Menu

संत नामदेव : समतामूलक आंदोलनाचे प्रथम निर्गुण संत कवी

-प्रा. विमल थोरात, माजी प्राध्यापक IGNOU , न्यु दिल्ली

-प्रा. विमल थोरात

संत नामदेव : संत नामदेव १२७० इ.स. महाराष्ट्रातील नरसी (हिंगोली) येथे शिंपी जातीत जन्मले. बालपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रमलेले नामदेव आणि ज्ञानेश्वर ह्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची स्थापना केली. नामदेवांनी बरीच वर्षे महाराष्ट्रभर फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. पण त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य हे महाराष्ट्रापुरतेच सीमित राहिले नाही, तर नामदेवांनी निर्गुण भक्तीचा प्रचार प्रसार महाराष्ट्राबाहेर पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, पाकिस्तानसीमाप्रांत, आणि राजस्थानच्या गावा-गावापर्यंत पोहोचवला. तत्कालीन समाजामध्ये लोककल्याणाची भावना सरल भक्तीव्दारे पोहोचविण्याचे कार्य त्यांनी उत्तर भारतापासून सुरु केले. काही विद्वानांच्या मते पंजाबमधील गुरुदासपूर जिल्हातील घुमान येथे इ.स. १३५० मध्ये त्यांनी देहत्याग केला, तेथे त्यांची समाधी आहे. दुसरे मत आहे की पंढरपूर येथे त्यांनी देह ठेवला आणि त्यांची समाधी पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे.

संत ज्ञानेश्वरवरांनी वयाच्या विसाव्या वर्षी समाधी घेतल्याची घटना घडली तेव्हा अतिशय विचलित झालेल्या नामदेवांनी उत्तर भारताकडे वारकरी संप्रदाय म्हणजेच निर्गुण निराकार आराध्याच्या भक्तीव्दारे समाजकल्याण व समाज जागृतीचे कार्य करण्याचे योजिले. मध्ययुगीन भारतीय समाज अनेकानेक कुप्रथा, धार्मिक अवडंबर, जाती भेदभाव, कट्टर सांप्रदायिकतेने ग्रासलेला होता. बुद्ध धर्माची उदात्त तत्वे समता, बंधुभाव आणि न्यायपूर्ण मूल्ये विसरलेला होता. समाजात अत्याचार वाढलेला पाहून संत नामदेवांना विलक्षण वेदना होत असत. बाह्य अवडंबराचा विरोध दर्शवित नाम स्मरणास महत्व देवून भक्तीचा सरळ सोपा मार्ग जनसामान्यांना समजावा हा त्यांचा (नामदेवांचा) ध्यास होता. त्यांनी हिंदू धर्मात असलेले बाह्य सोपस्कार, तीर्थ-स्नान, व्रत-अनुष्ठान, उपवास, दान-पुण्य, यज्ञ इत्यादिला विरोध करीत शुद्ध मनाने केलेल्या नाम स्मरणाने मिळणारे सुख ते प्रत्येक मानव जीवाला देण्यास उत्सुक होते-

लागती सायास करणे कायाक्लेश।
आपण वैकुंठ येईल सवे।
गोमुखी गोवूनि काय जपतोसी। जपतप त्यासी विघ्न।
नामसंकिर्तनी जळतील पापे। चुकतील खेपा चौर्यांशीच्या
उपवास करी उग्र अनुष्ठानी।तथा चक्रपाणी अंतरतो।
नामा म्हणे ऐसे बहुतेक प्राणी। पिचतील खाणी भ्रष्ट लोक।

पाखंड, कर्मकांड, ढोंग व अहंकारी प्रवृत्तींवर टीकास्त्र चालवीत संत नामदेव ब्राम्हण,पंडित व हरिदास ह्यांच्या ढोंगीपणावर वार करतांना म्हणतात

यज्ञादीक कर्म करुनी ब्राम्हण। दंभ आचरण दावी लोकां।
लोकांसी दाविती मीच कर्मनिष्ठ। अभिमान खोटा वागवित्ती।
गोसाविपणाचा दाखविती वेष। नाही निदिध्यास हरिनामी।
वरी वरी आर्त दाविती झगझग। अंतरी तो संग विषयांचा।

संत नामदेव रूढी परंपरांच्या जोखडाखाली दबलेल्या बहुजन समाजाला मुक्त करू पाहत होते. याविषयी त्यांची कळकळ निम्नलिखित अभंगातून स्पष्ट होते-

हिंदू अंधा तुरकू काणा दोहां ते गियानी सियान।
हिंदू पूजै देहुरा मुसलमान मसीत।
नामे सोई सेविआ जह देहुरान मसीत।

नामदेवांनी धार्मिक आचार विचारांच्या नावावर सत्य आणि नैतिकता त्यागणा-या हिंदू व मुसलमान दोहोंना फटकारले. सगुण भक्ती मध्ये ही विश्वास असलेले संत नामदेव निरर्थक दगडाच्या मूर्तीची पूजा करणे म्हणजे मूर्खता मानीत असत. निराकार ईश्वराला मानणारे वारकरी संप्रदायाचे सर्व संत निर्गुणवादी होते. ज्यांच्यामध्ये संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपानदेव, विसोबा खेचर, संत तुकाराम, संत चोखामेळा, कर्ममेळा, सावतामाळी, जनाबाई, गोरा कुंभार

प्रमुख होत. मध्यकालीन भक्ती परंपरेमध्ये शुद्र, स्त्रिया, व निम्न मानल्या गेलेल्या जातींचे संतांची संख्या अधिक असल्याचे कारण हे की तत्कालीन जातीव्यवस्थेचे ते बळी होते.

श्रमिक असूनही अतिशय दारिद्रयाने पिचलेले आर्थिक साधनांच्या अभावामुळे, सरंजामशाहीने त्रस्त अशा सर्वसामान्य जनतेचे ते नेतृत्व करीत होते. पंजाबमध्ये संत नामदेवांचे वास्तव २०-२१ वर्षाचे राहिलेले, त्यादरम्यान पंजाबच्या गावा-गावांमध्ये फिरून त्यांनी जातिप्रथा ब्राम्हणवादी वर्चस्व, कर्मकांड, धार्मिक अवडंबर, मूर्तीपूजा, स्नान, पोथी, ईश्वर, कर्म, पुर्नजन्म आदि अंधविश्वास पसरविणा-या बाह्य अवंडबराविरुद्ध निर्गुण निराकार भक्तिचे किर्तन स्वरुपात काव्यात्मक आंदोलन उभे केले. त्यांनी रचलेल्या ३०० पदांमधून ८१ पदे “गुरुग्रंथसाहेब’मध्ये समाविष्ट केलेले आहेत. पंजाबी गुरुमुखी भाषेत अभंग त्यांनी रचलेले आहेत. पंजाब संत परंपरेमध्ये संत नामदेवांचे स्थान सर्वोपरी आहे. त्यांचे गुरुमुखीमधील काही अभंग वानगी दाखल बघायला हवेत.

भैया कोई तुलै रे रामाँय नाँम।
जोग यज्ञ तप होम नेम ब्रम्ह।
ए सब कौने काम।

जातीदंशाची वेदना नामदेव ह्या शब्दांमध्ये व्यक्त करतात.

हीन दीन जाति मोरी पंढरी के राया।
ऐसा तुमने नामा दरजी कायकू
बनाया।
कहा करऊ जाति, कहा करऊ पाति।
राम का नाम जपऊ दिन राती।

निर्गुण विचारवादी संत नामदेव मुखरपणे एकेश्वरवादाचे समर्थक होते, राम आणि रहीम हे एकाच ब्रम्हाची दोन रूपे मानत असत. पण इथे ब्रम्ह म्हणजे वेदामधील तो ब्रम्ह नव्हे ज्याच्या शरीराच्या विभिन्न अंगातून चतुर्वर्ण व्यवस्थेचा जन्म झाल्याचे मिथक (काल्पनिक) वापरले जाते. ब्रम्ह हा संत नामदेवांनी एकेश्वर निर्गुण-निराकार रुपामध्ये भक्तीच्या आलंबन रुपामध्ये अंगिकारला. म्हणूनच आपणास दिसून येते की, विठ्ठल रुपात सगुण व निर्गुण  ही दोन्ही रूपे त्यांनी स्वीकारली आणि जनमानसामध्ये भक्तीची सरल पद्धतीने नाम किर्तनाद्वारे समता, बंधुभाव, जातपात विहीन शोषणमुक्त समाजाचे स्वप्न बघितले. ते म्हणतात-

करीमा रहिमा अल्लाह तु गनी।
हाजरा हजीर दरि पेसि तु मनी।
दरिआऊ तुं दिहंद तु बिसिआर तुं धनी।
देहि लेहि एकु तुं दिगर को नहीं।
तुं दाना तुं बीना मैं बिचारू किया करी।
नामेचे सुआमी बखसंद तु हरी।

संत नामदेव रहीम अल्लाह ला ब्रम्हाचेच रूप मानत असत.
संत नामदेव निर्गुण -निराकार ब्रम्हाची भक्ती सगुण रुपात म्हणजेच विठ्ठल, पांडुरंग ह्यांना आळवित प्रश्न विचारतात.

देव दाखवी ऐसा नाही गुरु।
जेथे जाय तेथ दगडं शेंदरू।
देव दगडाचा बोलेल कैसा।
कोणे काळी त्यास फुटेल वाचा।
देव देव करिता शिणले माझे मन।
जेथे जाय तेथे पूजा पाषाण।
नामा तोचि देव हृदयीं पाहे।
नामा केशवाचे न सोडी पाय।

बाह्य आंडबराचे विरुद्ध नामदेवाचे विचार हे आज घडिला अतिशय महत्वाचे ठरतात, हिंदू-देवदेवतांची, पूजा-अर्चना, मंदिर देव्हारे, व्रत उपवास करण्याचे नवे पर्वच जणू सुरु झाल्याचे आज दिसून येत आहे. स्नानादी तीर्थ, दक्षिणा, आदिचे स्तोम हे हेतूपुरस्सर राजनीतिक स्वार्थासाठी माजवले जाणे अज्ञानी अशिक्षित अंध श्रद्धाळू जनांना मूर्ख बनवून अविवेकी व तर्कशून्य बनविण्याचे मोठे षडयंत्र आहे.

वर्णवाद, जातिवाद, भेदभाव अस्पृश्यता, स्त्रियांचे शोषण हिंसाचार, तिरस्कार व घृणा ही सामाजिक विकृती परत बोकाळत आहे. संविधानाची मूल्यवान मुल्ये अक्षरक्ष: विसरून समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय तत्वांची पायमल्ली होत असलेली दिसतेय. पुरातन पुरोहितवादी, ब्राम्हणवादी विचारसरणी समाजाला प्रगतीच्या वाटेवरून मागे खेचत आहे. प्रगतीशील, समतावादी, शोषणमुक्त समाज आणि भाईचारा ह्या मूल्यांना जपणारी विज्ञानवादी विवेकशील विचारधारा जी निर्गुण  संत परंपरेने ई.स. ११ ते १७ व्या शतकापर्यंत येथे रुजविली, त्यांचा पुरस्कार करणे आजच्या घडीला अपरिहार्य आहे.

मध्यकाळातील भक्ती साहित्य आंदोलनाच्या निर्गुण  संत परंपरेने तत्कालीन यथास्थितीवादी जडमूल ब्राह्मणवादी विचारधारेविरुद्ध प्रखर विरोध नोंदविला व समतामुलक समताधारित समाज निर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पोथी पुराण स्मृती इत्यादी तसेच ईश्वर कर्मकांड (पाखंड) जातीप्रथा अंधविश्वास विरोधी प्रखर प्रतिरोध दर्शविला. निर्गुण  संत परंपरेने भारताच्या मूळ चिंतन परंपरेचा जी चार्वाक लोकायत, बुद्ध सिद्ध व नाथ ह्या श्रमणवादी परंपरेचा लोकोन्मूखी विकास आहे. त्यामध्ये लोक आणि शास्त्र यांचे व्दंव्द तसेच आर्थिक परिवर्तनाचे ध्येय पण दिसून येते.

वर्णजाती व्यवस्थेचा प्रखर विरोध तसेच अस्पृश्यतेची वेदना अपमान अवहेलना दुःख प्रकर्षाने दिसून येतो. सर्वसामान्य समाज हा अतिशय गरिबीत जीवन कंठीत होता, शेतकरी कामगार मजूर वर्ग बहुतेक करून गुलामासारखे जीवन जगत असे. कारण सरंजामशाहीच्या आसुडाखाली तो दबलेला पिचलेला होता. दुसरीकडे जाती श्रेष्ठतेचा दंभ दाखवीत ब्राह्मणांनी मनुस्मृतीच्या आधारे गरीब कष्टकरी दलित आणि स्त्रियांना मूलभूत अधिकारांपासून वंचित केले. जर का त्यात कसूर दिसून आला तर प्राणातित शिक्षा अंमलात आणली जात असे. शूद्र-अतिशूद्र स्त्रियांना विद्या ज्ञान प्राप्तीच्या अधिकारांपासून वंचित केले असल्यामुळे हा बहुजन समाज दारिद्रयामध्ये खितपत पडलेला होता. अशा सामाजिक आणि आर्थिक स्थितीने ग्रासलेल्या समाजातूनच बहुतांशी निर्गुण  संताचा उदय झाला. निर्गुण  संतांनी जातीप्रथेबरोबरच सरंजामशाही विरोधी आवाज उठविला.

हे ऐतिहासिक सत्य आहे की, निर्गुण  संत परंपरेतील सर्वच संत श्रमशील होते. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, कर्ममेळा, विसोबा खेचर हे सगळे निम्न व शूद्र समाजातल्या जातीत जन्मलेले होते. संत नामदेव शिंपी (दर्जी) होते तर संत चोखामेळा महार जनाबाई मोलकरीण तर संत तुकाराम वाणी होते. सर्वजण उत्पादन कार्याशी जुळलेले असावे हा ह्यांच्यामधील महत्त्वाचा दुआ आहे. पुरोहित जे की परजीवी होते त्यांच्याकडून ह्या सर्व संतांचा अस्पृश्य मानून अतोनात छळ केल्या जात असे. संत नामदेव जातीव्यवस्थेविरुद्ध क्रोधीत होऊन विठ्ठलाला प्रश्न विचारतात.
आदि से अंत तक अशौच समाया
स्पृश्य कौन जन्मा न
हीन दीन जात मोरी पंढरी के राया।
ऐसा तुमने नामा दरजी कायकू
बनाया।।
मेरी कौन गति गुसाई तुम जगत भरन देवा।
जन्महीन करम छीन भूलि गयौ सेवा ।।

अशारूपात निर्गुण  संतांनी शूद्र अतिशूद्रांची वेदना तीव्र शब्दात बेधडकपणे अभिव्यक्त करून वर्ण जातीप्रथेच्या अमानवीय अवैज्ञानिकतेवर प्रश्न उभे केले. संत चोखामेळा संत तुकाराम संत जनाबाई आदींनी पण त्यांच्या काव्य अभंगामधून वर्ण जातीप्रथेच्या अविवेकी शोषणामुक्त व अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध क्रांतिकारी आंदोलन उभे केलेले दिसून येते.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *