विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याबाबत राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
पंतप्रधानांना लिहिले पत्र; वसतिगृहांच्या दयनीय अवस्थेकडे वेधले लक्ष
नवी दिल्ली अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहांच्या अत्यंत दयनीय अवस्थेबाबत आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या रकमेच्या वितरणातील विलंबाबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, या दोन गोष्टींमुळे देशातील वंचित समुदायातील ९० टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे हे प्रश्न पंतप्रधानांनी तातडीने सोडवावेत. अनुसूचित जाती-जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात होणारी ढिलाई फक्त बिहारपुरती मर्यादित नाही, तर ही परिस्थिती संपूर्ण देशात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने दोन महत्त्वाचे उपाय योजावेत.
एससी, एसटी, ईबीबीसी, ओबीसी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रत्येक वसतिगृहाचे ऑडिट करावे, जेणेकरून तेथे दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता, पोषणयुक्त जेवण आणि शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध होईल, तसेच या त्रुटी भरून काढण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करावा.
शिष्यवृत्तीसाठी निधी वेळेवर वितरित करावा, वितरित करावा, शिष्यवृत्तीच्या रकमा वाढवाव्यात आणि अंमलबजावणीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय ठेवावा, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. निवासी वसतिगृहांची स्थिती अत्यंत भीषण आहे. बिहारमधील दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहाला मी नुकतीच भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांनी सांगितले की ६-७ मुलांना एका खोलीत राहावे लागते. शौचालयांची स्वच्छता, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, मेस, वाचनालय, इंटरनेट यांची उत्तम व्यवस्था उपलब्ध नाही.
वंचित विद्यार्थ्यांसाठी असलेली पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
केवळ कागदावरच आहे. बिहारमध्ये गेली तीन वर्षे शिष्यवृत्ती पोर्टल बंद आहे. २०२१-२२ मध्ये एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यानंतरही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. २०२२-२३ मध्ये १.३६ लाख दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. २०२३ – २४ मध्ये फक्त ६९ हजार जणांनाच शिष्यवृत्ती मि ळाली. शिष्यवृत्तीची रक्कम अतिशय तुटपुंजी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप असल्याचे गांधी म्हणाले.