दलितेत्तर मागासवर्गाची ब्राम्हण्याविरोधी वैचारिक चळवळ व कृती
-प्रा. सुखदेव थोरात
भारतीय इतिहासाचे विश्लेषण करण्यासंबंधी दोन प्रवाह आपणास दिसतात. एक धर्मसहिष्णुता म्हणजे सर्व धर्माला समानतेने वागणूक देणे आणि प्रत्येक धर्माची विचारसरणी प्रचारित करणाऱ्या अधिकार देणे. दुसरा विचार जो प्रामुख्याने डॉ. आंबेडकरांनी मांडला तो भारतीय इतिहासात ह्या दोन विचारसरणीचा सतत चाललेला संघर्ष.
हा संघर्ष धार्मिक व सामाजिक विचारसरणीचा संघर्ष होय. डॉ. आंबेडकरांच्या मते हा संघर्ष प्रामुख्याने बुध्द धम्म व ब्राह्मण्य विचारसरणी मधला आहे. बुद्ध धम्म (व तत्सम विचारसरणी) व ब्राह्मण धर्म यामध्ये सातत्याने वैचारिकच नव्हे तर हिंसात्मक संघर्ष झाला.
डॉ बाबासाहेबांनी या परस्परविरोधी विचारसरणीचा उहापोह “बुद्ध व त्याचा धम्म’ ह्या पुस्तकात केला. समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव व एकता ह्या तत्वांवर व “सत्य’ म्हणजे काय? यावर सुद्धा संघर्ष झाला. ब्राह्मण धर्म वेदांना सत्य मानतो. एवढेच नव्हे तर वेदांना अपरिवर्तनीय मानतो. सामाजिक पातळीवर ब्राह्मण धर्म आचार, व्यवहार व अधिकारांवर बंधने आणतो. जाती-भेदभाव, तिरस्कार, द्वेष व घृणा ह्यावर आधारित आहे.
या विचारांच्या अगदी उलट बुद्ध धम्म हा केवळ “सत्य’ मानतो जे व्यक्ती स्वतः अनुभवतो व पूर्णतः समजून घेतो. शिवाय तोच विचार सत्य मानतो, जो विवेकवादी असेल, जो तर्कसंगत असेल. ह्याशिवाय बुद्ध धम्माचा सत्याचा सिद्धांत वाढत्या वैज्ञानिक ज्ञानाबरोबर उत्क्रांत होत जातो असेही मानतो. ह्यामुळे बुद्ध धम्म “सर्व बदलणारे आहे’ सर्व अनित्य आहे हे तत्त्व मान्य करताना प्रत्येक घटनेमधील बदलामागे कारण आहे हे ही जाणतो.
बुद्ध धम्म कारण व परिणाम (Causes and effect) हा परिवर्तनाचा सिद्धांत मांडतो. ब्राह्मणवादी विचार बुद्धांच्या वैज्ञानिक तत्वाना मानत नाही. बुद्ध धम्मात समता, बंधुत्व, प्रेम व करुणा ह्या तत्वावर आधारित समाजरचनेस प्राध्यान्य आहे. पंचशील व आर्य अष्टांगिक मार्ग ह्यावर आधारित कर्मामुळे सर्वांचे अधिकाधिक कल्याण होईल असे मानतो. ब्राह्मण धर्माप्रमाणे आत्म्यावर आधारित पुनर्जन्म मानत नाही. पूजाअर्चा, ग्रंथ पठण, कर्मकांड करणे ह्यामुळे व्यक्तीचे कल्याण होईल हे बुद्ध धम्म नाकारतो. तर योग्य कर्म, सम्यक मार्ग हा कल्याणाचा मार्ग आहे हे सांगतो. अशा अर्थाने भारतीय इतिहासात जरी धर्माधर्मामधील सहिष्णुता पाहावयास मिळत असली तरी, ब्राम्हणधर्म व बुद्ध धम्माचा धार्मिक व सामाजिक विचार संघर्षाने भारतीय इतिहासाचा मोठा भाग व्यापलेला आहे, अशी डॉ आंबेडकर यांची भूमिका आहे. ह्या वैचारिक संघर्षामध्ये चार्वाक, लोकायत, जैन, सिद्ध, नाथ, वारकरी पंथ, भक्ती परंपरा इत्यादींचा समावेश होतो. महाराष्ट्रातील भक्ती परंपरा ही बुद्ध धम्माच्या विचाराने प्रभावित होऊन
बुद्धिवाद किंवा विवेकवाद ह्याचा पुरस्कार करणारी आहे. धार्मिक व सामाजिक समानतेचा पुरस्कार करणारी आहे. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सुधारणावादी विचार वरील सर्वच विचारप्रवाहात अंतर्भूत आहेत. तसेच या चळवळींमध्ये दलित, मागासवर्गीय व ब्राह्मणांचा समावेश आहे. ब्राह्मण जातींमध्ये रानडे, आगरकर, साने गुरुजी, श्रीधरपंत टिळक (लोकमान्य टिळकांचे चिरंजीव) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. दलितांमध्ये शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बनसोड, गणेश आकाजी गवई व पुढे डॉ. बाबासाहेबांचा समावेश होतो. मागासवर्गीयांमध्ये समानता, स्वातंत्र्य व बंधुत्व ह्या तत्वावर आधारित समाजाचा पुरस्कार करणारी ब्राह्मण्य विरोधी प्रबळपरंपरा व चळवळ आहे. ही परंपरा संत नामदेव, संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, कृष्णाजी आवर्जून केळुसकर, पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज व त्याच विचाराने प्रभावित असलेले डॉ. साळुंके, डॉ बाबा आढाव व इतर अनेकांचा समावेश होतो. ही फार मोठी समाज सुधारकांची चळवळ आहे. जी तेराव्या शतकांपासून सुरु होऊन थेट विसाव्या शतकापर्यंत चालू राहिली व आजही आहे. हा प्रचंड मोठा मागासवर्गीय किंवा शुद्र समाजाला सुधारवादी चळवळींचा वारसा आहे. ह्या मागासवर्गीय चळवळींनी वैचारिक व कृतीच्या माध्यमातून ब्राह्मण्यवादी धार्मिक विचारसरणीला विरोध केला व कर्मकांडा ऐवजी योग्य कर्मावर समाज व व्यक्तीच्या कल्याणावर भर दिला. विशेष महत्त्वाचे म्हणजे धार्मिक समानतेचा पुरस्कार केला व सर्व जातींच्या व्यक्तींना धर्माचा अधिकार असावा ही भूमिका घेतली. धर्मग्रंथ वाचण्याचा, मंदिरात प्रवेश करण्याचा व शिक्षणाचा अधिकार सर्वांना असावा हे आग्रहाने मांडले.
शिक्षणात समान अधिकार असावे याकरिता शैक्षणिक संस्था काढल्यात. यामध्ये महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. पंजाबराव देशमुख यांचा प्रामुख्याने समावेश होतो. जातीविरोधी सामाजिक विचार व कृती यामध्ये महात्मा फुले व महर्षी शिंदे ह्यांचा समावेश होतो. अंधश्रद्धा, जात व अस्पृश्यता ह्या विरोधात विवेकवादी विचारात शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, तुकडोजी महाराज, व गाडगे बुवा यांचा आग्रहाने समावेश करता येतो. ह्या ब्राह्मणवादाच्या विरोधी चळवळींमुळे सामाजिक परिवर्तन सुद्धा घडून आले. ह्या सर्व समाजसुधारकांना ही जाणीव होती, की ब्राह्मणवादी धर्मग्रंथ विशेषतः मनुस्मृति व इतर स्मृति गीता, वेद, पुराण इत्यादींनी जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून शूद्रांना मुलभूत अधिकारांपासून वंचित केले. ह्या सर्व समाजसुधारकांनी शुद्रांवरील अन्यायाविरोधात सतत संघर्ष केला. परंतु आजही काही प्रमाणात ही परंपरा जिवंत आहे. पण खेदाची गोष्ट हि की शूद्र वर्ग ब्राह्मण वादाच्या प्रभावाखाली आलेला आहे. धार्मिक व सामाजिक कुप्रथा, कर्मकांड व असमानतेवर आधारित समाजव्यवस्थेचे बळी पडत आहेत. तेव्हा १२ व्या शतकापासून शूद्र मागासवर्गीयांकडून सुरू झालेली वैचारिक चळवळ शूद्रांच्या प्रगती करिता पुनर्निर्मित करणे आवश्यक आहे.
घटनेमधील समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, एकता व विवेकवादाला आज तडा दिल्या जात आहे. अशा स्थितीत मागासवर्गीयांची चळवळ पुन्हा सक्रीय करणे काळाची गरज आहे. ह्या परिस्थितीची जाणीव ठेऊन ह्यामुळे हा “मुक्ती विमर्श’ चा विशेषांक मागासवर्गीयांमधील, ब्राह्मणधर्म विचारसरणी विरोधी वैचारिक प्रबोधनाच्या चळवळी ज्या बाराव्या शतकात सुरू होऊन विसाव्या शतकापर्यंत चालू राहिल्या व काही प्रमाणात आजही आहे; त्यावर चर्चा करते. ह्या अंकात बसवेश्वर, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले, नामदेव, तुकाराम, महर्ष शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज इत्यादींच्या विचारांचा व कार्यांचा आढावा घेण्यात आला. ज्या लेखकांनी या वैचारिक चळवळीवर त्यांच्या लेखातून भूमिका व्यक्त केल्यात त्यांचे आम्ही आभारी आहोत. ह्या विचारांचा योग्य प्रभाव होईल ही अपेक्षा.
***
तुमचे संपादकीय तथ्ये आणि अनुभवांवर आधारित आहे. शेवटच्या परिच्छेदात तुम्ही संवैधानिक मूल्यांबद्दल चिंतेत असलेल्या उल्लेखाबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या मतांचा आदर करतो. मी पूर्णपणे सहमत आहे.