
म. बसवेश्वर अवैदिक व स्वतंत्र धर्म आणि संस्कृती चे जनक आहेत. आपली संस्कृती ही शरण संस्कृती आहे. लिंगायत धर्मात स्री-पुरुष समानता, लिंगभेद, वर्ग वर्ण भेदभाव मान्य नाही. सर्व जाती समावेशक समाज निर्मिती करण्याचे महात्मा बसवेश्वरव शरण मंदियाळांचे स्वप्न होते. बारा बलुतेदार व समाजातील बहुजन वंचित अस्पृश्य घटकांना एकत्रित समान पातळीवर आणण्याचे महान क्रांतिकारी काम म. बसवेश्वर यांनी केले. बाराव्या शतकात मुठभर धर्म प्रस्थापितांनी सामान्य लोकांचे जगणे मुश्किल केले होते. रूढी परंपरेचे दानव समाजात थैमान घालत होते. स्त्री वर्ग, शुद्र व अतिशुद्र अतिशय दुबळा झाला होता. मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे म. बसवेश्वर हे क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर म्हटले तर वावगे ठरणार नाही. अन्यायाविरुद्ध लढणारे विद्रोही होते. पुरोहितशाही विरुद्ध बंड थोपटणारे क्रांतिवीर होते
वैज्ञानिक दृष्टिकोन : विज्ञान म्हणजे चिकीत्सा! जे ज्ञान विचार करून, विवेक मार्गाने, अनेक कसोटींवर तपासले जाते तेच खरे विज्ञान. त्याची पुनरावृत्ती होऊ शकते ते विज्ञान. सत्याचा मार्ग म्हणजेच विज्ञान. सत्य अंतिम कधीच नसते कारण विज्ञानाच्या क्षेत्रात सतत नवनवीन शोध लागत असतात. पुरावे, कारणमीमांसा, तर्कशुद्ध अभ्यास म्हणजेच विज्ञान होय. म.बसवेश्वर यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन खालील ओळींतून स्पष्ट होतो.
“मंथनाविना सत्य असत्य म्हणू नये
प्रत्यक्ष पडताळल्याविना सत्य असत्य स्विकारु नये,
गुरू-लिंग असो वा जंगम,
त्यांची भक्ती विरक्ती प्रत्यक्ष पडताळून पहावी,
न पडताळणी भक्ती विरक्ती म्हणजे,
छिद्र पडलेल्या घड्या प्रमाणे आहे.”
ज्ञान म्हणजे काय? आपण काही गोष्टींना सत्य म्हणून मान्यता देतो व त्याचे समर्थन करतो. लोकसमजुती, परंपरा व लोकविद्या ह्या चिकित्सक दृष्टीने तपासूनच स्वीकारा अथवा ते मान्य करु नये असा सल्ला बसवादी शरणांनी आपल्या आचरणाने व वचन साहित्याने दिला आहे. तर्कशुद्ध विचार करण्यास प्रवृत्त केले. मंथनाविना सत्य स्वीकारू नये असा नवा आदर्श निर्माण झाला.
चिकित्सक दृष्टीकोन हा वैज्ञानिक कसोटीचा भक्कम पाया आहे. चिकित्सक दृष्टीकोन आत्मसात केल्यावर चौकस बुद्धी वाढते. परंपरागत व्यवस्था व वैचारिक बैठकीमध्ये बदल घडवून आणण्यात चौकस बुद्धी वृध्दी आवश्यक आहे. सामाजिक विषमतेविरुध्द बंड पुकारण्याची व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची प्रेरणा चिकित्सक दृष्टीकोनातूनच मिळते. क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर अतिसंवेदनशील, बुध्दीमान व चिकित्सक होते. अन्याय व विषमते विरुद्ध लढ्यास चिकित्सक वैचारिक बैठक पूरक ठरली. दलित, न्हावी, चांभार, कुंभार, नाविक, मातंग, धोबी, कोष्टी, सुतार सर्वांना सामावून समानता आणली. नैसर्गिकरित्या मानव जात एकच आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला. माणसा-माणसांमध्ये भेदभाव का केला जातो? सर्वजण सारखेच असताना एकमेकांबद्दल तिरस्कार का केला जातो? प्रत्येकास जगण्याचा अधिकार सारख्याच पातळीवर का मिळत नाही, असे अनेक प्रश्न ते उपस्थित करत.
वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबर आपोआप निर्माण होत नसतो. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही संकल्पना निर्विवादपणे मानवता, समता, हक्क आणि न्याय या आधुनिक मूल्यांच्या संकल्पनेशी जोडलेली आहे. आणि म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे, हे सरकारचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. लैंगिक आरोग्य आणि समानता, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह, आधुनिक लोकशाही तसंच सर्वसमावेशक मूल्यांना पुढे घेऊन जाणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन “निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग” या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.
पंडित नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व सांगताना लोकसभेत म्हणाले होते की..”Scientific Temperament is a Process of Thinking, Method of Action,Search of Truth,Way of Life,Spirit of Free Man.”
तथागत बुद्ध, म. बसवेश्वर, म. फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर विज्ञानवादी होते. प्रश्न पडणे ही विज्ञानाकडे जाणारी प्राथमिक वाटचाल आहे. म. बसवेश्वर लहान असताना अनेक प्रश्न विचारीत जसे चांभाराच्या मुलाला स्पर्श का नाही करायचा? चांभाराने तयार केलेली चप्पल का घालू शकतो? मुलींची मुंज का होत नाही? विधवेचे केशवपन का करायचे? विधवेने पांढरेच कपडे का घालायचे? म. बसवेश्वर तीक्ष्ण बुध्दीमान व अति संवेदनशील होते. त्यामुळे समाजातील सर्व भेदभाव व अनिष्ट रूढी, अंधविश्वास बघून खूप दुःखी होत असत.
शिक्षण म्हणजे प्रगती! आजच्या प्रगत युगात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला की कमी झाला? याचे उत्तर खरतर खूप खेदजनक आहे. सुशिक्षित समाज सुध्दा बुवाबाजी, धागेदोरे, नवस, उपवास, यज्ञ, शांती या बाह्य अवडंबर च्या चक्रात अडकलेला दिसून येते. म. बसवेश्वर व शरण- शरणींनी वेद आगम, शास्त्र, अंधश्रद्धा, संन्यास यास कडाडून विरोध केला. प्रामाणिक कामाला अतिशय महत्व दिले. कायकवे कैलास या सूत्राला आरोग्यदायी जगण्यासाठी प्राधान्य दिले. याद्वारे सामाजिक आरोग्याचीही काळजी घेतली गेली.
म. बसवेश्वर व शरणींनी आचार विचारात सामरस्य आणले. बोले तैसा वागे अथवा वागे तैसा बोले ची प्रचीती आणली. कालच प्रयागराज महाकुंभ ची बातमी आली. अनेक भक्त जण चेंगराचेंगरीत ठार झाल्याची बातमी वाचून मन हेलावून गेले. महात्मा बसवण्णा, शिवयोगी सिद्धरामेेशर, अल्लम प्रभुदेव यांच्यासह ३६ शरणांनी आपल्या वचनांतून गंगा स्नानातल्या डुबकीच्या पवित्र्यावर प्रश्न विचारलाय. महात्मा बसवण्णा म्हणतात,
पाणी पाहिलं की डुबकी मारतात
झाड पाहिलं की फे-या घालतात
वाळून जाणारं पाणी, वठून जाणारं झाड
भुरळ घालणा-याना आपली जाण कशी असेल
याचा अर्थ असा की विषयासक्ती न सोडता गंगेत आंघोळ करून, तीर्थाटन करून, मेरूपर्वतावर पायपीट करून, व्रत वैकल्यं करून काही मिळणार नाही. चंचल मन स्थिर केल्यानंतरच परमज्ञानाची प्राप्ती होईल. अशा शब्दात अल्लमप्रभुदेवांनी तीर्थाटनाच्या मागे लागलेल्यांना फटकारलंय. अनुभव मंटप म्हणजे जगातील पहिली लोकसंसद जी बसवण्णानी उभारली. ७०० शरण (सदस्य) आणि ७० शरणी दररोज आपले काम झाल्यावर चर्चासत्र, परिसंवादात भाग घेत. समाजातील सर्व घटकातील शरण शरणी येत असे. शरण मंदियाळ सर्वसमावेशक असल्याने उच्च दर्जा चे वचन साहित्य या संसदेतून निर्माण झाले.
ज्ञानावर अफाट निष्ठा बाळगणा-या अक्कमहादेवी म्हणतात,
अज्ञ जनांचा संग केल्यावरी
दगडांच्या आघाताने ठिणग्या काढल्यापरी
सूज्ञ जनांचा संग केल्यावरी
दही मंथुन लोणी काढल्यापरी
चेन्नमल्लिकार्जुनराया
तव शरणांचा संग केल्यावरी
अग्निने कर्पुरर्गिरी गिळण्यापरी
लिंगभेद : निसर्ग नियमानुसार महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, हक्क व समान अधिकार महात्मा बसवेश्वरांनी दिले. स्त्री, आपली जबाबदारी पार पाडते, तिला शूद्र स्थान का असावे ? असा खडा सवाल शरण विचारतात. मासिक प्रक्रिया व गर्भधारणा ही एक नैसर्गिक जबाबदारी आहे. ती विटाळ कशी असू शकते?
समान अधिकार : चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. निसर्गामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, मांडण्याचा, म्हणण्याचा, प्रकटीकरणाचा, लढण्याचा इत्यादी गोष्टींमध्ये समान व बरोबरीचा अधिकार असल्याचे ते नेहमी मानत; नुसतेच मानत नव्हते तर त्यांनी आपल्या लहानपणीपासूनच विविध ठिकाणी आपली भूमिका मांडली.
जातीभेद : महात्मा बसवेश्वर यांनी चारही वेद, सर्वशास्त्रे, अठराही पुराणे नाकारली आहेत, त्यांचे खंडन केले, ते थोतांड आहेत ते फेकून द्यावीत, त्यावर मी शस्त्र चालवून नष्ट करतो,असे म्हटले आहे. त्याबाबत वचनात म्हणतात,
वेद थरारले, शास्त्रे बाजूला हटली,
तर्कही अतर्क होऊन मूक झाले,
आगमही हटून दूर सरले,
कारण आमच्या कुडलसंगमदेवाने
मादार चेन्नय्याच्या घरी भोजन केले.
प्राण्याचा बळी दिला तर देव पावतो काय? यज्ञात दूध तूप घातल्यास देव प्राप्त होतो काय वा भरभराट होते काय? असे प्रश्न यामधून उपस्थित होतात.
आंतरजातीय विवाह : विज्ञानाच्या कसोटीवर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह मान्य आहेत. सनातनी पुराणमतवादी समाजाने आंतरजातीय विवाहांना कधीही मान्यता दिली नाही, कठोर शिक्षा ठोठावली. बहिष्कृत केले. या पार्श्वभूमीवर. अनुभव मंटपात ब्राह्मण मधुवरसाची कन्या कलावती आणि चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत यांच्या विवाहाचा निर्णय एकमुखाने घेतला. बसवादी शरणांनी सर्वांच्या अनुमतीने कलावती-शीलवंत विवाह लावून दिला. प्रस्थापित वैदिक व्यवस्थेने हे विवाह अमान्य केले.
दूरदूरपर्यंत क्षेत्र भ्रमंती
करूनही नच लाभे.
गंगातीर्थी लक्ष स्नान
करूनही नच लाभे.
मेरुगिरीच्या शिखरावरून
सादवूनही नच लाभे.
नित्य व्रत-नेमांनी तनू
शिणवूनही नच लाभे.
नित्य विषय स्मरणात रमणारे,
विषयांमागे क्षणोक्षणी धावणारे,
चंचल मन चित्तात स्थिर केल्यास
गुहेेशरलिंग केवळ परमज्ञानप्रकाश!
अल्लमप्रभुदेवां : ९५० वर्षांपूर्वी म. बसवेश्वर व शरण- शरणींनी दाखविलेला पूरोगामित्व, वैज्ञानिक दृष्टिकोन, उदात्तीकरण आजच्या घडीला पुसट होत आहे का असा प्रश्न पडतो. समाजात बुवाबाजी चे स्तोम पुन्हा वर येत आहे. महाकुंभ च्या निमित्ताने गंगा स्नानाचे महत्त्व वाढत आहे. वचन साहित्य चा अभ्यास, प्रचार, प्रसार व मंथन झाले पाहिजे. चला सर्व मिळून प्रयत्न करूया. आपण लिंगायत धर्म समजून घेवू आणि आचरणात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू या.
***