Menu

महाराज सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे

-शिवानी घोंगडे

पारंपारिक भारतीय समाजव्यवस्थेने सामाजिक-धार्मिक परिघाबाहेर ठेवलेल्या अस्पृश्य जातीतील लोकांना ‘माणूस’ म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी आधुनिक भारतातील अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले. बडोद्याच्या महाराजा सयाजीरावांनी तर बडोद्यात भारतीय अस्पृश्योद्घार चळवळीचा ‘पाया घातला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच विठ्ठल रामजी शिंदे व बाबासाहेब आंबेडकर आपले अस्पृश्योन्नतीचे कार्य ‘उभा’ करू शकले. परंतु सयाजीरावांकडून प्रेरणा, आर्थिक सहकार्य आणि पाठबळ घेऊन बाबासाहेबांच्या कार्याला भक्कम पाश्वभूमी तयार केलेले विठ्ठल रामजी शिंदे सयाजीरावांप्रमाणेच महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिले. २३ एप्रिल १८७३ ला कर्नाटकातील जमखंडी येथे जन्मलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांचे शिक्षण गंगाधर भाऊ मस्के यांच्या डेक्कन मराठा असोसिएशन आणि सयाजीराव या दोघांच्या शिष्यवृत्तीवर झाले. परंतु गंगाराम भाऊ म्हस्केंची शिष्यवृत्ती पुरेशी नसल्याने बी. ए. पदवी शिक्षण खर्चाच्या विवंचनेत असणा-या शिंदेंनी १८९६ मध्ये लक्ष्मणराव माने व खासेराव जाधव यांच्या मदतीने सयाजीरावांची भेट घेतली. यावेळी सयाजीरावांनी त्यांना दरमहा २५ रु. स्कॉलरशिप मंजूर केली. ही स्कॉलरशिप देताना शिक्षणपूर्तीनंतर विठ्ठल रामजी शिंदेंनी बडोद्यात नोकरी करावी किंवा स्कॉलरशिपची रक्कम परत करावी अशी अट घालण्यात आली. सयाजीरावांनी ही स्कॉलरशिप दिल्यानंतर डेक्कन मराठा असोसिएशनकडून शिंदेंना दिली जाणारी १० रु. ची मदत बंद करण्यात आली. सयाजीरावांनी विठ्ठल रामजी शिंदेंना पदवी आणि एल.एल.बी. शिक्षणासाठी ५ वर्षे एकूण सुमारे १५०० रु.ची मदत केली. यानंतर सयाजीरावांनी शिंदेंना ऑक्सफर्ड येथील तुलनात्मक धर्म अभ्यासासाठी आधीची स्कॉलरशिप देताना घातलेली बडोद्यातील नोकरीविषयीची अट बाजूला ठेवून पुन्हा १५०० रु. प्रवास खर्च दिला.
विठ्ठल रामजी शिंदेंनी संपूर्ण भारतात सर्वप्रथम अस्पृश्योद्धाराचे संस्थात्मक काम उभे केले. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर शिंदेंनी देशपातळीवर सुरू केलेल्या या कार्यामागे सयाजीरावांची प्रेरणा होती. विठ्ठल रामजी शिंदे परदेशाहून परत येण्याआधी सयाजीरावांनी त्यांना पत्राद्वारे भारतात आल्यानंतर सर्वप्रथम आपली भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे ऑक्टोबर १९०३ मध्ये भारतात आल्यानंतर शिंदेंनी बडोद्यात सयाजीरावांची भेट घेतली. महाराजांनी त्यांना बडोद्यातील अस्पृश्यांसाठीच्या शाळांची तपासणी करून सूचना करण्यास सांगितले. विठ्ठल रामजी शिंदेंनी या शाळांची तपासणी करून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी पारंपरिक उद्योगधंदे करण्यास नाखुष असल्याने त्यांना नोक-या उपलब्ध करून देण्याची सूचना मांडली. या सूचनेवरील सयाजीरावांची प्रतिक्रिया सांगताना शिंदे म्हणतात, “धोरणी महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्याने तूर्त हे शक्य नाही असे सांगितले; पण स्कॉलरशिप देऊन पुढील शिक्षणाची सोय करण्याचे कबूल केले आणि त्याप्रमाणे तशी व्यवस्था पण केली. “त्यावेळी अस्पृश्य उद्धारासाठी सयाजीरावांनी राबवलेले शैक्षणिक उपक्रम पाहून ते इतके प्रभावित झाले की ब्राह्मो समाजाच्या कामाबरोबर त्यांनी देश पातळीवर अस्पृश्य उद्घाराची संस्थात्मक चळवळ उभी करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
१९०७ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात न्यायमंदिराच्या दिवाणखान्यात विठ्ठल रामजी शिंदेंचे ‘अस्पृश्योद्धार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. ते व्याख्यान ‘मनोरंजन’ मासिकाच्या डिसेंबर १९०८ च्या अंकात ‘बहिष्कृत भारत’ या मथळ्याखाली प्रकाशित झाले. पुढे महाराजांच्या आज्ञेवरून हेच व्याख्यान ‘बहिष्कृत भारत’ या स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तिकेच्या एक हजार प्रती महाराजांनी विकत घेऊन बडोद्यात वाटल्या. शिंदेंचा या विषयावरील हा पहिला मराठी निबंध होता. हा निबंध म्हणजे १९३३ मध्ये शिंदेंनी लिहिलेल्या ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ या प्रश्नाची समाजशास्त्रीय चर्चा करणा-या मराठीतील पहिल्या ग्रंथाचा पाया होता.
विठ्ठल रामजी शिंदेंनी स्थापन केलेल्या ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ या संस्थेचीदेखील सयाजीरावांनी सातत्याने ‘पाठराखण’ केली. सप्टेंबर १९०९ मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांच्या बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेल्या सयाजीरावांनी या संस्थेला एक हजार रुपयांची देणगी दिली. १८ ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथील डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वाढदिवस समारंभाचे सयाजीराव अध्यक्ष होते. यावेळी महाराजांनी मिशनला दोन हजार रुपयांची देणगी दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ५५ लाख ४५ हजार रु. हून अधिक भरते. या देणगीच्या व्याजातून डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ‘दमाजीराव गायकवाड स्कॉलरशिप फंड’ या नावाने शिष्यवृत्ती चालू करण्यात आली. त्याचबरोबर सयाजीरावांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वसतिगृहातील रा. भटकर नावाच्या महार विद्यार्थ्याला मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजातील पुढील शिक्षणासाठी दरमहा २५ रुपयांची स्कॉलरशिप दिली. विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्योद्धाराच्या संस्थात्मक कार्याला सयाजीरावांचा असलेला भक्कम पाठींबा यातून अधोरेखित होतो.
१८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनात महत्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हाती घ्यावा यासाठी विठ्ठल रामजी शिंदेंनी १९०७ पासून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. १९०७ ते १९१७ या दहा वर्षांतील शिंदेंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर १९१७ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करण्यात आला.
२३ व २४ मार्च १९१८ रोजी विठ्ठल रामजी शिंदेंनी मुंबई येथे भरवलेल्या दुस-या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते. या परिषदेत भारतातील पहिला अस्पृश्यता निवारण ठराव मांडला होता. या ठरावावर उपस्थित मान्यवरांपैकी शंभरहून अधिक लोकांनी सह्या केल्या. त्यामध्ये पहिली सही करणारी व्यक्ती सयाजीराव गायकवाड होते. १९२३ मध्ये श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या मराठी ज्ञानकोशासाठी विठ्ठल रामजी शिंदेंनी लिहिलेली ‘अस्पृश्यता निवारणाचा भारतीय इतिहास’ नोंद हे अतिशय महत्वाचे लेखन आहे. या नोंदीत भारतातील अस्पृश्योद्धाराच्या कामाचा इतिहास सांगताना शिंदेंनी महात्मा फुले, शशिपाद बंडोपाध्याय यांच्यानंतर तिसरा क्रमांक महाराजा सयाजीराव गायकवाड यांना दिला होता. हा क्रमांक कालानुक्रमे होता. ही दखल घेत असताना सयाजीरावांच्या कार्याच्या परिणामकारकतेबाबत शिंदे म्हणतात, “कार्याच्या प्रमाणाच्या व सिद्धाच्या दृष्टीने पाहताना वरील दोघांपेक्षा महाराजांचे काम इतके विस्तीर्ण व परिणामकारक झाले आहे की, या तिघांच्या कार्याची तुलना करणेच व्यर्थ आहे.”
नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर भारतातील लेखक आणि समाजसेवकांना बडोद्यातील ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड पारितोषिक समिती’च्या वतीने पुरस्कार दिला जात होता. १९३२-३३ साली एक हजार रुपये रोख रकमेचा हा पुरस्कार विठ्ठल रामजी शिंदेंना देण्यात आला. याचवेळी एक वर्षासाठीची तैनात म्हणून दरमहा शंभर रु. असे वार्षिक १२०० रु. व पुरस्काराचे एक हजार रुपये असे एकूण २२०० रु. महर्षी शिंदेंना मिळाले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४७ लाख ५८ हजार २६९ रु. इतकी भरते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बडोदयास गेल्यानंतर शिंदेंनी ‘अस्पृश्यतेचा प्रश्न’ आणि ‘समाजसुधारणा’ या विषयांवर ३ व्याख्याने दिली. विठ्ठल रामजी शिंदे यांचे जातधर्मविषयक संशोधन आणि अस्पृश्यता निवारणासाठीच्या सामाजिक पातळीवरील संस्थात्मक कार्याचे फलित म्हणूनच त्यांना २५ ते २७ डिसेंबर १९३४ दरम्यान बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या तत्वज्ञान आणि समाजशास्त्र या सत्राचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
सयाजीरावांच्या खंबीर पाठींब्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे आपले अस्पृश्यता निवारणासाठीचे संस्थात्मक कार्य उभे करू शकले. त्यामुळेच १९३३ मध्ये शिंदेंनी आपला ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कृतज्ञतापुर्वक सयाजीरावांना अर्पण केला होता. अस्पृश्योद्धाराच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले विठ्ठल रामजी शिंदे कुटुंबासह महार वस्तीत जाऊन राहिले. परंतु मराठ्यांनी त्यांना ‘महार मराठा’ तर महार लोकांनी त्यांना ‘मराठा’ म्हणून त्यांची एकप्रकारे अवहेलनाच केली. सयाजीराव आणि महर्षी शिंदे यांच्याइतके अस्पृश्यता उद्घाराचे काम भारतात दुस-या कोणाकडूनही झालेले नाही. परंतु अस्पृश्यता उद्घाराच्या इतिहासाने त्यांनी दखल घेतली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *