
‘शिक्षणासाठी ताटे विका पण शाळा शिका, कारण ताटाशिवाय खाता येईल. परंतु, शिक्षणाशिवाय संपूर्ण आयुष्य अर्धवट आहे, असे विचार समाजमनावर बिंबवताना आपल्या किर्तनातून स्वच्छता, अहिंसा दारूबंदी अंधश्रद्धा, निर्मुलन, अस्पृश्यता निवारण आदी विषयांबाबत समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी दि. २३ फेब्रुवारी रोजी झाला. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील व समाजातील मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. गाडगे महाराजांचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आकारास आले. शहरांपासून खूप दूर असलेल्या एका खेड्यातील परीट जातीतील जन्म. परीट म्हणजे काही फारशी सुधारलेली जात नव्हे. लोकांचे कपडे धुवावे आणि दारूच्या धुंदीत पडून असावे, हा त्या जमातीचा जनमान्य प्रघात. शिक्षणाचा आणि परीट समाजाचा दूरदूर पर्यंत संबंध नव्हता. खेड्यांमधून एखाद्या माणसाला जेमतेम सही करता आले तरी स्वर्गप्राप्ती होते असा समज या समाजाचा होता. परीट आहे आणि त्यास लिहिता वाचता येते, तर मग तो शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे, अशी त्या काळी या समाजाची जनरीत होती. त्यामुळे गाडगेबाबांच्या अमर्याद स्वकर्तुत्वाच्या विचार या पार्श्वभूमीवर केला पाहिजे.
या प्रतिकूल परिस्थितीशी गाडगे महाराजांनी मोठ्या जिद्दीने झुंज दिली. मामाच्या घरी शिळ्या भाकरीवर राबत असता गाडगे महाराजांचे समाज नेतृत्व पुढे आले. मामाच्या गावात गाडगे बाबांनी गुरे चारली. शेणपाणी केले, नांगरणी, वखरणी, पेरणी, सोंगणी, मळणी, या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी कष्ट केले. या कष्टातून त्यांनी सावकाराच्या घशात गेलेली मामाची जमीन परत मिळवली. ज्यामुळे जनमानसात गाडगे बाबांचे लढाऊ नेतृत्व चर्चेस आले. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून गाडगेबाबांनी संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव ते झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी किर्तन मार्गाचा अवलंब केला. आपल्या किर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. जसे चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या किर्तनातून सांगत.
देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाहीं असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने व-हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या किर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या किर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्गार बाबाचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यानी काढले होते. नवल असे की, गाडगेबाबा कुण्या मठधा-याचे शिष्य झाले नाहीत. त्यांनी स्वतःचे नाणे पाडले. स्वकर्तुत्वावर त्यांनी समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. गाडगे महाराजांनी समाजाच्या दातृत्वास आवाहन केले. या आवाहनाला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळाला. दानशुरांनी लक्षावधी रुपये त्यांच्या गाडग्यात टाकले. त्यांतली पै अन पै बाबांनी सत्कारणी लावली. अनेक धर्मशाळा बांधल्या. आंधळ्या-पांगळ्यांसाठी सदावर्ते चालविली. निराश्रितांस वस्त्रे-पत्रे वाटली. देशी पाणपोया चालविल्या. अनाथ वृद्धांसाठीं झोपड्या बांधून त्यास मरेपर्यंत सांभाळले. कसायाच्या हातून गाई सोडविल्या. गोरक्षणे काढली. दुष्काळग्रस्तांस अन्न पुरविले. गरिबांची लग्ने लावून दिली. निरक्षरांसाठीं शाळा-प्रशाळा सुरू केल्या. हजारो लाखो मद्यप्यांना व्यसनमुक्त केले. त्यांचे उजाडलेले संसार पुनः मार्गास लावून दिले. अस्पृश्यतेविरुद्ध कडाडून प्रचार केला. देवाच्या नावे होत असलेल्या पशुहत्येविरुद्ध प्रचाराची झोड उठविली. असंख्य ठिकाणांच्या हत्या निकराची झुंज देऊन बंद पाडल्या. नद्यांवर घाट बांधले. गुरांना पाणी पिण्यासाठी हौद निर्माण केले. निर्धंनासाठीं वसतिगृहे सुरू केली. कर्जे काढून देवयात्रा करणा-यांचा निषेध केला. सणवार करण्यासाठी जो अपार खर्च केला जाई, त्याविरुद्ध जनास जागे केले. हुंड्याविरुद्ध आवाज उठविला. स्त्रिया आणि पुरुष असा भेदभाव करण्यास मज्जाव केला. कुष्ठरोग्यांची सेवा केली.
गाडगे बाबांच्या स्वकर्तुत्वास बहर येत होता, त्याच क्षणी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद ऐन भरास आला होता. सत्यशोधनाची चळवळ शिगेस पोहचली होती. बाबा त्या दिशेला वळले असते, तर सत्यशोधकांनी त्यांना डोक्यावर घेऊन मिरवले असते. पण त्यांनी आपला तोल सुटू दिला नाही. जनमानसात गाडगे महाराज वा-याप्रमाणे पसरू लागले होते. या काळात मोठमोठे लोक बाबांच्या चरणाच्या धुळीची आशा करीत. परंतु बाबांनी कधीही या गोष्टीचा अनुचित लाभ घेतला नाही. त्याकाळी मुंबईतील कित्येक कोट्याधीश गिरणी मालक गाडगे बाबांना साद देत असत. परंतु बाबांनी कधीही श्रीमंतीपुढे मान झुकवली नाही. अत्यंत निष्ठेने व निस्वार्थपणे त्यांनी समाजसुधारणेसाठी लढा सुरु ठेवला.
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणी गावात झालेले भाषण बाबांना ठाऊक होते… स्टेजवर येताच बाबानी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन गावक-यांना शिकविणार! असाही उद्गारवाचक सवाल त्यांनी टिळकांना केला. यावरून गाडगे बाबांच्या परखड वृत्तीचे दर्शन होते.
महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हणले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे – ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ – असे म्हणले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांबद्दल प्रचंड आदरभाव होता.१४ जुलै १९४१ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. प्रकृतीचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणा-या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्विकारल्या आणि म्हणाले “डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.” तेव्हा बाबासाहेब म्हणाले “बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.” या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. संत गाडगेबाबा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. दोघांमध्ये खूप चर्चा होत असत. गाडगेबाबा हे डॉ. आंबेडकरांपेक्षा वयाने मोठे असले तरी यांच्यावर डॉ आंबेडकरांचा खूप प्रभाव होता. खरे तर गाडगेबाबांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. स्वअभ्यासाच्या बळावर ते थोडं लिहायला-वाचायला शिकले होते. तरीसुद्धा ३१ शैक्षणिक संस्था व शंभराहून अधिक इतर संस्था गाडगेबाबांनी स्थापन केल्या होत्या.
डॉ. आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्य- मातून आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. या कार्यात त्यांना गाडगेबाबांनी मोलाची मदत केली. उल्लेखनीय म्हणजे संत गाडगेबाबांनी पंढरपूर येथे स्थापन केलेली त्यांची धर्मशाळा पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान केली होती. याशिवाय मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान जेव्हा बंद केले होते तेव्हा गाडगेबाबा त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. गाडगे बाबांनी मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेत,’ रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले? असा सवाल करीत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. बाबांमुळे रयत शिक्षणस्थेचे अनुदान पुन्हा सुरू झाले. या अर्थाने गाडगेबाबांचा शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन लक्षात घेणे काळाची गरज आहे.
वर्तमानात शिक्षणापासून वंचित असलेल्या समूहासाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांची निर्मिती करून या समूहाला शिक्षण प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या आधुनिक नेत्यांनी गाडगेबाबांचा विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. याशिवाय संत गाडगेबाबांनी समाजप्रबोधनासाठी दिलेला दशसूत्री संदेश ज्यामध्ये, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्याना वस्त्र, गरीबमुला मुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, पंगू रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत इत्यादी कार्य करण्यासाठी समाज व शासनाकडून व्यापक प्रमाणात सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.