Menu

अमेरिकेतील Anti-Caste चळवळ

मिलिंद अवसरमोल
संचालक, आंबेडकर इंटरनेशनल मिशन (AIM USA)

मिलिंद अवसरमोल

शंभर हुन अधिक वर्षांपुर्वी, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापिठातील आपल्या व्याख्यानामध्ये डॅा. केतकरांच्या विधानाचा उल्लेख केला होता जेव्हा हिंदु भारता बाहेर प्रयाण करतील, तेव्हा जातीयवादाची समस्या भारतापुरती सिमित न राहता, ती एक वैश्विकसमस्या बनेल!

आजच्या युगात मोठ्या संख्येने भारतीय परदेशांमध्ये स्थलांतरीत झालेत आणि त्यांनी उपरोक्त भविष्यवाणीस खरे ठरविले आहे. याचे परिणामी, मागील काही दशकांपासून जातीविरुद्ध चा लढा हा भारताबाहेर सुद्धा मोठ्या जोमाने लढवला जात आहे. याचे बोलके उदाहरण म्हणजे अमेरिकेत जातीच्या आधारावर होत असलेल्या भेदभावावर दाद मागण्यासाठी कायद्यात तरतुद समाविष्ट करण्याकरिता चालू असलेला संघर्ष! हा संघर्ष विविध क्षेत्रात व तसेच अनेक स्तरावर लढला जात आहे. प्रामुख्याने अमेरिकेतील विविध आंबेडकरवादी संस्था, काही मानवतावादी व पुरोगामी भारतीय संस्था, सजग व मानवतावादी प्रतिभावंत नागरिक, Academia,, विचारवंत इत्यादींच्या प्रयत्नांने ही मोहीम अविरत वाटचाल करीत आहे. प्रचंड संख्येने असलेल्या विरोधकांना, त्यांच्या अमाप आर्थिकबळाला किंवा राजनीतिक शक्तिला न जुमानता ही मोहीम विविध पातळ्यांवर यश संपादन करित आहे. अमेरिकेतील न्यायालयीन व्यवस्थेत भेदभावाचे काही निकष कायद्यात समाविष्ट आहेत, उदा. वर्ण (Race), लिंग, वय, राष्ट्रीय त्व, इत्यादी. एखाद्या व्यक्तिवर वरील कोणत्याही आधारावर जर भेदभाव होत असेल आणि तो सिद्ध झाल्यास तो कायद्याने गुन्हा ठरतो व दोषीला शासन होऊन पिडीताला न्याय मिळतो. अमेरिकेतील जात विरोधी (एंटी कास्ट) चळवळ ही ‘जात’ हा निकष उपरोक्त निकषांमध्ये जोडण्यासाठी आहे, ज्यामुळे जातीवर आधारित भेदभावाच्या पिडीताला न्यायाची दाद मागता येईल. असे अनेक उदाहरणे आहेत जेथे या निकषाअभावी पिडितांना दिलासा मिळु शकला नाही. येथे भारताप्रमाणे जातीय भेदभाव उघडपणे जरी होत नसेल तरी अप्रत्यक्ष व छुप्या पद्धतीने तो मोठ्या प्रमाणात आढळतो. तसेच उच्चवर्णियांकडुन आरक्षणावर तर तोंडसुख पावलोपावली घेतले जाते. त्यामुळेच बहुतांश दलित आपली जातीय ओळख इतर भारतीयांपासुन लपविण्याच्या प्रयत्नात असतात. या कारणास्तव या निकषाची आवश्यकता ही काळाची गरज ठरते, ज्यासाठी हा लढा सुरु आहे. या लढ्यातील आज-वरची स्थित्यंतराची मांडणी करत आहे. सिस्को (CISCO) या तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनीतील दलित इंजिनीयर ला जातिय भेदभावाची झळ त्याच्या दोन उच्च वर्णिय भारतीय वरिष्ठांकडुन पोहचली. पिडीत अभियंताला आरोपींनी नोकरीत योग्य संधी, पगारवाढ व Promotion नाकारले कारण तो आरक्षणाचा लाभार्थी असल्याचे त्या दोघांना कॉलेजच्या दिवसांपासून ज्ञात होते असा आरोप त्या दोघांवर आहे. ठोस पुराव्याच्या अभावी, कायद्यात जात हा निकष नसल्याने तसेच सादर करण्यात आलेले सर्वेक्षण न्यायालयात प्रश्नांकीत केले गेल्या मुळे, दोन्ही आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. जरी या खटल्याचा निकाल निराशाजनक आला, तरी या खटल्या मुळे जातिभेदाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. या पोर्शभूमीवर मुळच्या भारतीय असलेल्या Councilor क्षमा सावंत यांच्या पुढाकाराने Seattle  या शहराच्या City Coun-cil ने ‘जात’ हा निकष त्यांच्या कायद्यात समाविष्ट केला. या लढ्यातील ही अत्यंत मोलाची अशी अग्रणी घटना ठरली कारण पहिल्यांदाच ‘जात’ या निकषाला शासनदरबारी मान्यता मिळाली!

या विजयामुळे जातीभेदा विरुद्धच्या संघर्षाला मोठे पाठबळ मिळाले आणि या चळवळीची व्यापकता संपूर्ण अमेरिकेत पसरण्याचा मार्ग सुकर झाला. Seattle City Council च्या यशावर मार्गक्रमण करीत अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य कॅलिफोर्निया येथील सिनेटर आयेशा वहाब यांनी ‘जात‘ यास भेदभावाच्या निकषात अंतर्भुत करण्यात यावे असे SB403 बिल कॅलिफोर्निया सीनेट मध्ये फेब्रुवारी 2023 ला मांडले, जे सिनेट व असेंब्ली या दोन्ही सभागृहात पारित झाले. हा तर एक ऐतिहासिक असा आंबेडकरवादातील समतामूलक तत्वांचा विजय होता. आता केवळ राज्याचे राज्यपाल मा. न्यूसम यांच्या स्वीकृतीची औपचारिकता बाकी होती. दुर्दैवाने काही अति उत्साही व श्रेयपिपासू आंदोलकांनी सभागृहाबाहेर उपोषण करून देशभरातील विरोधकांना जागृत व सतर्क केले व त्यांच्या हस्तक्षेपामुळे राज्यपालांनी सीनेट व असेंब्ली या दोन्ही सभागृहात पारीत झालेल्या SB403  बिलाला वीटो केले व या आंदोलनाला मोठा धक्का तर दिलाच, पण भावी प्रयत्नांवर सुद्धा खीळ घातली! असेही ऐकण्यात आले की विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व राजनीतिक बाळाचा वापर करण्यात आला. तरीदेखील, या धक्क्यातून सावरीत, आंबेडकरवादी व समताप्रेमींनी जातीभेदाचा विरुद्ध लढा अधिकच जोमाने अविरत चालू ठेवला आहे. याच दरम्यान न्युजर्सी येथील जगातील सर्वात मोठे व भव्य असे स्वामी नारायण मंदिराच्या बांधकामाकरिता अनेक कामगार भारतातुन आणण्यात आले होते. त्या मध्ये 100 हुन अधिक दलित कामगारांचा समावेश होता. या दलित कामगारांचे जातीभेदाने प्रेरित शोषण होत असल्याचे सुत्रांकडुन सार्वजनिकरीत्या उघडकीस आले, ज्यामध्ये अमेरिकेतील मानवाधिकार, Immigration  व Labor च्या नियमांना बगल देण्यात आली होती. त्यातच एक दलित मजुराचा हालाखीच्या परिस्थितीत झालेला मृत्यु, मंदीर प्रशासना द्वारे दडपून टाकण्याचा प्रयत्न झाल्यावर हे प्रकरण मे 2021 मध्ये उघडकीस आले. हे अतिशय गंभीर प्रकरण जातीय अत्याचाराचे निर्विवाद आणि बोलके प्रमाण म्हणुन वापरण्यात आले असते, परंतु प्रकरण हाताळणा-या कायद्येतज्ञांनी जातीय अत्याचाराला अग्रभागी न ठेवता, Immigration  व Labor च्या मुद्द्यांना अधोरेखित करून जातिभेदाच्या मुद्द्याला गौण केले व चालुन आलेल्या सुवर्ण संधीला गमावले! या काही अनपेक्षित व निराशाजनक घडामोडींना न जुमानता या अपयशापासून बोध आणि अनुभव घेऊन लढा पुढे सरकत आहे. या प्रकरणांना समांतर व पुरक अशी मोहीम येथील अनेक विश्वविद्यालय व तंत्रज्ञान कंपन्यात, ‘जात‘ यास भेदभावाच्या निकषात अंतर्भुत करण्यासाठी राबवण्यात आली असून तेथे मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या महत्त्वाच्या उपक्रमाला चालना आणि मार्गदर्शन मिळाले ते Boston येथील Brandeis University कडून. अमेरिकेतील हे पहिले विद्यापीठ आहे जिथे जातीभेद निर्मुलनाला मान्यता देऊन इतर सर्व शैक्षणिक संस्थानांसाठी आदर्श उभा करुन जातीभेदाच्या लढ्यात खूप मोठे योगदान दिले. आपणा सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की या उपक्रमाचे प्रणेते व आघाडीचे शिलेदार आपले भारतातील आंतरराष्ट्रीय  पातळीवरचे नामांकित विचारवंत व अभ्यासक डॉ. सुखदेव थोरात सर असून, त्यांच्या पुढाकाराने Brandeis University  ने हा उपक्रम डिसेंबर 2019 मध्ये राबवला व त्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थांनी अनुकरण करीत, हा उपक्रम अनेक ठिकाणी खालील प्रमाणे राबवला –

2019 Dec.. – Brandeis University,

2021 Sept. – UC Davis,

2021 Oct.. – Colby College of Maine,,

2021 Dec.. – Harvard,,

2023 Sept.. – Barnard College,,

2021 Apr.. – California State University (CSU)

याच्या अंतर्गत California राज्यातील 23 महाविद्यालये समाविष्ट असून ही अमेरिकेतील सर्वात मोठी पब्लिक यूनिवर्सिटी सिस्टीम आहे. याच बरोबर अमेरिकेतल्या अग्रस्थानी असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांनी जातिभेदाचा निकष त्यांच्या भेदभावाच्या कायद्यात समाविष्ट केला आहे. या मध्ये प्रामुख्याने Microsoft, Google, Apple, Amazon इत्यादिंचा समावेश आहे. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की येथे वर्णभेद(Racism) अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे व तसेच त्याच्या विरोधात अतिशय प्रभावी अशी ऐतिहासिक चळवळ सुद्धा उभी आहे. येथील कृष्णवर्णीय समाजाच्या व्यथा व दलितांच्या व्यथांमध्ये बरेच साम्य आहे. त्यामुळे, त्यांच्या संघर्षाशी आपली चळवळ जोडुन आपली ही मोहीम पुढे नेणे गरजेचे आहे. प्रख्यात लेखिका इसाबेल विल्कर्सन यांच्या Caste: The Origin of Our Discontents या सुप्रसिद्ध पुस्तकात या दोन्ही संघर्षातलं साम्य प्रभावीपणे मांडले असून या दोन पिडीत समाजांना एकत्र लढण्यास प्लेटफार्म प्रदान केला आहे. सरतेशेवटी शंभरहून अधिक वर्षांपूर्वी केलेले भाकित जरी खरे ठरत असले तरीही त्याचा प्रतिकार यशस्वीपणे होत आहे. विरोधकांकडे जरी आर्थिक सामर्थ्य प्रचंड मनुष्यबळ व राजनैतिक पाठबळ असले तरीही डॉ. बाबासाहेबांच्या मानवतावादी व समता मुलक तत्त्वांच्या बळावर अमेरिकेत जातीभेदाला शह देऊन त्याचे उच्चाटन करु हा आत्मविश्वास सर्व आंबेडकरवाद्यांना वाटतो!

अमेरिकेतील Anti-Caste  चळवळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *