पत्रकार :- डॉ. आंबेडकर भारतात लोकशाही कार्यरत राहील असे तुम्हाला वाटते काय ?
डॉ. आंबेडकर :- नाही, ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान इत्यादी….

प्रश्न:- पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुकांचे महत्त्व नाही काय?
उत्तर :- नाही, त्या प्रक्रियेतून आदर्श लोक तयार होत नसतील तर निवडणूक महत्वाच्या नाहीत. विधायक बदल घडविण्यासाठी मतदान करायंच, हा विचार रुजला आहे काय? लोकांना अजून ती समज आली नाही. आपली निवडणूक पद्धती लोकांना उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य देते काय? जसे कांग्रेसने बैलाला मत द्या असे आवाहन केले आता तो बैल कुणांच प्रतिनिधीत्व करतो याचा विचार लोक करतात काय? त्या बैलाच्या नावावर एखादा गाढव उभा आहे की सुशिक्षित व्यक्ती उभा आहे याचा कुणीच विचार करीत नाही.
प्रश्न:- मी पक्ष पद्धतीवर बोलणार नाही पण तुम्ही नावापुरती लोकशाही म्हणता तेव्हा तुम्हाला काय अभिप्रेत आहे?
उत्तर: इथे सांसदीय लोकशाही काम करणार नाही कारण इथली समाजव्यवस्था तिच्याशी पूर्णपणे विसंगत आहे.
प्रश्न:- ही समाजव्यवस्था विषमतेवर आधारित आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?
उत्तर :- होय, ही समाजव्यवस्था विषमतेवर आधारित आहे. ही समाज व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही शांततामय मार्गाने बद लायला वेळ लागेल हे मलाही मान्य आहे. पण कुणीतरी त्यासाठी प्रयत्न तर करायला हवे!
प्रश्न:- तुमचे पंतप्रधान तर यावर अनेक भाषण करतात?
उत्तर :- पण ती न संपणारी भाषणे… कार्लाइल ने जेव्हा स्पेन्सरला कागदपत्रांचा गठ्ठा दिला, तेव्हा तो काय म्हणाला On this endless speaking ass in christiendom….- मला भाषणाचा कंटाळा आलाय,आता कृती हवी, एखादी ठोस योजना, एखादी संस्था जी ही व्यवस्था बदलू शकेल.
प्रश्न:- याला पर्यायी व्यवस्था काय असू शकते ?
उत्तर :- एक प्रकारची साम्यवादी व्यवस्था याला पर्याय असू शकते..
प्रश्न:- त्याचा देशाला फायदा होईल असे तुम्हाला वाटते काय? लोकांचे जीवनमान सूधारेल असे वाटते काय ?
उत्तर :- होय, सुधारू शकेल लोकांना निवडणुकांपेक्षा आपल्या मुलभूत गरजाची काळजी जास्त असते, अमेरिकेत लोकशाही काम करीत आहे तिथे साम्यवाद काम करेल असे मला वाटत नाही, याचे कारण प्रत्येक अमेरीकन माणसांच उत्पन्न जास्त आहे
प्रश्न:- ते इथे करता येईल असे नाही की वाटत तुम्हाला?
उत्तर :- कसे करता येईल लोकांकडे पुरेशी जमीन नाही, पाऊस पुरेसा नाही, प्रचंड जंगलतोड होत आहे, कसे करायचे?
जो पर्यंत या समस्या सोडवल्या जात नाहीत, या सरकारला हे प्रश्न सोडवता येतील असे मला वाटत नाही
प्रश्न:- ही व्यवस्था कोलमडेल असे तुम्हाला वाटते काय ?
उत्तर :- होय, ही व्यवस्था कोलमडेल, मी माझ्या लोकांचा विचार करीत आहे ते अगदी अगतिक झाले आहे ते समाजाच्या सगळ्यात खालच्या स्तरात आहे जर एखाद्या इमारतीचा पाया कोसळत असेल तर खालचा स्तर प्रथम कोसळतो.
प्रश्न:- माझ्या लोकांचा असे म्हणतांना तुम्ही अस्पृष्यांबद्दल बोलत आहात काय?
उत्तर :- होय
प्रश्न:- कम्युनिष्ट काम करीत नाही काय?
उत्तर :- नाही , माझ्या लोकांचा माझ्यावर भरवसा आहे आणि मला ते विचारत असतात, त्यांना मला उत्तर दयावे लागेल.