Menu

सामाजिक आरक्षणाचा फक्त आभास

-मिलिंद रुपवते
साभार लोकसत्ता

कुठल्याही समस्येचे निवारण करण्याची पूर्वअटच मुळी अचूक निदान ही असते. पण अनेकदा जाणीवपूर्वक समस्येचे निदानच केले जात नाही. समाजाचे लक्ष विचलित करत अनावश्यक गाेष्टींना महत्त्व देणे, प्रपाेगंडा करणे आदी प्रकार केले जातात. विभाजनवादी कार्यक्रम आखले जातात. समस्येचे सुलभीकरण केले जाते. सध्या आरक्षण हा असा कार्यक्रम आहे.
मुळात अनेक समूहांना आरक्षण हवे आहे ते शिक्षण आणि नाेकरीसाठी. पण हा आरक्षणाचा मूलभूत उद्देशच नाही. आरक्षणासाठीचा मुख्य निकष हा सामाजिक मागासलेपण आहे. पण नोकऱ्या आणि शिक्षण सरकारच्या हाती आहे का? कारण आरक्षणाअंतर्गत केवळ सरकारी निमसरकारी नोकऱ्याच येतात. खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या आरक्षणाअंतर्गत येत नाहीत. आपण जागतिकीकरण स्वीकारल्याच्या 30-35 वर्षानंतरही अनेकांना सरकारी नाेकरी हवी असेल तर कुठेतरी काहीतरी चुकते आहे. सरकारी नोकऱ्यांचे देशातील एकूण नोकऱ्याच्या तुलनेत प्रमाण पाच टक्के आहे. त्यात 50 टक्के आरक्षित नोकऱ्या, म्हणजे त्यांचे प्रमाण अडीच टक्के.
देशातील सरकारी नोकऱ्यांची-बँका, सार्वजनिक उद्याेग, सरकारी खाती आदींची सद्या स्थिती काय आहे?
गेल्या पाचसात वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एकत्रीकरण, विलीनीकरण प्रक्रियेतून 27 बँकांचे 12 बँकांत रूपांतर करण्यात आले आहे. ऑल इंडिया बैंक ऑफिसर्स फेडरेशनच्या दाव्यानुसार 2017 पर्यंत 8.57 लाख असलेल्या बैंक कर्मचार्यांची संख्या 2021 मध्ये 7.7 लाख झाली आहे.
सार्वजनिक उद्याेगांच्या निर्गुतवणुकीच्या धाेरणाने गेल्या काही वर्षात प्रचंड गती पकडली आहे. सरकारने निर्गुतवणुकीअंतर्गत 2022 मध्ये 97 हजार काेटी, 2023 मध्ये 1 लाख 32 हजार काेटी आणि यावर्षी म्हणजे 2024 मध्ये साडेतीन लाख काेटी रुपये लक्ष्य ठेवले आहे. ही माेठ्या प्रमाणात राेजगार निर्माण करणारी क्षेत्रे आहेत. त्यांच्या खासगीकरणाबराेबरच त्यांच्या मालमत्तेवरही सरकारचे लक्ष आणि लक्ष्य आहे. एलआयसीचे उदाहरण घेऊ. यावर्षीचा एलआयसीचा 40 हजार 600 काेटी रुपये आहे.
सार्वजनिक उपक्रमांपैकी एलआयसीची मालमत्ता तिसऱ्या क्रमांकावर येते. एलआयसीच्या काही इमारतींच्या विक्रीमधून सरकार 60 हजार काेटी रुपये उभे करण्याच्या प्रयत्नात आहे.
निर्गुतवणुकीकरण धाेरणामुळे राेजगार निर्मितीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. माेदी सरकारने 2014 मध्ये सत्तेत येताना प्रतिवर्ष 2 काेटी नोकऱ्या चे ओशासन दिले हाेते. 2014 ते 2022 दरम्यान 22 काेटी लाेकांनी नाेकरीसाठी अर्ज केले हाेते. त्यामध्ये सर्वात जास्त, पाच काेटी अर्ज 2018-19 या वर्षामध्ये आले. तर सर्वांत कमी, दीड काेटी अर्ज 2019-20 या काेविड काळात आले, नोकऱ्या मिळाल्या 80 लाख ही केवळ केंद्र सरकारची आकडेवारी आहे. राज्याची वेगळी. (संदर्भ: 27 जुलै 2022 संसदेचे कामकाज)
एका सार्वजनिक उपक्रमाच्या निर्गुतवणुकीकरणाने किती नोकऱ्यांना फटका बसताे, हे भारत पेट्रोलियम काॅपाेरेशनच्या उदाहरणातून बघू या. या उपक्रमामध्ये राेजगार आहेत नऊ लाख 20 हजार, त्यामध्ये 1 लाख 60 हजार 284 अनुसूचित जातींसाठी (17 टक्के) 99 हजार 693 अनुसूचित जमातींसाठी (10 टक्के) आणि 1 लाख 98 हजार 581 ओबीसी प्रवर्गासाठी (24 टक्के) आहेत. या उपक्रमाच्या निर्गुतवणुकीकरणाने या एका सार्वजनिक उपक्रमातील 49.5 टक्के नोकऱ्या म्हणजे साधारण साडेचार लाख नोकऱ्या संपणार आहेत. असे 32 सार्वजनिक उपक्रमांबाबत झाले आहे किंवा हाेण्याच्या मार्गावर आहे.
केंद्रीय लाेकसेवा आयाेगाद्वारे निर्माण होणाऱ्या पदांमध्ये सातत्याने घट हाेताना दिसते आहे. 2014 मध्ये 1,364 जागा तर 2015 मध्ये 1,164 जागा, 2016 मध्ये 1,058 जागा तर 2018 मध्ये 812 जागा निर्माण झाल्या. हीच बाब स्टाफ सिलेक्शनबाबत. तिथे 2013 मध्ये 20 हजार जागा, 2018 पर्यंत 12 हजार तर 2022 मध्ये आठ हजारांहून कमी जागा निघाल्या.
आता शिक्षणाच्या मुद्दद्याकडे पाहू या. शिक्षण हक्क कायदा येण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2008 मध्ये महाराष्ट्र सरकारने नवीन खासगी शाळांची शासकीय अनुदाने बंद केली.
आधीच्या शाळा अत्यंत तुटपुंजे अनुदान दिले. पूर्वी शाळेतील एकूण कर्मचात्यांची कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या नऊ टक्के अनुदान दिले जात असे. मात्र आता अत्यंत तुटपुंजे व शाळेय स्टेशनरीचा खर्च भागेल इतकेच जेमतेम अनुदान मिळते. 2000 सालापासून नवीन शिक्षकांची नियुक्ती ‘शिक्षण सेवक’ म्हणून करण्यात येते. परिणामी, राज्यात प्राथमिक शाळा वरून 28,532 वर आली आहे. (संदर्भ: लाेकसत्ता, 28 जून 2024) शिवाय 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळा बंद करण्याचे धाेरण आहेच. देशात इतरत्र संख्या घटली आहे. 2021-22 साली ती 1,05,848 हाेती. 2022-23 साली ती 1,04,781 वर आली. याच काळात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या 28. यापेक्षा वेगळी स्थिती नाही. हरियाणा सरकारने 300 सरकारी शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे 20 हजार शिक्षक बाधित झाले आहेत. आणि आधीपासूनच 38 हजार शिक्षक पदे रिक्त आहेत ते वेगळे, उच्च शिक्षणाचे खासगीकरण तर आधीच प्रचंड वेगाने सुरू झाले आहे. ही बाब खासगी वैद्याकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधशास्त्र आदी महाविद्यालयांच्या संख्येवरून ध्यानात येईल. हे सर्व राजकीय नेतेच शिक्षणसम्राट आहेत. किंवा या नेत्यांचे काेचिंगवाल्यांशी संबंध असल्याचे दिसून येते.
हे कमी म्हणून की काय, या शिक्षणधंद्यामध्ये आता गुटखा आणि तंबाखूवालेही उतरले आहेत. हे लाेक शिक्षणापेक्षा शिशू, आदर्श मंदिरच्या माध्यमातून सांस्कृतिक खेळे करतात. पुढे थेट व्यवस्थेवर परिणाम करतात. एनटीएद्वारा यावर्षी घेण्यात आलेल्या नीट यूजी परीक्षा प्रकरणात सापडलेले सर्व संशयित गायपट्ट्यातील आहेतच पण त्या ’संस्कृति’तिलही आहेत. ही संस्कृती कष्टकऱ्यांना, ‘श्रमण’करणाऱ्या विराेध करणारी, त्यांचे शाेषण करणारी आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वीही एनसीआरटीद्वारे अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेले बदलही टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. या सर्व शैक्षणिक अव्यवस्था आणि शिक्षणाचा दर्जा आणि त्यापेक्षा या सर्व व्यवस्थेवरचा विद्यार्थ्यांचा उडालेला विश्वास यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यां विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी वाढत आहे. 2014 साली परदेशी शिक्षणासाठी 1 लाख 60 हजार विद्यार्थी गेले तर 2023-24 साली आठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी गेले. सामाजिक आरक्षणाचा लाभार्थी समूह सरकारी नोकऱ्या आणि काेणत्याही अर्थाने उपयाेजित नसलेल्या शिक्षणामध्ये अडकवलेला आहे.
दुसरा मुद्दा, इंदिरा साहनी प्रकरणातच नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने सामाजिक आरक्षणावर 50 टक्के मर्यादा आणली असे नव्हे, तर संविधानसभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याबाबत स्पष्टता दिली आहे. समानता हा केवळ नियम नव्हे तर ते एक आधुनिक मूल्य आहे. तर आरक्षण हा अपवाद आहे. नियमापेक्षा वा मूल्यापेक्षा अपवाद माेठा झाला तर व्यवस्थाच विसविशीत हाेण्याचा धाेका आहे. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा न वाढवता व्याप्ती वाढवावी. म्हणजे, खासगी क्षेत्रामध्ये सामाजिक आरक्षणाची किंवा अफर्मेटिव्ह अक्शन (सकारात्मक भेदभाव) ची तरतूद करावी.
यासाठी आरक्षित वर्गाची अनुभूती असणारे शासन हवे. अर्थात या वेळी मतदारांनी तसा प्रयत्न केला. मात्र ते पुरेसे नाही. कारण उडदामाजी काळेगाेरे अशी सद्या स्थिती आहे.
असाे.वरील उपाय खूपच प्राथमिक पातळीवरील आहे. समस्येला सुलभीकरणाच्या पल्याड न्यायचे असेल तर तिच्या मुळाशी जावे लागेल. सामाजिक आरक्षण देण्याची गरज भासली, ती विषमतेमुळे. ही विषमता जन्मापासूनच येते. महत्त्वाचे म्हणजे या व्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान आहे. आणि या विषम व्यवस्थेचे समर्थन करणारे पक्ष, संघटना, व्यक्ती 21 व्या शतकामध्येही अस्तित्वात आहेत. आरक्षणाचा लाभार्थी हाेऊ पाहणारा बहुसंख्य समूह या धर्मग्रंथाना पवित्र मानताे, पण ते धर्मग्रंथ त्याला अपवित्र मानतात. या समूहाची संख्या एकूण समाजाच्या 90 टक्के आहे. आरक्षणाचा लाभार्थी असणारा 10 टक्के समूहच या व्यवस्थेचे पाेषण करत आला आहे. या वर्चस्ववादी समूहाचे केवळ सेवक राहाल तर काय हाेईल, ते अज्ञेय हे प्रसिद्ध हिंदी कवी नेमकेपणाने सांगतात.
‘जाे पूल बनाएंगे
वे अनिवार्यतः पीछे रह जाएँगे….
सेनाएँ हाे जाएँगी पार,
मारे जाएँगे रावण, जयी हाेंगे राम,
जाे निर्माता रहे इतिहास में बंदर कहलाएँगे.’
असे व्हायला नकाे असेल तर ज्या संस्कृतीत या व्यवस्थेची मुळे आहेत ती व्यवस्था, संस्कृती बदलण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सत्तेचे नाही, तर संस्कृती आणि व्यवस्थेचे परिवर्तन करणे आणि त्यातून आपले सांस्कृतिक भांडवल निर्माण करणे हा एकच अहिंसक, सत्य आणि शाश्वत मार्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *