Menu

आदिवासींसाठी आंबेडकरी चळवळ व चळवळीतील आदिवासी

डॉ. सुनिता सावरकर, औरंगाबाद

प्रस्तावना :

            सामाजिक प्रबोधनाच्या काळात भारतातील संपूर्ण सामाजिक संरचना ढवळून निघाली. भारतातील पारंपरिक सामाजिक वहिवाटी, प्रथा आणि परंपरा यांमध्ये बदल घडून आले. प्रबोधनाच्या या काळात वर्षानुवर्षे कोंडित सापडलेल्या समुहांनी स्वत:ला मुक्त करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि स्त्रियांचे लढे महत्त्वाचे आहेत. आंबेडकरी चळवळीत महार, मांतग, चांभार, ढोर, वाल्मीकी, मराठा, ब्राह्मण, कायस्थप्रभू आणि आदिवासी इत्यादी सर्वांचे कमी अधिक संदर्भ येतात. जो समाजच आधुनिक समाजाचा भाग नव्हता आणि गावगाड्याचा देखील कधीच भाग नसणाऱ्या भिल्ल जमातीचा आंबेडकरी चळवळीत सहभाग असणे हे विशेष आहे त्याची नोंद घेणे गरजचे आहे. त्यासाठी इतिहासातील आंबेडकरी चळवळीशी सबंधीत काही पुरावा आहे का याचा शोध घेतांना आंबेडकरी चळवळीत आदिवासी भिल्ल जमातीचा उल्लेख असल्याचे दिसून येते. खरं तर अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विविध समूह तसेच विविध विषय यांच्या अनुषंगाने अनेक अभ्यासक चर्चा करतात, लिहितात त्यामध्ये आदिवासी हा विषय अनेक विद्वानांनी चर्चेला घेतला आहे त्यावर लिखानही केले आहे. बाबासाहेब आणि आदिवासी या विषयावर लिहिताना अभ्यासक फक्त त्यांची संविधान सभेतील व वर्तमानपत्रातील मते मागील पुढील संदर्भ विचारात न घेता स्वतःला पाहिजे तशी वापरुन लिहितात, बोलतात. परंतु आदिवासी आणि बाबासाहेब यांच्या संबंधातील पूर्ण सत्य जाणून घेतल्यानंतर बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी यांचा आदिवासी समुहा संबधीचा खरा विचार आपणास समजण्यास मदत होईल.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासींचा जवळचा संबंध आहे. त्यामध्ये विशेषत्वाने आदिवासींशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आंबेडकरी चळवळीशी आदिवासी स्त्रियांचा असा हा संबंध दुहेरी स्वरूपाचा आहे. उन्नत समाजापासून लांब असलेला, आपल्या नैसर्गिक प्रथा-परंपरांना जपणारा आदिवासी समूह एतद्देशीय समाजाने चोर ठरवला आणि इंग्रजांनी गुन्हेगार. या दोन्ही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदिवासिंचा व आदिवासी  स्त्रियांचा आंबेडकरी चळवळीतील सहभाग समजून घेणे गरजेचे आहे. तसेच भारतातील स्त्रीमुक्तीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील सहकार्यांचा आदिवासींच्या प्रश्नांशी असलेला संबंध समजून घेणे आवश्यक आहे. समतेसाठी संघर्ष करणारी आंबेडकरी चळवळ ही सर्वव्यापक होती. १९२० पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंबेडकरी चळवळीची सुरुवात झाली ही चळवळ फक्त अस्पृश्य समाजाला जागृत करणारी नव्हती. तर अखिल मानवी कल्याणाच्या दृष्टीने समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळून देण्यासाठी काम करणारी चळवळ होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी यांचा सर्वप्रथम संबंध १९२८ ला स्टार्ट कमिटीच्या माध्यमातून आला. अस्पृश्य व आदिवासी किंवा जंगलात राहणाऱ्या समुहाला समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीत बदल घडून आणण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण  कायदे करण्यासाठी, सामाजिक स्तरावर अभ्यास करण्यासाठी ही कमिटी नेमली होती. या कमिटीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक सदस्य होते. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून काही ठिकाणी बैठका झाल्या त्यात बाबासाहेबांसोबत अस्पृश्य समाजातील काम करणाऱ्या सहकार्यांचाही समावेश आहे.

आदिवासी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकरी चळवळ ज्या ज्या भागांमध्ये कार्यरत होती त्या त्या भागातील नाकारल्या गेलेल्या समूहाचे प्रश्न चळवळीने घेतले. आदिवासिंचा आंबेडकरी चळवळीत असलेला सहभाग आणि आंबेडकरी चळवळीने आदिवासींचे घेतलेले प्रश्न असा दुहेरी विचार व्हायला पाहिजे. याची काही उदाहरण आपल्याला दिसून येतात.   दि. १० नोव्हेंबर १९४० रोजी पश्चिम खान्देश दलित परिषदेचे दुसरे अधिवेशन तळोदे येथे पूर्व खान्देश जिल्ह्याचे स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार दौलतराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भरले. यामध्ये तळोदे येथील एका बहुरुपे नावाच्या लहानशा गावात ही सभा भरली होती. या गावात १०० भिल्ल व ५/१० महार कुटूंबाच्या झोपड्या होत्या. हे सर्व भिल्ल व महार एकाच भागात गुण्या गोविंदाने राहत त्या गावातील गुज्जर लोकांकडून या लोकावर कायम अन्याय होत असे. या सभेत पुढील ठराव पास झाले.

१) या जिल्ह्यात फॉरेस्ट जमिनी ज्या पडीत आहेत. त्या सरकारने भिल्ल समाज व अस्पृश्य समाजास मोफत खडण्यास द्याव्यात अशी ही परिषद सरकारास विनंती करीत आहे. तसे जर सरकारने दिले नाही तर ही परिषद या जमिनींबाबत सत्याग्रह करणार आहे. अशी सुचना ही परिषद सरकारास देत आहे.

२) भिल्ल बोर्डिंग स्कूलमध्ये व हरिजन बोर्डिंगमध्ये सूतकातण्यात येते तरी तसे तेथे सूत कातण्याकरिता तरी अस्पृश्यावर सक्ती करण्यात येऊ नये. अशी ही परिषद सरकारास विनंती करीत आहे.

३) कोणत्याही सरकारी ऑफीसात व म्युनिसीपालटिमध्ये स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव (पिण्याच्या पाण्याबाबत) होतो. तो होऊ नये, अशी विनंती ही परिषद सरकारास ही परिषद करत आहे.

४) सरकारने ११ महिन्याच्या करारावर ज्या जमिनी अस्पृश्य व भिल्ल समाजाकडून काढून घेण्यात आल्या होत्या तरी ही परिषद अशी विनंती करते की त्या जमिनी वरील लोकांस ११ महिन्यांच्या कराराने पुन्हा द्याव्या.

५) दि. लोकलबोर्डिंग व म्युनिसीपालटीत व ग्रामपंचायतीत अस्पृश्य व भिल्ल समाजास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्याबाबत ही परिषद सरकारास विनंती करीत आहे.

६) कोंडवाड्याबद्दल महार लोकास मिळणारी सोडबांध वेळच्यावेळी मिळत नाही (महिना अखेर देतात) त्यामुळे त्यांचे नुकसान होते. तरी ही परिषद सरकारास अशी विनंती करीते की, कोंडवाड्याची सोडबांध गावकरी महारास ताबडतोब मिळावी.

पश्चिम खान्देश जिल्ह्यात ज्या-ज्या गांवी भिल्ल  लोकांची वस्ती आहे. त्या-त्या गावी नदीकाठी असलेले डोंगरमळे कमीत कमी शेतसारा घेऊन प्रथम भिल्ल लोकांना देण्यात यावे व त्यानंतर इतरांच्या अर्जाचा विचार करण्यात यावा.

या परिषदेचे श्रेय मुख्यतः भिल्ल पुढारी श्री संपत सुरका पाटील, भाई पुनाजी लळिंगकर यानांच दिले गेले व या परिषदेत भिल्ल स्त्रियांनी दाखवलेली आस्था ही अवर्णनिय होती. या वरून आंबेडकरी चळवळ आदिवासींच्या  प्रश्नावर  कश्याप्रकारे काम करत होती हे दिसून येते.

खांदेशातील समकालीन वृत्तपत्रात नाशिक येथील ‘गुणाजी मास्तर’ यांनी आपल्या एका लेखामध्ये हिंदू महासेभला ठणकावून विचारले की, ‘हिंदूंचे संघटन झाले पाहिजे असे हिंदू महासभा जोरदारपणे प्रतिपादन करते. पण महार, मांग, चांभार, मांगगारुडी, फांसे पारधी, वैदू लवंगे गोसावी इ. लाखो हिंदू लोकांना आहेत तसेच आपल्यापासून फार, फार दूर ठेवून कोणत्या हिंदूचे संघटन करणार’ असा प्रश्न उपस्थित केलेला होता.गुणाजी मास्तर हे खांदेशातील आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे कार्यकर्ते आहेत.   आंबेडकरी चळवळीला व भिल्ल आदिवासी जमातींना जोडण्याचे काम आंबेडकरी चळवळीचे खानदेशातील कार्यकर्ते पुनाजी लळींगकर यांनी केले. हे भिल्ल जमातीसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी कायम झगडणारे नेते होते. त्याचबरोबर भिल्ल जमातीला त्यांचे राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले होते त्याची माहिती देणारा लेख जुने धुळे, महारवाडा येथील अण्णा नेतकर या खानदेशातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याने लिहिला आहे. ‘भिल्ल समाजाची रास्त तक्रार’ या मथळ्याखाली भिल्ल समाजाविषयी माहिती आली आहे. भिल्लांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या निम्मी असल्यामुळे डि.लो. बोर्डात एकूण ४१ जागांपैकी त्यांना अर्ध्या जागा देण्यात याव्या व ज्या भागात तुरळक वस्ती आहे. तिथे एकही जागा दिली नाही. तसेच ज्या ९ जागा दिल्या आहेत. त्यांची ६ जागा पश्चिम भागाला व ३ जागा पूर्व भागाला द्याव्या. अशी सूचना या लेखातून आलेली आहे. यावरून आंबेडकरी चळवळीचा दूरदृष्टिकोन दिसून येतो. डि.लो. बोर्डात त्या भागातील प्रतिनिधी गेल्यामुळे त्या भागात जागृती होऊन तो भाग प्रगत होईल. सरकारने जी ६ विद्यार्थी वसतिगृहे काढली होती, ती सर्व एकच भागात असल्याने दुसऱ्या भागांत जिथे भिल्लांची वस्ती आहे. तिथे एकही बोर्डिंग नाही. तर, तिथे बोर्डिंग सुरू केले पाहिजे, हा दृष्टिकोन भिल्लांच्या मुला- मुलींच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचा होता याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. भिल्लांची वस्ती असणारा एक भाग प्रगत व दुसरा अप्रगत असे चित्र दिसू नये, म्हणून पुनाजी लळिंगकर यांची तळमळ दिसून येते. त्यामुळे त्यांनी अन्ना नेतकर यांना ही बातमी देऊन या बातमीस प्रसिद्धी देण्यास सांगितले व भिल्ल जमातीच्या प्रश्नांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. पुनाजी लळिंगकर हे खांदेशातिल आंबेडकरी चळवळीचे महत्वाचे कार्यकर्ते होते त्यांनी खांदेशातील भिल्ल लोकांच्या उत्थानासाठी  केलेल्या कार्यामुळे स्वतंत्र मजूर पक्षातर्फे जनरल जागेकरिता उमेदवारी दिली होती.

आंबेडकरी चळवळीतील आदिवासी स्त्रीया        

            समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली आंबेडकरी चळवळ ही स्थानिक पातळीवरील आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांची, त्यांच्या दु:खांची दखल घेताना दिसून येते. या संदर्भात अस्पृश्य समाज कश्याप्रकारे आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढतो याची अनेक उदाहरणे विविध वृत्तपत्रांतून छापून आलेल्या अनेक बातम्या आणि लेखांवरून स्पष्ट होते. डी. जी. जाधव,  पुनाजी लळिंगकर, अण्णा नेतकर व आर. एम. वाहुळे यांच्यासारखे आंबेडकरी  चळवळीतील कार्यकर्ते व नेते आदिवासींच्या संदर्भाने काम करताना दिसून येतात. सोयगाव येथे यशवंत बाळाजी, नागो बाळाजी, श्रीपत बाळाजी, बाळाजी सदु व सोनाबाई भागोजी ही भिल्ल कुटुंबे राहत होती. या कुटुंबांवर होळीच्या दिवशी गुंडांनी हल्ला केला. कोलाहल माजताच  गावातील वतनदार महार लोकांनी भिल्ल वस्तीकडे धाव घेतली. भिल्ल स्त्री-पुरुष जखमी झाले होते. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यात एक वयोवृध्द स्त्री जबर जखमी झाली होती. झालेल्या या अन्यायाच्या विरोधात दलित फेडरेशन तालुका येवलाचे जनरल सेक्रेटरी आर. एम. वाहुळे यांनी तत्कालीन वृत्तपत्रात  बातमी देऊन न्याय मागितला आहे.

पश्चिम खानदेशात तळोदे येथील बहुरूपे या लहानश्या गावात १९४० रोजी स्वतंत्र मजूर पक्षाचे दुसरे अधिवेशन भरले होते.  या अधिवेशनाचे अध्यक्ष डी. जी. जाधव यांची भिल्ल स्त्रियांनी कुंकुम तिलक लाऊन पंचारती ओवाळली. सभास्थानी जाण्यासाठी सजवलेल्या बैलगाडीत अध्यक्षांची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत समोर महार, भिल्ल लोकांचे वाजंत्री, स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा त्यामागे शेकडो भिल्ल स्त्रियांचा घोळका, त्यामागे अध्यक्षांची गाडी, त्यामागे प्रचंड मोठ्या प्रमाणात भिल्ल शेतकरी चालत होते व त्या मिरवणुकीतून भिल्ल स्त्रिया गाणे गात होत्या. 

“आघाडी चले भीमराजा

पिछाडी दलितों की फौजा”

त्याचप्रमाणे

“भिल्ल संभालनेकु जाता है |

वाघळीवाला जाधव साहिब”

या परिषदेचे श्रेय भिल्ल पुढारी संपत सुरक पाटील व स्थानिक दलित नेतृत्व पुनाजी लळिंगकर या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे. या परिषदेत भिल्ल स्त्रियांनी दाखवलेली आस्था ही अवर्णनीय होती. या परिषदेत गाणी गाणाऱ्या प्रमुख भिल्ल मुलींची नावे छुकमा, वारी, मथा, रुक्मा, दुधी, रेणा, गमुना, बुल्फा, दशी, कथी, मदी, झगी, छायति, नुरा, माजा, पुरा, पुनी, तारी, तापी इ. या मुलींच्या गाण्याची जबाबदारी राधाबाई व पोशिबाई या दोन भिल्ल स्त्रियांकडे होती. यावरून आपणास जाणवेल की, भिल्ल स्त्रियांच्या गाण्यांमध्ये बाबासाहेबांचे संदर्भ येतात. याचा अर्थ भिल्ल आदिवासी  जमातीमध्ये आंबेडकरी चळवळ किती रुजलेली होती हे दिसून येते. कोणत्याही समाजातील स्त्रियांपर्यंत एखादा विचार पोहचवणे हे तुलनेने खूप कठीण काम असते. आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेब यांचे भिल्ल महिलांच्या गाण्यांमधील संदर्भ  दाखून देतात की भिल्ल महिलांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी किती आदर आणि विश्वास आहे. एखादी भावना गाण्यामध्ये उतरण्यासाठी त्याविषयी खूप चिंतन आणि मनन करावे लागते. भावनिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या त्या विषयाशी जोडले जाणे गरजेचे असते. ही सर्व प्रक्रिया झाली, तरच एखादा विचार हा गाण्याच्या स्वरुपात येतो. आंबेडकरी चळवळीविषयी या सर्व प्रक्रिया भिल्ल महिलांच्या संदर्भात झाल्या असे दिसून येते.

            आंबेडकरी चळवळीचे “जनता” हे अत्यंत महत्त्वाचे वृत्तपत्र होय. या वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीत अनेक विविध समुहाचे प्रश्न सातत्याने घेतले व २०व्या शतकातील प्रबोधनात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. जनता हे वृत्तपत्र आदिवासी भागापर्यंत सुद्धा पोहचले होते. जनता वृत्तपत्राचे महत्व ओळखून बहुरूपे गावातील भिल्ल आदिवासी स्त्रियांनी एक-एक आणा गोळा करून १ रु. ची देणगी जनता वृत्तपत्राला दिली. राधीबाई, पोसीबाई, फाशीबाई, चौकाबाई, भुर्जाबाई, सारजाबाई, पारीबाई, समाबाई, काशीबाई, कायीबाई, गोदिबाई, बायजाबाई इ. आदिवासी महिलांनी आर्थिक स्वरुपात देणगी दिली.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासीच्या संदर्भाने येणाऱ्या माहितीचा आणखी नव्याने शोध घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीतून आदिवासी समाज व स्त्रियाही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे बाबासाहेब स्वत: आदिवासी मुलींच्या शिक्षणाविषयीचा प्रश्न मांडतात. एवढेच नाही, तर आंबेडकरी चळवळीत  जसे  इतर जातसमुहातील महिला काम करतात अगदी तसेच आदिवासी स्त्रिया सुद्धा काम करतात. चळवळीला त्यांना शक्य तितकी आर्थिक स्वरुपात मदत करतात. गाण्याच्या स्वरुपात त्यांच्या भावना व विश्वास व्यक्त करतात. आंबेडकरी चळवळीतील दुसऱ्या फळीतील नेतृत्व, स्थानिक कार्यकर्ते सुद्धा भिल्ल आदिवासी समाजाविषयी आस्थेने काम करताना दिसतात. जनता हे वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये आदिवासी स्त्रियांच्या सहभागाला आणि  योगदानाला लिखित स्वरुपात जतन केले गेलेले आहे. मानवमुक्तीचा विचार घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही चळवळ वाटचाल करत होती. आदिवासी समूह आणि त्यातही आदिवासी स्त्रिया यांच्या संबंधाने मानवमुक्तीचा लढा लढताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर किती जवळचा संबंध होता हे यावरून दिसून येते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिवासींच्या हक्क आणि अधिकारासाठी संविधानिक पातळीवर भूमिका घेतात त्याच प्रमाणे चळवळीतील त्यांचे कार्यकर्ते आदिवासींच्या प्रश्नांना अगदी स्थानिक पातळीवर समजून घेऊन त्यासाठी प्रयत्न करतात. आंबेडकरी चळवळ ही आदिवासींच्या प्रश्नावर किती गंभीर पणे काम करत होती हे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *