Menu

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न

– अरविंद गेडाम. नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न कठीण होते. तरीसुद्धा त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा रथ एका निर्णायक टप्यावर आणून ठेवला. त्यांनतर मात्र दलित समाजाला सक्षम नेतृत्व मिळालं नाही. तत्कालीन नेत्यांनी वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधून समाजबाधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे.

अरविंद गेडाम. नागपूर

दलित समाज आता नेतृत्वहीन असून फक्त बाबासाहेबांचे विचारधन व प्रेरणाच या समाजाचे नेतृत्व करत आहे. राजकारणाचा विचार केला तर समाज सैरभैर झालेला असला तरी राजकीय शहाणपणाने मतदान करत असल्याचे निवडणूक निकालाने सिद्ध केलं आहे. परंतु या स्थायी भूमिकेने आपले प्रश्न सुटणार नाही हेही तितके खरं आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या घटना, जातीयवादातून होत असलेलं मानसिक खच्चीकरण व राजकीय हस्तक्षेप या प्रकारांमुळे समाजाला न्याय मिळण्याच्या आशा संपल्यात जमा आहेत. वेळप्रसंगी ज्यांच्याकडे आशेच्या नजरेने पाहावे असे राखीव मतदार संघातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी चिडीचूप असतात. दलितांच्या प्रगतीच्या वाटेत सवर्णांची अरेरावी सहन करता करता हा संघर्षशील समाज आता मात्र हतबल झालेला दिसून येतो. या समाजातील संघर्ष शक्तीला पुन्हा नव्याने उभारी देण्याची गरज आहे, असं समाजघटकांना वाटायला लागलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला पाहिजे. आता राजकारण्यांवर अवलंबुन न राहता लोकचळवळीतून आपले घटनादत्त अधिकार प्राप्त करून घेतले पाहिजे. स्वार्थी राजकारण्यांच्या मागे जाऊन आपली फसगत झाली हे जनतेने ओळखले पाहिजे. आता गावातून, शहरातून या विखूरलेल्या समाजातील बुद्धिमान, आणि मागील पिढीतील प्रामाणिक अनुभवी कार्यकर्त्यांनी सामूहिक नेतृत्व स्वीकारून मार्गदर्शन केलं पाहिजे. दिक्षाभूमी, चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने एकत्र येणारा आपला समाज आजही आपल्या अस्तित्वाच्या लढ्यात उतरण्यासाठी सज्ज आहे. त्याला गरज आहे प्रामाणिक, समर्थ नेतृत्वाची. साहित्यिक, बुद्धीजीवी, आणि मागील पिढीतील प्रामाणिक राजकीय नेत्यांनी त्यांच्या चळवळीच्या अनुभवातून नवीन दिशा देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या पिढीतील नवीन तरुणांच्या मनगटात समाज परिवर्तनाची ताकद आहे. या शक्तीला चळवळीच्या उभारणीत संधी दिली पाहिजे. त्यामुळे नेतृत्वहीन झालेल्या या समाजाला पुन्हा एकदा दलित क्रांतीसाठी सज्ज करण्याच्या प्रक्रियेला गतिमान करता येईल, असा विश्वास वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *