Menu

भारतीय संविधानाच्या ब्राह्मणीकरणाचे आंबेडकरांचे विश्लेषण

वैदिक ब्राह्मणवाद किंवा सनातन धर्माच्या चौकटीत संविधान आणण्याचा सध्याच्या प्रयत्नाचे विश्लेषण अनेक विद्वान करीत आहेत. काही लेखकांनी ह्या परिवर्तनाचे विश्लेषण ऐतिहासिक हिंदू परंपरेच्या आधारावर करण्याचे प्रयत्न केले आहेत व काही लेखकांनी १९३० च्या जर्मनीतील हिटलरच्या फॅसिझमच्या अनुभवाचा आधारावर स्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्न केला आहे. तथापि, हे प्रयत्न सध्याच्या स्थितीचे विश्लेषण केवळ अंशतः स्पष्टीकरण करण्यास उपयोगी दिसतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय इतिहासाबाबत जो सैद्धांतिक दृष्टिकोन आहे,

तो आपल्या राज्यघटनेला धर्माचा आधार देण्याचे जे प्रयत्न होत आहेत ते समजून घेण्याकरिता अधिक उपयोगी ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय इतिहासाकडे ब्राह्मणवाद आणि बौद्ध यांना धार्मिक व सामाजिक विचारसरणीचा संघर्ष म्हणून पाहतात. डॉ. आंबेडकरांच्या मते ह्या संघर्षात बौद्धांची विचारसरणी क्रांतीकारी (Revolutionary) आहे तर ब्राह्मणवादी विचारसरणी हि प्रतीक्रांतिकारी (Counter-Revolutionary) आहे. हा संघर्ष म्हणजे राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानातील क्रांती आणि प्रतिक्रांती होती व आहे. या दोन विचार-सरणीचा संघर्ष प्राचीन काळापासून (इ.स.पूर्व १५०० ते इ. स. १०००) पर्यंत समांतर पणे चालत राहिला; तो प्राचीन, मध्यकालीन, ब्रिटिश ते सध्याच्या काळापर्यंत म्हणजे सुमारे ३५०० वर्षापर्यंत निरंतर चालत आहे.  

वैदिक ब्राह्मणवाद व बुद्धवाद ह्या परस्परविरोधी विचारसरणीमधील संघर्ष  

         हा संघर्ष कशाबाबत होता ? ब्राह्मणवाद व बुद्धवाद मध्ये कोणता विरोधाभास आहे? प्रारंभिक अवस्थेतील वैदिक किंवा वैदिक ब्राह्मणवादाचे मुख्य धार्मिक आणि सामाजिक सिद्धांत किंवा तत्वज्ञान काय आहे? (इ.स. पूर्व, १५००- इ.स. १००० पर्यंत) डॉ. आंबेडकरांच्या मते, ब्राह्मणवादी धार्मिक विचारसरणी असे मानते की, ‘वेद’ ग्रंथ हे अपौरुषेय व पवित्र आहेत, प्रश्नापलीकडील आहेत. ते चिरंतर व चिरकाल आहेत. ब्राह्मणवाद मानतो की, ईश्वराने या भौतिक व मानवी जगाची निर्मिती केली आहे. वैदिक यज्ञ आणि धार्मिक विधी-कर्मकांडांचे पालन केल्याने मानवाचा उद्धार होतो. वैदिक ब्राह्मणवाद मृत्युनंतरचे जीवन व पुनर्जन्म यावर

 विश्वास ठेवतो. आत्मा जो अमर आहे तो पुर्नजन्म घेतो. पुनर्जन्म हा कर्मावर अवलंबून आहे. माणसाचे वर्तमानातील जीवन हे मागच्या जन्मातील कर्मावर अवलंबून आहे, तसेच त्याचे पुढच्या जन्मातील जीवन हे वर्तमान काळातील कर्मावर ठरते. म्हणजेच वर्तमान जीवन शास्त्रानुसार निश्चित झाले आहे. वर्तमान काळात बदल अशक्य आहे. जो शाश्वत ब्राह्मणवाद आहे तो यज्ञात प्राण्यांची बळी देणे व विविध कर्मकांड करणे यावर विश्वास ठेवतो.

सामाजिक व्यवस्थेबाबतीत वर्ण/ जाती हि वैदिकवादाची आदर्श समाजव्यवस्था आहे, जी ईश्वराने निर्माण केली आहे. समाज हा चार वर्णामध्ये विभागला आहे जो असमानतेवर आधारित आहे. त्यातील प्रत्येक जातीचा व्यवसाय हा जन्माने निर्धारित आहे. एक वर्ण इतर वर्णाचा व्यवसाय करू शकत नाही, या चार वर्णामध्ये सामाजिक समता नाही. शुद्र, महिला व वर्णव्यवस्थे बाहेरील वर्ग जो अस्पृश्य आहे यांना शिक्षणाचे अधिकार नाहीत. या तथाकथित आदर्श समाजात बहुसंख्य निम्न जातींना आर्थिक, सामाजिक व धार्मिक अधिकार नाकारले आहेत व ब्राह्मणांना अपार विशेषाधिकार दिले आहेत. या धार्मिक आणि सामाजिक तत्वज्ञानाचा हेतू आर्थिक फायदा, सत्ता व समाजातील उच्च स्थान मिळविणे आहे. ऋग्वेदापासून उत्पत्ती पावलेली हिंदूंची सामाजिक संस्था सर्वच ब्राह्मणी धर्मग्रंथामध्ये नमूद केलेली आहे, ज्यामध्ये सर्व वेद, गीता, मनुस्मृती, इतर स्मृती, पुराणे, उपनिषद, रामायण आणि महाभारत यांचा समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘रिडल ऑफ हिन्दुइज़म’ ग्रंथामध्ये ह्या विषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे.

ह्या वैदिक ब्राह्मणवादाविरुद्ध, इ. स. पूर्व ६०० मध्ये बौद्ध धम्माचा उदय झाला, ज्याने वैदिक ब्राह्मणवादाचे धार्मिक आणि सामाजिक तत्वज्ञान अमान्य केले. वेद हे शाश्वत व अपरिवर्तनीय आहे हे बुद्धाने नाकारले. कर्मकांड, यज्ञ, विधी-वैकल्य यावर बुद्धाचा विश्वास नव्हता. प्राण्यांची हत्या करण्यास बुद्धाचा विरोध होता.  ईश्वर, आत्मा व मागील जन्मातील कर्मामुळे आजचा जन्म मिळतो हे बुद्धाने नाकारले. स्वातंत्र्य, न्याय व समता हि मानवी मुल्ये व असमानतेवर आधारीत जातीव्यवस्था बुद्धाने नाकारली. सत्य कसे ओळखावे ह्या विषयी सुद्धा बुद्धाचे विचार वेगळे आहेत. अनुभव, माणसाची सद्सदविवेकबुद्धी व तर्काद्वारेच सत्य जाणता येते ह्या विचाराला बुद्धाने महत्व दिले. जे वेदामध्ये दिले तेच सत्य हा विचार बुद्धाने स्पष्टपणे नाकारला.

बुध्दाचा कर्मसिद्धांत मानतो की, “जसे तुम्ही पेरता, तसे “पीक येईल.” (“As you sowso shall you reap”) तसेच अहिंसेविषयी बुद्धाचा विचार वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणजे, “मारण्याची इच्छा आणि मारण्याची गरज” (Will to kill and need to kill) यामध्ये बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत फरक करतो. मानसिक सुखाकरिता केलेल्या हिंसेचा विरोध करतो. तर संरक्षणाकरिता लादलेली हिंसा मान्य करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानुसार धम्म हा सामाजिक आहे. त्यांच्या मते “नैतिकता म्हणजे धम्म”, “आदर्श सहजीवन म्हणजे धम्म.” जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसाने माणसासी कसे वागावे हे धम्म सांगतो. प्रत्येकाने नीतिमत्तेने वागले पाहिजे जेणेकरून सर्वांचे कल्याण होईल. असे धम्म सांगतो. “नैतिकतेने जीवन जगण्यासाठी निती दैनंदिन आचरणात आणण्यासाठी बुद्धाने पंचशील सांगितले व आर्य अष्टांगिक मार्ग दिला. पंचशीलामध्ये खोटे बोलणे, हत्या करणे, मद्यपान करणे, चोरी करणे, व्यभिचार हे निषिद्ध मानले. अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक कर्म, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हा बुद्धाने सांगितलेला जीवन जगण्याच्या मध्यम मार्ग आहे. धम्म सुरुवातीला कल्याणकारक, मध्याला कल्याणकारक व अंतिमतः कल्याणकारकच आहे. 

क्रांती व प्रतिक्रांतीचा डॉ. आंबेडकरांचा सिद्धांत

          मानवतावादी व समतावादी बुद्ध धम्म व असमानता मानणारा वैदिक ब्राम्हणवाद यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष झाला. या ऐतिहासिक संघर्षामध्ये बुध्द धम्म हा क्रांतीसाठी तर वैदिक ब्राह्मणवाद हा प्रतिक्रांतीसाठी लढत होता. दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे बुद्ध धम्म समता व स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत होता तर ब्राह्मणवाद असमानता व बंधन किंवा अ-स्वातंत्र्य ह्याचा आग्रह करत होता. या संघर्षात क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या अनेक अवस्था आपल्याला दिसतात. वैदिक विचारसरणी साधारणतः इ.स. पूर्व १५०० वर्षांपासून सुरू झाली मात्र या विचारसरणीला अगदी समांतर अशी विचारधारा बुद्धकाळापूर्वी (इ.स. पूर्व ६००) श्रमणवादाच्या (श्रमनिझम) अस्तित्वात होती. श्रमण परंपरा अत्यंत प्राचीन उन्नत व गरिमामय आहे. सर्वांप्रती समभाव ठेवणे, वेदांना प्रमाणित न मानणे, संसाराचा त्याग करून उच्च मूल्यांनी जीवन जगणे हि त्याची वैशिष्टे होत. हि श्रमण परंपरा इ. स. पूर्व ६०० वर्षांपर्यंत ठळकपणे दिसते. त्यानंतर बुद्ध धम्माच्या रूपात इ. स. पूर्व ६०० ते सम्राट अशोकाचा कार्यकाळापर्यंत म्हणजे इ. पूर्व. २५० वर्षापर्यंत तिचा परमोच्च बिंदू आढळतो. डॉ. आंबेडकरांच्या मते, इ.स.पूर्व १७५ या वर्षात सम्राट अशोकाचा पनतू सम्राट बृहद्रथाची हत्या त्यांचाच ब्राह्मण अमात्य पुष्यमित्र श्रृंग याने केली. तेव्हापासून पुन्हा समताविरोधी प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. ही प्रतिक्रांती नंतर मध्ययुगीन काळापर्यंत व नंतर ब्रिटिश राजवटीपर्यंत म्हणजे १७७२ ते १९५० पर्यंत पहायला मिळते. नंतर १९५० पर्यंत तिला हादरे बसून ती क्षीण झाल्याचे दिसते, त्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती, तसेच बाबासाहेबांनी १४ एप्रिल १९५६ला केलेली लक्षावधी लोकांची धम्मदिक्षा ह्या निर्णायक घटना म्हणजे समतेला पुरस्कार करणारी क्रांती होय.

इ.स. पूर्व २०० मध्ये पुष्यमित्र श्रृंगाने सम्राट बृहद्थाची हत्या केल्यानंतर सुरू झालेल्या प्रतिक्रांतीला कारणे होती. वैदिक काळापासून ब्राह्मण वर्गांचे अमर्यादपणे उपभोगत असलेले विशेषाधिकार बुद्ध धम्माच्या प्रसारामुळे व पुढे सम्राट अशोकाच्या कार्यकाळात कमी झाले होते व जातीव्यवस्थासुद्धा बरीच क्षीण झाली होती. डॉ. आंबेडकरांच्या मते, मनुस्मृती साधारणतः इ.स. पूर्व १७५ मध्ये अस्तित्वात आली व त्यानंतर ब्राह्मण तसेच वरच्या वर्गांचे कमी झालेले विशेषाधिकार आणि क्षीण होत आलेली जातीव्यवस्था पुन्हा शक्तीशाली झाली. पुष्यमित्र श्रृंगाने राज्य हस्तगत केल्याने बुध्द धम्माला मिळत असलेला राजाश्रय नष्ट झाला व वैदिक ब्राह्मणवादाला पुन्हा समर्थन मिळाले. ब्राह्मणवादाच्या प्रचंड विरोधामुळे बुद्ध धम्माची इ.स. पूर्व २०० पासून पडझड सुरू झाली आणि बुद्ध धम्म इ.स. १२०० पर्यंत जवळपास लुप्त झाला, हिंसाचाराने युक्त अशा प्रतिक्रांतीचा हा काळ साधारणत १००० वर्षांचा होता. मुघल काळात प्रतिक्रांती सुप्तावस्थेत  राहिली, भक्ती चळवळ, नामदेव, कबीर, मीरा, रविदास, चोखामेळा आणि शिख धर्माद्वारे १३ वे ते १८ व्या शतकात व पुढे १७५६ मध्ये ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या काळापर्यंत क्रांतिकारी आवाज हे सतत पुढे आलेत.

प्रतिक्रांतीने १७५६ ते १९५० या काळात हिंदू धर्माच्या नावाने नवे फलक धारण केले, जे वैदिक ब्राह्मणवादाचाच भाग होते. या काळात हिंदुच्या एकत्रीकरणाच्या दिशेने एक चळवळ सुरु झाली. हिंदू धर्माची ही संज्ञा सन १००० च्या सुमारास प्रथमच उदयास आली. परंतु सुरुवातीला हि सध्या भौगोलिक स्वरुपाची होती. पण पुढे तीला सांप्रदायिक व धार्मिक आधार मिळाला. हिंदू सभे’च्या माध्यमाने हिंदू लोकांच्या एकत्रीकरणास सुरुवात झाली. १८२८ मध्ये पहिल्यांदा बंगालमध्ये ब्राह्मो समाज स्थापन झाला. स्वामी दयानंद सरस्वतींनी १८७५ मध्ये पंजाबमध्ये आर्य समाज स्थापन केला, नंतर मदन मोहन मालवीय द्वारे उत्तर प्रदेशात १९१० च्या मध्यात हिंद सभा स्थापन झाली, महाराष्ट्रात प्रार्थना समाज तर दक्षिणेकडील भारतात हिंदूनी तामिळ समाज स्थापन केला. या चळवळी ब्रिटिशांनी कायद्यात समानता आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात जाणारे व्यक्तीस्वातंत्र्य यांचा विरोध म्हणून उदयास आल्या. हिंदू सभा चळवळीमुळे हिंदूचे एकत्रीकरण झाले आणि अखेरीस मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली १८९५ मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली. सावरकरांनी १९२५ च्या आसपास हिंदूत्व आणि हिंदू राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या करून आणि भौगोलिक अर्थ असलेल्या हिंदू शब्दाचे रूपांतर “इझम” (वाद) मध्ये करून हिंदू अस्मितेला स्पष्ट वैचारिक आधार दिला. हिंदू राज्याची प्रस्तावित कल्पना सामाईक जमीन, एक धर्म (सनातन धर्म) आणि एक भाषा-संस्कृत यावर आधारीत होती. सावरकरांनी हिंदू धर्मात बौद्ध, जैन व शीख या भारतीय वंशाच्या धर्माचा समावेश केला होता. हे नमूद केले पाहिजे, यात मुस्लिम व ख्रिश्चन वगळलेत. लाल मणी जोशी यांनी असेही मत मांडले की “ब्राह्मणवाद आणि बौद्ध, जैन, योग, सांख्य व या धार्मिक व सामाजिक विचाराचा समावेश वैविध्यपूर्ण विचारधारा असलेल्या हिंदू समाजाच्या होत. ह्या हिंदू समाजाच्या किंवा धर्माच्या व्यापक संकल्पनेमध्ये ब्राह्मणवाद, (वैदिक, किंवा सनातन किंवा नव-ब्राह्मण वाद किंवा सुधारित बाह्मणवाद), बौद्ध जैन, लिंगायत, शीख धर्म, अंत्य समाज, ब्राह्मो समाज यांचा समावेश होतो. तसेच इतर संप्रदाय, जसे वारकरी, महानुभाव, भक्ती चळवळ, कर्नाटकातील बसवेश्वरांची चळवळ, तामिळनाडू येथील रामस्वामी पेरियारची ब्राह्मणेतर चळवळ, केरळमधील नारायण गुरुची चळवळ, पंजाबमधील आदी चळवळ तसेच उत्तर भारतातील सुधारणावादी चळवळी जसे कबीर, रविदास, अच्युतानंद, मिरा व इतर सगळे पंथ मिळून हिंदू समाज बनला म्हणजेच प्रत्यक्षात आधुनिक हिंदु समाज/धर्म हा विभिन्न धार्मिक विचार सरणी व परंपरांनी तयार झाला आहे.

 सामावून घेणे, आत्मसात करणे व हिंसाचाराची रणनीती : 

भूतकाळात व वर्तमान काळातसुद्धा क्रांतीवादी सांस्कृतिक व सामाजिक परंपरा नष्ट करण्यासाठी प्रतिक्रांतीच्या प्रक्रियेने (व्यवस्थेने) विशिष्ट रणनीतीचा वापर केला. डॉ. लाल मणी जोशी यांनी या रणनितीला “सामावून घेणे व आत्मसात करणे” (Assimilation and Accommodation) असे संबोधले. ते समता विरोधी प्रतिक्रांतीवादी विचार व्यवस्था जिवंत राहण्याकरिता वैदिक ब्राह्मणवादाने बौद्ध धम्म व जैन धर्माच्या काही संकल्पना सामावून घेतल्या व आत्मसात केल्या. पुढे त्या आपल्याच संकल्पना आहेत असे म्हणून त्यांचा वापरही केला व त्या रूढ केल्या. बुद्धाच्या व सम्राट अशोकाच्या काळात ब्राह्मणवादाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व पुन्हा वरच्या स्थानावर आरूढ होण्यासाठी ब्राह्मणवादाने ‘सामावून घेणे व आत्मसात करण्याची’ रणनिती उपयोगात आणली. उदाहरणार्थ, कर्मकांडातील प्राण्यांच्या बलिदानाच्या स्वरूपातील हिंसेच्या विरुद्ध अहिंसेचे तत्व किंवा ऐहिक जीवन किंवा संन्यास यांच्याव्दारे भौतिक लोभाची अनासक्ती मानणारे बुद्धाचे तत्व यामुळे लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित झाले होते. लोकांना ब्राह्मणवादाकडे पुन्हा परत आणण्यासाठी, ब्राह्मणवादाने इ.स. ४ थ्या शतकातील गुप्ता राजवटीत अहिंसेचे तत्व अंगिकारले व गाईची हत्या हा अपराध (गुन्हा) म्हणून घोषित केले. शाकाहाराचा अवलंब करून अहिंसेला उच्चतम पातळीवर नेले. तसेच संन्यास ही संकल्पना स्वीकारली. बौद्ध भिक्कूचे जीवन, हिंदूंच्या भवचक्रातील शेवटचा टप्पा म्हणजे वणाश्रम झाले. यामुळे ब्राह्मणवाद आणि बौद्ध धम्मातील फरक पुसट होत गेला. इ.स. ४०० च्या सुमारास बुद्धाला विष्णूचा नवा अवतार घोषित करून किंवा दत्तक घेवून आत्मसात करण्याच्या नितीला पराकोटीला नेऊन पोहचवले. ब्राह्मणवादाने ध्यान (Meditation) आणि योगाची (Yoga) बौद्ध आचरणाची (सम्यक, ध्यान व समाधी) मार्ग देखील स्वीकारला, बौद्धाच्या अष्टांगिक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे सम्यक समाधी ( Concentration Yoga), आपला स्वतःचा मार्ग म्हणून प्रचलित केला. आणि लोकांच्या स्मरणातून पूर्णपणे काढून टाकले की ध्यान आणि योगाची सुरुवात बौद्ध विचारातून व जीवन पद्धतीतून आली होती. ब्राह्मणवादाने बौद्ध विहाराच्या संकल्पनेचे सुद्धा अनुकरण केले व प्रार्थनेसाठी देवांच्या प्रतिमांचा वापर केला. बौद्ध धम्मात विहारामध्ये बुद्धाची प्रतिमा फक्त आदर व स्मृती म्हणून वापरली जाते. परंतु ब्राम्हण धर्माने मंदिरांमध्ये मूर्ती स्थापन करून तिचा वापर पूजेकरिता केला. “अंगिकार व आत्मसात” करण्याच्या रणनीतीचा उद्देश बौद्ध आणि जैन धर्माला मागे टाकणे आणि धर्मांतरित बौद्धांना ब्राह्मणवादाकडे आकर्षित करणे हा होता. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि विवेकानंद यांच्यासारखा हिंदू विचारसरणीच्या विव्दानांनी ही रणनीती मान्य केली. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नमूद केले की, “ब्राह्मणवादाने बंधुत्वाच्या आलिंगनातून, कवटाळून बौद्ध धम्माचा नाश केला.” अगदी स्वामी विवेकानंदानीही असाच विचार व्यक्त केला व ते म्हणाले की, “हिंदू धर्माने बौद्ध धम्माचा विचारांचा रस घेतल्यानंतर बौद्ध धम्म चोथा करून फेकून दिले.” अशाप्रकारचे मत लाल मणी जोशी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

इस्लामिक काळात संतांच्या भक्ती चळवळीने सामाजिक संबंध व धर्मामध्ये समानता असली पाहिजे असे प्रसारित करून ब्राह्मणी धर्माला आव्हान दिले. वैदिक ब्राह्मणवादाने अशाच रणनितीचा वापर करणे सुरू केले. त्याने संतांच्या भक्ती चळवळीचा व तत्कालिन समाजसुधारकांचा काही अंशी गौरव केला, मात्र त्यांची पुरोगामी शिकवण दडपून टाकली. संतांची मंदिरे उभारली मात्र त्यांचे विचार कुंठित केले. बसवेश्वर, नामदेव, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, नारायण गुरू अशा अनेक संतांची व सुधारकांची त्यांनी मंदिरे उभारली व पूर्जा-अर्चा, कर्म-कांडांच्या नावावर ब्राह्मण पुजारी या मंदिरात दक्षिणा भेट स्विकारत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. अमरावतीचे संत गाडगे बाबांचे मंदिर एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शोकांतिका अशी की ह्या कर्मकांडता, पूजा-अर्चा व उपासनांचा या संतानी व समाजसुधारकांनी मध्यकालीन व ब्रिटिश काळात विरोध केला होता. ज्या विचारसरणीने खालच्या जातीचे अधःपतन झाले, त्याच विचारसरणीची काही दलित व मागासवर्गीय, ब्राह्मणी विद्वत्तेच्या चतुराईमुळे त्यांचे विचार अंगीकृत करू लागले.

इतकेच नव्हे, तर जेव्हा ब्रिटिश काळात ब्रिटिशांनी ‘कायद्यासमोर सारे समान आहेत, ही संकल्पना आणली, तेव्हाही बंगालमधील विचारवंतांनी याच रणनितीचा वापर केला. त्यांनी ब्रिटिशांच्या सती, बाल विवाह व विधवा पुनर्विवाहाबाबत बंद करण्याच्या कायद्याला मान्यता दिली. मात्र जातीव्यवस्थेमध्ये सुधारणा नाकारल्या. हिंदूंच्या दबावामुळे ब्रिटिशांना सुरुवातीला हिंदूधर्मशास्त्र मुख्यतः मनुस्मृतीनुसार अँग्लो-इंडियन कायद्याची रचना करण्यास बाध्य केले. ब्रिटिशांनी १७७२ मध्ये अँग्लो-इंडियन कायदा जारी केला, ज्याने घोषित केले की “वारसा, विवाह, जात आणि इतर धार्मिक उपयोग किंवा संस्थांशी संबंधित सर्व खटल्यांमध्ये, हिंदूंच्या संदर्भात शास्त्राचे नियम नेहमीच पाळले जातील.” ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर १७९३ मध्ये ब्रिटिशांनी एक बदल घडवून आणला ज्याअंतर्गत हिंदू धर्मशास्त्र्याप्रमाणे कायदा स्पष्ट करण्यासाठी दिवाणी न्यायालयांमध्ये हिंदू कायद्यानुसार स्पष्टीकरण करण्यासाठी एका ब्राह्मण विद्वानाची न्यायालयात अधिकृत नेमणूक करण्यात आली. ह्या ब्राह्मण विव्दानांनी मार्गदर्शन करतांना उच्च जातींना विशेषाधिकार देणाऱ्या विचारसरणीचा त्याग किंवा त्यामध्ये कुठलाही बदल त्यांनी होऊ दिला नाही. यासंदर्भात लाल मणी जोशी म्हणतात, “खरं तर ब्राह्मणवाद क्वचितच कमी झाला, किंबहुना तो शतकानुशतके वाढतच गेला, आणि ब्राह्मणी नसलेल्या सिद्धांत व प्रथाद्वारे परिष्कृत आणि रूपांतरित होऊनही त्याने आपले मूळ इंडो-आर्यन वर्ण कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कायम ठेवले. दैवी वर्ण व्यवस्था (जाती आणि वर्ग) आणि त्यांची मतप्रणाली (कर्तव्य-व्यवसाय आणि विशेषाधिकार) असंख्य पुत्र उत्पन्न करणारी सुवार्ता, अस्पृश्यतेची शिकवण, देवदासी प्रथा इत्यादि ब्राह्मणवादाचे नियमित वैशिष्ट्य राहिले आहेत. अगदी वैदिक धर्मसूत्र आणि महाभारताच्या काळापासून, ते आजही कायम आहेत.

हिंसेचा वापर

सध्याचा काळ, प्रतिक्रांतीचा काळ

आंबेडकरांनी १९४४ मध्ये मद्रास येथील भाषणात म्हटले होते की, आजचा काळ प्रतीक्रांतीचा काळ आहे. आज जनता, गीता आणि मनुस्मृतीमधील प्रतिक्रांति विचारांचे आवर्तनात आहेत.” हे समजून घेणे आवश्यक आहे, की सद्याची प्रतिक्रांती ही त्याचाच एक भाग व निरंतरता आहे, जी इ. स. पूर्व १७५ साली मनुपासून सुरू झाली होती. सद्याच्या प्रतिक्रांतीची व्यापक वैशिष्ट्ये त्या काळाच्या गरजेनुसार काही बदल करून मुळात तशीच राहिली आहेत. सद्याच्या काळात प्रमुख ध्येय एकच आहे ते म्हणजे राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून किंवा साधनाद्वारे राज्य आणि सत्ता काबीज करणे, ह्याकरिता राजकीय लोकशाहीचे रुपांतर धर्मावर व जातीवर आधारित लोकशाहीत करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे १९२० च्या मध्यापासून निवडणूकीच्या उद्देशाने लोकांचे हिंदूकरण करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. हिंदूकरण हे ध्येय व राज्य काबीज करण्याचे एक साधन म्हणून अंगिकारले. ब्राम्हणवादी विद्वानांनी वापरलेली ही पहिली रणनीती होती. दुसरी रणनीती म्हणजे हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणवादाच्या विचारसरणीला पुढे करणे, ही नवी रणनीती नव्या संदर्भात वापरण्यात येत आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू धर्माच्या संकल्पनेमध्ये सावरकरांनी केवळ वैदिक ब्राह्मणवादच नव्हे, तर भारतीय वंशाच्या इतर धार्मिक परंपरा आणि अनेक पंथ यांच्या समावेश केला आहे. बाबासाहेब आंबेडकर सावरकरांना उद्धृत करून म्हणतात, “वैदिकवाद, सनातनवाद, जैन- बौद्ध, लिंगायत, शीख, आर्य समाज, ब्राह्मो समाज, देव समाज, प्रार्थना समाज आणि इतर धर्माचे अनुयायी भारतीय मूळ आहेत त्यामुळे संपूर्ण लोक हिंदू होतात व म्हणून ते (सावरकर) हिंदू होण्यास पात्र एक घटक म्हणून वेदांच्या पवित्रतेवर विश्वास ठेवण्याचा आग्रह धरत नाही.” (परंतु हिंदू असण्याची पात्रता म्हणून मुस्लिम, ख्रिस्ती, पारसी आणि ज्यू यांना स्पष्टपणे वगळते). हिंदू धर्माची कल्पना कालांतराने ज्या प्रकारे विकसित झाली, त्यात सर्व वैविध्यपूर्ण तात्विक परंपरांचा समावेश आहे. परंतु ब्राह्मणेत्तर तत्त्वज्ञान हे ब्राह्मणवादाच्या धार्मिक आणि सामाजिक तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे, हे ब्राह्मण पंडितांना पूर्णपणे माहीत आहे.

म्हणून भूतकाळाप्रमाणे, एक विशिष्ट भ्रामक रणनीती वर्तमान काळात कार्यान्वित करण्यात आली आहे. सामान्य हिंदू धर्माची कल्पना सार्वजनिक जनतेमध्ये मांडल्या जात आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात सर्व गैर-ब्राह्मणी परंपरांना वगळून ब्राह्मणी धर्माचा प्रचार केला जात आहे. अशा प्रकारे हिंदू धर्माच्या आडून, गैर-ब्राह्मणवादाच्या धार्मिक आणि सामाजिक विचारसरणीला नाकारल्या जात आहे. त्यामुळे सध्या हिंदु राष्ट्रासाठी जो प्रचार केला जात आहे तो म्हणजे वैदिक ब्राह्मणवादाची मूळ कल्पना काही उथळ बदलांसह कायम ठेवणे हा वैदिक ब्राह्मणीवादाचा अजेंडा आता अगदी स्पष्ट झाला आहे. सनातन धर्माची संकल्पना ज्यामध्ये ब्राह्मणवाद समाविष्ट आहे असे मोठ्या समर्थपणे मांडल्या जात आहे. ब्राह्मणेतर हिंदू परंपरांचे समर्थन जाऊ शकत नाही कारण, ब्राह्मणेतर धर्माच्या परंपरा, कर्मकांड आणि व्रतवैकल्यांना अनुकूल नाहीत. पण विवेकवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित समाजाचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. हिंदू धर्माचा नावावर ब्राह्मण धर्माचा पुरस्कार करण्याची निती इतकी प्रभावी आहे की काही अस्पृश्य आणि इतर मागासलेल्या जातींसह खालच्या जाती या भ्रामक प्रचाराला बळी पडत आहेत. खरे तर ब्राह्मणवादी धार्मिक विचारसरणीचे समर्थन खालच्या जातींनी करण्यासाठी, ब्राह्मणवाद्यानी दीर्घकालापासून रणनीती वापरली आहे. आणि ब्राह्मणवाद्याला ह्या प्रयत्नात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. खालच्या जातींना ब्राह्मणवादाच्या समर्थनार्थ आणणे, जा विचारसारणी त्यांच्या अधःपतनाचे आणि वंचिततेचे कारण आहे, ही ब्राह्मणवादी विद्वत्तेचे उच्चतम यश आहे. हा वर्तमानकाळात वापरला जाणारा भूतकाळाचा वारसा आहे. आमच्याकडे ब्राह्मणवादाच्या पुरस्कार करणारे, वाल्मिकी या तथाकथित निम्न जातीचे शूद्र किंवा अतिशूद्र यांचे उदाहरण आहे. ज्या रामायणात जातिव्यवस्थेचे समर्थन आहे त्या रामायणाची निर्मिती एक अस्पृश्य वाल्मिकीने केली असे मांडले आहे. तसेच भगवान कृष्ण जे मागासवर्गीय जातीमधून असूनही गीतेमध्ये वर्णव्यवस्थेचे समर्थन करतात हे स्पष्ट आहे.

अशा प्रकारे अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत समाविष्ट व एकत्रीकरणाचे धोरण काही बदलांसह वापरले गेले. नव ब्राह्मणवाद किंवा सुधारित ब्राह्मणवाद अशी नवीन नावे घेण्यात आली. पण या प्रक्रियेत वैदिक ब्राह्मणवादी विचारसरणीचा गाभा जिवंत ठेवला गेला. आज हेच घडत आहे. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची एक टिप्पणी मांडणे संयुक्त ठरेल. डॉ. आंबेडकरांनी निरीक्षण केले की, वेदांमध्ये अशी काही धार्मिक तत्त्वे आहेत जे वैयक्तिक हक्क, स्वातंत्र्य व समानता याचे समर्थन करतांना दिसतात, परंतु ब्राह्मण विद्वानांनी हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले. उदाहरणार्थ, “Brahma is not Dharma. What good is Brahma?” ह्या निबंधात आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला की “ब्रह्मवाद” हा सर्व व्यक्ती ब्रह्माचे अंश आहेत असे मानतो म्हणजेच सर्व समान आहेत आणि सर्वांनी समान स्वातंत्र्याच्या उपभोग घ्यावा हि संकल्पना मांडतो. ब्रह्माची शिकवण लोकशाहीसाठी एक मजबूत पाया प्रदान करते. परंतु ब्राह्मणवादाला (Brahamanism) ब्रह्मवादाचा (Brahmvad) सिद्धांत “राजकीय तत्वज्ञानामध्ये” लागू करणे आवश्यक वाटले नाही. आंबेडकरांनी आणखी एक उदाहरण दिले. त्यांनी नमूद केले की, जमातींचे (Tribes) जातींमध्ये (Castes) रूपांतर होण्यापूर्वी, “ऋग्वेदात पाच आर्य जमातींना (Tribes) एक मानले होते, जे एकतेची भावना किंवा एक प्रकारची चेतना दर्शविते. परंतु ब्राह्मणवादाने ही एकता मान्य केली नाही. किंबहुना पुरूष सूक्ताने वर्णव्यवस्था मान्य केली. दोन विचारसरणीपैकी ब्राह्मणवादाने जाती व्यवस्थेला प्राधान्य दिले व जमातीचे जातीमध्ये रूपांतर केले आणि राष्ट्रवादापेक्षा (Nationalism) जातीवादाला (Communalism) महत्त्व दिले.” या सर्व विवेचनाचा मुद्दा हा की, वैदिक ब्राह्मणवादामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि लोकशाहीची क्षमता असलेली काही धार्मिक तत्त्वे होती ज्यात समानता आणि वैयक्तिक अधिकार मानणारे तत्वे समाविष्ट होती. परंतु ब्राह्मणवादाने जातीयवाद आणि असमानतेला प्राधान्य दिले. कारण लोकशाही आणि समानता स्वीकारून ब्राह्मणांचे विशेष अधिकार धोक्यात आले असते. भौतिक विशेषाधिकार, सत्ता आणि उच्च सामाजिक दर्जाच्या हव्यासापोटी ब्राह्मणवादांनी सवर्ण समाजाच्या हव्यासांना धोका निर्माण होऊ दिला नाही.

-प्रो.सुखदेव थोरात

मुख्य संपादक: डॉ. सुखदेव थोरात, कार्यकारी संपादक : किशोर खांडेकर, डॉ. गौतम कांबळे, संपादक मंडळ: डॉ. जोगेंद्रनाथ गवई, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. विकास जांभूळकर, विद्या चौरपगार, डॉ. अल्का पाटील, सल्लागार मंडळ: डॉ. एम. एल. कासारे, डॉ. विमल थोरात,  जनसंपर्क व वितरण व्यवस्था : डॉ. त्रिलोक हजारे (९४२२८१२६८४)