Menu

निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला !…. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

२६ जानेवारी १९५० ला भारताचे संविधान लागू झाले. जगातल्या एका मोठ्या लोकशाहीचा लोककल्याणाचा मार्ग मतपेटीतून निवडून येणा-या लोकप्रतिनिधींच्याद्वारे सुरू झाला. आज या लोकशाहीने आपल्या वयाची पंचाहत्तरी कठिण परिस्थितीतून गाठली. कारण हा देश विविध जाती, पोटजाती, धर्म, पंथ, संप्रदाय, भाषा अशा विविधतेत विखुरलेला आहे. भारतीय जनजीवनाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान भारतीय संविधानाने बहाल केला. संविधान निर्मितीत मोठे योगदान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधानाविषयी म्हणाले होते, “संविधान कितीही चांगले असेल पण त्याची योग्य अंमलबजावणी केल्या गेली नाही तर त्याचे वाईट परिणाम भारतीय जनजीवनावर होतील.” असा आशय त्यांच्या बोलण्याचा असावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अल्पशिक्षीत, मराठीचे चारही वर्ग पूर्ण न शिकलेले पण भारतीय लोकशाहीची योग्य मिमांसा करतात. ते ग्रामगीतेत लिहतात-
जनतंत्राचा हा काळ शक्ति लोकाअंगीच सकळ ।
जनतेच्या निश्चयाचे बळ। साम्राज्यासहि नमवू शके ।१४। ग्रा.अ.११ निवडणुकीची चालू प्रथा हीच मुळी सदोष पाहता ।म्हणोनि योग्य दृष्टी द्यावी समस्ता । गाववासिया ।६६। ग्रा.अ. १० जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरि ।
हे पटवोनि निवडणूक खरी करवावी न गोंधळता ।६७। ग्रा.अ.१०
भारतीय लोकशाहीत कोण जनप्रतिनिधी बनण्याच्या लायकीचा आहे. ह्याची मांडणी राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या अनेक ओव्यांमधून केली.
अहो ! पुढारीपण कशाला ? । सेवा गावाची करावयाला ।
मग सेवेची कसोटी लावा की आपुला । समजेल पुढारी कोण तो ।६९। ग्रा. अ. १० कोण नीतीने असे चांगला? पक्षपात न आवडे कोणाला ?। छदामासि नसे लाजीम झाला । गाव-निधीच्या ।७२। ग्रा.अ. १० कोण सर्वांचे पाहतो सुख, दु:ख कोणाचे दिसे सेवेसाठी मुख । हीच त्याची जाणावी ओळख । निवडावया ।७३। ग्रा.अ. १०
मला वाटतं भारतीय लोकशाहीला मजबूत करणारे आम्ही सुजान नागरिक लोकप्रतिनिधी निवडतांना खरच विचारपूर्वक मतदान करतो का? भारतीय स्वातंत्र्यानंतर सुराज्याचं स्वप्न स्वातंत्र्य संग्रामात लढणा-यांनी पाहीले. १९४२ ला ‘इंग्रजांनो भारत सोडा’ ‘चालते व्हा’ या महात्मा गांधीच्या हाकेला विदर्भात क्रांतीची धार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी जनमाणसात निर्माण केली.
अब काहेको धूम मचाते हो , दुखवाकर भारत सारे ?
आते है नाथ हमारे । झाडझडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना ।
पत्थरसारे बाँम बनेंगे, नाव लगेगि किनारे ।
विदर्भातील लोकसमुह अशा भजनांनी राष्ट्रभक्तीने पेटला. राष्ट्रसंतांच्या भजनांवर बंदी आणून त्यांना नागपूरच्या तुरूंगात बंदिस्त केले. तरीही विदर्भातील जनआंदोलन थांबत नव्हते. राष्ट्रसंतांना रायपूरच्या तुरूंगात हलविले. असा हा राष्ट्रधर्माची शिकवण देणारा संत भारतीय लोकशाही संबधात भजनातून मांडणी करतो.
निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला
अवकळा लोपुनी सारी, मिळो सुखशांती सकळाला ।
राष्ट्र बलवान हो रक्षो, सदा अपुल्या स्वराज्यासी ।
पुर्णता लोकशाहीची, भुकेला जीव बघण्याला ।

कोणत्या लोकशाहीचं स्वप्न या महापुरूषांनी बघितले होते. स्वातंत्र्याच्या आणि प्रजातंत्राच्या ७५ वर्षानंतर आजही जात, धर्म, पंथ, संप्रदायांसाठी आम्ही आपसात भांडतो. आमची माणूसकी आज तर संपण्यात जमा नाही? आम्ही सत्तरच्या दुष्काळ अन्न धान्याचा तुडवडा पाहला. कडधान्य, तुरी उकळून खाल्ल्या, मोहाच्या भाकरी, विदेशातील मिलो डुकराचं खाद्य, त्याच्या भाकरी खाऊन उपासमार भागवली. पण माझ्या शेतकरी, शेतमजुरांनी कधी आत्महत्या केली नाही. काल गावखेड्यात जातींचे समुह होते. पण एकमेकांचे कट्टर दुष्मन कधी झाले नाही. गरीबाच्या झोपडीतल्या मुलीचं लग्न गावच्या सहकार्यातून व्हायचं. ती गावाची मुलगी असायची. गावकरी कर्तव्य म्हणून असे प्रसंग पार पाडायचे. हे आपुलकीचं नातं, ती सहकार्याची भावना आज कुठे लोप पावली? कुठली शासकीय योजना नसतांना आम्ही जीवनाचा आनंद शोधत होतो. शिक्षणाने मानवी मन जोडून एक बलशाली भारत उभा झाला कां ?
मिटो अस्पृश्यता सगळी, कळो मान्यवता समता ।
भेद श्रीमंत -गरीबाचा, न भासो भावि कोणाला ।
कळो चारित्र्यता सगळ्या, नीति जी रामराज्याची ।
नष्ट हो दुर्व्यसन आता, मिळो उद्योग जनतेला ।

राष्ट्रसंताचं सामाजिक चिंतन, डिग्रीच्या अहंकारानेग्रस्त पुस्तकी ज्ञानीयांना अचंबीत करणारं आहे. अस्पृश्यतेचा कलंक आज नाही असं काही शहाणे बोलतात. तंबाखु, घुटका खातांना, दारूचे घोट आपसात वाटून घेतांना अस्पृश्यता संपली असेल, जेवनावळीतून कदाचित अस्पृश्यता संपली असेल पण छुप्या व्यवहारात ती कालपेक्षाही आज जास्त उफाळून आलेली दिसते. त्याचे चटके आजही समाजजीवनात झोंबताना दिसतात. यावर रोज वाद-सवांद आमच्या देशात घडतात. ही अस्पृश्यता अतिशिक्षित अथवा अति श्रीमंत परिवारात संपलेली दिसते. पण सर्वसामान्य भारतीय आजही त्या अस्पृश्यतेशी लढतो आहे. कालच्यापेक्षा आज जास्त “जात-पोटजात’ आम्हाला कळायला लागली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांनी कुठल्या रामराज्याची कल्पना केली होती.

ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेचि स्वराज्य ।
बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ।१२५।ग्रा.अ. ३९

राष्ट्रसंत म्हणतात, “याच भूतलावर आम्हाला स्वर्ग निर्माण करावयाचा आहे. ज्याला ते ‘भू-वैकूंठ’ म्हणतात.

भिकारी ना दिसो कोणी, आळसी ना असो कोणी ।
मिळो बहुमान मातांना, जसा देशात पुरूषाला ।
दुःखवो ना कुणी केव्हां, भावना अन्य धर्माच्या ।
प्रिय आपुल्यास जो जैसा, प्रिय हो अन्य सकळाला ।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचे मुल्य भारतीय संविधानात दिसतात. स्वातंत्र्य, समता, ममता, न्याय, बंधुता, स्त्री-पुरूष समानता, धर्मउपासनेचे अधिकार इत्यादीचे आज प्रजासत्ताकाची पंचाहत्तरी गाठतांना चिंतन करावे लागते. आज प्रसिद्धी माध्यमातल्या खुन आणि आत्महत्याच्या बातम्या मानवी मनाला अस्वस्थ करतात. गुंडप्रवृत्तीचा सर्व क्षेत्रांतला शिरकाव यावर प्रहार करतांना राष्ट्रसंत लिहतात-
दुष्ट, खल, गुंड, छल-द्वेषी, म्हणें तुकड्या नको आता ।
न्याय-सत्ता बघो त्यांना, मनोभ्रम दुर करण्याला ।

जग ज्या भारतीय लोकशाहीकडे एका मोठ्या आशेने पाहते, कारण साम्राज्यवादी देशांना कौतुक वाटते की विविधतेत विखुरलेला देश हा एकदिलाने कसा राहतो. याला तडा देणा-या जागतिक षडयंत्राचा भाग भारताने होऊ नये असे प्रत्येक भारतीयांना वाटत असावे? भारतातील मोठी लोकसंख्या आजही मोफत अन्नावर जगत असेल, विदेशी तंत्रज्ञानावर आजही भारत अवलंबून असेल तर आम्ही कुठल्या प्रगतीच्या गप्पा करतो? शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी भारतीय संविधानाने दिलेल्या हक्काचे बाजारीकरण कुठला भारत घडवणार? हो आमच्या लोकशाहीत विश्वगुरू बनण्याची महाशक्ती आहे. युवाभारताची लोकशक्ती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती आमच्याकडे मुबलक आहे. पण जगातील साम्राज्यवादी देश आमच्याकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहतात. चायनाच्या वस्तुने आमच्या बाजारपेठा व्यापल्या आहे. स्वदेशीचा नारा दिल्याने भारत विविध क्षेत्रात स्वावलंबाकडे जाणार नाही. शब्दांचे बुडबुडे हे फुटणारे असतात. आमची मुलं भारतात शिकुन आज विदेशाची गुलामी करतात हा कुठला स्वाभीमान? आम्ही तरूण पिढीत रूजवतो आहोत? सत्तेच्या राजकारणाचे दोष दाखवत आपण भारतीय लोकशाहीला कुठे घेऊन जात आहोत? कोण करणार चिंतन? मित्रांनो आपल्यातली राष्ट्रभक्ती आज तपासण्याची वेळ आलेली आहे. उठा जागे व्हा आपल्या कर्तव्याला जागा. ‘दोष अपनेही देखो, उसे सुधारनेको सिखो’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका लेखात लिहतात-
‘मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला, एवढेच नव्हे, तर इथे लोकतंत्र राज्य निर्माण झाले; पण लोकतंत्र राज्य किंवा लोकशाही केव्हा म्हणता येईल जेव्हा लोक आपलं राज्य अशी जाणीव करून घेतील. किंबहूना, त्याप्रमाणे आपआपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडतील तेव्हा. प्रत्येक गाव जोपर्यंत आपला कारभार व्यवस्थित चालवू शकत नाही, स्वतःच्या पायावर स्वावलंबाने उभा राहून आपला विकास करू शकत नाही, तोपर्यंत हा देश ‘प्रजातंत्र राज्याला लायक झाला’ असे म्हणताच येणार नाही.’
मित्रांनो फक्त एक दिवस राष्ट्रभक्ती दाखवित’ भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो’ चे नारे दिल्याने आपलं कर्तव्य संपत नाही. ग्रामगीतेत राष्ट्रसंत लिहतात ती क्रांतीची हाक आम्हाला कळावी- अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! अधिका-यांनो ! पंडितांनो ! ।

सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हाक आली क्रांतीची ।११४। ग्रा.अ. १७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *