-प्रा.श्रीरंजन आवटे, प्रख्यात कवी व लेखक
दि. 23 नाेव्हेंबर 2024 राेजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल झाला आणि एकच हलकल्लोळ झाला. हा जनादेश खरा आहे की खोटा, यावर मोठे वाद सुरु झाले आहेत. हा निकाल बनावट आहे, त्यात घोटाळा आहे, असे म्हणणारे महायुतीचे, भाजपचे समर्थक मी पाहिले आहेत तर हा जनादेश खरा असू शकतो, असं सांगणा-या महाविकासच्या समर्थकांशीही मी बोललो आहे. हा जनादेश घोटाळा असेल तर ते काळजीचं कारण आहे; मात्र हा जनादेश खरा असेल तर ते त्याहून अधिक काळजीचं कारण आहे. मुद्दा पक्षांचा नाही, नेत्यांचा नाही. अगदी आघाड्यांचाही नाही. मुद्दा आहे तो संविधानाचा, लोकशाहीचा, वैधानिक प्रक्रियेचा आणि मुख्य म्हणजे या प्रक्रियेत केंद्रबिंदू असलेल्या माणसाचा, मतदाराचा, नागरिकाचा. हा जनादेश महाघोटाळा आहे, असं बहुसंख्य लोक म्हणत आहेत, असं दिसतं. याचा अर्थ बारा कोटींच्या महाराष्ट्र निवडणुकीची प्रक्रिया ही सामान्य जनते च्या कौलाला वळसा घालून पार पाडली जाऊ शकते. याचा अर्थच हा लोकशाहीच्या अपहरणाचा प्रकार आहे. लोकशाहीचा देखावा करुन तिला पोकळ करण्याचे हे भयंकर कारस्थान आहे.

हा जनादेश खरा असेल तर ते त्याहून अधिक चिंतेची गोष्ट आहे कारण याचा अर्थ शिंदेची सेना ही खरी शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे. मुद्दा शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या अंतर्गत वादाचा नाही तर त्याला जनतेने दिलेल्या मान्यतेचा आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्व आमदारांना पात्र ठरवले. निवडणूक आयोगाने गद्दारांनाच पक्षाचे मूळ चीन्ह दिले आणि सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय न देता लोकशाहीला चूड लावण्याचा प्रयत्न केला. हा जनादेश खरा असेल तर या सा-या लबाड्यांवर जनतेने मोहोर उमटवली आहे, त्याला राजमान्यता दिली आहे, असा अर्थ होतो. जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाला दिलेली ती मंजुरी आहे. ही अधिक गंभीर बाब आहे. हे लोकशाही चे अपहरण नव्हे; तर तो तिच्या आत्म्यावरच प्राणघातक हल्ला आहे. सरसकट सर्व स्त्रियांना ‘लाडकी बहीण’ योजना नावा खाली दिलेले पैसे हे लाचखोरीचे अधिकृत रूप होते. प्रचंड प्रमाणात पाण्यासारखा पैशाचा वर्षाव करुन माणसांचं सर्व इमान हिरावून घेता येतं, असाही त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हा जनादेश खरा असेल तर महाराष्ट्रात धर्म नावाची जर काही गोष्ट असेल तर तिचे पूर्णतः अधःपतन झाले आहे, असे म्हणावे लागेल. या दोन्हींपैकी कोणतीही एक शक्यता असली तरी त्या तून एका अराजकाच्या नांदीला आमंत्रण दिले गेले आहे, हे नक्की. कॉंग्रेसने हरियाणा राज्याच्या विधानसभा निकाला नंतर हा जनादेश मान्य नसल्याचे अधिकृतपणे म्हटले होते .या आधी अनेकदा शंका-कुशंका व्यक्त केल्या असल्या तरी प्रमुख विरोधी पक्षाने अधिकृतपणे जनादेश नाकारण्याची ही पहिलीच घटना होती. महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या आधी जनतेने या निकालावर प्रश्नचीन्ह उपस्थित केले. त्या जनरेट्यामुळे विरोधी पक्षही बोलू लागले. त्यावर आपली भूमिका मांडू लागले.
हा जनादेश नसेल तर ‘अधिमान्यतेचे संकट आहे आणि हाच जनादेश असेल तर ‘संवैधानिक नैतिकतेचे संकट ओढवले आहे ! यापैकी कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल, हे माहित नाही; पण लोकशाही व्यवस्था आणि संविधानाची पायाभूत रचना पूर्णपणे गलितगात्र होत असताना आपण प्रजा होणार की नागरिक, हा मूलभूत सवाल आहे. प्रजेकडून नागरिक व्हायचं म्हणजे स्वतःचा श्वास शोधणं. त्यासाठी बोलता यायला हवं. ‘बोल की लब आजाद है’, एवढं म्हणून थांबता येणार नाही. त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची गरज आहे. डॉ. राम मनोहर लोहियांच्या भाषेत सांगायचं तर ‘जिंदा कौमे पांच साल का इंतजार नहीं करती!
हे वाक्य समजून आपण कृतीप्रवण झालोत तर दोन्हीं पैकी कोणतंही संकट असलं तरी आपण त्यावर सामूहिक समंज सपणाच्या आधारे उत्तर शोधू शकतो. अन्यथा लोकशाहीच्या मरणाची वार्ता कोणतीही ‘ब्रेकन्यूज’ म्हणून न उमटता शांतपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकते. हे होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे हीच संविधान मानणा-या प्रत्येकाची जबाबदारी आहे. संविधानकर्त्यांनी तुमच्या माझ्या वतीने शपथपत्र घेतलं होतं २६ नोव्हेंबर १९४९ रोजी. त्याचा हा जेंटल रिमाईंडर आहे.