–डॉ. संजय सु. ग. शेंडे, (नागपूर)

पेशवाई समाप्तीचा तह 1817-1818 साली होतो. 1827 साली म. फुले यांचा जन्म होतो. पुढे सावित्रीमाईचा जन्म 3 जानेवारी, 1831 ला सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी होतो. कालांतराने 1840 साली जोतीराव फुले यांच्यासोबत सावित्रीमाईच्या विवाह होतो आणि सावित्रीमाईच्या जीवनात 1841 साली ज्ञानपर्व सुरू होते. ही घटना शेतकरी कष्टकरी असलेल्या अठरा पगड जाती-पोटजातीत विभागलेल्या समस्त अलुतेदार बलुतेदार समाजासाठी क्रांतीकारकच म्हणावी लागेल. याच ज्ञानाच्या प्रकाशाने आज हजारो लाखो उपेक्षित वंचित मागासलेल्या समुहातून मुलं-मुली उच्चशिक्षण घेऊन जग पादाक्रांत करीत आहेत. निर्णय प्रक्रियेत हवा तसा सहभाग महिलांचा नसला तरी स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर स्त्रियांनी आपला आवाज मात्र बुलंद केला आहे. स्त्री-पुरुष समानता पूर्णतः अस्तित्वात आली नसली तरी तशी मानसिकता हळूहळू का होईना जोर घेत आहे. अनेक सामाजिक-सांस्कृतिक संघटनांकडून स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला जात आहे. स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श असलेल्या सावित्री जोतिबांच्या कार्याचा हा परिपाक आहे हे अतिशय महत्वाचे आहे. 175 वर्षापूर्वी सर्वसमान्यांना स्त्रीशिक्षण, शोषित- वंचित -दलितांना शिक्षण ही बाब दुरापास्त असतांना कर्तेसुधारक सावित्री जोतिबानी ही समतेची पेरणी केली, वखरणी नांगरणी केली, मशागत करून खतपाणी दिले. मायेने जवळ घेऊन या समुहांत स्वाभिमानाची प्राणप्रतिष्ठा केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, प्रेम, करुणा ही मानवी मूल्य रूजविली. जात-पात-धर्म-भाषा-लिंग हा भेदाभेद संपवून ’माणूस’ म्हणून त्यांच्यात स्फुलिंग चेतविले त्यामुळेच हा शेतकरी-कष्टकरी कामगार वर्ग स्वाभिमानी जीवन जगण्यास अंशतः होईना प्रवृत्त होत आहे. भौतिक लाभ या वर्गास मोठया प्रमाणात झालेला आहे. तथापि बौद्धिक व मानसिकदुष्ट्या कर्मविपाकाच्या थोतांडामुळे आजही तो कुपोषित आहे. याचे शल्य सर्वच विवेकी माणसांना आहे हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे अशी परिस्थिती सध्या आहे. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही लादण्याचा अमानवीय प्रयत्न भारतात तसाच जगभरात होतो आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुतेची फळ आता कुठे चाखायला मिळत असताना द्वेषाची, विषमतेची शेती करणारे या सर्वहारा समाजाचे मेंदू कलम करण्यात यशस्वी होतांना दिसताहेत हे अत्यंत धोकादायक आहे. अशा आधुनिक पेशवाईच्या काळात पुन्हा एकदा सावित्रीमाई फुले यांची प्रकर्षाने आठवण होणे स्वाभाविकच आहे स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या, भारतीय स्त्रीच्या उत्थानासाठी कार्य करणारी 19 व्या शतकातील एकमेव युगप्रवर्तक, पहिली स्त्री अशी अनेक विशेषण कमी पडतील अशी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची ओळख आपणा सर्वांना आहे. त्यांच्या कार्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात आढावा घेणे आजच्या प्रसंगी क्रमप्राप्त आहे.
पूर्णवेळ वेतन न घेणा-या शिक्षिका : 1 जानेवारी, 1848 साली पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाडयात
म. फुल्यांनी पहिली मुलींची शाळा काढून शिक्षकाचे नवेयुग निर्माण केले. भारतीय व्यक्तींनी भारतीय मुर्लीसाठी काढलेली पहिली शाळा असून ’सावित्रीमाई’ हया भारतातील पहिल्या भारतीय शिक्षिका होत. 1848 ते 1852 या दरम्यान एकूण 18 शाळा फुले दांपत्याने उघडून या देशात नवीन इतिहास निर्माण केला. आजच्या पोटार्थी शिक्षण सम्राटांनी शिक्षणाच्या बाजार मांडला असताना सावित्रीमाईयांनी पूर्णवेळ वेतन न घेऊन शेतकरी, कष्टकरी, कामगार, उपेक्षित बंचितासाठी तसेच सर्वच वर्गातील मुलींसाठी ज्ञानदानाचे कार्य केले याला इतिहासात तोड नाही. प्रत्येक शाळा काढतांना अनेक अडचणी, आर्थिक चणचण कमालीची प्रतिकूल परिस्थिती असूनही हे दांपत्य कदापि डगमगले नाही. अधिक जोमाने, अधिक आनंदाने हे कार्य अविरत करीत राहिले यातूनच सावित्रीमाईची एकनिष्ठा, सचोटी, प्रमाणिकपणा आणि स्वतःवर असलेला प्रबळ विश्वास दिसून येतो. स्वतः प्राप्त केलेले ज्ञान इतरास दयावे एवढा साधा अर्थ आजही आमच्यातील तथाकथित पंडितांना झाला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. ज्ञान वाटल्याने कमी होणार नाही परंतु जाणीवपूर्वक बहुजनांना ज्ञान दयावयाचे नाही हे आजही षडयंत्र रचल्या जात आहे. सरकारी शाळा बंद करून खासगी भांडवलदारांना सरेआम विकल्या जात आहे. कौशल्य शिक्षणाच्या नावावर जातीव्यवस्था मजबूत केल्या जात आहे. फुले दांपत्याच्या या अथक प्रयत्नांमुळे प्रथमच मागास प्रवर्गाना शिक्षणाची संधी मिळाली. आज 175 वर्षानंतरही बहुसंख्य असतांना शेतकरी-कष्टकरी सर्वहारा समाज ज्ञानसत्ता हस्तगत करू शकला नाही हे वास्तव आहे. फुले दांपत्याने ’शिक्षिका’ तयार करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जे ’नार्मल स्कूल’ काढले त्यामधून प्रशिक्षित झालेल्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका व विदयार्थीनी म्हणजे ’फातिमा शेख’ होतं. सावित्रिमाईंनी स्वतःच्या अनुभवावर आधारित शिक्षणविषयी जी भूमिका घेतली त्यानुसार ज्या परिस्थितीतून मुली अगर मुले येतात त्याचा परिणाम संबंधित मुलांच्या शिक्षणाबर होत असतो. सामाजिक परिस्थितीचा विचार करणा-या सावित्रीमाई शिक्षणतज्ञ, तत्ववेत्या होत्या हे यावरून दिसून येते.
जीवनात स्वानंद स्त्री पुरुष समानतेचा खरा आदर्श फुले दांपत्याने कृतीने दाखवून दिला. साधनशुचिता, पवित्र, सहअस्तित्वाची भावना, एकमेकांवर असलेला प्रचंड विश्वास, आदर-सन्मान-प्रतिष्ठा, प्रेम, जिव्हाळा, ओलावा या सर्व गुणांनी ओत प्रोत भरलेले हे दांपत्य आदर्श सहजीवनाचा आपल्याला वस्तुपाठच शिकवितात. अलीकडच्या काळात स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीचा दोन्ही बाजूने होत असलेला गैरवापर घटस्फोटाचे कारण ठरत आहे. सामंजस्य शहाणपणा, जबाबदारीचे भान, आस्था, करूणा याचा लवलेशही मुला-मुर्लीच्या सहजीवनात फारसा नसल्याने अनेक लहान- सहान गोष्टीसाठी भांडणे, वितंडवाद होतात. प्रत्येकाचा वृथा अभिमान यास कारणीभूत आहे हे रात्रंदिवस चंगळवादाच्या आहारी गेलेल्या अलीकडील पिढींना समजावून सांगणे कठीण होत चालले आहे. यासाठी सावित्रीमाईच्या ’संसाराची वाट’ या अभंगातील ओळी प्रासंगिक आहेत त्या म्हणतात,
’माझ्या जीवनात । जोतिबा स्वानंद ।। जैसा मकरंद । कळीतला ।। ऐसा भाग्यवंत । असेल तुजला । नसे आनंदाला पारावार ।।
’मन करारे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण’ या तुकोबारायाच्या विचाराशी साधर्म्य सांगणा-या सावित्रीमाई सर्वहारा समाजाला ’आदर्श संसार’ कसा करावा याचा धडाच गिरवितात ही प्रचंड अभिमानाची बाब होय. फुले दांपत्याला मुलं बाळ नसतानाही म. फुल्यांनी कधीही सावित्रीमाईना दुखावलं नाही उलट सावित्रीबाईनी जोतिरावांना अपत्य होण्यासाठी दुस-या लग्नाचा विचार करावा असा आग्रह केल्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारे जोतिराव सावित्रीमाईना तू का करत नाहीस दुसरे लग्न? असा प्रश्न करून निरूत्तरीत करतात. मुलं होण्यासाठी आणि न होण्यासाठी स्त्रीच नाही तर पुरुषही जबाबदार असू शकतो याचे भान दोघांनाही होते, हे खरेतर अलीकडील भोंदूबाबांच्या आहारी गेलेल्या कागदी पदव्या घेतलेल्यांना कधी समजेल हा प्रश्नच आहे. र.धो. कर्त्यांसारख्या समाजस्वास्थ्यकारांनी लैंगिक शिक्षण यासारख्या विषयांवर प्रचंड काम करूनही हा कर्मठ समाज सत्यापासून पळ काढतो. व्रतवैकल्ये, उपास-तापास, दैववाद, कर्मविपाकामुळे तो अजूनही नागवला जात आहे हे जगद गुरू तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे ’ऐसे नवसायासे पुत्र होती, का करणे लागे पती’, याच आशयाच्या ’नवस करिती। बकरू मारीन, नवस फेडीन। बाळजन्मी।।’ पंक्ती लिहून परखड सवाल करतात,
’गुलामगिरीचे दुःख नाही, जराही त्यास जाणवत नाही, माणुसकीही समजत नाही, तयास मानव म्हणावे का?
बहुसंख्य असलेल्या मागास प्रवर्गाला शरीर जरी त्याचे असले तरी त्यांचा मेंदू विषमतावादी व्यवस्थेने कलम केलेला आहे. तो जीवंत असूनही मेला आहे. अज्ञानी असलेल्या या समाजाला स्वातंत्र्याची भिती वाटते. गुलामगिरीत अडकलेला हा समाज स्वतःच्या मेंदूने केव्हा विचार करेल हा सावित्रीमाईना पडलेला प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. बहुजन असलेल्या या सर्वहारा समाजाची शारीरिक वाढ जरी झाली असली तरी मानसिक व बौध्दिक वाढ म्हणावी तशी झालेली नाही. शरीराच्या एकाच अंगाची वाढ झाल्यास त्यास ’बांडगूळ’ म्हणतात तसेच काहीसे या समाजाचे झाले आहे याचे शल्य सावित्रीमाईना असल्यानेच त्या अत्यंत पोटतिडकीने प्रश्न विचारतात अशा लोकांना मानव म्हणावे का? याचा अर्थ हा समाज वाचा असूनही मुका का? धडधाकट शरीर असूनही स्वतःचे हित याला का समजत नाही? असे एक ना अनेक प्रश्न आजही प्रासंगिक आहे हीच सावित्रीमाईची दूरदृष्टी आपल्याला पदोपदी निदर्शनास येते.
सम्यक आचरण हेच सावित्रीमाईचे जीवन :पेशवाई संपल्यानंतरही पुनर्विवाहबंदी असल्यामुळे पुणे भागात विधवांची त्यातही बालविधवांची संख्या वाढली होती. भृणहत्या होण्याचे प्रकार कमी करण्यासाठी, बालकाश्रम चालविण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. खिस्ती लोक काही प्रमाणात याबाबतीत प्रयत्न करीत असत. तथापि ज्याप्रमाणे फुले दांपत्याने मराठी लोकांसाठी, मुलींसाठी व शुद्रातिशूद्रांसाठी शाळा काढल्या, त्याचप्रमाणे बालकाश्रम व प्रसुतिगृह इ.स. 1864 पासून स्वतः चालविले. सगुणाबाईच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीमाई बालसंगोपनाच्या व तत्सम कार्यात अग्रेसर राहिल्या. बालविधवा असलेल्या काशीबाई या ब्राम्हणकन्येस स्वतःच्या घरी ठेऊन, तिची प्रसूती करून, तिच्या बाळास स्वतःचे नाव देणारे फुले दांपत्य आजही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत. सावित्रीमाईच्या उदार व सहिष्णु स्वभावामुळे काशीबाईस वैधव्य निराश्रितपणा कधीही जाणवला नाही सावित्रीबाईंनी यशवंताचा सांभाळ पोटच्या मुलाप्रमाणे करून जी माया दिली. त्याला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले. त्यामुळेच त्या केवळ यशवंताच्याच ’आई’ नाही तर सर्वांच्याच ’सावित्रीमाई’ आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे. बालकाश्रम व विधवाश्रम चालविणे अत्यंत जिकिरीचे काम असून टिका-टिप्पणीही आनंदाने स्वीकारणे हे काम फुले दांम्पत्याने तन-मन-धनाने स्वीकारले. परमानंद लिहितात उच्चवर्णीय विधवा स्त्रिया ज्या आडमार्गाने गेल्या त्याच्या भूतदयेने, मातृवात्सल्याने, जिवाभावाने सांभाळ सावित्रीमाईनी केला. बालहत्येसारख्या गुन्ह्ययापासून त्यांनी कितीतरी भगिनींची सुटका घडवून आणली आहे. हा केवढा त्याग बरे? फुले दांपत्याचे हे कार्य प्रचंड करूणेचे मूर्तीमंत उदाहरण होय. 10 जुलै 1887 रोजी जोतीरावांनी मृत्यूपश्चात यशवंताला इस्टेटीचा मालक नेमले. त्याने त्या पश्चात कसे वागावे यासंबंधी
मार्गदर्शन करून ठेवले. यशवंत त्या वेळी केवळ 13 वर्षांचा होत. यशवंताने फुले दांपत्याच्या इच्छेप्रमाणे समाजसेवेचा हा वारसा अखंड चालू ठेवण्याचे मनोमन स्वीकारल्यामुळे जोतीराव प्रचंड आनंदी होते. आजारी असूनही 1888 मध्ये म. फुल्यांनी ’सार्वजनिक सत्यधर्म’ या बहुजनांना पर्याय उपलब्ध करून देणा-या ग्रंथाची निर्मिती केली. पुढे 4 फेब्रुवारी, 1889 ला यशवंत आणि लक्ष्मी यांचा विवाह जोतीराव सावित्रीच्या साक्षीने झाला. फुले दांपत्याच्या गृहस्थी जीवनातील हाच एक शेवटचा मंगलप्रसंग होय. यशवंत याला दत्तक घेऊन फुले दांपत्य आनंदी होते. ’याची देही, याची डोळा’ त्याचे लग्न फुल्यांनी लावले. कालांतराने 1890 मध्ये म. फुले यांचे निर्वाण झाले. अत्यंत खडतर परिस्थितीत 1893 मध्ये यशवंत मॅट्रीक पास झाला. पुढे डॉक्टर झाला सावित्रीमाईच्या सोबत प्लेगची साथ आली असताना यशवंता सतत सोबत होता. आईसोबत समाजसेवेचे हे अखंड व्रत यशवंत कृतीने सिध्द करीत होता. सावित्रीमाईला प्लेगची साथ ही संसर्गजन्य असल्याचे माहीत असूनही हे माय-लेक रुग्णांची सेवा करण्यात मग्न होते. या दोघांनाही जीवाची पर्वा नव्हती. प्रचंड अशी करुणा, आस्था, प्रेम, जीव्हाळा या दोघांच्या जीवनाची फलश्रुती होती. यातच 1897 साली 10 मार्चला सावित्रीमाईरुग्णाची सेवा करता करता मृत्यू पावल्या प्रचंड करूणेचा अखंड प्रवाह या सृष्टीतून कायमचा थांबला होता. डॉ. यशवंतासह अनेक मुलं-मुली ख-या अर्थाने पोरके झाले होते. आजही सावित्री जोतीरावांमध्ये असलेली करूणा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण जागृत करते. मानवी मनाची श्रेष्ठ अवस्था म्हणजे करुणा होय. हा माझा हा परका अशी संकुचित भूमिका या दोघांनी कधीही घेतली नाही. त्या दोघांचेही मन स्वच्छ, नितळ आणि निरभ्र झाले होते त्यामुळेच ’एकमय’ समाजाशिवाय राष्ट्र निर्माण करता येत नाही हे म. फुल्यांनी ओळखले होते. जातीच्या आधारावर राष्ट्र उभे राहू शकत नाही. जातीव्यवस्थाच याला कारणीभूत आहे हे त्यांनी ठासून सांगितले. जात-पात, धर्म, भाषा, लिंगभेद याच्या पलीकडे जाऊन केवळ आणि केवळ ’माणूस’ म्हणून व्यक्तिमत्व घडविणे हाच फुले दांपत्याच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा होता. त्यामुळेच ते म्हणतात,
‘ख्रिस्त महंमद, मांग ब्राह्मणाशी ।। धरावे पोटाशी बंधुपरी ।।‘
या अखंडामध्ये म. फुल्यांनी वैश्विक माणूस’ ही संकल्पना पुढे आणली आहे. मानवधर्माची कास धरूनच मनुष्य ’जातीमुक्त’ होऊ शकतो हे चिरकाल टिकणारे तत्त्वज्ञान म. फुल्यांनी मांडले आहे. आज भारतातील अनेक मुलं-मुली युरोप, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी प्रगत देशात उच्च शिक्षणासाठी गेले आहेत, जात आहेत. या देशांमध्ये ख्रिश्चन धर्म मोठया प्रमाणात आहे. सौदी अरब, दुबई, संयुक्त अरब अमिरात ह्या मुस्लिम बहुल देशातही उद्योगधंदा व कामासाठी अनेक भारतीय जात आहेत. तेव्हा कुठे यांचा धर्म आड येत नाही. केवळ बहुजन बांधवांना भूलथापा देऊन, जात-धर्माच्या नावावर भेद निर्माण करणा-या विषम प्रवृत्ती स्वतः मात्र ह्या जागतिक भाषा असलेल्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून देश-विदेशात अनेक कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदावर आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. यासाठी सावित्रीमाई फुले म्हणतात,
‘।। विद्येविना गेले वाया गेले पशु, स्वस्थ नका बसु विद्या घेणे शूद्ध अतिशूद्र दुःख निवाराया इंग्रजी शिकाया संधी आली इंग्रजी शिकूनी जातीभेद मोडा भटजी भारूडा फेकुनिया।।.
यावरून आपल्या लक्षात येईल की, भाषेवर प्रभुत्व मिळवून, वैश्विकमाणूस बनण्याकरिता स्वतःच्या अंतर्मनातील ’जात’ नष्ट करणे क्रमप्राप्त आहे. हाच संदेश सावित्रीमाई फुलेंनी दिलेला आहे. आज जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाच्या युगात हा वैश्विकमानवतेचा संदेश प्रत्येक शेतकरी-कष्टकरी बहुसंख्याकांनी कृतीत आणून म. फुले, सावित्रीमाई असत्या तर त्यांनी आज काय सांगितले असते, हा विचार करून इंग्रजीबरोबरच फ्रेंच, स्पॅनीश, जापनीज, जर्मन, इटालियन व इतर तत्सम भाषा आणि मराठीबरोबरच हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, बंगाली भाषा व तत्सम भाषा शिकाव्यात त्यासाठी कठोर परिश्रम करावेत तसेच संगणकीय डिजीटल भाषा म्हणून कृत्रीम बुद्धिमत्ता, डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, पायथन आदि संगणकीय भाषा प्रयत्नपूर्वक शिकणे गरजेचे आहे. तरच या दांपत्यांना आपण ख-या अर्थाने स्वीकारले असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. माणूस प्रचंड मोठा झाला. भौतिक गरजा पूर्ण झाल्यात. प्रचंड पैशाचा महापूर असल्याने श्रीमंत ही झाला. उच्चशिक्षण घेऊन ज्ञानी झाला. तथापि फुले दांपत्यासारखी करूणा नसल्याने तो डबक्यातच राहत आहे. डबक्याला विश्व समजणारे स्वतः कमावलेले ज्ञान इतरांना देतील काय? हा प्रश्न कायमच अनुत्तरीत आहे.
आजच्या चंगळवादी समाजात चारित्र्य, सचोटी, नैतिकता आचरणात आणणारे दुर्मिळ होत चालले असतांना सावित्रीमाईचा आदर्श आम्ही घेणार आहोत काय? याचे उत्तर आम्हालाच शोधावे लागेल. तरच म. फुले, सावित्रीमाई फुले यांचे नाव घेण्याचा आम्हाला नैतिक अधिकार राहील. 77 वर्षात जे जे संविधानाचे लाभार्थी आहेत त्या त्या सर्वांनी लोकशाही टिकविण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता ही मानवी मूल्य रूजविण्यासाठी फुले दांपत्यांमध्ये असलेली करूणा, आस्था अंगीकारावी ही आग्रहाची विनंती..
शेवटी सावित्रीमाईच्या कवितेतील ओळीने सांगता करूयात. त्या म्हणतात-
‘उठा बंधुनो अति शूद्रांनो, जागे होऊनी उठा परंपरेची गुलामगिरी ही, तोडणेसाठी उठा बंधूनो शिकणेसाठी उठा‘