Menu

परभणी दंगल: पोलिसांच्या मारहाणीने आंबेडकरी तरुण सोमनाथ सुर्यावंशीचा मृत्यू

– अ‍ॅड. डॉ.भीमराव हाटकर,नांदेड

‘मी येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन !‘ असे म्हणत 5 डिसेंबर 2024 राेजी भारताच्या संविधानाला बांधिल असल्याची आणि राज्यातील काेणत्याही घटकाबाबत दुजाभाव न करता निःपक्ष आणि निष्पक्षपणे राज्यशकट हाकण्याची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजगादीवर विराजमान झाले. यानंतर अवघ्या पाच दिवसानंतर 10 डिसेंबर राेजी परभणी शहरात अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समाेर आणि पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या जवळच असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या शिल्पकृतीची एका इसमाने नासधूस केली हा विचित्र शोकात्मक याेगायाेग आहे की, समाजकंटकांनी घडवून आणलेली कटकारस्थानपूर्वक कृती आहे, याची शहानिशा तपासणी यंत्रणा करीलच, परंतु गृहविभागाने आणि जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरण हाताळताना दाखविलेला गैरजबाबदारपणा व गाफीलपणा यामुळे दलित, बाैध्द आंबेडकरी समाजाला एक नवतरूण उच्चशिक्षित युवकाची शहादत द्यावी लागली ही बाब पुराेगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी निश्चितच आहे. सदर घटनेची पार्श्वभूमीवर, घटनाक्रम व विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.

1) प्रकरणाची पार्श्वभूमीवर दिनांक 10 डिसेंबर :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नाेव्हेंबर 2024 राेजी लागून भाजपा-शिंदे सेना-अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी अशा महायुतीला प्रचंड बहुमत मिळून महायुती महाराष्ट्राची सत्ताधारी झाली. चार पाच दिवस राजकीय विश्लेषणात जाऊन जनता स्थिरावली. आणि नव्या सरकारच्या स्वागतासाठी सज्ज झाली.

तथापि विजयी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पालक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या दिशा दिग्दर्शनात कार्यरत असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना यांनी बांग्लादेशातील हिंदुवर हाेत असलेल्या तथाकथित अन्याय अत्याचाराचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेऊन महाराष्ट्रात आंदाेलनं सुरू केले. या आंदाेलनाचे तात्कालिक कारण असे की, ‘25 नाेव्हेंबर 2024 राेजी बांग्लादेशात हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करणा-या इस्काॅन (International Society for Krishna Consciousness) या संघटनेचे माजी सदस्य चिन्मया कृष्णा दास या महंताला राजद्राेहाच्या आराेपावरून बांग्लादेश सरकारने अटक केली. या अटकेच्या निषेधार्त तेथील हिंदू समुदायाने 26 नाेव्हेंबरला चिन्मया कृष्ण दासाला तात्काळ साेडण्यात यावे यासाठी तीव्र आंदाेलन केले. परंतु चिन्मयदास यांचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यातून दंगल उसळली. या दंगलीत 26 नाेव्हेंबर राेजी सहाय्यक सरकारी वकील सैूल इस्लाम आलिफ यांचा मृत्यू झाला. त्यामुळे चिन्मया दासाला त्यादिवशी जामीन मिळाला नाही. जामिनाची सुनावणी काेर्टाने आता 2 जानेवारी 2025 राेजी ठेवली आहे.‘

बांग्लादेशातील उपराेक्त घटनेत हिंदू समाजावर हाेत असलेल्या अन्यायाच्या विराेधात भारतातील सर्व प्रांतात हिंदू जनजागरण करून केंद्रातील हिंदुत्ववादी माेदी सरकारने बांग्लादेशावर दडपण आणावे या मागणीसाठी संघ आणि त्याचा गाेतावळा कामास लागला. मराठवाड्यात याच मागणीसाठी आठही जिल्ह्यात 10 डिसेंबर 2024 राेजी एकाच दिवशी माेर्चे, निदर्शने, निवेदने आणि भाषणे यांचा कार्यक्रम सकल हिंदू समाज संघटनेने आयाेजित केला. यात परभणीचा समावेश हाेता.

2) परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांत या माेर्चाची तयारी करण्यात आली. माेर्चामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आणि विविध कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा सक्रिय सहभाग हाेता. परभणी शहरातील शनिवार बाजार मैदानातून 10 डिसेंबर, मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ’सकल हिंदू समाज संघटनांचा माेर्चा ’नानल पेठ, शिवाजी चाैक, गांधी पार्क, अष्टभुजादेवी, नारायण चाळ मार्गे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या डाव्या बाजूच्या मैदानात येऊन सभेत रुपांतरीत झाला.

माेर्चामध्ये ’बटेंगे ताे कटेंगे’, ’एक है ताे सेफ है!’ अशा घाेषणा आणि फलक हाेते. या घाेषणा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे याेगी आदित्यनाथ (भाजपाचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा तथा मुख्यमंत्री उत्तर प्रदेश) आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी माेदी यांनी जाहीर सभेत देऊन हिंदू धर्मातंर्गत मतदारांचे ध्रुविकरण करून निवडणुका जिंकल्या. ह्याच घाेषणा या आंदाेलनात सकल हिंदू समाजाने देऊन लाेकांची माथी भटकवली व सरकारी भाषेत बाेलायचे झाले तर…. माथी फिरवली!

सेलू शहरातील माेर्चात तर ’शिवाजी महाराज हे अफजल खानाच्या पाेटात वाघनखे खुपसून त्याची आतडे बाहेर काढीत असलेल्या चित्राचे माेठ्या आकाराचे फलक लाेकांच्या हाती हाेते. या माेर्चाच्या घाेषणा आणि फलक पाहाता या माेर्चातील सकल हिंदू समाजाचा निशाणा हा बांग्लादेशातील मुस्लिम राजवटीच्या आडून महाराष्ट्रातील मुस्लिम, दलित, बाैध्द आणि आंबेडकरवादी समाजाविरूध्द असल्याचे स्पष्ट हाेते. याचे कारण असे की, लाेकसभेच्या आणि विधानसभेच्या दाेन्ही निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील मुस्लिम, दलित व बाैध्द आंबेडकरी समाज हा महायुतीच्या विरूध्द महाआघाडीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच राजकीय नुकसान झालेले आहे. परभणीतील लाेकसभा आणि परभणी विधानसभा ही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपा तथा महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करून जिंकलेली आहे. महाविकास आघाडीच्या विजयात परभणीतील मुस्लिम, दलित, बाैध्द व आंबेडकरवादी जनतेचा माेठा वाटा आहे. हे शल्य भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेला निश्चितच बाेचत असावे अन्यथा आता निवडणुका संपल्यानंतर बांग्लादेशाच्या अंतर्गत प्रश्नावर निघालेल्या परभणीतील हिंदू समाजाच्या माेर्चात ’बटेंगे ताे कटेंगे’, ’एक है ताे सेफ है !’ असे नारे आणि अफजल खानाच्या खुनाचे पाेस्टर लावण्याचे काय कारण असावे?’ याचाही एक पदर हा परभणीतील ’संविधान अवमान’ प्रकरणा- मागे आहे. याचा शाेध तपास यंत्रणेने घ्यावा.

3) सकल हिंदू समाजाचा माेर्चा, निदर्शने, आणि भाषणे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संपताच सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान ’साेपान दत्तराव पवार’ हा इसम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आला व त्याने तेथील संविधानाच्या प्रतिकृती शिल्पाची नासधूस व माेडताेड केली. हा प्रकार त्यावेळी पुतळ्याजवळच असलेल्या काही भीम अनुयायांनी पाहिला आणि ताबडताेब ते तिथे धावून गेले. माेडताेड करणा-या इसमास अडवले. तेथे त्यांची बाचाबाची झाली. ताेपर्यंत इतरही नागरीक तिथे जमले. काहींनी पाेलिसांना काॅल केला. काहींनी त्या इसमास चाेपही दिला. शेवटी साेपान दत्तराव पवार या इसमास पाेलिसांच्या हवाली करण्यात आले.

सदर वार्ता शहरात वा-यासारखी पसरली आणि आंबेडकरी वस्त्यावस्त्यातील युवक, विद्यार्थी, महिलासह नागरिकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे धाव घेतली. या सर्व जमावाने पुतळ्याजवळच असलेल्या रस्त्यावर ठिय्या देऊन रास्ता राेकाे केला. समाजमाध्यमांद्वारे प्रसंगांची क्षणचित्रे शहरात प्रसारित झाली. त्यामुळे संपूर्ण शहरातील विविध भागातील बाजारपेठा काही वेळातच बंद झाल्या. बल्लारशा येथून मुंबईला जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस परभणी रेल्वे स्थानकावर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दाखल झाली असता त्यावेळी काही युवकांनी एक्सप्रेस काही वेळ राेखून या दुर्घटनेचा निषेध व्यक्त केला.

प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने आणि पाेलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रत्यक्ष घटनास्थळास भेट देऊन जनतेला शांततेचे आवाहन केले. आंबेडकरी संघटना आणि नेत्यांनी देखील शांतता पालन करण्याचे आवाहन केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बाैध्दवंदना घेऊन मंगलमैत्री, शांतता व सद्भावाची कामना करण्यात आली. अशाच प्रकारे दिनांक 11 डिसेंबर राेजी शांततापूर्ण बंद व्यापक जिल्हास्तरावर पाळून संविधानाच्या अवमान प्रकरणी निषेध नाेंदविण्याचे

आवाहन आंबेडकरी संघटना आणि नेत्यांनी जनतेला केले. याबाबत जिल्हा प्रशासनास व पाेलिस प्रशासनास पूर्णपणे अवगत करण्यात आले हाेते.

2) आंबेडकरी संघटनांचा बंद दिनांक 11 डिसेंबर 2024 : राेजी पुकारलेला बंद सर्वच व्यापारी आणि दुकानदारांनी अत्यंत शांततेने पालन केला. आंबेडकरी युवकांनी देखील कुठेही आततायीपणा केलेला नाही. दलित, बाैध्द तरूण हे जथ्याजथ्याने शहरातून दुपारपर्यंत फिरत हाेते. हे सत्य आहे. परंतु दुपारी अचानक बंदला हिंसक वळण लागले. ‘शहरातील गांधीपार्क, गुजरी बाजार, सुभाष राेड या व्यापारी पेठेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अनेक दुकानांवर, वाहनांवर दगडेक करण्यात आली. पाेलीस व आंदाेलकांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले‘ असे लाेकसत्तेच्या वार्ताहाराने गुरुवार 12 डिसेंबर राेजीच्या वृत्तपत्रात म्हटले आहे. उपराेक्त दगडेक झालेला एरिया हा शहरातील प्रमुख व मध्यवर्ती बाजारपेठेचा आणि अत्यंत गजबजलेला म्हणजे दरराेज किमान दहा हजार लाेकांची चहलपहल असणारा एरिया आहे. येथील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे असून दुकानदारांच्या अतिक्रमणाने दिवसभर शाेधले तर दगडच काय एखादा गिट्टीचा खडादेखील सापडणार नाही. अशी असणारी परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणा-या आंबेडकरी जथ्यांनी दुकानावर दगडेक केली ही बाब शक्यच नाही. कारण हा जमाव दगडाचा टेम्पाे घेऊन काही फिरत नव्हता. कारण जागाेजागी बंदाेबस्तावर असलेल्या पाेलिसांचा तसा काेणताही अहवाल नाही. मग व्यापा-यांच्या बंद दुकानावर दगडेक काेणी केली?

व्यापाऱ्यांचा दुकानांचे नुकसान करण्याचा दुष्टहेतू काेणाचा? या बाबीची कसून चाैकशी झाली पाहिजे. आंबेडकरी तरुणांच्या जथ्यात भाडाेत्री गुंडांना एका हाती निळे झेंडे आणि दुस-या हाती दगड धाेंडे देऊन, दुकानांवर दगड-फेक करण्यासाठी ज्या समाजविघातक व समाजकंटक प्रवृतींना पाठवून दंगल घडवून आणली त्या दुष्प्रवृत्तीचा आणि शक्तीचा तपासयंत्रणानी शाेध घेतला पाहिजे. कारण किराणा दुकानातून, कापड दुकानातून नेहमी सामान खरेदी करणारा काेणताही ग्राहक त्या दुकानाची नासधूस करीत नाहीत. व्यापाऱ्यांचा, दुकानदाराचा तथा भांडवलदारांचा दुश्मन हा त्याच क्षेत्रातील स्पर्धक असताे. म्हणून बनिया भांडवलदारांनीच आपल्या स्पर्धकांचा काटा काढण्यासाठी आंबेडकरी जथ्यांनी पुकारलेल्या बंदचा गैरायदा घेऊन काट्यांनी काटा काढला. त्यामुळे ह्या प्रकरणात समाजाच्या पायात घुसलेले हेकळणीचे काटे असाेत की येड्या बाभळीचे काटे असाेत, त्या सा-या काटे आणि मुचकण्यांचा शाेध घेऊन काढून टाकल्या पाहिजेत. अन्यथा पायात कुरूप हाेऊन चालणे अवघड हाेते. ताेंडाला फडके बांधून आलेल्या गुंडांचा तपास यंत्रणेने शाेध घेणे आवश्यक हाेते, पण तसे न करता पाेलिसांनी निष्पाप आणि संविधानावर पूर्ण निष्ठा असलेल्या उच्चशिक्षित तरुणांना वेठीस धरले आहे. ही बाब निंद्यनीय आहे.

3) नुकसान भरपाईसाठी व्यापाऱ्यांचा प्रतिमाेर्चा व बंद: 12 डिसेंबर 2024: 10 डिसेंबर राेजीच्या संविधान अवमान प्रकरणी आंबेडकरवादी संघटनांनी 11 डिसेंबर राेजी पुकारलेल्या बंद मध्ये हिंसक वळण लागून झालेल्या व्यापारपेठेतील दुकानांच्या नुकसानीने संतप्त हाेऊन व्यापारी संघाने लागलीच त्याच दिवशी जिल्हाधिका-याची भेट घेऊन दिनांक 12 डिसेंबर पासून दुकाने बेमुदत बंद असतील असे जाहीर करून 12 डिसेंबर राेजी भव्य माेर्चाचे आयाेजन केले.

सदर माेर्चा शहरातील मध्यवर्ती ठिकाण शिवाजी चाैक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढला. हे अंतर दाेन ते अडीच किलाेमीटर आहे. नुकसान भरपाई देण्यात यावी याबद्दल व्यापारी संघटनेने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर पाेलीस अधिक्षक यशवंत काळे, अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार संदीप राजापुरे, पाेलीस निरीक्षक अशाेक घाेरबांड यांच्याशी व्यापाऱ्यांनी संवाद साधून आक्रमक भूमिका मांडली.

व्यापारी मंडळाच्या झालेल्या नुकसानीबद्दल शासन, प्रशासन व पाेलीस यंत्रणेने देखील कमालीची संवेदनशीलता व ममत्व दाखविले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यापारी प्रतिनिधी मंडळाला नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्याची भरपाई शासनाकडून मिळवून देण्याची हमी दिली. पत्रकारांना दिलेल्या माहितीत गावडे म्हणाले, ‘व्यापाऱ्यांच्या 251 नुकसानीच्या प्रकरणात आम्ही पंचनामे करीत आहाेत. यासाठी एक पाेलीस, तीन नगरपालिका कर्मचारी व दाेन मंडळ अधिकारी अशा सहा-सात व्यक्तींचे गट तयार करून दिनांक 12, 13 व 14 अशा सलग तीन दिवस पंचनामे करून त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्याची एक प्रत संबंधित व्यापाऱ्यांस देऊन एक प्रत शासनास सादर करण्यात येईल. असे आम्ही नियाेजन केले आहे. कृपया व्यापाऱ्यांनी त्यांचा बंद मागे घ्यावा.’

विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखिल 12 डिसेंबर राेजी परभणीस भेट देऊन स्थानिक आमदार राहुल पाटील यांच्या समवेत परिस्थितीची पाहणी केली व व्यापाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी आणि पाेलीस प्रशासनाशी संवाद साधला. नुकसान भरपाई देण्याबद्दल तातडीचे प्रयत्न करावेत आणि शांतता राखण्याची खबरदारी घेण्याचे सांगितले. व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून 12 डिसेंबर राेजी सायंकाळी बंद मागे घेतला. एकूणच परभणी बंद दरम्यान झालेल्या व्यापाऱ्यांच्या नुकसानीबद्दल पाेलीस व जिल्हा प्रशासनाने दाखविलेली तत्परता, संवेदनशिलता व प्रेमभाव हा कमालीचा हाेता. हिच वागणूक त्यांनी जर आंबेडकरी जनतेबद्दल दाखविली असती तर परभणीच्या प्रकरणात दाेन जिवांचा बळी गेला नसता. ‘हिंदू व व्यापाऱ्यांना प्रेमभाव आणि संविधानवादी आंबेडकरी जनतेबद्दल वैरभाव‘ असा प्रशासनाचा दुजाभाव या प्रकरणी दिसून आला.

4) व्यापारी व हिंदूंच्या दबावाखाली पाेलीसांचा आंबेडकरी जनतेवर कहर : संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस झाल्याप्रकरणी आंबेडकरी जनतेच्या वतीने 11 डिसेंबर राेजी शांततापूर्ण बंदचे आवाहन केले हाेते. दुपारी 12 वाजेपर्यंत बंद शांततेत हाेता. बंदचे आवाहन करणा-या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजय वाकाेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिका-यांना ‘संविधान शिल्पकृतीची
माेड-ताेड करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कडक कार्यवाही करावी, त्याच्या विरुध्द देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा‘ अशा आशयाचे निवेदन दिले. सदर निवेदन दिल्यानंतर आंबेडकरी कार्यकर्ते आपआपल्या वस्त्यांकडे पांगले. अंदाजे एक वाजण्याच्या दरम्यान शहरातील वसमत रस्ता, खानापूर फाटा व अन्य काही ठिकाणी जमावाने टायर जाळले. तरुणांचा जमाव स्टेशन रस्त्याने शहरातल्या मुख्य चाैकापर्यंत आला. या जमावात काही समाजकंटक, असामाजिक तत्वांचे गुंड ताेंडाला रूमाल बांधून, हातात लाठ्याकाठ्या घेऊन त्यांनी व्यापा-यांच्या दुकानांची नासधूस करायला सुरुवात केली. ही बाब जिल्हाधिका-यांना कळताच त्यांनी जमावबंदीचे आदेश लागू करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

सदर परिस्थिती जिल्हा पाेलिस यंत्रणेच्या हाताबाहेर गेल्याचे कळताच नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे 11 डिसेंबर राेजी दुपारी दाेन वाजेपर्यंत परभणी शहरात दाखल झाले. त्यांनी अतिरिक्त पाेलिस फौजफाटा मागवून घेतला. राज्य राखीव पाेलीस दलाच्या काही तुकड्या मागवून घेतल्या आणि स्वतःच्या नियंत्रणात त्यांनी दुपारी अंदाजे तीन वाजल्यानंतर जिल्हाधिका-याच्या जमावबंदी आदेशानंतर काेम्बिंग ऑपरेशन सुरू केले. रस्त्यावर दिसणा-या निळ्या गमचेवाल्यांना, हातात निळा झेंडा असणा-यांना निर्दयपणे ठाेकून काढले. भीमनगर, गाैतम नगर, आंबेडकरनगर, शंकरनगर, राहुल काॅलनी, अजिंठा नगर, खानापूर फाटा इत्यादी आंबेडकरी समाजाच्या नगरांमध्ये पाेलीसांच्या तुकड्या हातात दंडे घेऊन गेल्या आणि ज्या घरावर अशाेकचक्र आहे, ज्या घरावर निळा ध्वज आहे, जिथे पंचरंगी ध्वज आहे, अशा घरात घुसून त्यातील महिला, मुलांना, वृध्दांना युवकांना निर्दयी मारहाण करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द संबंधीत पाेलीस ठाण्यात एफआयआर दाखल केले. प्रत्यक्ष जायामाेक्यावर दुकानांची नासधूस करतांना पाेलिसांनी काेणालाही ताब्यात घेतले नाही. परंतु नंतर वस्त्यावस्त्यात जाऊन सायंकाळी पाचनंतर काेम्बिंग ऑपरेशन सुरू करून ते रात्री नऊ वाजेपर्यंत जवळपास नऊ एफआयआर दाखल केले. यामध्ये 52 व्यक्तींना अटक करून 400 लाेकांविरुध्द अजामिनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. पाेलिसांनी केलेली मारहाण क्रूर, निर्दयी व निघृण हाेती. पाेलिसांनी दलित वस्त्यामध्ये आंबेडकरी जनतेच्या घरात घुसून मारहाण करताना महिला, लहान बालके, वृध्द, बिमार व्यक्ती, अशा काेणत्याही बाबींचा विचार न करता आपल्याला असलेल्या अधिकाराचा बेलगाम वापर करून लाठीहल्ल्याचा कहर माजविला.

5) पाेलिसांच्या निष्ठुर मारहाणीने आंबेडकरी तरुण साेमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू : परभणी येथील संविधान शिल्पाची नासधूस झाल्या प्रकरणी केलेल्या प्रतिक्रियात्मक घटनेची समाजाला जबर किंमत चुकवावी लागली आहे. पाेलिसांनी 11 डिसेंबरच्या बंद प्रकरणात झालेल्या दुकानांच्या ताेडाेडीच्या नुकसानीस आंबेडकरी जनतेला जबाबदार धरून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पाेलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनात राज्य राखीव पाेलीस दलाचे पाेलीस आणि स्थानिक पाेलिसांनी अत्यंत निर्दयतेने केलेल्या मारहाणीत विधिशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तिस-या वर्षाचा विद्यार्थी साेमनाथ व्यंकट सूर्यवंशी (वय 35 वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. साेमनाथ हा जमावात सहभागी हाेता. परंतु त्याने काेणतीही दगडेक केलेली नव्हती. कायदा व संविधानाचा अभ्यासक म्हणून संविधानाविषयी असलेली आस्था आणि संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने त्याच्या जीवनास मिळालेली प्रेरणा यातून ताे आपला माेबाईल, घेऊन आंदाेलनाचे चित्रिकरण करीत हाेता. बस्स! या एकाच कारणावरून पाेलिसांनी त्याची पाठ दंडुक्यांनी फोडून काढली. त्याला 11 डिसेंबर राेजी गंभीर गुन्ह्याखाली अटक केली आणि 12 डिसेंबर राेजी त्याला इतर व्यक्तीसह न्यायाधीशासमाेर हजर करून पाेलिस कस्टडी मागण्यात आली. दिनांक 12 व 13 राेजीची पाेलीस कस्टडीनंतर सर्वांना परत दाेन दिवसाची न्यायालयीन कस्टडी देण्यात आली. पाेलीस कस्टडीमध्ये या तरुणांना निष्ठुरपणे मारहाण करण्यात आली असावी. ज्यामुळे 15 डिसेंबर 2024 रविवारी सकाळी साेमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कस्टडीतच मृत्यू पावला. सदर तरुणाचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याची पाेलिसांनी प्रथम केली. परंतु विजय वाकाेडे आणि आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी सूर्यवंशीचा मृत्यू हा पाेलिसांच्या मारहाणीमुळेच झाला आहे तेव्हा त्याचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ’इन कॅमेरा’ करावे अशी मागणी केली. शवविच्छेदन नांदेड येथे करण्याचे प्रशासनाने ठरविले हाेते. परंतु कार्यकर्त्यांनी त्याला प्रचंड विराेध केला. शेवटी रविवारी दुपारी साेमनाथचे पार्थिव शवविच्छेदनासाठी माेठ्या पाेलीस बंदाेबस्तात छत्रपती संभाजीनगरला रवाना करण्यात आले. 16 डिसेंबर, साेमवारी सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे सहा डाॅक्टरांच्या पथकाने ’इन कॅमेरा’ शवविच्छेदन केले. नियमित शवविच्छेदनाला एक ते दीड तास लागताे. मात्र हे शवविच्छेदन 3 तास चालले. सकाळी 11 वाजता शवविच्छेदन पूर्ण झाले. त्यानंतर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समाेर आला. प्राथमिक अहवालानुसार साेमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा ’शाॅक फॉलाेइंग मल्टिपल’ इंज्युरी म्हणजे अनेक जखमांमुळे रूग्ण शाॅक’ मध्ये गेल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.
अशा प्रकारे संविधानाच्या रक्षणार्थ रस्त्यावर येऊन प्रशासनाला जाण निर्माण करुन देण्याचा प्रयत्न करणा-या एका उच्च विद्याविभूषित कायदा तज्ञाला पाेलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जिवानिशी खतम केले. साेमनाथ सूर्यवंशी याला या मुक्ती विमर्श परिवाराच्या वतीने. साश्रू आदरांजली !

प्रति.
मा.ना. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई – 32.
विषय: परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समाेरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस- त्यातून आंबेडकरी अनुयायांचा उद्भवलेला उद्रेक आणि पाेलिसांनी केलेल्या धरपकड व मारहाणीने न्यायालयीन काेठडीत साेमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांतर्गत न्यायालयीन चाैकशी करून संबंधित दाेषींना कडक शिक्षा हाेण्याबाबत निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *