Menu

हिंदु समाजाचा धर्म कोणता?

जनता मधील डॉ. बाबासाहेबांच्या संपादकीय अग्रलेख २३ जानेवारी १९३२ सद्याच्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्यास अत्यंत उपयोगी आहे. हिंदू समाजाचा धर्म कोणता हिंदू धर्म की ब्राम्हणी धर्म या प्रश्नांची उकल करतो.

हिंदु समाजाचा धर्म कोणता?

‘जनते’तून ‘ब्राह्मणी धर्म’, ‘ब्राह्मणी संस्कृती’ अगर ‘ब्राह्मणीझम’ हे शब्दप्रयोग वारंवार वापरण्यात येतात. ‘हिंदु धर्म’ हा शब्दप्रयोग आम्ही मुद्दाम उपयोगात आणीत नाही. कारण ‘हिंदुधर्म’ हा शब्द चुकीचा व अयथार्थ आहे. हिंदूंच्या प्रचलीत अगर रूढ धर्माचे खरे व यथार्थ नाव ‘ब्राह्मणी धर्म’ हेच आहे. ‘सनातन धर्म’ ‘वैदिक धर्म’ अगर ‘हिंदु धर्म’ यापैकी एकही नाव खरे अगर सार्थ नाही. खरे नाव कोणाला कळू नये व त्याच्यावर अचूक हल्ला करता येऊ नये म्हणून ‘सनातन धर्म’ ‘वैदिक धर्म’ वगैरे मोठमोठ्या नावाच्या बुरख्याखाली ‘ब्राह्मणी धर्मा’ला सुरक्षितपणे झांकून ठेवण्यात आले आहे. मोठमोठ्या सुधारकांना व जातपात-तोडकांनाही हे रहस्य सहसा कळत नाही; व ज्या कांही थोड्या लोकांना ते कळते ते लोक ‘ब्राह्मणी धर्म’ हा शब्द आपल्या लिहिण्या-बोलण्यातून वापरण्याचे टाळतात. हे सुधारक व जातपाततोडक बहुधा ब्राह्मण जातीतील असतात. ‘ब्राह्मणी धर्म’ हा शब्द वापरल्यास फक्त ब्राह्मण जातीवरच सर्व दोषांचे व जबाबदारीचे खापर फुटते अशी त्यांना भीती वाटते.

असे होणे त्यांना बरे वाटत नाही. हिंदु समाजाचा ‘धर्म’ जर वाईट असेल अगर त्यात कांही दोष असतील तर त्या दोषांबद्दल एकट्या ब्राह्मणांनाच जबाबदार न धरतां त्या दोषांचे वाटेकरी इतर जातींच्या लोकांनाही करावे अशी त्यांची स्वाभाविक इच्छा असते; व म्हणून ते ‘हिंदु धर्म’ वगैरे व्यापक पण चुकीचे शब्दप्रयोग उपयोगात आणतात. बॅ. सावरकरासारखे जातपाततोडक देखील ‘ब्राह्मणी धर्म’ अगर ‘ब्राह्मणीझम’ हा शब्द यामुळेच चुकून सुद्धा वापरीत नाहीत. कलकत्त्याचे आचार्य पी. सी. रॉय, मद्रासचे डॉ. वरदराजलू नायडू वगैरे कांही हिंदु पुढारी मात्र ‘हिंदु धर्म’ अगर ‘हिंदुझम’ असे न म्हणता ‘ब्राह्मणी झम’ अगर ‘ब्राह्मणी धर्म’ असा स्पष्ट शब्दप्रयोग करतात; आणि तोच यथार्थ शब्द आहे. श्री. नायडू अगर सर पी. सी. रॉय हे जातीने ब्राह्मण नाहीत ही गोष्ट येथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. नागपूरचे सर हरिसिंग गौर यांचा ‘हिंदुस्थान रिव्ह्यू’ नावाच्या मासिक पुस्तकात निरनिराळ्या धर्माच्या अधःपातावर एक लेख आला आहे. त्यांनी देखील हिंदु समाजाच्या प्रचलीत अगर रूढ धर्माचा उल्लेख करतांना ‘हिंदुधर्म’ असे लटकेच नाव धारण करणाऱ्या हिंदुस्थानातील ब्राह्मणी धर्माला शेवटचा श्वास लागला आहे’ (In India, Brahmanism Masquerading as Hinduism is already in its last gasp.) हे वाक्य लिहून त्यात त्यांनी ‘ब्राह्मणीझम’ असा स्पष्ट शब्द वापरला आहे आणि ‘हिंदुझम’

हा शब्दप्रयोग अर्थहीन, बनावट व भ्रामक आहे असे त्यांनी ध्वनित केले आहे. हिंदुस्थानातील हिंदु लोकांचा धर्म हा खरोखर ‘ब्राह्मणी धर्म’ आहे. जातिभेद व अस्पृश्यता ही हिंदूच्या या ब्राह्मणी धर्माची दोन प्रमुख लक्षणे आहेत. अस्पृश्यता ही जातिभेदाची आत्यंतिक अवस्था अगर शेवटची पायरी आहे. म्हणून ब्राह्मणी धर्म नष्ट केल्याशिवाय जातिभेद नष्ट होणार नाही व जातिभेद म्हणजेच तज्जन्य उच्चनीच भाव व आचार विचार मुद्दाम नष्ट केल्याशिवाय हिंदू समाजात आज ज्या प्रकारची अस्पृश्यता व शिवाशिवीची अमंगल व दुष्ट भावना वावरत आहे ती अस्पृश्यतेची भावनाही समूळ नष्ट होणार नाही. ब्राह्मणीधर्म, जातिभेद व अस्पृश्यता हे परस्परावलंबी असे एक त्रांगडे आहे. हिंदूंच्या प्रचलीत धर्मरूपी विषवृक्षाचे ब्राह्मण्य हे मूळ, जातिभेद या फाद्या व अस्पृश्यता ही फुले फळे आहेत. म्हणून या पापत्रयांतून हिंदुसमाजाची जर कायमची मुक्तता करावयाची असेल तर हे ‘त्रांगडे’ आधी नीट ओळखले पाहिजे व त्यांचा परस्पर संबंध जाणला पाहिजे. औषधोपचार करण्यापूर्वी रोगाचे निदान बरोबर झाले पाहिजे आणि त्याचे नावही बरोबर समजले पाहिजे. हिंदु समाजाला जडलेला हा ब्राह्मणी धर्माचा रोग इतका सूक्ष्म व लबाड आहे की त्याचे नीटसे निदान आधी सहसा कोणाला होत नाही व त्याचे खरे नावही कोणाला समजत नाही. त्यामुळे बहुतेक धर्म व समाज सुधारक ही पुराणमतवादा (Orthodoxy) ची सर्वसाधारण व मामुली व्यथा आहे असे समजून उपाययोजना करतात. कांही जहाल सुधारकांच्या समजुतीची मजल ‘जातीभेद’ हा रोग आहे इतके समजण्यापर्यंत येऊन पोहचते. पण ही समजूत अपुरी आहे. जातिभेद हा रोग नसून ते केवळ रोगाचे एक स्पष्ट व ठळक दिसणारे लक्षण आहे. ब्राह्मणीधर्म हाच हिंदु समाजाला जडलेला मूळ महारोग आहे. हे ओळखून जर उपाय योजना झाली तरच मागेपुढे या दुर्दैवी हिंदु समाजाचा तरणोपाय होण्याची आशा आहे. ‘ब्राह्मणी धर्म’ म्हटला की त्याच्या पापपुण्याची खरी व मूळ जबाबदारी ब्राह्मण जातीवर येते ही गोष्ट खरी आहे. तसे झाले म्हणजे ब्राह्मणजातीय सुधारकांना व जातपात-तोडकांना खंत वाटावी ही गोष्टही अगदी स्वाभाविक आहे. पण या गोष्टीला इलाज काय? वस्तुस्थिती आहे ही अशी आहे. हिंदु समाजाच्या प्रचलीत धर्माचे चालक उर्फ वर्णगुरू ब्राह्मण हेच आहेत. इतर जातीचे हिंदु लोक हे केवळ त्यांचे अनुयायी व हस्तक आहेत. राजकीय क्षेत्रांत हिंदुस्थानावर ‘ब्रिटिश इंपिरिया-लिझम’ची सत्ता आहे व ब्रिटिश मुत्सद्यांच्या तंत्राने हिंदुस्थानचा राजकारभार चालतो ही गोष्ट आज जितकी खरी आहे त्या पेक्षाही हिंदूंवर ब्राह्मणीझमची सत्ता आहे व ब्राह्मण शास्त्री पंडितांच्या न्याय निर्णयावर त्यांच्या धर्माचा कारभार चाललेला आहे ही गोष्ट किती तरी पटीने अधिक खरी व यथार्थ आहे. इंग्रज अधिकाऱ्यांपेक्षा पुष्कळ वेळा ‘नेटिव्ह’ अधिकारी अधिक कडक व जाचक असतो; ब्राह्मण जातीच्या माणसांपेक्षाही इतर जातींची हिंदु माणसे अधिक कर्मठ व ‘ब्राह्मण्यग्रस्त’ असू शकतात. पण या गोष्टीमुळे हिंदुस्थानावर इंग्रजांचे राज्य नाही अगर हिंदुसमाजावर ब्राह्मणी धर्माचा पगडा नाही असे कोणालाच म्हणता यावयाचे नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ‘हिंदु’ हा शब्द धर्मवाचक न समजता तो समाजवाचक समजला पाहिजे. ‘हिंदुधर्म’ असे न म्हणता ‘हिंदु समाज’ असे म्हटले पाहिजे. त्याचप्रमाणे बहुजन हिंदु समाज आज ज्या धर्माचे पालन करीत आहे तो धर्म सनातन नाही; तो वैदिकही नाही तर तो केवळ ‘ब्राह्मणी धर्म’ आहे व त्याचे हे खरे नाव ‘सनातन’ ‘वैदिक’ ‘हिंदू’ वगैरे जुन्या नव्या शब्दांच्या पांघरुणाखाली दडपून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जुने शास्त्री पंडित व नवे सुधारक- विशेषतः ब्राह्मण जातीय सुधारक कळत नकळत करून राहिले आहेत. या ब्राह्मणी धर्माला ‘सनातनी’ धर्म म्हणणे सनातनी शब्दांत जे कांही पावित्र्य व गांभिर्य असेल त्याचा धडधडीत उपमर्द करणे होय. आणि वेदातील उच्च तत्त्वांना आणि श्रेष्ठ सिद्धांताना या ब्राह्मणी धर्मसंस्कृतीने कलंकित करण्याचा जितका पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे तितका अन्य कोणत्याही मानव संस्कृतीने केलेला नाही. हिंदु समाजाचे हित व्हावे; हिंदी राष्ट्राची प्रगती व्हावी; अस्पृश्यतारूपी पापाचे निर्मूलन व्हावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी हिंदु समाजाला अडलेल्या या रोगाचे नाव ‘ब्राह्मणी धर्म’ आहे असे स्वतः आधी जाणले पाहिजे आणि ‘आप्त स्वकीयांशी कसे युद्ध करू ?’ असा स्वतःला पडलेला व्यामोह अर्जुनाने शेवटी जसा सोडला तसा तो सुधारकांनी- विशेषतः ब्राह्मण जातीय सुधारकांनी व देशभक्तांनी सोडला पाहिजे. यातच शेवटी त्यांचे, त्यांच्या जातीचे, हिंदु समाजाचे व हिंदी राष्ट्राचे खरे व टिकाऊ हित आहे.