प्रा. ख्रिस्तोफी जॅफरलॉट हे राजकीय घडामोडीचे व इंडोलॉजीचे विशेषज्ञ आहेत. ते भारतीय राजनीती व समाजशास्त्र
या विषयात किंग्ज इंडिया इन्स्टीट्युट (लंडन) येथे कार्यरत आहे.
सनातन धर्माला सुरुवात आणि अंत नाही. असे ब्राह्मणवादी मानतात. सनातन धर्म ही संज्ञा जरी फार जुनी असेल परंतु त्याचा प्रचार करणारी “सनातन धर्म संस्था सभा” ही तितकी पौराणिक नाही. सनातन धर्म सभा हि १९ व्या शतकात परंपरावादांनी आर्य समाजाला उत्तर म्हणून स्थापन केली होती. आर्यसमाजवादी हे सामाजिक सुधारणावादी होते. सामाजिक सुधारणेचा भाग म्हणून लोकांना जनगणनेत “हिंदू” म्हणून नोंदणी करू नये असा सल्ला देत होते. आर्य समाज संस्थेनी “दलित शुद्धीकरण” मोहीम राबविली होती. त्यांच्या दृष्टीने सनातन धर्माचे उपग्रंथ हे अन्यायकारी जातीचे संरक्षक होते.
आपल्याला असे दिसते की, आधुनिक सनातन विचारसरणीचे पहिले शिल्पकार दिन दयालू होते. त्यांनी १८८७ मध्ये हरिद्वार येथे उत्तर भारतामध्ये असलेल्या अनेक धार्मिक संघटनांना एकत्र आणून “भारत धर्म महामंडळ” हे महामंडळ स्थापन केले. त्या महामंडळाचे नाव “गौ वर्णाश्रम हितैशिनी गंगा धर्म सभा” असे ठेवण्यात आले. ह्या नावातच एक कृतिकार्यक्रम होता. तो म्हणजे गाय, वर्णाश्रम पद्धती आणि गंगा यांच्या हितासाठी काम करणारी धार्मिक संघटना. ह्या संघटनेनी वर्णव्यवस्थेची पुर्नःस्थापना केली. त्यांनी सामाजिक समतेची आवश्यक मानली नाही आणि जातीय उतरंडीवर विश्वास व्यक्त केला. भारत धर्म महामंडळाच्या पहिल्या सभेसाठी त्यांनी ‘शुद्र’ आणि ‘दलितांना’ सोडून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच आमंत्रित केले होते.

सनातनवाद्यांनी धार्मिक शिक्षणाला प्राधान्य दिले. १८९९ मध्ये दिन दयालू यांनी दिल्लीत एक महाविद्यालय स्थापन केले. पुढे त्यांचे जवळचे मित्र पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा बनारसमध्ये एक महाविद्यालय स्थापन केले ते म्हणजे आजचे ‘बनारस हिंदू विद्यापीठ’ होय.
सनातनवाद्यांची विचारधारा, जी परंपरावादी आणि प्रतिगामी होती, ती समजून घेण्यासाठी आपल्याला मदन मोहन मालवीय पासून सुरुवात करावी लागेल. मदन मोहन मालवीय यांनी उत्तर भारतामध्ये आग्रा व औन्ध येथे अनेक धार्मिक संस्था स्थापन केल्या होत्या. त्यात ‘हिंदू समाज’ व इतर पुरातन सनातनवादी संघटनेचाही समावेश होतो. अलाहाबादच्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या मदन मोहन मालवीय यांनी ‘मुईर कॉलेज’मध्ये आधुनिक शिक्षण घेतले आणि कालांतराने ते पत्रकार व वकील झाले. पुढे ते अलाहाबाद नगरपरिषदेत निवडून आले आाणि नंतर प्रांतीय विधान परिषदेत त्यांची निवड झाली. पंडित मदन मोहन मालवीय हे एक कट्टर ‘सनातनी ब्राह्मण’ होते, जे ब्राह्मण नसलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून अन्न स्वीकारत नसत.
१९०६ च्या हिंदू सभेचा अधिवेशनात मालवीय यांनी हिंदू विद्यापीठाचा एक प्रकल्प तयार केला, जो पुढे बनारस हिंदू विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध झाले. विद्यापीठ स्थापनेवेळी करण्यात आलेला ठराव हा विद्यापीठाची उद्धीष्टे स्पष्ट करतो. त्यामध्ये सुरुवातीला असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय समाजाला उतरती कळा लागलेली आहे आणि त्याचे प्रमुख कारण हे भारतीय परंपरा व वर्णव्यवस्थेतील उतरती कळा आहे. “मदन मोहन मालवीयची वैदिक धर्माच्या वंशपरंपरागत संकल्पनेवर आधारित सामाजिक व्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था पुर्नःस्थापित करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सामाजिक समृद्धीसाठी मानव समाजाची विविध कार्य वेगवेगळ्या जातींना सोपविणे व ते करणे हे त्यांचे कर्तव्य आहे व त्यातच संपूर्ण समाजाचे हित आहे असे त्या उद्धिष्टामध्ये नमूद केलेले आहे.” तसेच विविध कुटुंबांनी त्यांचे ‘कुलधर्म’ म्हणून नेमून दिलेली कार्ये संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडली पाहिजे, व समाजाचा एक घटक अवयव म्हणून सेवा केली पाहिजे, हि त्याची मांडणी होती.”
ऋग्वेद मधील पुरुषसुत्त १०.९० मध्ये वर्णन केलेल्या जातीव्यवस्थेचा त्यांनी पुरस्कार केला, जिथे ब्राम्हणांची उत्पती देवाच्या डोक्यामधून तर शुद्रांची पायामधून झाली आहे. सर्वात जुन्या ऋग्वेद ह्या वैदिक ग्रंथातील पुरुषसुत्तात वर्णन केलेल्या वर्णव्यवस्थेला पुर्नःस्थापित करण्याच्या बाजूने मालवीय यांनी युक्तिवाद केला. ह्यावरून असे स्पष्ट होते की, ते सनातनी व पुराणमतवादीच होते.
बनारस हिंदू विद्यापिठाच्या पहिल्या प्रकल्पावर १९०४ मध्ये बनारसच्या महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. जमीनदार संघटनेचे नेतृत्व करणारे सुखवीर सिन्हा आणि कुर्री सिधीलीचे राजा रामपाल सिंग अशा लोकांनी मालवीय यांना जागा शोधण्यात व निधी गोळा करण्यासाठी मदत केली. सुखवीर सिन्हा व रामपाल सिंग हे सामाजिक सुधारणांच्या विरोधात होते. दलितांची “शुद्धी” करण्याच्या चळवळीला ज्याप्रकारे आर्य समाजवादी यांनी प्रोत्साहन दिले त्यासाठी यांची नाराजी होती. आर्यसमाजाने समोर आणलेला ‘शुद्धी’ चा कृत्रिम मुद्दा हा सनातन समाजव्यवस्थेतील धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते ‘सनातन समाजव्यवस्था’ म्हणजे शाश्वत ‘मनुचा नियम’ आहे, म्हणून त्याचे अक्षरश: पालन करणे बंधनकारक आहे.
ह्या काळात उत्तर प्रदेश हे सनातनवादी संघटनेचे मुख्य केन्द्र होते आणि जातीवर आधारित समाजव्यवस्थेचे रक्षण हे त्यांचे मुख्य उदिष्ट होते. तथापि इतर प्रदेशामध्ये सुद्धा सनातनवादी हे सामाजिक सुधारणेच्या विरोधात होते. उदाहरणार्थ बॉम्बे प्रेसिडेंसीमध्ये, १९ व्या शतकाच्या शेवटी, सार्वजनिक पटलावर विवाहाचे संमती वय ह्यावर कायदा करण्याच्या मुद्यांवर बरीच चर्चा झाली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह अनेक सुधारक यांचा या कायद्याला पाठींबा होता. परंतु सनातनवादी विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा असा विश्वास होता की बालविवाह हि महत्वाची प्रथा आहे ज्याचा केवळ सवर्ण नाहीत तर शुद्र सुद्धा पालन करत होते.
बनारस हिंदू विद्यापीठ सुरू झाल्यानंतर लगेचच १९२२ मध्ये हिंदू महासभा पुन्हा कार्यान्वित करण्यात मदन मोहन मालवीय यांचा मोलाचा वाटा होता. पुढे पुणे कराराचा वेळी महात्मा गांधींनी जातीय निवाडाविरोधात जे आमरण उपोषण केले होते त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वाटाघाटी करतेवेळी मालवीय यांनी सनातनी हिंदूंचे प्रतिनिधित्व केले.
पुढे दिनदयालू यांचे चिरंजीव मुरली चंद्र शर्मा हे जनसंघाचे अध्यक्ष बनले. पंडित मदन मोहन मालवीय यांना पुढे २०१४ ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला.