–एल. अविनाश ( सामाजिक कार्यकर्ता )
विधानसभेच्या निवडणुकीत जे काही घडले किंबहुना जे काही घडत होते, त्या दरम्यान आयोगाच्या आणि सरकारी तंत्राचे मूकदर्शक बनून तमाशा बघणे ही लोकशाहीची थट्टा नव्हे तर काय आहे? लोकसभेचे मतदान झाल्यानंतर अवघ्या ३ महिन्यात लोकांचे मत परिवर्तन होऊन विरोधी पक्ष कधी नव्हता एव्हढा रसातळाला जाणे हे अनाकलनीयच. सामान्य जनमानस आलेला निकाल बघून जेव्हा बुचकळ्यात पडले आहे. लोकशाहीची हत्या ही थट्टा नव्हे तर काय?. हे न कळण्याइतका फक्त अंधभक्तच असू शकतो. पुरोगामी महाराष्ट्रात ही एक नवीन जमात उदयास आलेली आहे.
व्हॉटएप यूनिवर्सिटीच्या माध्यमातून कॉंग्रेस प्रति जन-मानसात वाईट भावना, द्वेष, चीड निर्माण करण्याचा पगारी आय टी सेलचा वर्षानुवर्ष चाललेला प्रयास फलित झाला, आणी एक अंधभक्त जमात उदयास आली. खोटा इतिहास ( खरा इतिहास तोड़-मरोड़ करून ) कॉंग्रेस पक्षाला खलनायक ठरविण्यास मिळालेली सफलता हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे, किंबहुना खोटे जनमानसात बिंबवलं जाऊच शकत नाही किंवा काहीच फरक पडत नाही हे गृहीत धरून दुर्लक्ष करण्याचा कॉंग्रेसचा अहंकार, निर्ढावलेले लोकनेते आणि जनमानसाला गृहीत धरण्याचा मुजोरपणा या देशव्यापी पक्षाचे पानिपत करण्यास कारणीभूत ठरला आहे.हे माझे वैयक्तीक मत आहे.
बीजेपीकडे गमाविण्यासाठी काहीच नव्हते, पण कॉंग्रेसकडे राखण्यासाठी बरेच काही होते, आणि हाच फरक आजची परस्थिती निर्माण करण्यासाठी पूरक आहे. ज्यांच्या पूर्वजांचा कुटील, कुत्सित कारस्थाने आणि साम, दाम, दंड, भेद या उक्तीनुसार वागण्याचा इतिहास आहे त्यांनी अनेक दशके अथक प्रयत्नांनंतर हे मिळविलेले यश आहे, ते इतक्या सहजी सोडणार काय? गाफिल राहणे, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेऊन आत्मघात करून घेणे हा भारतीय राज्यकर्ते-सत्ताधारी यांचा इतिहास राहिला आहे, उगाच इंग्रज शेकडो वर्ष राज्य करून नाही गेले, आणि त्यांना सोबत साथ देणारी जमात भारतात राहिली आहेच. विधानसभेच्या निर्मित्याने पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक होण्याचे भूत जिवंत झाले आहे? निश्चितच हॅक करता येत नसले तरी घोटाळा करता येऊ शकतो हे सॉफ्टवेअर शिकणारा नवखाही सांगू शकेल. प्रोग्रामिंग (टाइमिंग आणि लूप) आणि वायरस (हा ही प्रोग्रामच असतो, जो प्रणालीच्या विरोधात काम करतो), VVPAT याला ही कमांडच दिल्या जाते ना. त्यामुळेच मतदानाच्या आकडेवारीत फरक ठीकठीकाणी सांगीतले जात आहे. इथे मला न्याय-प्रणालीच्या हस्तक्षेपाची गरज भासते, पण यावर मी भाष्य करण्या इतपत सक्षम नाही. या सगळ्या घटना घडत असताना, डोळे बंद करून सगळे बरोबर आहेच हे सांगणे म्हणजे निव्वळ लोकशाहीशी प्रतारणा नव्हे काय? मग यावरही उपाय काय? पक्ष याविरोधात आरडाओरडा करतील, पण ते निरर्थक ठरणार आहे. कारण सगळ्या वैधानिक संस्था राज्यकर्त्याच्या हातात आहे, किंबहुना जे दिसतय ते तर हेच दर्शविते. मग हा लढा जन-माणसाने आपल्या हातात घेतल्या खेरीज लोकशाही वाचणे कठीणच आहे? असहकार, बहीष्कार अशा संवैधानिक पद्धतीने हा लढा जनतेच्या पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी लढणे ही काळाची गरज आहे!