Menu

बळीचे राज्य : महात्मा फुले

डॉ. अशोक चौसाळकर

म. जोतीराव फुले यांनी इ. स. १८८३ साली आपला ‘शेतक-याचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात त्यांनी सर्व शेतकरी एकच गणला आहे. कारण त्यांच्या मते लहानमोठ्या सर्वच शेतक-यांची अज्ञाना- मुळे नोकरशाहीच्या व भटशाहीच्या जुलमामुळे आणि साम्राज्यशाहीच्या शोषणामुळे दैना उडालेली आहे. म. फुले यांच्या मते सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यात तीन भेद आहेत. कुणबी, माळी आणि धनगर. या भेदाचे कारण इतर काही नसून व्यावसायिक आहे. मूळचे जे लोक शेती करून निर्वाह करू लागले ते कुळवाडी किंवा कुणबी. जे आपले शेतीचे काम सांभाळून बागायती करू लागले ते माळी आणि जे दोन्हीही करून मेंढरे-बकरे वगैरे कळप पाळू लागले ते धनगर. यातील पुढे काहीजण राजेरजवाडे, इनामदार, जहागिरदार व वतनदार झाले. त्यांचे वंशज आता शूद्र शेतक-यांच्या परिस्थितीची काळजी न करता ऐषआरामात, अज्ञानात जीवन जगत आहेत. म. फुले यांच्या मते हे राजेरजवाडे ‘दिवसा गोप्रदाने आणि रात्री प्रजोत्पादने’ करण्यात आनंद मानतात. त्यामुळे त्यांच्याकडून सध्या तरी फारशी अपेक्षा नाही. पण माळ्या-कुणब्यांत स्वतःस खास मराठा म्हणून शेखी मिरवणारा, ज्याचे शिंदे-गायकवाडांसारख्या सरकारांशी एकेकाळी नातेसंबंध होते, ज्याच्याजवळ आठ बैलांचे काम चालण्याइतकी शेती आहे, असा शेतकरीही आज अतिशय वाईट परिस्थितीत आहे.
या शेतक-यांच्या घरची परिस्थिती म. फुल्यांनी ‘शेतक-याचा आसूड’ या ग्रंथांच्या चौथ्या प्रकरणात विस्ताराने वर्णन केलेली आहे. ब्राह्मण भटभिक्षुकांनी, सावकारांनी, सरकारी नोकरांनी हा अक्षरशून्य शेतकरी पूर्णतः नागवला आहे. त्याच्या घरची परिस्थिती मोठी वाईट आहे. घरात सगळीकडे घाण पसरलेली आहे. तेथे व्यवस्था अशी नाहीच. पण कोर्टात पेशा करून, पैसे खर्च करून तो शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाला आहे. सगळीकडून नागवला गेलेला शेतकरी मनाशीच मोठ्या दुःखाने म्हणतो, “बैल विकून जर सारा द्यावा तर शेतकी कोणाच्या जीवावर ओढावी? व्यापारधंदा करावा तर मला लिहिता वाचता मुळीच येत नाही. आपला देश त्याग करून परदेशात जातो तर पोट भरण्यापुरता हुन्नर ठाऊक नाही. कण्हेरीच्या मुळ्या मी वाटून खाल्यास कर्तीधर्ती मुले आपली कशी तरी पोटे भरतील, पण मला जन्म देणा-या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या चिटुकल्या लेकरास अशा वेळी कोण सांभाळील?” थोडक्यात, लहानमोठे सर्वच शेतकरी सध्या दैन्यावस्था भोगत आहेत.
आपल्या पुस्तकाच्या शेवटी म. फुले लिहितात की, “या प्रकरणात शूद्रांपैकी बडे बडे राजेरजवाडे व लहानसहान अज्ञानी संस्थानिकांच्या आणि अतिशूद्रांच्या लाजीरवाण्या स्थितीविषयी बिलकूल वर्णन केले नाही. याचे पहिले कारण आपल्या पोकळ वैभवामुळे आणि दुसरे आपल्या दुर्दैवामुळे शूद्र शेतक-यांपासून दुरावलेले आहेत. या पुस्तकात फक्त मध्यम व कनिष्ठ प्रतीच्या शेतक-याचे हालच वर्णन केले आहेत.”पण शेतक-यांच्या मुक्तीसाठी शूद्र शेतकरी आणि अतिशूद्र यांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे ते सांगतात.
शेती आणि पाणी : न्यायमूर्ती रानडे चालवत असलेल्या सार्वजनिक सभेवर फुल्यांचा राग होता. कारण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी न करता “आता शेतक-यांची परिस्थिती सुधारते आहे. शेतक-याच्या कर्जबाजारीपणाला कारण म्हणजे तो लग्नात जास्त खर्च करतो हे आहे,” इत्यादी विचार सभा मांडीत असे. जोतीरावांच्या मते सार्वजनिक सभा नावालाच ‘सार्वजनिक’ आहे. त्यात शेतकरी, बलुतेदार, मांग, महार यांचा समावेश नाही. पाचपन्नास ब्राह्मणांनी सर्वांचे नाव घेऊन ब्राह्मणांना सरकारी जागा मिळवून देण्यासाठी उभे केलेले ते एक सोंग आहे, असे त्याबाबत जोतीरावांचे मत होते. जोतीरावांनी ‘इशारा’ ही पुस्तिका रानड्यांच्या मताचा प्रतिवाद करण्यासाठी लिहिली. रानड्यांना शेतक-यांचे व खालच्या जातींचे दुःख माहीत नाही म्हणूनच ते ‘जातिरचना प्रगतीस बाधक नाही’ असे बोलू शकतात असे जोतीरावांचे मत होते. म्हणून त्या पुस्तिकेच्या सुरुवातीसच त्यांनी कबीराचे “जिस तन लागे वहि तन जाने । बीजाक्या जाने गव्हारा रे ।। हे वचन उद्धृत केले आहे. या पुस्तिकेत शेती व पाणी या विषयावर जोतीरावांनी त्यांचे विचार मांडले आहेत.
म. फुले यांच्या मते शेतीच्या विकासासाठी पाणी असणे मोठे गरजेचे आहे म्हणून शेतक-यास जर पाणी आहे, तर या सर्व गोष्टी आहेत. शेतक-यास पाणी मिळाले तर तो खराब जमिनीवरही चांगले पीक काढू शकतो. खडकाळ जमिनीतही उत्पन्न निघू शकते. पाणी गेले की त्याचे ऐश्वर्य जाते. सृष्टीक्रमाप्रमाणे पर्जन्य कोणत्याही एका भागावर पडला तर दुस-या भागावर पडत नाही. त्यामुळे शेतकरी लोकांस अन्नधान्याची तूट पडते. त्यामुळे सतत बारा महिने कॅनालने पाणी मिळालं तर हवेच आहे.
ज्या भागात पाटबंधारे खात्याचे कालवे आहेत त्या भागातील पाणी सोडणारे कामगार हे बेपर्वा आणि भ्रष्टाचारी आहेत. फुले सांगतात की, सरकारचा पाणीपट्टीचा दर जास्त, पण इंग्रज कामगार त्याकडे लक्ष देत नाहीत. भट कामगार शेतक-यास वेळेवर पाणी देत नाहीत. पाणी देण्याऐवजी ते शेतक-याशी अरेरावीची व उद्धट भाषा करतात. पुन्हा सरकार सांगते की, वक्तशीर पाणी न मिळाल्यामुळे जर शेतक-यांचे काही नुकसान झाले तर त्यास सरकार जबाबदार नाही. फुले लिहितात की, ‘हजारो रुपये पगार घेणा-या इंजिनियरांना धरणात किती गॅलन पाणी आहे, याचा अंदाज असणे जरुरीचे आहे. त्याप्रमाणेच त्यांनी पुढे पाणी अखेरपावेतो जेवढ्या जमिनीत पुरेल तितक्याच जमिनीच्या मालकास पाणी घेण्याची परवानगी द्यावी. त्यांच्या बेहिशोबीपणामुळे शेतक-याचे नुकसान होते म्हणून जोतीरावांनी अशी मागणी केली की, सरकारने शेतक-यास वेळेवर पाणी दिले पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारने प्रत्येक शेतक-यास शेताच्या पाण्याच्या मानाने प्रत्येकास एक एक तोटी करून द्यावी; जींपासून शेतक-यास वाजवीपेक्षा जास्त पाणी घेता येऊ नये. त्यामुळे शेतक-याचाही फायदा होईल व सरकारच्या पैशाची बचत होईल. आज महाराष्ट्रात पाणी वाटपाची जी चर्चा सुरू आहे तिला सुरुवात जोतीरावांनीच करून दिली आहे.
पाणी वाटपाची उपाययोजना, शेतक-यांच्या सर्वांगीण मुक्तीसाठी सर्वांगीण सुधारणेचा कार्यक्रम, शेतीसुधारणेचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम जोतीराव फुले यांनी सुचविले. शेतक-याची पिळवणूक धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अंगाने होत आहे. त्यां पिळवणुकीवरचा मुख्य उपाय म्हणजे शेतक-याची मानसिक गुलामी नष्ट करणे हा आहे. जोतीरावांच्या मते त्यासाठी शेतक-यांनी सर्वप्रथम कृत्रिम ब्राह्मणी धर्माचा, रितीरिवाजांचा व विधींचा त्याग केला पाहिजे. शेतक-यांनी सत्य धर्माचा स्वीकार केला पाहिजे. त्यांनी अनावश्यक विधी करू नयेत आणि लग्नासारखे आवश्यक विधी भटजीची मदत न घेता स्वतः करावे. अशी शिकवण जोतीरावांनी शेतक-यांस दिली. शेतकरी अज्ञानी व अक्षरशून्य असल्यामुळे आपल्या पिळवणुकीचे कारण तो जाणू शकत नाही. त्याला आत्मस्थितीचे ज्ञान आधुनिक विद्या संपादन केल्याशिवाय होणार नाही. सरकार शेतक-याकडून शेतसारा व लोकल फंड गोळा करते. पण त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करीत नाही. याबद्दल फुल्यांनी सरकारला दोष दिलेला आहे. गरिबांच्या शिक्षणासाठी शाळा उघडणे गरजेचे आहे. अडाणी पोटभरू आणि धार्मिक अंधश्रद्धेचा प्रचार करणारे ब्राह्मण पंतोजी शूद्रांना नको आहेत. त्यासाठी शूद्रातून नवे पंतोजी निर्माण करावे असे फुल्यांचे मत होते.
ब्राह्मणाच्या नोकरशाहीतील मक्तेदारीमुळे समाजावर त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ते समाजावर अन्याय करतात, भ्रष्टाचार करतात, लाच खातात. शेतक-यांच्या मनात त्यांच्याबद्दल बिलकूल आपुलकी नाही. म्हणून त्यांची नोकरीतील मक्तेदारी मोडण्यासाठी जोतीराव असे मत व्यक्त करतात की, प्रत्येक जातीला त्या जातीच्या संख्येच्या प्रमाणात नोक-या देण्यात याव्या. एकाच जातीची भरती केल्यामुळे अनिष्ट परिणाम होतात. फुले सांगतात,
“अनुभवा स्वता लक्षून । सांगतो खरे निक्षून । सर्व जाती निवडून । घाण्या संख्या प्रमाण ।।”
जोतीरावांनी सरकारला शेतक-यांची काळजी घेण्यास सांगितले आहे. कारण शेतकरी अज्ञानी आहेत. तो वाममार्गाने जाऊ शकतो. त्यास दारूचे व्यसन लागू शकते. त्यांनी गैरशिस्त वागू नये म्हणून डिटेक्टिव्ह डॉक्टरची नेमणूक करावी. शेतक-यांनी एकापेक्षा जास्त बायका करू नयेत. मुलांची लग्ने लहानपणी करू नयेत. त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळाले पाहिजे. शूद्रांची मुले शिकून सरकारी अधिकारी, मामलेदार झाली पाहिजेत. शेतीच्या बाबतीत जोतीरावांनी खालील सुधारणा करण्यात याव्यात असे सुचविले आहे :
१) शेतीची योग्य प्रकारे मशागत करता यावी म्हणून चांगल्या जातीच्या गायी-बैलाची पैदास करण्यात यावी. त्यासाठी सरकारने परदेशातून चांगल्या गाईचे बेणे आणावेत. गाई न मारण्याचा कायदा करावा.

२) डोंगर-टेकड्यांवरील गवत, पालापाचोळा, मेलेले कीटक व श्वापद यांच्या हाडामांसाचे सत्त्व, पानाफुलांचे कुजलेले खत पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ नये म्हणून जागोजाग तालीवजा बंधारे बांधावेत. त्यामुळे वळवाचे पाणी एकंदरीत शेतात मुरून नदी-नाल्यास मिळेल. असे केल्याने शेते सुपीक होतील.

३) हे काम लष्करातील काळ्या गो-या शिपायांकडून करून घ्यावे. त्याचप्रमाणे पोलीस व शिपायांकडून डोंगर-टेकड्यां मधील द-याखो-यांनी तलाव, तळी जितकी होतील तितकी सोयीसोयीने बांधून काढावी. म्हणजे त्यांच्या खालच्या प्रदेशात ओढ्याखोड्यांनी भर उन्हाळ्यात पाणी असल्यामुळे जागोजागी धरणे होतील. विहिरींना पाणी मिळेल आणि बागायती शेती वाढेल.

४) शेते धुपून त्यात खोंगळ्या पडू नयेत म्हणून शेतक-यांनी पाणलोटाच्या बाजूने शेतांच्या बांधांनी वरचेवर ताली दुरुस्त ठेवाव्यात.

५) ज्या ठिकाणी झरे सापडतील त्या ठिकाणी गावाच्या नकाशात नमूद करून विहिरी पडाव्यात. या विहिरी स्वतः बांधणा-यास लहानमोठी बक्षिसे देण्याची व्यवस्था सरकारने करावी.

६) एकंदर सर्व नदीनाले व तलावातील साचलेला गाळ पूर्वीप्रमाणेच शेतक-यास फुकट नेऊ द्यावा.

७) गावराने फॉरेस्ट खात्यास सामील केली असतील तर ती शेतक-यास वापस द्यावीत. जंगलातील इमारती लाकडे तोडू देऊ नयेत, पण इतर लाकूडफाटा तोडण्याची मुभा असावी.

८) उत्तम शेळ्यामेंढ्याची पैदास वाढविण्यासाठी परदेशातून त्यांची बेणी आणावी.

९) शेतक-यांचा व त्याच्या पिकांच्या गली जनावरांपासून बचाव करण्यासाठी गावठी तोड्याच्या बंदुका शेतक-यास द्याव्यात. शेतक-यांची पिके जर जनावरांनी खाल्ली वा त्यांची नासाडी केली तर सरकारने त्याची नुकसानभरपाई पोलीस खात्यातील वरिष्ठ अंमलदारांचे पगार कापून करावी.

१०) सालदरसाल श्रावण मासी प्रदर्शने करून अश्विन मासी शेतपिकांच्या व औते हाकण्याच्या परीक्षा घेऊन शेतक-यांस बक्षिसे द्यावी. त्यांना पदव्या द्याव्या.

११) शेतक-याच्या मुलास लोहारी, सुतारी कामाचे शिक्षण द्यावे. त्यांना विलायतेतील शेतीशाळा पाहण्यास पाठवावे. तेथील सुधारणा बघून ते आपल्याकडेही त्याच प्रकारच्या सुधारणा करू शकतील.

१२) शंभर रुपये पगाराच्या वरील सर्व अंमलदारांचे पगार कमी करावेत. त्यांच्या पेन्शनी कमी कराव्यात. मात्र शेतमजूर, कारागीर, लोहार, सुतार, बिगारी, डोलीवाले यांचे पगार कमी करू नयेत.

१३) शेतक-यांच्या मुलास पुस्तके, पाट्या व पेन्सिली पुरवाव्यात. तसेच शेतक-यास शेती सुधारण्यासाठी शेतीसंबंधीचे सर्व ज्ञान देऊन त्यासंबंधी ग्रंथ उपलब्ध करावे.

१४) शेतकी शाळा स्थापन कराव्या.

म. फुले यांचे असे मत होते की, सरकारने शेतक-यांसाठी आणि शेतीसाठी या सुधारणा अमलात आणल्याखेरीज शेतक-यांची परिस्थिती सुधारणार नाही.
म. फुले यांनी ‘शेतक-याचा आसूड’ मध्ये अशा प्रकारे अनेक मूलग्रामी विचार मांडले. शेतक-यांच्या उन्नतीची चळवळ वर सांगितलेल्या कार्यक्रमाच्या आधारावर बांधली जावी असे त्यांचे मत होते. त्यांचे अंतिम धेय्य ‘बळीच्या राज्याची’ स्थापना करणे हे होते. त्यांच्या लेखी ‘बळीचे राज्य’ हे शेतक-यांचे राज्य होते


(‘महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ’ या पुस्तकातून साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *