Menu

आदिवासी अधिकारी,शिक्षक व इतरकर्मचाऱ्यांनी समाज सुधारणा गटअंतर्गत ” आदिवासी जनता दरबार “

महिन्याच्या पहिल्या रविवारी ५० टक्के व त्यावरील आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावात सामाजिक,शैक्षणिक,कौटुंबिक व विविध शासकीय योजना संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्रुटी पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन शिबीर गावात सुरु करावे. या समाजसुधारणा गटाला एक स्वयंसेवी सामाजिक कार्यकर्ता नेमावा जेणेकरून कार्यालयीन कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी मदत करू शकेल.जल,जंगल,जमीन कृषी,शिक्षण,अर्थ बँकिंग,कौटुंबिक, वैवाहिक बाबतच्या समस्या तसेच अनाथ,अपंग,निराधार व वृद्ध महिला पुरुष यांच्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी chairperson तयार करावेत.

या कामी सेवानिवृत्त अधिकारी,शिक्षक, व इतरही विभागाचे कर्मचारी यांचीही सेवा “आदिवासी जनता दरबार ” मध्ये रुजू करावी.असे केले तरच जमिनी स्तरावर आदिवासी विकास शक्य आहे.” आदिवासी जनता दरबार ” झाडाची सावली असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी सुरु करता येईल.शक्य झाल्यास कुणाकडे जर या कामाकाजासाठी खोली उपलब्ध केल्यास त्या ठिकाणीही घेता येईल.कारण आदिवासी समाजात विशेषतः शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे व नीट लिहता वाचता येत नसल्यामुळे मार्गदर्शन करणे अत्यंत जरुरीचे आहे.शिकला सवरलेला समाज नोकरी व शिक्षणासाठी शहरात राहायला आलेत.त्यामुळे ग्रामीण भागात अशिक्षित,अडाणी व कमी शिकलेला आदिवासी समाज खेड्यात रूतून बसलेला आहे.

आदिवासीना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षण हा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक आदिवासी शिक्षित झाला पाहिजे.” एक गांव एक वकील ” मोहीमेला आता गती देणे आवश्यक झाले आहे.गावातील कोणताही आदिवासी मुलगा – मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये.सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत, समाजसुधारक,हितचिंतक सेवानिवृत्त अधिकारी,शिक्षक,प्राध्यापक,व इतरही विभागातील सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी समाज सेवा समजून आपला अमूल्य वेळ समाज विकासासाठी दिला पाहिजे.

आपल्या वयाची ५८ वर्षे आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी दया आणि त्यानंतर उरलेले १० वर्षे समाजाचे आपल्यावर असलेले कर्ज समजून समाज विकासासाठी आपला अमूल्य वेळ द्या.” समाजासाठी दोन तास ” अभियान सुरु करा.कारण आपल्याला दिवसाचे २४ तास मिळतात त्यातील २तास समाजविकासासाठी वापरून उरलेले २२ तास तुम्ही आपल्या स्वतःसाठी व कुटुंबासाठी राखून ठेवा.आपण स्वतः साठी व कुटुंबासाठी तर २४ तास राबतोच पण समाजाच्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी फक्त दोन तास उपयोगात आणा तरच तुमच्यावर असलेल्या समाजाच्या कर्जाची परतफेड होऊ शकेल.

कुटुंबाचे कर्ज तर आपल्याला जन्मभर फेडावेच लागते तसे आपल्याही समाजाचे ऋण आपल्यालाच फेडावे लागेल, नाहीतर उभा जन्म वाया जाईल आणि समाजाचे ऋण तसेच कायम राहील. कारण आपण ज्या समाजात जन्मलो,लहानाचे मोठे झालो त्या समाजाला आपण हे जग सोडून जाण्यापूर्वी काहीतरी द्यायचे आहे. हे जीवनाचा आनंद घेताना लक्षात असू द्या.कारण हा आपला सुंदर जन्म पुन्हा कधीच येणार नाही.

प्रा.नरेंद्र सरस्वती उदेभानजी पेंदामकर ( सेवानिवृत्त )
आदिवासी संस्कृती साहित्य कला आरोग्य करिअर कायदा क्रीडा शिक्षण संशोधन अध्यासन फॉउंडेशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *