Menu

सीमारेषेवरील आदिवासी : महाराष्ट्रातील शैक्षणिक अंतराचे वास्तव

डॉ. माला बनर्जी, IIDS, New delhi

घोषित धोरणे व घटनात्मक संरक्षण असूनही, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींचा शैक्षणिक प्रवास अद्यापही कमी नावनोंदणी, मोठ्या प्रमाणात गळती, कमी टिकाव व उच्च शिक्षणात विशेषतः STEM क्षेत्रात सर्वात कमी सहभागामुळे ग्रस्त आहे. महाराष्ट्राच्या २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची साक्षरता फक्त ५६ टक्के आहे, जी राज्याच्या ७२ टक्के सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. आदिवासी महिलांची साक्षरता फक्त ४८.७ टक्के असून ती धोकादायक पातळीवर कमी आहे. तथापि, मध्यान्ह भोजन योजना, प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती व इतर सरकारी उपक्रमांमुळे प्राथमिक स्तरावर (इयत्ता १ ते 8) एकूण नावनोंदणी दर (GER) १०० टक्के आणि माध्यमिक स्तरावर ९६.८ टक्केपर्यंत वाढली आहे. मात्र, उच्च माध्यमिक स्तरावर (५५.२%) नावनोंदणीचा दर अचानक कमी होतो. विशेषतः मुलींचा (५२.९%) शालेय शिक्षणानंतर इयत्ता दहावी नंतर गळती मोठ्या प्रमाणात होते.

आदिवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण सर्व स्तरांवर कायमच जास्त राहिले आहे, इयत्ता १ ते ५ मध्ये ०.८ टक्के, इयत्ता ६ ते 8 मध्ये २.९ टक्के तर माध्यमिक शिक्षणानंतर (इयत्ता १०) अचानक २१ टक्क्यांवर पोहोचते. यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांमध्ये गळतीचे प्रमाण खूप जास्त असून, प्राथमिक स्तरावर सातत्याने ४ टक्क्यांपेक्षा जास्त गळती नोंदवली जाते. सह्याद्री, सातपुडा, गोंडवाना व विदर्भातील डोंगरी भाग महाराष्ट्रातील आदिवासींचे मुख्य ठिकाण आहे. या जिल्ह्यांमध्ये रस्ते व आधुनिक सुविधा यांचा अभाव आहे. अंतरामुळे अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी नंतर शिक्षण सोडतात, विशेषतः मुली शिक्षण सोडतात व मुले कामगार म्हणून गावात किंवा गावाबाहेर स्थलांतर करतात. शाळेत जायला मैलोनमैल चालावे लागते, शाळांमध्ये वीज नसते, योग्य वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी शौचालय, पिण्याचे पाणी नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस कमी होतो. जवळपास ३० टक्के एसटी विद्यार्थ्यांनी शिक्षणात रस नसल्यामुळे शाळा सोडल्याचे सांगितले, १५.२ टक्के आर्थिक अडचणींमुळे तर ४ टक्के विद्यार्थ्यांनी काम करण्यासाठी शाळा सोडली.

मुफ्त शिक्षणाचा अधिकार (१४ वर्षे वयोगटापर्यंत) असूनही, माध्यमिक व उच्च शिक्षण पर्यायी व अनेकदा परवडणारे राहत नाही. आदिवासी विद्यार्थी मुख्यतः मोफत शालेय शिक्षणावर अवलंबून असतात, तर उच्च शिक्षणात देखील ५२ टक्के विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्तीवर अवलंबून असतात व फक्त १ टक्का विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेतात.

आदिवासी मुलांना शिकायचे नसते असे नाही, पण शैक्षणिक व्यवस्था त्यांना परावृत्त करते. पायाभूत सुविधांचा अभाव व खर्च परवडत नसणे याशिवाय, भाषेची अडचणही मोठी आहे. प्राथमिक स्तरावर ७३ टक्के एसटी विद्यार्थी शासकीय शाळांमध्ये शिकतात जिथे स्थानिक भाषा शिकवली जाते. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर शासकीय शाळांचे प्रमाण कमी होते व आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अनुदानित शाळा व महाविद्यालयांवर अवलंबून राहतात. खासगी शाळा व महाविद्यालये भाषेच्या अडचणीमुळे व परवडत नसल्यामुळे तपासून दूर राहतात. स्थानिक भाषेतून इंग्रजी माध्यमात संक्रमण करणे मोठे आव्हान ठरते. आपण दोन स्वतंत्र शिक्षण व्यवस्था तयार केल्या आहेत, व आदिवासी विद्यार्थी त्यामध्ये अडकले आहेत.

जेव्हा एसटी विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचतात, तेव्हा बहुतांश विद्यार्थ्यांना कला शाखेत प्रवेश मिळतो — ५५% विद्यार्थी कला शाखेत, १०% अभियांत्रिकी, ८.५% वाणिज्य व फक्त २.३५% व्यावसायिक शिक्षणात प्रवेश घेतात. या अभ्यासक्रमांमध्ये मर्यादित नोकरीची संधी असल्यामुळे निराशा वाढते. पदवी मिळाल्यानंतर नोकरीची हमी नसल्यामुळे त्यांना शेवटी त्यांच्या पालकांना शेतात मदत करावी लागते. त्यामुळे उच्च शिक्षण त्यांना चांगले भविष्य किंवा सामाजिक चढउतार देईलच असे नाही.

महाराष्ट्राने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय नावनोंदणीमध्ये सुधारणा केली असली व प्राथमिक पातळीवर लैंगिक अंतर कमी केले असले तरी, आदिवासी प्रगतीसाठी असलेले संरचनात्मक अडथळे अद्याप कायम आहेत. म्हणूनच, लक्ष केंद्रित केलेल्या पद्धतीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. आश्रम शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा यांचे विस्तार करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी निवासी वसतिगृहे निर्माण करणे आवश्यक आहे. पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम व कव्हरेज वाढवावी, व STEM क्षेत्रात विशेषतः मुलींसाठी कोटा व शुल्क माफी लागू करावी. राज्यात ४७ आदिवासी समुदाय अनुसूचित जमाती म्हणून सूचीबद्ध आहेत, जे एकसमान नाहीत. भील व गोंड हे संख्येने मोठे आहेत, तर माडिया व कोलाम हे PVTG (विशेषतः असुरक्षित आदिवासी गट) म्हणून सूचीबद्ध आहेत. त्यामुळे आदिवासी गटानुसार धोरणात्मक हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. सह्याद्री, सातपुडा, गोंडवाना व विदर्भातील दाट जंगल व डोंगराळ भागांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करणे कठीण आहे, म्हणून जिल्हा व विभागानुसार हस्तक्षेप आवश्यक आहे.

पायाभूत सुविधा विकास व आर्थिक विषमता कमी करण्याबरोबरच धोरणकर्त्यांनी आदिवासी समुदायाला शिक्षित  म्हणून नव्हे तर ज्ञानसंपन्न मानून त्यांचा इतिहास, संस्कृती व ज्ञान परंपरा अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी-माध्यमातील अभ्यासक्रम शिकवले जातात, ज्यामध्ये त्यांचा इतिहास, तोंडी परंपरा, नातेवाईक रचना, आदिवासी सण, देवता, पर्यावरण नैतिकता व स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींच्या भूमिकेचा उल्लेखच नसतो. त्यामुळे घर व शाळेतील ज्ञानात तफावत निर्माण होते व विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेतून दुरावतात. त्यांना वाटते की, त्यांची संस्कृती मागास आहे, त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान व आत्मविश्वास कमी होते.

आदिवासी भागातील अध्यापन पद्धती बदलून स्थानिक शिक्षकांची नेमणूक करावी व आदिवासी बहुल भागातील ग्रामसभेला अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती ठरविण्याचा अधिकार द्यावा.

ज्ञान विषयक न्याय देणे आवश्यक आहे, अन्यथा शैक्षणिक अंतर कमी होणार नाही. राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट २००५ व नवी शैक्षणिक धोरण २०२० स्थानिक व आदिवासी ज्ञान प्रणालींचे महत्त्व मान्य करतात, परंतु महाराष्ट्रातील अंमलबजावणी केवळ वरवरची आहे. आदिवासी ज्ञानाचा समावेश केलाच तर तो फक्त त्यांचे परंपरागत सामुहिक नृत्ये –पेहराव किंवा हस्तकला प्रकल्पात मर्यादित राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *