Menu

कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : सहमतीची हुकूमशाही, ॲरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी

  • लेखक- मिलिंद कीर्ती
  • प्रकाशक – लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई.
    ” २०१४ नंतरच्या वास्तविक भारताचे निर्भीड चित्रण- सहमतीची हुकूमशाही”
  • डॉ. गौतम कांबळे, नागपूर.

मिलिंद कीर्ती हे पत्रकारिता क्षेत्रात ३० वर्षांपासून कार्यरत असून सध्या ते नागपूर येथील एका दैनिकात वृत्तसंपादक या पदावर काम करतात. त्यांनी लिहिलेला ”सहमतीची हुकूमशाही” हा ग्रंथ “कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग” या ग्रंथाचा दुसरा खंड आहे. आर्टिफिशियल इंटेलेक्च्यूअल टेक्नॉलॉजीचा समाजावर होणारा परिणाम हा या पुस्तकाचा अभ्यास विषय आहे. हा ग्रंथ समाज आणि संस्कृती, तंत्रज्ञान आणि समाज, एआय तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत, चौथी औद्योगिक क्रांती आणि राजकारणातील ढवळाढवळ अशा चार भागात विश्लेषित केला आहे. त्यांचा हा ग्रंथ मुंबई येथील लोकवाङ्मय गृह या समाजभिमुख प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे मूल्य या दर्जेदार प्रकाशनावरदेखील निर्भर करते.

लेखक मिलिंद कीर्ती यांनी या ग्रंथात सत्ता चढत्या क्रमाने केंद्रीकरणाकडे थोडी थोडी सरकत जाते व एकदा सत्तेचे केंद्रीकरण झाले की, मग निरंकुशता, सर्वसत्तावाद व त्याचे अंतिम टोक म्हणजे हुकूमशाहीची निर्मिती होय, असे निरीक्षण आपल्या प्रस्तावनेत नोंदवले आहे. भारत हा देश आज नेमक्या कोणत्या स्थितीत आहे, याचे वर्णन त्यांनी याच निरीक्षणासभोवती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. हा निष्कर्ष या ग्रंथाचे सार- तत्व आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. दुसरे म्हणजे- अनियंत्रित अनिर्बंध हुकूमशाहीसाठी सर्वहारा समाजाची सहमती असल्याचे कथन व्यवस्थेद्वारे हेतूपूर्वक निर्माण केले जात असल्याचेही लेखक अप्रत्यक्ष – प्रत्यक्षपणे नमूद करतात.

ग्रंथातील पहिल्या प्रकरणात मोक्ष, निजात, निर्वाण आणि पॉप्युलिझम तसेच दुसऱ्या प्रकरणात सांस्कृतिक वर्चस्ववाद आणि अस्मितांचे अंगार, असे दोन उपविभाग यात आहेत. या ग्रंथाचे ठळक दिसणारे एक वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथातील शीर्षक व उपशीर्षकेदेखील अफलातून आहेत. त्यात मिलिंद कीर्ती यांनी स्पष्ट केलेल्या संकल्पना नवीन तर आहेतच; सोबत त्यांच्या विश्लेषणातदेखील तजेलतेचे दर्शन ठीकठिकाणी होते. या उपभागात धर्माचा मानवी जीवनावर परिणाम, धर्मातील सुखवादाचे तत्व, मेंदूचे कार्य आणि केमिकल लोच्या, मानवी इच्छा आणि पॉप्युलिझम, अल्पसंख्यांक वैदिक ते बहुसंख्यांक हिंदू, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी भारत – नेपाळचे एकीकरण, या उपशीर्षकातील विश्लेषण केवळ माहितीपर म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह नाही, तर ते विचार करायला व विमर्श करायला भाग पाडतात. त्यातील दुसऱ्या उपभागातील सांस्कृतिक वर्चस्ववाद व अस्मितांचे अंगार यात कट्टर हिंदू बनण्याची स्पर्धा, अस्मितेचे राजकारण हे मुद्दे तर खऱ्या अर्थाने कट्टरपंथीयांचे – कट्टर धर्मीयांचे तंतोतंत प्रतिबिंब दाखवते.

या ग्रंथाचा भाग दोन हे तंत्रज्ञान आणि समाज यामधील चौथी औद्योगिक क्रांती आणि हिंदुत्ववादांचा उभार या तिसऱ्या प्रकरणात तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे साम्यवादाचा पाडाव, कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्टित समाजाची घडण, वर्चुअल रियालिटी व ऑगमेंटेड रियालिटी तथा मेटावर्सचे जग आणि तंत्रज्ञानाचे मानवी जीवनावर नियंत्रण, यातील मुद्दे मागच्या पिढीने कधीही न कल्पिलेले जग उभे करतात. या मुद्द्यांचे विश्लेषण वाचून ‘असा विचार आपण कधीच केला नव्हता’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया बाहेर येते. हे वाचताना चार्ली चॅप्लिनच्या सिनेमात उभा केलेल्या ‘माणूस व मशीन’चा संघर्ष प्रकर्षाने आठवतो. सोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापुढे माणसाच्या नातेसंबंधाचे विशेषत: माणूस व समाजाच्या नात्याचे नेमके काय होईल ? अशी भीतीही वाटायला लागते. नव्या पिढीच्या मानसिकतेवर “हे आता असेच होणार, आपण जगायचे तेवढे जगून घ्या ” असा सोयीचा परिणाम होतो की काय ? याचीही चिंता वाटते.

“आभासी सत्याचे वास्तव” या भागातील सर्व मुद्दे माणूस व समाजात जैविक मानसिक द्वंद्व (डायलेक्टिक्स) आणि मानसिक तणाव हे मानवसमाजाचे भले करणार नाही, या कटू निष्कर्षाकडे घेऊन जातात. एआय तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत या तिसऱ्या भागात माहितीवाद आणि कृत्रिम बुद्धिमत्ताधारित अर्थव्यवस्था, विकासाला गुन्हेगारी अर्थव्यवस्थेचा कर्करोग व रोजगारविहीन विकास; तंत्रज्ञानापुढील हतबलता या तीन उपविभागात विश्लेषित केला आहे. या तिन्ही भागात एकूण वीस मुद्द्यांवर लेखकाने चर्चा केली आहे. यात माहिती व कृत्रिम बुद्धिमत्ताधारित अर्थव्यवस्था- अर्थव्यवहार, नवीन जागतिक अर्थव्यवस्था, श्रमिकांच्या सौदा- शक्तीवर परिणाम, जागतिकीकरण की गुलामीचे षडयंत्र, जनतेशी द्रोह, पाच ट्रिलियनचे स्वप्न व देश विकण्यात आघाडी, हवालांचा कारभार : मोठ्या नेत्यांची नावे, मनी लॉंडरिंगचा भस्मासुर, हिंदू जनतेविरुद्ध आर्थिक युद्ध, गुन्हेगारी अर्थव्यवस्थेचा देशाच्या विकासावरील दुष्परिणाम, ऑटोमेशनची सुसाट एक्सप्रेस, ६९ टक्के नोकऱ्या संकटात, कामगार संघटनांचा सफाया, कामगारांची गुलामगिरीकडे वाटचाल असे अत्यंत ज्वालाग्रही मुद्दे समाजासमोर आणले आहेत. हा ग्रंथ वाचताना प्रसिद्ध शायर माननीय जावेद अख्तर यांच्या ‘सच है, वह लिख’ ही वांङमयीन कृती लेखक मिलिंद कीर्ती यांच्या मनात घर करून आहे व तिच्या संदेशानुसार लेखक मानसिकदृष्ट्या कृतिशील झाले असावेत, असे वाटत राहते.

ग्रंथाच्या चौथ्या भागात लेखकाने चौथी औद्योगिक क्रांती आणि राजकारणात ढवळाढवळ हा अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळला आहे. या चौथ्या भागातही एकूण २४ मुद्दे चर्चिले आहेत. यात चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आरक्षण धोरणापुढील आव्हाने व महिलांशी भेदभाव, उलटी गंगा : सामाजिक व आर्थिक लोकशाहीचे अस्तित्व तथा सहमतीची हुकूमशाही, ॲरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी हे भाग फारच महत्त्वाचे आहेत. ही दोन्ही प्रकरणे समाजाचे निद्रिस्त डोळे खाडकन उघडणारी आहेत.

या ग्रंथातील लेखनामध्ये लेखक मिलिंद कीर्ती यांची निर्भीडता, त्याकरिता कोणतीही किंमत चुकविण्याची मानसिक तयारी, वाचकांशी थेट संवाद साधण्याची वृत्ती, लेखनाला संदर्भाची पर्याप्त जोड, विरोधी मताचा समाचार घेताना पाळलेला संयम, मुद्दा समजावून सांगण्याची हातोटी, ग्रंथ लिहिताना पूर्व -आवश्यक अट म्हणून करावा लागणारा प्रचंड अभ्यास, या सगळ्या बाबी आज खरे तर अत्यंत दुर्मीळ झाल्या आहेत. मिलिंद कीर्ती यांनी मात्र त्या मौलिक संपत्तीसारख्या जपल्या आहेत, याचे कौतुक व हेवा वाटतो.

प्रस्तुत ग्रंथ सहमतीच्या हुकूमशाहीने ग्रस्त व त्रस्त अशा बहुसंख्य “नाही रे” वर्गातील समाजाने तर वाचलाच पाहिजे. ती त्याची नैतिक जबाबदारीच आहे. मात्र हा ग्रंथ हुकूमशाही आणण्याचे मनात असणाऱ्या धोरणकर्ते, राज्यकर्ते, अर्थव्यवस्थेचे धुरीण, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते; या सगळ्यांनीसुद्धा वाचण्याची नितांत गरज आहे, तो शिक्षित व्हावा यासाठी. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यासाठी ओळखले जातात, ते ‘शहाणपण'(Wisdom) या वर्गात येऊ शकेल, यासाठी त्यांनी हा ग्रंथ वाचला पाहिजे, असे वाटते.

डॉ. गौतम कांबळे, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *