‘एक देश एक निवडणूक’ हे बिल आणि असे अनेक बिलं आहेत जे संघप्रणित भाजपला आणायची आहेत. या बिलाचं वैशिष्ट्रय हे आहे की, ही बिलंवरवर पाहता व्यवहारी भासू शकतील, परंतु त्यामध्ये संघाचा अजेंडा दडलेला आहे. Bunch of thoughts मध्ये याचे निर्देश आढळतील.

विविधता असलेल्या देशात सर्व जनतेला एक छत्री अंमलाखाली आणायचा अजेंडा आहे, थोडक्यात त्यांना मनुस्मृतीचा अंमल इथं आणायचा आहे, जेणे करून राज्यसत्तेच्या मार्गातून सामाजिक सत्ता यांना प्रस्थापित करायची आहे. वर्णव्यवस्था आणि मनुस्मृती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे बिल दोन-तृतीयांश बहुमताशिवाय पास होऊ शकत नाही आणि त्यांच्याकडे तेवढे बहुमत नाही हे माहीत असूनही त्यांनी हे बिल कां आणले? यामागे त्यांचा हेतू स्पष्ट आहे की, अशी बिल Onboard आणून जनतेला विशिष्ट विषयांमध्ये गुंतवून त्यांना स्वतःचा कार्यभाग उरकायचा आहे. यासाठी आपण किती लोकप्रिय आहोत हे लोकांना भासवणे त्यांना गरजेचं वाटल्याने महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. लोकमानस विरोधात याची खात्री होती, तरीही एनकेन प्रकारे ही निवडणूक जिंकलीच पाहिजे हा संघाचा आदेश असणार हे नक्की.महाराष्ट्रात महायुतीला जिंकणं किती गरजेचं होतं, हे वर आलेच आहे, जर जिंकले नसते तर एक देश-एक निवडणूक असे भारताला विभागणारे बिल आणलं च नसतं. म्हणून या-ना-त्या मार्गाने जिंकवून घेतलं. ही बाब कठोर चौकशीच्या फेऱ्यात येईल म्हणून जम्मू काश्मीर व झारखंड मध्ये, अनैतिक मार्ग अवलंबला नाही. सगळ्या निवडणुका एकत्र घेऊन विविध राज्यांमध्ये खदखद निर्माण होईल, त्यांच्या अस्मितेला धक्का पोहचेल, देशाच्या विरोधात जाण्याचे विचार सुरू होतील मग या देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचेल, एवढं साधं आहे म्हणून प्रत्येक राज्याला अनेक विषयांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची मोकळीक या संविधानाने दिली आहे. परंतु एकात्मतेला धक्का लागेल असे कोणतेही विषय राज्याच्या अखत्यारीत नाही, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सशक्त केंद्र व राज्यांच्या प्रादेशिक अस्मितेला धक्का न लावणे हा आपल्या संविधानाचा गाभा आहे, या गाभ्यालाच उध्वस्त केलं जातंय. व्यक्तिगत पैशाचे लोभ व पद देऊन पक्ष फोडून तरीही जमणार नाही हे लक्षात आल्याने साम, दाम, दंड, भेद या त्यांच्या प्रिय सूत्राने सत्ता मिळविणे हेच त्यांचे ध्येय होते. हे कशासाठी केलं जातंय तर राजकीय सत्तेतुन सामाजिक वर्चस्व निर्माण करणं.
एक देश-एक निवडणूक मधून त्यांना राजकीय वर्चस्व निर्माण करायचं आहे, परंतु हे करताना देश विभागला जाईल, तुकडे होतील याचं भान नाही या लोकांना. देशाचं हित या लोकांनी कधी पाहिलं नाही म्हणून इंग्रज २०० वर्ष राज्य करू शकले.
– सुनील कदम आंबेडकरी अभ्यासक (मुंबई)