ब्राह्मणवादी धर्माच्या चाैकटीत संविधानाला बांधण्याचे प्रयत्न 2014 पासून जाेमाने सुरु आहेत. हे सरकारच्या व त्यांना मदत करणा-या संघटनेच्या विचारातून व कृतीतून अगदी स्पष्ट झाले आहे. हिंदुधर्म, सनातन धर्म, गीता, मनुस्मृती ह्यांवर आधारित घटना असावी असे पर्याय सुचविले जातात. ह्या सर्व पर्यायाचा अर्थ एकच आहे; व ताे म्हणजे ब्राम्हणवाद. ब्राम्हणवादी धर्माचे निश्चित असे धार्मिक आणि सामाजिक तत्वज्ञान आहे. ही धार्मिक विचारसरणी असे मानते की, ‘वेद’ ग्रंथ हे अपाैरुषेय व पवित्र आहेत, प्रश्ना पलीकडील आहेत. ते चिरंतन व चिरकाल आहेत. ब्राह्मणवाद मानताे की, ईेशराने या भाैतिक व मानवी जगाची निर्मिती केली आहे. वैदिक यज्ञ आणि धार्मिक विधी-कर्मकांडांचे पालन केल्याने मानवाचा उद्धार हाेताे. वैदिक ब्राह्मणवाद मृत्युनंतरचे जीवन व पुनर्जन्म यावर विेशास ठेवताे. पुनर्जन्म हा कर्मावर अवलंबून आहे. माणसाचे वर्तमानातील जीवन हे मागच्या जन्मातील कर्मावर अवलंबून आहे, तसेच पुढच्या जन्मातील जीवन हे वर्तमान काळातील कर्मावर ठरते. परंतु वर्तमान काळात बदल अशक्य आहे. वर्तमान काळात जातीनुसार वागणे हाच याेग्य मार्ग आहे. जाे शाश्वत ब्राह्मणवाद आहे ताे यज्ञात प्राण्यांची बळी देणे व विविध कर्मकांड करणे यावर विश्वाश ठेवताे.

सामाजिक व्यवस्थेबाबतीत जाती व्यवस्था ही वैदिकवादाची आदर्श समाजव्यवस्था आहे, जी ईश्वराने निर्माण केली आहे. समाज हा चार वर्णामध्ये विभागला आहे जाे असमानतेवर आधारित आहे. त्यातील प्रत्येक जातीचा व्यवसाय हा जन्माने निर्धारित आहे. एक जात इतर जातीचा व्यवसाय करू शकत नाही, या चार वर्णांमध्ये सामाजिक समता नाही. शुद्र, महिला व वर्णव्यवस्थे बाहेरील वर्ग जाे अस्पृश्य आहे, यांना शिक्षणाचे अधिकार नाहीत. या तथाकथित आदर्श समाजात बहुसंख्य निम्न जातींना आर्थिक, सामाजिक व धार्मिक अधिकार नाकारले आहेत व ब्राह्मणांना अपार विशेषाधिकार दिले आहेत.
या धार्मिक आणि सामाजिक तत्वज्ञानाचा हेतू उच्च जातींचा आर्थिक फायदा, सत्ता व समाजातील उच्च स्थान मिळविणे आहे. ऋग्वेदापासून उत्पत्ती पावलेली हिंदूंची सामाजिक संस्था सर्वच ब्राह्मणी धर्मग्रंथामध्ये नमूद केलेली आहे, ज्यामध्ये चार वेद, गीता, मनुस्मृती, इतर स्मृती, पुराणे, उपनिषद, रामायण आणि महाभारत यांचा समावेश हाेताे. थाेडक्यात ब्राम्हणवाद तर्क व अनुभवावर आधारित नाही. ताे वेदामध्ये दिलेल्या ज्ञानावर आधारित आहे. सामाजिक व्यवस्था वेदांमध्ये नमूद केल्याप्रमाणे जातींवर आधारित आहे.
प्रचलित घटनेला विराेध करण्याचे कारण म्हणजे घटनेमधील सर्व तत्वे ही ब्राम्हणवादाच्या विराेधी आहेत. घटना धर्मनिरपेक्षता, लाेकशाही, समाजवाद व लाेकप्रमाणीत राज्याची संकल्पना मान्य करते. परंतु ब्राम्हणवाद, एका धर्माच्या विचारावर आधारित राज्य, एक पक्षीय राज्य व खाजगी मालमत्ता ह्यावर आधारित आहे. ब्राम्हणवाद हिंसेला मान्यता देताे. सामाजिक व्यवस्थेच्या बाबतीत ब्राम्हणवाद हा असमानतेवर आधारित जातीव्यवस्था मानताे. स्वातंत्र्यावर बंधन आणणे व बंधुभावाला नाकारणे, जाती-जातीमध्ये कलह व द्वेषाची भावना जागृत करताे. ह्याविरुद्ध समानता, स्वातंत्र्य व बंधुभाव हे घटनेचे उद्दिष्ट आहेत. अहिंसेच्या
मार्गाने ही उद्दिष्ट पूर्ण करण्याचे घटना मान्य करते. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राम्हणवाद हे उच्च जातीचे आर्थिक कल्याण करण्याचे तत्वज्ञान आहे. आर्थिक फायद्याबराेबर (Economic Gain ), सत्ता (Political Power), व उच्च सामाजिक दर्जा
(High Social Status) सुरक्षित करण्याची तरतूद करते. भारतीय घटना ही समानतेच्या तत्वावर आधारित असल्यामुळे व उच्च जातीचे विशेष अधिकार काढून घेतल्या मुळे उच्च जाती हे प्रचलित घटना वगळून ब्राम्हणवादावर आधारित घटना बनविण्याचे आटाेकाट प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये उच्च जातींकडे आर्थिक, राजकीय व सामाजिक सत्ता राहावी हे एकमेव उद्दिष्ट आहे. ब्राम्हणवादी आर्थिक, राजकीय व सामाजिक व्यवस्था उच्च जातीतील विशेष अधिकार देऊन, तेच अधिकार दलित, आदिवासी व अन्य जमातीला नाकारते. वाढते खाजगीकरण हा ह्या धाेरणाचा भाग आहे. तसेच खाजगीकरणामुळे आरक्षणाचे संकुचीकरण हा सुद्धा ह्या धाेरणाच्या भाग आहे. दलित, आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चनावर वाढते अत्याचार हा वाढत्या ब्राम्हणवादाचा परिणाम आहे. अध्यक्षीय पद्धतीचे सरकार ( Presidential form of Government ) एक निवडणूक व एक राष्ट्र हे सुद्धा बहुसंख्य असलेल्या धार्मिक सांप्रदायाचा फायदा सत्ता काबीज करण्यासाठीच पुढे मांडला आहे. अशा विविध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गाने राज्याचा आधार ब्राम्हणवादी विचारसरणी घडवीत आहे. त्यावर निवडणुकीमध्ये जनतेने विचार करणे गरजेचे आहे.
-डॉ. गौतम कांबळे