डॉ. संजय सुमन ग. शेंडे, नागपूर

संपूर्ण देशात राजरोसपणे लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविल्या जात आहे.संविधानिक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे.जात्यांधता, धर्मांधता व कर्मकांडे आधुनिकतेची शाल पांघरून मनामनात विष कालवत आहे.अशा निराशेच्या वातावरणात एक आशेचा किरण घेऊन येत आहे *फुले* नावाचा क्रांतीकारी चित्रपट.हे शिवधनुष्य पेलले आहे अनंत महादेवन नावाच्या दिग्दर्शकाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.जवळजवळ दीडशे वर्षाचा कालावधी होऊनही समग्र क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित सिनेमा हिंदी मध्ये काढण्याचं धाडस कुणीही केले नाही..ती छाती दाखविण्याचं महान कार्य अनंत महादेवन यांनी करून हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे.त्यांच्या हिंमतीला आणि निर्मात्यांच्या औदार्याला मानाचा सलाम करणे प्रारंभीच महत्वाचे आहे.कारणही तसेच आहे, तथागत गौतम बुद्धानंतर प्रथमच थेटपणे ब्राह्मणी वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम म.फुल्यांनी केले आहे.या अमानुष अशा विषम व्यवस्थेला निर्भयपणे आणि निडरपणे भिडणे आणि या व्यवस्थेला रचनात्मक व विधायक मार्गाने सक्षम पर्याय उभा करणे हे महान कार्य फुल्यांनी केल्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा काढण्याचे धाडस कुणीही केले नाही हे वास्तव आहे.मराठीत जेष्ठ संपादक प्र.के.अत्रे यांनी महात्मा फुल्यांवर प्रथमच मराठीत सिनेमा काढून इतिहास निर्माण केला आणि त्यानंतर निलेश जळमकर या धाडसी दिग्दर्शकाने ‘सत्यशोधक’ हा सिनेमा मराठी मध्ये काढून अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना प्रेरणा दिली हे अतिशय कौतुकास्पद आहे.गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांच्या सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर सिनेमे आले आहेत.यशस्वीही झाले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन,निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान आणि प्रतीक गांधी,पत्रलेखा व इतर सर्व कलाकार मंडळी, गीतकार, संगीतकार रोहन रोहन,छायांकन सुनिता राडिया या सर्वांनी जी मेहनत घेतली आहे त्यामुळे सिनेमाला रंगत आली आहे. सिनेमात दोन गाणी असून श्रवणीय झाली आहेत.मोनाली ठाकूर यांच्या आवाजातील साथी हे गाणं अप्रतिम आहे . सिनेमा फ्लॅशबॅक पध्दतीने सुरू होतो.प्लेग या साथीच्या रोगांवर रूग्णांवर उपचार करताना सावित्रीमाई फुले आणि डॉ यशवंत फुले यांना दाखविले आहे. त्यानंतर सिनेमा हळूहळू उलगडत जातो. प्रेक्षकांना हा सिनेमा शेवटपर्यंत जवळजवळ सव्वा दोन तास जागेवर खिळवून ठेवतो.सर्वत्र देशभर जमीन बंजर(पडीक) झाली असताना समतेची बीजं पेरणारा हा सिनेमा प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन बघावा आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीत आपला खारीचा वाटा उचलावा अशी कळकळीची विनंती आहे.
या चित्रपटाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जोतीराव , सावित्रीमाई व फातिमा शेख या त्रयींना अनेक प्रसंगांमध्ये इंग्रजी भाषेतून संवाद करताना दाखवून दिग्दर्शकाने मास्टरस्ट्रोक लगावला आहे.इंग्रज अधिकारी व त्यांची पत्नी शाळेला भेट द्यायला आल्यावर झालेला संवाद,इंग्रज अधिकारी कॅन्डी यांनी घरी बोलविल्यावर मोठ्या खुबीने त्यांच्या धार्मिक प्रलोभनाला बळी न पडता लेबर पुरवठा करण्याचे कंत्राट मिळवणे याप्रसंगी झालेला संवाद, पुरोहितांना न बोलावता सत्यशोधक पद्धतीने अनेक लग्न लावल्यामुळे भटजींच्या वंशपरंपरागत व्यवसायांवर गदा आली अशी तक्रार दाखल केल्यामुळे कोर्टामध्ये जोतीराव यांनी हजरजबाबीपणा दाखवून दिलेले सडेतोड प्रत्युत्तर याप्रसंगीचे आणि भारतातील जातीव्यवस्थेमुळे बहुसंख्य समाजावर होणारे अन्याय यांचे वास्तववादी चित्रण, नेमकेपणाने इंग्रजी भाषेतून आलेले संवाद तसेच जोतीराव यांच्या जीवनात थाॅमस पेन, अब्राहम लिंकन,यांसारख्या व्यक्तीमत्वाचा झालेला खोलवर परिणाम सिनेमाला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यात नक्कीच मदत करेल किंबहुना आस्कर व तत्सम अनेक जागतिक पातळीवरील पुरस्कार या चित्रपटाला मिळू शकतात एवढी वैचारिक गुणवत्ता व उंची या चित्रपटाची नक्कीच आहे. महात्मा जोतीराव फुले यांचे व्यक्तिमत्त्व एक उद्योजक, प्रगतशील शेतकरी आणि समाज क्रांतीकारक या रूपात ताकदीने सादर करून नवीन पैलू समोर आणला आहे.या चित्रपटाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्यं असं आहे की,हा चित्रपट केवळ जोतीराव फुले यांचाच नाही तर सावित्रीमाई आणि फातिमा शेख यांच्या जीवनावर आधारित आहे किंबहुना काकणभर अधिकच भर या दोघींवर ठेऊन स्त्री- पुरुष समानतेचा खराखुरा आदर्श प्रत्येक फ्रेम मधून उलगडून दाखवून दिग्दर्शकाने करूणाशील प्रज्ञेची साक्ष पटवून दिली आहे, हा आनंददायी अनुभव आहे.सावित्रीमाईने अस्पृश्य व सर्वच मुलींना शिकवू नये म्हणून त्रास देणाऱ्या माणसाच्या थोबाडीत सणसणीत लगावण्याचा प्रसंग सिनेमॅटिक लिबर्टीचा उत्तम नमुना आहे.या संपूर्ण चित्रपटात सावित्रीमाई व फातिमा शेख या कणखर आणि रणरागिणी सारख्या एक पाऊल पुढे जाऊन जोतीराव फुले यांना साथ देतात हे बघणं सुखावह आहे.उस्मान शेख, फातिमा शेख,मुक्ता साळवे, बालपणीचे मित्र सखाराम परांजपे,केशव भवाळकर आणि पुढे विष्णू भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, विष्णूपंत थत्ते, डॉ विश्राम घोले, नारायण मेधाजी लोखंडे, वस्ताद लहूजी साळवे,तुकाराम तात्या पडवळ, कृष्णाजी भालेकर,त्यांचा मुलगा डॉ यशवंत फुले ही सर्व जाती धर्मातील मंडळी जोतीराव यांच्या समतेच्या लढ्यात निस्वार्थ भावनेने साथ देत होती हे लक्षणीय चित्रण या चित्रपटात आहे. मुंबई येथील कोळीवाडा सभागृहात दिनांक ११ मे,१८८८ रोजी आयोजित सत्कार सोहळ्यात सयाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने आणि संपूर्ण सत्यशोधक कामगार मंडळींच्या वतीने जोतीराव फुले यांचा सत्कार *’महात्मा’* ही मानाची पदवी देऊन घडवून आणतात त्यावेळी या सर्व सत्यशोधकांचे मनस्वी आभार मानून कृतार्थ झालो ही भावना म.फुले व्यक्त करतात हा प्रसंग श्रोत्यांच्या अंगावर शहारा आणणारा आहे.नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या जातात.*खरोखर महात्मा जोतीराव फुले हे मायबाप आहेत..मायबाप हे मायबापच असतात अशा उत्तुंग माणसावर सिनेमा काढून फार मोठं काम दिग्दर्शकाने व त्यांच्या टीमने करून आशावादच संपत चाललेल्या देशात *’फुले’ सिनेमाच्या रूपानं एक नवीन आशादायी पर्याय उभा केला आहे.चित्रपटात अनेक प्रसंग आहेत त्यामध्ये सावित्रीमाई व फातिमा शेख यांच्यावर सनातनी मंडळी शेणगोट्याचा मारा करतात,त्यावर जोतीराव सावित्रीमाईंना धीर देत बघूया किती दिवस ही माणसं त्रास देतात आणि सोबतीला एक आणखी लुगडं घेऊन जात जा असा सल्ला देतात. सावित्रीमाईला मुलं होत नाही म्हणून गोविंदराव फुले जेव्हा जोतीराव यांना दुसऱ्या लग्नाची गळ घालतात तेव्हा कमतरता माझ्यामध्येही असू शकते मग तुम्ही सावित्रीमाईला दुसऱ्या लग्नाची परवानगी द्याल का असा खडा सवाल वडिलांना करून निरूत्तर करतात.काशीबाई या ब्राह्मण विधवेला घरी आणून तिचे स्वतः बाळंतपण करून,तिच्या बाळाला दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवणे,त्याला डॉक्टर करणे,त्याला संपत्तीचा वारस करणे आणि तोही सावित्रीमाईसोबत प्लेगच्या रूग्णांवर उपचार करतो हे सर्व स्वप्नवत वाटतं तथापि हे सत्य आपल्या जीवंत अभिनयातून प्रतीक गांधी,पत्रलेखा,दर्शिल सफारी, अक्षया गुरव, जयेश मोरे,विनय पाठक या कलाकारांना प्रत्यक्षात बघण्याचा अनुभव मनाला उभारी देणारा आहे. ब्राह्मण बालविधवांसाठी आश्रम उघडून त्यांना अघोरी आणि अमानवीय असलेल्या केशवपन करण्याच्या जाचातून सुटका करणे त्यासाठी नाव्ह्यांचा संप घडवून त्यांचे मनपरिवर्तन करणे हा प्रसंग आताच्या मुलींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.वस्ताद लहूजी साळवे यांचेही मनपरिवर्तन करणारा प्रसंग प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा आहे.धोडूंजी कुंभार व इतर मंडळी जोतीराव फुले यांच्यावर हल्ला करतानाचा प्रसंग आणि त्यानंतर ते शस्त्र खाली ठेवून सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहभागी होतात.मुक्ता साळवे हीचा “महार मांगाच्या दु:खाविषयी लिहिलेल्या निबंधाला” पुरस्कार देतानाचा प्रसंग चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे.मुक्ता साळवे इंग्रज अधिकाऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देवून एवढ्या कमी वयात आपल्या बुद्धीची चुणूक दाखविते.मुक्ताने जातीव्यवस्थेच्या जाचाविरूद्ध केलेले चिकित्सक विश्लेषण प्रत्येकाला विचारप्रवण करायला लावणारे आहे.फातिमा शेखलाही धर्मांध मंडळी शिक्षण देण्याचे काम पाप असल्याचे सांगतात त्यावेळी कुराणातले दाखले देवून त्यांना गप्प करणारी फातिमा व तिच्या डोळ्यातील वेदना प्रत्यक्ष चित्रपटांतूनच बघण्यासारखी आहे. *”सार्वजनिक सत्यधर्म” हा ग्रंथ जोतीराव यांनी अर्धांगवायूचा झटका आल्यावर लिहिला.शेतकरी, कष्टकरी,कामगार असलेल्या समाजाप्रती असलेली प्रचंड तळमळ,करूणा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती यातूनच प्रचंड वेदना सहन करूनही डाव्या हाताने लिहून हा ग्रंथ पूर्ण केला.सत्यशोधक समाजाचे हे संविधान अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे.प्रश्न केवळ हाच आहे की हे वाचायचं कुणी ? जेव्हा वाचायची परवानगी नव्हती तेव्हा कारणे होती.आता कुणी हात बांधलेले आहेत?घाणेरड्या पाण्यात डुबकी मारण्यासाठी,खुळचट काल्पनिक कर्मकांडे करण्यासाठी ओबीसींजवळ भरपूर वेळ आणि पैसा आहे.स्वत:च्या शरीरावर असलेल्या मेंदूचा उपयोग न केल्यामुळे हा शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग आजही नागवल्या जात आहे यामुळे बौद्धिक गुंडगिरी करणाऱ्यांचे चांगलेच फावते आहे. शेवटी जोतीराव फुले यांचे निर्वाण झाल्यानंतर महात्मा फुलेंच्या चितेला अग्नी देतानाच प्रसंग सावित्रीमाईच्या कणखर आणि निडर भूमिकेची साक्ष देणारा आहे.म्हणूनच काळाच्या हजारो वर्षे पुढं चालणारं हे दांपत्य खरोखरच विचारवंत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म.फुल्यांना आपले मार्गदर्शक मानून फुल्यांच्या विचारांना गतिमान करून आम्हा सर्वांपर्यंत पोहोचविले.त्यामुळेच अनेक संशोधकांनी फुले दांपत्यावर पुस्तके,नाटके, भारूड,मालिका,वेब सिरीज, एकांकिका,कविता, काव्यसंग्रह, सिनेमे,गाणे,पोवाडे आदिंच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधणारे,त्यांच्यावर पोवाडा लिहिणारे फुले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ग्रंथ लिहिणारे फुले, कामगारांसाठी आंदोलन करणारे फुले या चित्रपटात दिसून येत नाही.काही प्रसंगी अनेक उणीवा आहेत.महात्मा फुल्यांना बेदम मारहाण करतांनाचा प्रसंग अतिरंजितपणे चित्रपटात दाखविला आहे. सावित्रीमाईंच्या तोंडी शूद्र या शब्दाऐवजी दलित हा शब्द आकलना पलीकडचा आहे.महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमे येऊ शकतात..बस ये तो सिर्फ शुरूवात है.. प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा कुटुंबासह बघावा ही विनंती.शेवटी महात्मा जोतीराव फुले यांचा संवाद प्रभावीपणे आजच्या दाहक वास्तवाची जाणीव करून देतो त्या संवादानेच सांगता करूयात *हमारा देश एक भावुक देश है, यहां धर्म और जाति के नाम पर लोगों को लड़ाना बड़ा ही सरल है,यह भविष्य में भी होगा* आता आपण ठरवायचं,आपण काय स्वीकारायचं… *धुन लागी रे ….आझादीकी …*