मागील एक महिन्यात महाराष्ट्रातील एक महिला आयएएस अधिकाऱ्याने नियुक्तीप्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याबाबत प्रसार माध्यमांनी बरीच सतर्कता दाखवली आहे. “परीक्षेत अपव्यवहार करणे ही प्राचीन परंपरेच्या शृंखलेतील अद्यावत घटना आहे असेच म्हणावे लागेल. साधन-संपन्न लोक आपले विशेषाधिकार अबांधित ठेवण्यासाठी या स्तरालाही उतरतात, यांची असंख्य उदाहरणे पौराणिक काळापासून आढळतात. एकलव्य-द्रोणाचार्याचे चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे.” भारतात एकूण ३५११ आय.ए.एस अधिकारी आणि ५०४७ आय.पी.एस. अधिकारी आहेत. याच अधिकाऱ्यांच्या जोरावर देशातील दहा टक्के जनसंख्या ९०% जनतेवर राज्य करीत असते. नुकताच यूपीएससीचे चेअरमन प्रा. डॉ. मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा जाहीरनामा दिला व तो मंजुरही झाला. चौकशीच्या प्रक्रियेत मुख्य पदाचा कुठे अडथळा येऊ नये, तसेच आयएएस अधिकारी पूजा खेडकर, ज्यांच्या घोटाळ्यामुळे हा भ्रष्टाचार समोर आला, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याच्या मानसिक तयारीतून हा राजीनामा दिला असेल, तर ते योग्यच आहे. मात्र तरीही काही गंभीर प्रश्न या प्रकरणातून निर्माण होतात, त्याची दखल घेणे आवश्यक आहे.
- यूपीएससी सारख्या केंद्रीय शासन स्तरावर जवळपास ८५५८ व त्याहीपेक्षा जास्त अत्यंत महत्त्वाच्या पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये ओळखपत्र बदलवण्यापासून नंतर नियम नसतानाही अकरा वेळा परीक्षा दिली जात असेल, दिव्यांग प्रमाणपत्र वारंवार बदलविले जात असेल तर त्यामध्ये संपूर्ण व्यवस्था गुंतली असण्याचा संशय निर्माण होतो.
- वर्तमान शासन व्यवस्थेत मागील दहा वर्षांपासून देशातील विद्यापीठ, प्रशासकीय महत्त्वाच्या पदप्रक्रियेत एका विशिष्ट सामाजिक संघटनेशी संबंध असलेल्या उमेदवारांची थेट भरती केली जात आहे, हे उघड सत्य आहे. म्हणजेच देशातील सर्व प्रशासनिक संस्थांवर विशिष्ट विचारसरणीचाच पगडा असावा, या मानसिकतेतून तर हा भ्रष्टाचार करण्यात येत नाही?
- मागील दहा-पंधरा वर्षापासून देशातील तळागाळातील गरीब व आंबेडकरी समाजातील युवक साधारणतः बारावीनंतरच्या यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन व बँकिंग सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी दिवस-रात्र अभ्यास करून करीत आहेत. दिल्ली सारख्या मोठ्या शहरात वैद्यकीय, अभियंता किंवा समाजविज्ञान क्षेत्रातील पदवी शिक्षण पूर्ण केले की तो कोचिंग सेंटरमध्ये किमान दोन वर्षे महागडी गुंतवणूक करून अभ्यास करतो व मग आपल्या गावात येऊन स्व-अध्ययन करतो. सुमारे आठ दहा वर्षे तो याच स्पर्धात्मक जगात वावरतो नागपूर शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अनेक अशा अनेक अभ्यासिका कार्यरत आहेत. बौद्ध विहारे सुद्धा अभ्यासिका झाली आहेत. हे विद्यार्थी साधनहीन समाजाची खरे तर बौद्धिक संपत्ती आहे जी, हा समाज स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतः प्रचंड त्याग करून मोठ्या जिद्दीने-चिकाटीने गुंतवत आहे. या विद्यार्थ्यांसोबत जातीय भेदभाव झाल्याचे अनेक उदाहरणे आहेतच. त्यात असे भ्रष्टाचार यूपीएससी सारख्या गणमान्य संस्थात होत असतील तर या विद्यार्थ्यांचे काय होणार? हे प्रकरण उजेडात आले.
यापूर्वी असे प्रकार घडले नसतील का? असे प्रकार घडले तर समाजाचे भवितव्य कसे चांगले राहील? असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. यावर विमर्श होण्याची नितांत गरज आहे.
-डॉ. गौतम कांबळे