

सावित्रीबाईचा आंतरिक विश्वास प्रचंड होता. त्यांनी त्या काळात विधवा गरोदर स्त्रियांच्या मुलांना जन्म देण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह अत्यंत ठाम भूमिकेतून चालविले. त्यांना जैविक मातृत्व लाभले नाही परंतु या गृहातील एक मुल दत्तक घेऊन प्रस्थापित समाजाला हादरे दिले. आजही आपल्या समाजात मूल होत नसेल तर वेगवेगळे कर्मकांड करून स्त्रियांवर अपत्य प्राप्तीची सक्ती केली जात आहे. स्वतः ब-याच शिक्षित उच्चशिक्षित स्त्रियांची या कृतीला अबोल सहमती सुद्धा असते. अशा स्थितीत यशवंत सारख्या विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवलेला एक आदर्श लक्षात घेणे आवश्यक आहे. महात्मा फुले प्रणित सत्यशोधक समाजाची भूमिका फुल्यांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी योग्य रीतीने पार पाडली. सत्यशोधक समाजाने जातीनिर्मूलनासाठी केलेल्या वेगवेगळ्या कृतींपैकी समाजाने नाकारलेल्या जोडप्यांचे आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह सावित्रीबाईने लावून दिले. हे विवाह लावून देताना त्यांनी पुरोहितांची मध्यस्थी नाकारून सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून पुरोहितांच्या हस्तक्षेपाला आव्हान दिले. त्या काळातील हे सर्वात मोठे क्रांतिकारी पाऊल समजले जाते. सती प्रथेला विरोध केला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सावित्रीबाईंनी आपले लक्ष भ्रूणहत्येवर केंद्रित करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या रोखता यावी म्हणून त्यांनी नवजात बालकांसाठी आश्रम सुरू केला. त्यांनी 1852 मध्ये ‘महिला मंडळ’ स्थापन केले आणि भारतीय महिला चळवळीला पहिले उस्फुर्त नेतृत्व लाभले. त्यांनी उचललेले हे पाऊल अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक ठरले. महात्मा फुल्यांचे निधन झाल्यानंतर सावित्रीबाईचा दत्तक मुलगा यशवंत यास ज्योतीरावांचे अग्निसंस्कार करण्यासाठी समाजाने विरोध केला. तेव्हा सावित्रीबाईने धैर्याने पुढे येऊन स्वतः आपल्या पतीचे अग्निसंस्कार पार पाडले. भारताच्या इतिहासात एका स्त्रीने पतीच्या पार्थिवाला अग्नी देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. आज शतकाच्या वाटचालीनंतरही अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार याबाबतची जागरूकता आपल्या समाजात फारशी आलेली दिसत नाही.

सावित्रीबाईचा वारसा असलेल्या भारत देशात आज स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी शिक्षणक्षेत्रातील संकुचिकरण व विषमताकरणामुळे बहुजन समाजातील स्त्रीयांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. जातवर्गलिंग आधारित अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. यांच्या विरोधात सर्व जाती-धर्माच्या स्त्रिया कशा प्रकारे उभ्या राहतील याची व्युहरचना आखली पाहिजे. शिक्षणाने मनुष्यत्व येते व पशुत्व हटते असे सावित्रीबाई त्यांच्या काव्यात लिहित असत त्याप्रमाणे त्यांनी सर्व जीवन समाजाच्या मानवीकरणासाठी वाहिले. परंतु आज शिक्षित स्त्रियांमधील समाजपरिवर्तक प्रवृत्ती किती प्रमाणात जिवंत आहे? हा प्रश्न तपासावा लागेल. अर्थात या समाजपरिवर्तक प्रवृतींच्या विकासासाठी काय करता येईल याचा व्यवहार परीघ वाढला पाहिजे. आज नव्याने स्त्रीयांना सर्व जात-जमातवादी विळख्यात बंदिस्त केले जात आहे. धर्म, जाती व भांडवलशाही व्यवस्थेचे नवे प्रारूप उभे राहत असताना स्त्रीदास्यतेच्या नव्या परिभाषा व भूमिका निर्माण होत आहे. 19 व्या शतकातील रूढी प्रथांचा प्रभाव शिथिल झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. याबद्दलचे समाजभान येणे गरजेचे आहे. जात, धर्म, राष्ट्र या सगळ्याच संरचनानी संकुचित सांस्कृतिक प्रारूपांचा आश्रय घेतला असून त्याचा आघात स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रा. सचिन गरुड म्हणतात त्याप्रमाणे, ‘फुलेवाड्याचा इतिहास दफन करून त्यासमोर अथर्वशीर्ष स्त्रोतपठनाचे दिवाळखोर कार्यक्रम हजारो स्त्रिया मोठ्या उत्साहाने साजरे करतात.’ काहीही करून स्त्रिया व्यवस्थेत शोषित अंकित राहाव्यात असाच अंतिम अर्थ आहे याचा. अशा स्थितीत स्त्रीमुक्तीचा लढा उभा करण्यासाठी या देशाला लाखो सावित्रीबाई हव्या आहेत. पण या मूलभूत बदलासाठी सर्व पुरुष वर्ग ज्याेतिरावांचे सच्चे अनुयायी होणार आहेत काय? या आत्मटीकेपासून स्वतःतील बदलाला सुरुवात होणार आहे. हीच ख-या अर्थाने सावित्रीबाईना आदरांजली असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *