
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय सुधारणांत महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू छत्रपती या दोन लोकोत्तर राजांचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर राजर्षी शाहूंच्या कार्याचे स्मरण महाराष्ट्राने कृतज्ञतापूर्वक जागविले. राजर्षी शाहू छत्रपतींसंबंधी गेल्या तीस-चाळीस वर्षांत मराठी लेखकांनी सातत्याने चरित्र, संशोधन, भाषणांचे खंड, गौरवग्रंथ, शाहू छत्रपतींचे निवडक आदेश आणि शाहू कालखंडातील कागदपत्रांचे प्रकाशन केले आहेत. यातून शाहू छत्रपतींचे सर्व क्षेत्रांतील कार्य लोकांपर्यंत पोहोचले. त्या तुलनेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांची घ्यायला पाहिजे तेवढी दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्राबाहेर असलेले बडोद्याचे महाराजा सयाजीराव हे एकतर आम्हाला गुजरात प्रांतातील राजे वाटू लागले असावेत. त्यामुळे कदाचित आजच्या फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या मंडळींनी त्यांना सामावून घेतले नाही. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील या युगपुरुषांना ज्यांचा वरदहस्त लाभला होता, त्या बडोद्याच्या सयाजीराव या पुरोगामी राजांच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही.
यामुळे आधुनिक भारताचे एक शिल्पकार, महाराष्ट्राचा प्रज्ञावंत सुपुत्र, देशभरातील बहुतांश युगपुरुषांना मदत केलेले दानशूर सयाजीराव गायकवाड यांची ओळख राहून गेली. भाषावार प्रांतरचनेनंतर म्हणजे १९६० नंतर महाराष्ट्रातील गुजरात प्रांत वेगळा झाला. बडोदा राज्य गुजरातमध्ये गेले. इथल्या अभ्यासकांना, विचारवंतांना ते गुजराती राजा; तर तिकडच्यांना मराठा राजा वाटू लागल्याने, काळापुढे दृष्टी असलेल्या सयाजीराव यांच्याकडे दुर्लक्षच झाले.
शेतक-याचा मुलगा ते सुप्रशासक प्रज्ञावंत सार्वभौम राजा: एक शेतक-याचा मुलगा योगायोगाने बडोदा दत्तकपुत्र म्हणून गेला. राजगादीवर राजा बनतो. अक्षर-अंक ओळख नसलेला बारा वर्षांचा गोपाळ चिकाटीने शिकतो. प्रशासनाचा अभ्यास करतो. शिक्षणाची ताकद ओळखतो. ते शिक्षण रयतेला द्यायचं, निर्णय घेतो. गुरुवर्याच्या मार्गदर्शनासाठी सुप्रशासन, जनकल्याण, न्याय, शेती-उद्योगासह सामाजिक सुधारणांकडे लक्ष देऊ लागतो. तरुण सयाजीराव जनसेवेतच मोक्ष शोधू लागला.
एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी जगात कोणतेही सरकार प्रजेला शिक्षण देण्याची जबाबदारी मानत नव्हते. इंग्लंडमध्येही हीच स्थिती होती. श्रीमंत माणसे-ऐपत असणारे फीस देऊन शिकायचे. हिंदुस्थानातही असेच होते. म. फुले यांनी १८८२ साली हंटर कमिशनला सांगितले-कनिष्ठ वर्गांना शिकवा. तरुण सयाजीरावांनी म. फुले यांचे स्वप्न प्रत्यक्षात अमलात आणले. १८८२ साली बडोद्यात अस्पृश्य, आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण देणे सुरू करून समाजक्रांतीची सुरुवात केली.
महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहूंचा कालखंड : सयाजीराव आणि राजर्षी शाहू हे दोन्ही युगपुरुष नातेवाईक होते. दोन्ही राजांचा कालखंड बराचसा समकालीन होता. सयाजीराव ११ मार्च १८६३ ला जन्मले; तर शाहू २६ जून १८७४. १२ व्या वर्षी १८७५ ला सयाजीरावांचे दत्तकविधान झाले, तर शाहू १८९४ ला दत्तक गेले. १८ व्या वर्षी सयाजीराव राज्यकारभार पाहू लागले; तर शाहू विसाव्या वर्षी पाहू लागले. सयाजीराव ७६ व्या वर्षी, तर शाहू ४८ व्या वर्षी गेले. हे दोघेही दत्तकपुत्र होते. शाहू सुस्थितीतील सरदारपुत्र; तर सयाजीराव शेतक-याचा पोरगा. सयाजीरावांना इलियट आणि शाहूंना फ्रेजरसारखे चांगले गुरुवर्य लाभले. शाहूंच्याच अगोदर विसेक वर्षे सयाजीराव बडोदा राजा बनले. प्रशासन बघू लागले. बडोद्यात सुधारणा करू लागले. बडोद्यात होत गेलेल्या सुधारणा कोल्हापूरमध्ये होत गेल्या.
बडोद्यात प्रथम झालेल्या सुधारणा :
अस्पृश्य, आदिवासींना शिक्षण, सक्तीचे मोफत शिक्षण, गाव तेथे ग्रामपंचायत, वाचनालये, गैरहजर विद्यार्थ्यास दंड, मोफत आरोग्य सेवा, स्त्रीशिक्षण, बालविवाहबंदी, विधवा पुनर्विवाह, मंदिर-सार्वजनिक ठिकाणी सर्वांना प्रवेश, पुरोहित कायदा, धर्मखाते, ब्राह्मणेतरांसाठी वैदिक पाठशाळा सुरू केल्या. शेती-उद्योग, न्याय, सुप्रशासन, साहित्य-कलांना मदत, ते स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे झाले. बडोद्याचा महसूल, कर वाढवून अनावश्यक खर्चांना कात्री लावली. पंचवीस वर्षांत जगातले सातवे श्रीमंत झाले. श्रीमंतीचा उपयोग जनकल्याण, शिष्यवृत्ती, मदतीसाठी केला. ८९ कोटींची मदत वाटली.
राजर्षी शाहूंनी सयाजीराव यांना वारंवार पत्र लिहून कोल्हापूर राज्यात सुधारणा, प्रगतीसाठी मदत मागितली. बडोद्यातून सढळ हाताने मदत होत गेली. यातून कोल्हापूरला विद्यार्थी वसतिगृह, अस्पृश्य मुलांचे शिक्षण, शेती-सहकारात बडोद्यातून शिष्यवृत्ती मिळालेल्या तज्ज्ञ व्यक्तिंची मदत होत गेली.
सयाजीराव आणि शाहू महाराजातील साम्य-भेद :सयाजीराव यांनी बडोद्यात धर्मनिरपेक्ष लोकशाहीची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरुवात केली. चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणाले, हिंदुस्थानात दोनच खरे राजे झाले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी आणि सयाजीराव.’ शंभर वर्षांतील पहिले स्वकर्तुत्ववान राजे सयाजीराव होते, असे वि.का. राजवाडे म्हणाले. प्रबोधनकार ठाकरे यांनी राजर्षी शाहूंचे गुण ओळखले. ते म्हणाले, शाहू पट्टीचे राजकारणी, मुत्सद्दी, खंबीर समाजसुधारक तसेच अस्पृश्योद्धारक होते.’ तर वि.द. घाटे म्हणत, शाहू बेडर, रयतेची कणव, समतोल विचार करणारे होते.’
सयाजीराव सतत ग्रंथसंगतीने समतोल विचारांचे बनले, तर शाहू प्रत्यक्ष कृती करणारे क्रांतिवीर झाले. सयाजीराव सारासार विचार करायचे, शाहू ठोस निर्णय घेणारे. शाहू शिवपूजा करणारे, तर सयाजीराव अज्ञेयवादी, बुद्धिवादी होते. शाहू सर्वसामान्यांत सहज मिसळत, तर सयाजीराव कोणाच्याच फार जवळ आले नाहीत. वेदोक्त प्रकरण बडोद्यात प्रथम झाले, सयाजीरावांनी संयमाने हाताळले. शाहूंनी या प्रकरणात ब्राह्मणांविरुद्ध ठोस कार्यवाही केली. सयाजीराव यांनी १४ व्या वर्षी पंगतीभेद दूर केला. अस्पृश्यांसाठी शिक्षण, नोकरी, अस्पृश्यता पाळू नये हा कायदा करणारे सयाजीराव पहिले आहेत. कोल्हापुरात ब्राह्मणेतर चळवळीमुळे शाहूंना त्रास झाला. सयाजीरावांनी पुरोहित कायदा करून, धर्मखात्याअंतर्गत त्यावर नियंत्रण केले. जगातील ही पहिली घटना आहे.
सयाजीराव आणि शाहूंचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग : महाराजा सयाजीराव छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा उपयोग करत स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे झाले. पंचवीस वर्षे सयाजीराव यांच्याविरुद्ध ब्रिटिश सी.आय.डी. पुरावा शोधत होते; पण हाती ठोस पुरावा न मिळाल्याने त्या फायली बंद कराव्या लागल्या. छत्रपती शाहूंनी त्यांच्या कुवतीप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यास मदत केली. गुरुवर्यांनी सयाजीराव यांना शिकविले. बडोदे राज्य हे मांडलिक नव्हते. ब्रिटिशांचे मित्र होते. सयाजीरावांनी तो मूळ करार अभ्यासला. यातून आयुष्यभर ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करत राहिले. लंडनच्या सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात निर्णय दिला. सयाजीराव हे सार्वभौम राजे आहेत.
बडोदा आणि कोल्हापूर नातेसंबंध : छत्रपती शिवराय हे सयाजीरावांचे आदर्श होते. कोल्हापूर आणि बडोदा या राजघराण्यांचा जुना राजसंबंधही होता. सयाजीरावांचे उजवे हात खासेराव जाधव हे छत्रपती शाहूंचे मित्र होते. खासेराव यांनी शाहूपुत्र राजाराम आणि सयाजीराव यांची नात इंदुमती यांचा विवाह व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. सयाजीराव आणि शाहू यांच्यात पत्रव्यवहार सुरू झाला. सयाजीराव म्हणाले, पत्रिका वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही. आपण राजाराम यांची आरोग्यपत्रिका पाठवा.’ शाहूंनी कळविले, राजपुत्राची आरोग्यपत्रिका नाही.’
खासेराव जाधव यांनी दोन्ही राजांच्या विवाहसंबंधात मध्यस्थी केली. कोल्हापूरकर यांनी सहा लक्ष सत्तर हजारांची मागणी केली. सयाजीरावांना ही हुंडा मागणी पसंत नव्हती; पण पुन्हा खासेरावांनी सलोखा घडवून आणला. ऐन वेळेस पुन्हा कोल्हापूरकडून वर-वधूकरिता दोन लक्ष अशी मागणी आली. शाहू महाराज अडून बसले. पुन्हा खासेराव यांनी दोन्ही राजांना समजावले. विवाह समारंभ पार पडला.
सयाजीराव आणि शाहू हे दोघेही युगपुरुष होते : दोघाही युगपुरुषांना समाजसुधारणा आणि जनकल्याणाचा ध्यास होता. दोघेही राजे उत्तम प्रशासक उदार बुद्धिवादी होते. आपल्या राज्यात दोघांनाही सुप्रशासन, शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी दोघांनीही आपापल्या राज्यात प्रयोग केले. दुर्दैवाने छत्रपती शाहू ४८ व्या वर्षी जग सोडून गेले. सयाजीराव मात्र वयाच्या ७६ व्या वर्षांपर्यंत दीर्घकाळ कार्य करून गेले.
छत्रपती शाहूंनी ब्रिटिश सरकारशी असलेले मैत्रीचे संबंध शेवटपर्यंत जपले. याउलट सयाजीराव यांनी आयुष्यभर बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी हिमतीने संघर्ष केला. छ. शाहूंच्या अगोदर वीस वर्षे बडोदा गादीवर राजा बनलेले सयाजीराव, बडोद्यात अगोदर सुप्रशासनात व सामाजिक सुधारणांचे कार्य करू शकले. ही कामे कोल्हापूरला करण्यास सयाजीरावांनी शाहूंना मदत केली. याचा पत्र संदर्भ उपलब्ध आहे. सयाजीराव आणि लॉर्ड कर्झन यांच्यात दीर्घकाळ संघर्ष झाला; मात्र छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीत कर्झन यांनी सयाजीराव यांच्या वेगळेपणाचा गौरव केला. कर्झन म्हणाले, सयाजीरावांची तुलना एखाद्या शक्तिशाली वाफेच्या इंजिनाशी करता येईल. मी हे सत्य सांगत आहे. हिंदुस्थानातील इतर राजांनी सयाजीरावांच्या चांगल्या कामाचे अनुकरण करावे.’
महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू छत्रपती हे दोन युगपुरुष महाराष्ट्राच्या प्रगती गाडीची दोन चाके आहेत. आजच्या महाराष्ट्राच्या प्रगती प्रवासात या दोघाही युगपुरुषांचा सिंहाचा वाटा आहे.