Menu

‘हा देश बहुसंख्यांच्या मर्जीने चालेल’

-सयाजी वाघमारे, ज्येष्ठ रिपब्लिकन दलित पँथर नेता, समाजभूषण

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. शेखर यादव यांनी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अल्पसंख्यांक विरोधात कथीतपणे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. न्यायाधीश यादव म्हणाले की, ‘हा देश भारतात राहणा-या बहुसंख्यांकाच्या मर्जीने चालेल हे सांगण्यात आपल्याला कोणताही संकोच वाटत नाही. हा कायदा आहे. तुम्ही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतानाही असे कसे म्हणू शकता? असे तुम्ही मला सांगू शकत नाही.

वास्तवात, कायदा हा बहुसंख्यांकाच्या इच्छेनुसार चालतो. कुटुंब किंवा समाजाचे पहा, ज्यात बहुसंख्यांकाचे कल्याण आणि आनंद असतो तेच स्वीकारले जाते. हिंदूंनी अस्पृश्यता, सती आणि जोहार सारख्या प्रथा बंद केल्या असताना, मुस्लिमांनी बहुपत्नीत्वाची प्रथा का ठेवली आहे, हे अस्वीकारणे आहे, असे ते म्हणाले. न्यायाधीश महाराज रविवारी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमां मध्ये कथीत वादग्रस्त टीप्पण्यांची दखल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली. यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडून त्यांच्या भाषणाचे तपशील मागवले आहेत. असे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान न्यायाधीश यांनी काही वादग्रस्त टिप्पणी केली असेल तर त्यात आपल्याला काही गैर वाटत नाही अशी प्रतिक्रिया विहीपचे प्रमुख आलोक कुमार यांनी मंगळवारी दिली. न्यायमूर्ती यादव यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी वकील आणि ‘कॅम्पेन फॉर ज्यूडीशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म या संस्थेचे संयोजक प्रशांत भूषण यांनी मंगळवारी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना पत्र लिहून, न्यायाधीश शेखर कुमार यादव यांची अंतर्गत चौकशी करण्याची मागणी केली. ह्या घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहे. प्रशांत भूषण यांच्याप्रमाणेच माकपच्या नेत्या वृंदा करात यांनीही सरन्यायाधीशांना पत्र लिहून या प्रकरणाची दखल घ्यावी म्हणून मागणी केली आहे. न्यायाधीश यादव यांचे भाषण त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेचे उल्लंघन करणारे आहे. अशा व्यक्तींना न्यायालयात कोणतीही जागा असता कामा नये असे त्यांनी म्हटले आहे. न्यायाधीश शंकर कुमार यादव यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी विरोधी इंडीया आघाडीच्या घटक पक्षाच्या राज्यसभेमधील सदस्य तयारी करीत आहेत. विहिंपने आयोजित कार्यक्रम व न्यायाधीश महाराजांचे वक्तव्य म्हणजे निव्वळ योगायोग.

यासर्व पार्श्वभूमीवर परभणी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागले. बंदचं आवाहन करत असंख्य युवक रस्त्यावर आल्यानंतर शहरातल्या मध्यवर्ती भागात तणाव निर्माण झाला. शहरातील काही दुकाने व वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसेसवरही दगडफेक केली. दुपारी जिल्हाधिका-यांनी जमावबंदीचा आदेश दिल्यानंतर परिस्थिती निवळली. संविधान प्रतिकृतीचा अवमान झाला म्हणून जमावाने हिंसक होण्यापेक्षा प्रत्यक्ष संविधानाची पायमल्ली होत आहे, त्याविरोधात शांतपणे आणि संघटीत प्रतिकार करणे गरजेचे आहे.मी सर्व वाचकांना विनंती करतो की, मी लिहीत असलेल्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया, सूचना आणि व्यक्त होणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे संघटीत प्रतिकार उभा करणे, शक्य होईल.

Comments 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *