Menu

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध ? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

छत्रपती संभाजीनगरात आयोजित ब्राह्मण अधिवेशनात खा. मेधा कुलकर्णी म्हणाला, “मनुस्मृती फाडली जाते जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे? त्यातील जे चांगले आहे ते घ्या, जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, ऊठसूठ विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे थांबवा. हे किती दिवस सहन करायचे ? हे थांबले पाहिजे. सर्व समाजांनी एकत्र यावे हिंदू म्हणजे एकटा ब्राह्मण नव्हे. यात सर्व जातीपंथांचा समावेश होतो. आपण सर्वजण आधी हिंदू व नंतर ब्राह्मण, मराठा व विविध जातीपंथातील आहेत. यामुळे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केले. मेधा कुलकर्णी म्हणतात, ते ठीकच आहे. कारण एखाद्या इतिहासकालीन घटनेसाठी वा एखाद्याच्या एखाद्या कृतीसाठी सर्व समाजाला दोष देणे बरोबर ठरत नाही; पण वास्तव असे आहे, की उभ्या ब्राह्मण समाजाला कुणीही दोष देत नाही, तर ज्या वर्णवादी ब्राह्मणी व्यवस्थेने ब्राह्मणास सर्वश्रेष्ठ ठरवून समाजात उच्चनीचतेचे, विषमतेचे विषारी बीज पेरले आणि अजूनही ज्यांना ही ब्राह्मणी ब्राह्मण्यग्रस्त व्यवस्था आदर्श वाटते, त्या व्यवस्थेची चिकित्सा टीकाटीपणी होणारच; पण हे वास्तव चलाखीने जाणीवपूर्वक दडपून- नाकारून ब्राह्मण्यावर टीका म्हणजे ब्राह्मण समाजावरील टीका होय, असा जो दिशाभूल करणारा फसवा युक्तिवाद मेधा कुलकर्णी करतात, तो म्हणूनच समाजाचा बुद्धीभेद करणारा ठरतो, हे उघड आहे. कसे ते पाहू.

आजच्या आजच्या ब्राह्मणांचा मनुस्मृतीशी संबंध काय, असा चलाख प्रश्न विचारणाऱ्या मेधाताईंना शूद्रांचा आणि महिलांचा उपमर्द तसेच अवमान करणारी मनुस्मृती जाळण्याच्याच लायकीची आहे, असे का बरे वाटत नाही? आणि मनुस्मृतीच्या दहनाने इतक्या कासावीस होणाऱ्या मेधाताई जेव्हा संविधानाच्या प्रती खुलेआम जाळण्यात येतात, तेव्हा त्याबाबतची त्यांची भूमिका काय असते? काय आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *