
वारकरी संतमंडळातील संतांची अभिव्यक्ती आणि वैचारीक संघर्ष हा बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी होता. पहिला संघर्ष त्यांनी मक्तेदारीत कुलपबंद केलेले ज्ञान बहुजनांना वाटून टाकण्यासाठी केला होता. ज्ञान भांडाराच्या चाव्या ज्या वैदिक सनातन्याच्या जानव्याला होत्या त्यांच्याशी संतांनी तिव्र संघर्ष केला आणि ज्ञानबंदी उठवली. संस्कृतातले सर्व तथ्यांश संतांनी मराठीत आणुन, जनतेत वाटुन टाकले. या सुरुवातीच्या संत मंडळात संत नामदेव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब संत जनाबाई, संत चोखोबाराय आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, संत सावता महाराज, संत गोरोबाकाका, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत, संत भोजलिंग काका महाराज आदी संत सहभागी होते. पुढील काळात हाच वैचारिक बहुजनांच्या हिताचा, सुखाचा संघर्ष संत एकनाथ महाराजांनी पैठण या नगरीत अस्पृश्यता निर्मुलनासाठी खर्च केला होता. वैदिक छावणीशी सर्वात मोठी टक्कर देणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा संत म्हणजे जगद्गुरु जगत्वंद्य संत तुकोबाराय होत. श्रीमंत महाजनाच्या घरात जन्माला येऊनसुद्धा अत्यंत हिन वागणूक ज्यांना ब्राह्मणी छावणीकडून मिळाली ते तुकोबाराय होत. आपल्या आयुष्याचे सर्वस्व, संचित, अभिव्यक्ती, धनदौलत गरिबांच्या सुखासाठी हितासाठी वाटणारे संत तुकोबाराय होत. त्यांना सनातन्यांचा, पुरोहितांचा, कर्मठांचा, ब्राह्मणांचा, वैदिकांचा त्रास का झाला असेल? कारण जगद्गुरु जगत्वंद्य संत तुकोबाराय गोरगरिबांना, कष्टक-यांना, शेतक-यांना, बहुजनांना जागृत करू पाहत होते. ते नेहमी म्हणायचे,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमतों
किंवा
तुका म्हणे सत्य सांगोत येतील रागे तरी येवोतें
आम्ही कधीही सत्याची बाजू सोडणार नाही. सत्य सांगताना कुणाला राग आला तरी चालेल, किंवा सत्य बहुमताच्या विरोधात असले तरी चालेल.
ज्यांना ज्ञानबंदी होती अशा बहुजन समाजाला किर्तनरुपी शाळेतून स्वअनुभव कथन करत जीवनाचा योग्य मार्ग तुकोबाराय दाखवत होते. जीवन उपयोगी अभंग लिहून शेती कशी करावी इथपासून ते जीवन कसं जगावं, परोपकार कसा करावा हे तुकोबाराय किर्तनातून लोकांना शिकवत होते. त्यांनी शेतक-यांना प्रयत्नवाद शिकवला. शेती करताना कष्ट करताना प्राधान्य शेतीला इतर गोष्टी दुय्यम हे सांगताना ते म्हणायचे,
मढे झाकूनिया करती पेरणी कुणबीयाची वाणी लावलाहेें
संत तुकोबारायांच्या एवढा प्रयत्नवाद आजतागायत कोणत्याही विज्ञानवाद्याला सांगता आला नाही. ते म्हणायचे,
ओले मूळ भेदी खडकाचे अंग। अभ्यासाशी संग कार्यसिद्धीें
कोणतेही कार्य सिद्धीला न्यायचे असेल तर अभ्यासच करावा लागतो. ज्याप्रमाणे झाडाचे मुळसुद्धा खडकाला भेदून पाण्याचा शोध घेत जाते, त्याप्रमाणे माणसाने प्रयत्नवादी असावं. हा त्यांचा संदेश अत्यंत विज्ञानवादी आहे.
आजूबाजूला चाललेल्या अमानवीय प्रथा, परंपरा, अन्याय, अत्याचार तुकोबारायांना बघवत नव्हते. याबाबत ते म्हणतात,
न पहावे डोळा ऐसा हा आकांत परपीडे चित्त दुखी होतेें
भीत नाही आता आपुलिया मरणा । दुखी होता जना न देखवेें
म्हणून त्यांनी कुणाचीही भीडबाड न बाळगता सत्याचा मार्ग स्विकारला आणि ते बहुजनांना गुलामगिरीतून कर्मकांडातून अंधश्रद्धेतून बुवाबाजीतून बाहेर काढायला पुढे सरसावले. यामुळे सनातन्यांचे वैदिकांचे धाबे दणानले आणि त्यांनी तुकोबारायांना विविध प्रकारे छळण्यास, त्रास देण्यास सुरुवात केली. अंगावर उकळतं पाणी टाकलं, गावच्या पाटलाला फितवून, तुकोबारायांना गावाच्या बाहेर काढायचा प्रयत्न झाला आणि शेवटी अभंगाच्या गाथाही बुडवल्या. अशाप्रकारे तुकोबारायांची जनजागृती थांबवण्याचा प्रयत्न केला गेला.
कुनब्याच्या घरात जन्माला आलेले संत तुकोबाराय म्हणतात,
बरे झालो देवा कुणबी केलो नसता दंभेची असतो मेलोें
बरे झाले बहुजनांच्या शेतक-यांच्या, कष्टक-यांच्या, कुणब्याच्या घरात जन्माला आलो, ब्राह्मणांच्या घरात जन्माला आलो असतो तर गर्वाने फुगूनच मेलो असतो. म्हणून तुकोबाराय बहुजनांसाठी, ओबीसी, शेतकरी, कष्टक-यांसाठी आयुष्यभर राबत होते हे निश्चित होतं. त्यांनी सर्वप्रथम कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवून सावकारकीच्या विरुद्ध बंड केलं आणि जनतेला शेठजींच्या सावकारकीच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. त्यांनी आपल्या अभंगातून सरंजामशाहीच्या ही विरुद्ध कैफियत मांडली. विठ्ठलाला विठू पाटील म्हणत त्यांनी आजूबाजूचे शोषण पिळवणूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. आपल्या आजूबाजूची असमानता दर्शक वागणूक त्यांना आवडली नाही. म्हणून समतेची बाजू घेऊन हा संघर्ष त्यांनी विठू पाटलाच्या दारात नेला. त्यानंतर त्यांनी धर्मद्रोह्यांच्या विरोधात आयुष्यभर बंड केले. त्यांनी बहुजनांना कर्मकांडातून बहुदेवतावादातून बाहेर काढलं आणि भक्तीचा साधा सरळ नामस्मरणाचा मार्ग दिला. उत्तरेकडच्या कोणत्याही तीर्थक्षेत्रांना जाऊ नका असं त्यांनी सरळ सांगितलं. वाराणसी गया पाहिली मी द्वारका परिनोव्हे तुका पंढरीचों म्हणत त्यांनी उत्तरेकडचे कर्मकांड वैदिक परंपरा नाकारली. तुका म्हणे चित्ती धरा रुक्माईचा पतीें म्हणत त्यांनी एकच विठ्ठल सर्वांना दिला. ईेशर भक्तीत मध्यस्थाची गरज नसते असे त्यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले,
शिखा सूत्र तोडी मी तू हे पण मग तुझं बाधा कोणी नव्हेें
शेंडी जाणव्याचा संबंध तोडला की आयुष्यात कोणतीही बाधा होत नाही असं तुकोबारायांचं म्हणणं आहे.
संत तुकोबाराय डोळस विचारांचे होते. त्यांना चांगल्या वाईटाची जाण होती. चांगल्याची बाजू घेऊन वाईटाच्या विरोधात संघर्ष करावा ही त्यांची ठाम भूमिका होती. गुलामी लादणारी व्यवस्था त्यांना मान्य नव्हती. भेदभावाच्या शोषणाच्या विरोधात लढणे हे तुकोबारायांच्या रक्तात होते. त्यासाठी त्यांना धर्मपीठासमोर उभे केल्यानंतर सांगावे लागले की मी जी कृती केली त्यात काही वाईट नाही; मी लिहिणार, बोलणार. मला अभिव्यक्त होण्याचे अधिकार आहे अशा विद्रोही बंडखोर मराठी चित्रपटात मात्र शेळपट, वेंधळे दाखविले गेले. हा ख-या अर्थाने तुकोबारायांचा नव्हे तर संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान आहे.
तुकारामांनी स्त्री पुरुष हे दोघेही समान असतात हे मांडलं. मनुस्मृति म्हणत होती स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही. तुकोबारायांनी मनुस्मृतीचा विचार धुडकावून लावला. ते म्हणाले,
“या रे या रे लहान थोर याती भलत्या नारी नरें तरावया पार भव सिंधूें किंवा “सकळाशी येथे आहे अधिकार”
येथे सर्वांना अधिकार आहेत, स्त्रियांना, पुरुषांना, अस्पृश्यांना, तृतीयपंथीयांना, वेश्यांना देखील.
वैदिकांनी तुकोबारायांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरी वेश्या पाठवली होती. पाठवलेल्या वेश्येला तुकोबारायांनी आईचा दर्जा दिला. पराविया नारी आम्हा रुक्माई समान असं म्हणत त्यांनी घरी पाठवलेल्या वेश्येला तिच्या घरी परत पाठवलं. इतकी त्यांची समन्यायी दृष्टी होती. त्यांनी केलेला एकूण अभंग गाथेतील जीवन उपदेश प्रत्येकाने आपले हे इहलोकीचे जीवन सुंदर करावे यासाठीचाच आहे. हे त्यांचे सर्व सांगणे बहुजन समाजाच्या हितासाठीच होतं. म्हणून संत तुकोबारायांच्या भाषेत.
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचों
सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करों
****