Menu

२४० कोटी पॅकेजचा प्रस्तावही धूळखात

नागपूर : वर्धा नदीवरील दिंडोडा बॅरेज प्रकल्पाचे मंजुरीच्या २५ वर्षांनंतर २०१७ साली काम सुरू झाले. मात्र, या प्रकल्पासाठी २५ वर्षांपूर्वी भूसंपादन करून त्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नव्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा विभागात मुख्य अभियंत्याच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे मार्गदर्शक विलास भोंगाडे यांनी सांगितले, या प्रकल्पासाठी वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ११०० शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन १९९३ ते १९९९ या काळात करण्यात आले व तेव्हाच्या दरानुसार मोबदला देण्यात आला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे प्रकल्पाचे काम मात्र २०१७ साली सुरू झाले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी २०१३ सालच्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देण्यात यावा, यासाठी आंदोलन सुरू झाले. ४०० कोटींचा प्रकल्प १५०० कोटींवर गेला असताना शेतकऱ्यांना मात्र जुन्याच दराने मोबदला दिला जात असल्याने दिंडोडा प्रकल्पावर २०२३ साली बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तिन्ही जिल्ह्यांच्या प्रकल्पग्रस्तांसाठी २४० कोटी रुपयांचे पॅकेज तयार केले होते. हा प्रस्ताव पुढे नागपूरचे मुख्य अभियंता, पाटबंधारे विभागाचे संचालक यांच्याकडून सचिवांकडे पोहोचला. प्रकल्पग्रस्तांनी या काळात तीनदा सचिवांशी भेट घेतली. पुढे २०२४ साली मुंबईत वरोरा, वणी, हिंगणघाट व राळेगाव या क्षेत्रातील आमदार, मुख्यमंत्र्यांचे सचिव व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. प्रस्ताव आठ दिवसांत मंजूर करण्याचा शब्द यावेळी मिळाला; पण पुढे काहीच झाले नाही.

त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी चुल्हा जलाओ व तीनदा जेलभरो आंदोलन केले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन झाले. मार्च महिन्यात भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनीही आठवडाभरात निर्णय घेण्याचा शब्द प्रकल्पग्रस्तांना दिला. मात्र, चार महिने लोटूनही हे आश्वासनही फोल ठरल्याने जलसंपदा विभागात आंदोलन करण्यात आले. यापुढे ३० जूनला नागपुरात मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा आंदोलकांनी केली. यावेळी पुंडलिक तिजारे, अभिजित मांडेकर, जयंत लडके, मिथुन ठाकरे, कैलास ठाकरे, किशोर वानखेडे, मनीषा लडके, मनोज कोसुरकर, राजू भोयर, संजय देव्हाडे, देवराव सपाटे, संजय मेश्राम आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *